You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राहुल गांधींच्या यात्रेबाबत काय म्हणत आहेत लोक? इंदिरा आणि राजीव गांधींचा का होतोय उल्लेख?
- Author, सीटू तिवारी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
बिहारच्या लखीसराय जिल्ह्यातील निस्ता गावाबाहेरून वोटर अधिकार यात्रेचा ताफा जातो आहे.
पावसामुळे रस्ता भिजला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सर्वसाधारणपणे गुरंढोरं बांधलेली असतात. मात्र आता त्यांना मागे करण्यात आलं आहे.
सूर्यगढ्याहून मुंगेरकडे जाणाऱ्या या रस्त्यावर निस्ता गाव आणि जवळपासच्या परिसरातील तरुण, वृद्ध, महिला, मुलं सर्व गोळा झाले आहेत.
महागड्या गाड्या, मीडियाचे ट्रक, यात्रा लाईव्ह दाखवण्यासाठी लावण्यात आलेल्या चालत्या-फिरत्या क्रेन यामुळे लोकांचं कुतुहल वाढलं आहे.
मात्र लोकांना राहुल गांधींना पाहायचं आहे, त्यांच्याशी हस्तांदोलन करायचं आहे.
विशेषकरून तरुण राहुल गांधींशी हस्तांदोलन करण्यासाठी पुढे सरसावतात. मात्र राहुल गांधीच्या सुरक्षेसाठी असलेल्या जवानाच्या सतर्कतेमुळे फार थोडे लोक राहुल गांधीच्या जवळ काही क्षणांसाठी पोहोचतात.
या ताफ्याबरोबर डीजेची गाडीदेखील आहे. त्यामध्ये फक्त राहुल गांधी आणि काँग्रेसवरील गाणीच सुरू आहेत.
'तुमको तनिक नहीं है चिंता जनादेश की, अब तो आएगी सरकार कांग्रेस की..' हे गाणं मोठ्या आवाजात वाजतं आहे. लोकांचा आवाज या गाण्याच्या आवाजात दबून जातो आहे.
गावातील 'शहीद डोमन यादव द्वार'जवळ उभे असलेले रवी कुमार कॅमेऱ्यासमोर बोलण्यास कचरतात.
तरीही ते म्हणतात, "तेजस्वी तर आमचे कायमस्वरुपी नेते आहेत. मात्र, आता राहुल गांधी प्रसिद्ध आहेत. ते सर्वांना 'मतांची चोरी' झाल्याचा मुद्दा लोकांना समजावत आहेत."
वोटर अधिकार यात्रा आता निस्तामधून पुढे गेली आहे. ज्या लोकांनी त्यांच्या स्मार्टफोनमध्ये राहुल गांधींचे फोटो, व्हीडिओ घेतले आहेत, अशांभोवती इतर लोकांनी गर्दी केली आहे. ते त्यांना वारंवार व्हीडिओ दाखवण्यास सांगत आहेत.
वोटर अधिकार यात्रा : 16 दिवसांत 25 जिल्हे
महाआघाडीची 'वोटर अधिकार यात्रा' आता जोर पकडते आहे. राहुल गांधी जिथून जात आहेत, तिथे त्यांचं नाव घराघरात पोहोचतं आहे.
काही वृद्ध लोक इंदिरा गांधी आणि राजीव गांधींबद्दलच्या त्यांच्या आठवणींशी राहुल गांधींना जोडून पाहत आहेत.
पुतुल देवी सफाई कर्मचारी आहेत. त्या म्हणतात की, "राजीव यांचा मुलगा येत आहे. त्यामुळं जास्त साफ-सफाई होते आहे. आम्हाला कायमस्वरुपी सरकारी नोकरी हवी आहे. ती मिळाली तर मी धन्य होईन."
बिहारमध्ये 17 ऑगस्टपासून 'वोटर अधिकार यात्रा' सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या यात्रेची सुरुवात बिहारमधील रोहतास जिल्ह्यातून झाली. 1 सप्टेंबरला ही यात्रा पाटण्यामध्ये संपेल.
16 दिवसांत ही यात्रा 25 जिल्ह्यांमधून 1300 किलोमीटरचं अंतर पार करणार आहे.
या यात्रेत राहुल गांधी यांच्याबरोबर राजदचे नेते तेजस्वी यादव, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी-लेनिनवादी) चे दीपांकर भट्टाचार्य, व्हीआयपी चे मुकेश सहनी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेश राम सहभागी झाले आहेत.
बिहारमध्ये मतदार यादीच्या स्पेशल इंटेसिव्ह रीव्हिजन (एसआयआर) अंतर्गत पहिली मुसदा यादी जाहीर झाली असून त्यात 65 लाख मतदारांची नावं नाहीत.
राहुल गांधींनी महाराष्ट्र, हरियाणा, कर्नाटकमध्ये 'मतांची चोरी' झाल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या आधी ही यात्रा होते आहे.
राहुल गांधी या यात्रेत भाषण करताना वारंवार म्हणतात, "आम्ही बिहारमध्ये मतांची चोरी होऊ देणार नाही."
लखीसरायमधील झापानी गावात एका चहाच्या टपरीवर बसलेले अजय कुमार शर्मा राहुल गांधीच्या सूराशी सूर जुळवतात.
जवळपास 35 वर्षांचे अजय म्हणतात की, "राहुल गांधी आंदोलन करत आहेत आणि सर्व ठीक करत आहेत. सर्वकाही देशहिताचं आहे. मतदारांचा अधिकार हा सर्वात मोठा मुद्दा आहे. विरोधी पक्षांनी हा मुद्दा लावून धरला पाहिजे."
त्यांच्या शेजारी बसलेले जयप्रकाश देखील म्हणतात, "शिक्षण, रोजगार हे मुद्दे तर बिहारच्या निवडणुकीत असेलच पाहिजे. मात्र, जर मतांचा अधिकार नसेल तर राजेशाही येईल."
काँग्रेस फ्रंट सीटवर, राजद बॅकफूटवर?
बीबीसीची टीम, 'वोटर अधिकार यात्रे'मध्ये लखीसराय, मुंगेर आणि भागलपूरला गेली.
या भागांमध्ये संपूर्ण यात्रेदरम्यान काँग्रेसचे झेंडे सर्वाधिक दिसतात. त्यातुलनेत राजद, व्हीआयपी आणि डाव्या पक्षांचे झेंडे खूपच कमी आहेत.
मुंगेरमध्ये राहुल गांधी यांचं भाषण होत असताना राजदचे एक स्थानिक नेते त्यांच्या कार्यकर्त्यांवर रागवत आदेश देतात की, "आपला झेंडा वर करा रे, तो दिसत नाहीये."
या यात्रेत सुरुवातीपासूनच सोबत असलेल्या पत्रकारांचा गट म्हणतो, "काँग्रेस शो स्टीलर आहे. त्यांनीच पैसे खर्च केले आहेत, त्यामुळे तेच दिसतायेत."
अर्थात राजदचे लोक ही गोष्ट नाकारतात. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रमोद कुमार यादव म्हणतात, "आम्ही आघाडी धर्माचं पालन करत आहोत. काही ठिकाणी त्यांचे झेंडे जास्त आहेत, तर काही ठिकाणी आमचे झेंडे अधिक आहेत. आम्ही एकत्र चालत आहोत आणि पूर्ण ताकदीनिशी चालत आहोत."
मात्र काँग्रेसचे झेंडे जास्त दिसण्यामागचं कारण पैसा आहे का? आधीदेखील अनेक कार्यक्रमांमध्ये काँग्रेस पैसे, खर्च करत आली आहे.
मात्र 2025 च्या सुरुवातीपासूनच काँग्रेस पक्षाकडून बिहारमध्ये पक्षाला संघटनात्मक पातळीवर सक्रिय आणि मजबूत करण्याचा प्रयत्न होतो आहे.
कृष्णा अल्लावरू बिहारमध्ये प्रभारी होताच त्यांनी 'हर घर झंडा' सारखे कार्यक्रम चालवले. या कार्यक्रमाअंतर्गत काँग्रेसच्या नेत्यांनी घरोघरी जाऊन काँग्रेसचा झेंडा लावायचा होता.
दुसरं असं की, उमेदवारी हवी असणाऱ्या नेत्यांना त्यांच्या विधानसभा मतदारसंघात जाऊन काम करण्यास सांगण्यात आलं.
या यात्रेआधी काँग्रेस नेत्यांना हा स्पष्ट संदेश देण्यात आला की पक्षाचे पोस्टर, झेंड लावणं ही त्यांची जबाबदारी नाही. लोकांचा यात्रेतील सहभाग वाढवणं ही त्यांची जबाबदारी आहे.
'महिलांना देणार 2,500 रुपये'
24 ऑगस्टला अररिया जिल्ह्यात झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले होते की या यात्रेला येत असलेली गर्दी 'नैसर्गिक' आहे. म्हणजे लोक स्वत:हून गर्दी करत आहेत.
या यात्रेत आलेले लोक 'संमिश्र' स्वरुपाचे असल्याचं बीबीसीला दिसलं. म्हणजे कारकर्त्यांनी, नेत्यांनी आणलेल्या लोकांबरोबरच सर्वसामान्य लोकांची गर्दी.
यात्रा पाहायला आलेल्या उर्मिला देवी म्हणतात, "राहुल गांधी जनतेला भेटायला येत आहेत. गरीब माणसावर भलं करण्यासाठी. ते महिलांना 2,500 रुपये देणार आहेत. जर त्यांनी दिले नाहीत तर आम्ही लोक घरी बसू, आणि काय करू शकतो?"
काँग्रेसनं निवडणुकीच्या आधी 'माई-बहिन मान योजना' आणली आहे. या योजनेअंतर्गत काँग्रेसप्रणीत आघाडीचं सरकार आल्यावर गरजू महिलांना दर महिन्याला 2,500 रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.
तर उर्मिला देवींपासून थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या कंचन देवी म्हणतात, "ते मत मागायला आले की आणखी कशासाठी. गर्दी गोळा झाली होती, म्हणून मला वाटलं आपणही पाहावं."
मुंगेरमधील जमालपूरच्या कैली देवीदेखील त्यांच्या व्यथा मांडायला आल्या आहेत. एका स्थानिक नेत्यानं त्यांना यात्रेत आणलं आहे.
कैली देवी म्हणतात, "आमच्याकडे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. दुसऱ्याच्या विहिरीतून पाणी आणून आम्ही ते पितो. पाण्याची समस्या सुटली तर बरं होईल."
तर, काँग्रेसचा झेंडा हाती घेतलेल्या रिजवाना रागात म्हणतात की, "मतं तर सर्वांनाच हवी असतात, मात्र आम्हाला बेघर मरायला सोडून दिलं जातं. राहुल गांधीबाबत आशा आहे की, ते काहीतरी चांगलं करतील."
इंदिरा-राजीव गांधींची आठवण
मुंगेरहून ही यात्रा नाथनगरकडे गेली. नाथनगरमध्ये रस्त्यापासून घरांच्या गच्चीपर्यंत मोठी गर्दी आहे.
यात्रा पाहण्यासाठी कित्येक किलोमीटर लांबीची रांग आहे. त्यात बहुतांश लोक मुस्लीम समुदायाचे आहेत.
भागलपूरमधील नाथनगर परिसर विणकरांचा भाग आहे. राजदचे अली अशरफ सिद्दकी हे नाथनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
मात्र, इथेदेखील लोकांच्या हातात काँग्रेसचेच झेंडे आहेत. फक्त काही लोकांच्या हातातच राजद आणि डाव्या पक्षांचे झेंडे आहेत.
प्रचंड उकाड्यानं त्रस्त झालेल्या आणि घामानं भिजलेल्या बीबी कैसर म्हणतात, "यांची आजी आणि वडील (इंदिरा-राजीव गांधी) यांनी देखील चांगल्या प्रकारचे सरकार चालवलं आहे. हे (राहुल गांधी) देखील चांगल्या प्रकारे सरकार चालवतील."
"त्यांच्या (राहुल गांधी) सरकारच्या काळात मुस्लिमांना भीती नसेल. रोजगार मिळेल आणि तो शांततेत जगू शकेल. आता तर सर्वकाही उदध्वस्त झालं आहे."
मोठ्या संख्येनं आलेल्या मुस्लीम महिलांमध्ये हिंदू महिलादेखील आहेत. यातील सविता देवी म्हणतात, "तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांना पाहायचं आहे. देशाचं हित साधणारा नेता आम्हाला हवा आहे."
तर विणकामाच्या व्यवसायाशी निगडीत वृद्ध मगफिरत म्हणतात, "आम्हाला वृद्धांचं सरकार नको. तरुणांचं सरकार हवंय. इतकी वर्षे प्रत्येक वेळेस मत देत आलोय आणि आता आमचं नाव मतदार यादीतून वगळण्यात आलं आहे."
"मतदार यादीतून नाव काढून टाकल्यानंतर आमच्याकडे शिल्लक काय राहिलं आणि आता आम्ही कोणाचं सरकार बनवणार?"
अर्थात राहुल गांधी यांच्या 'जलद गती'नं सुरू असलेल्या यात्रेबाबत काही जणांना राग आहे. बिरजू मंडल त्यातील एक आहेत.
ते म्हणतात, "इंदिरा गांधी यायच्या तेव्हा मुलांशी हस्तांदोलन करत चालायच्या. हे आले आणि पैसेवाल्यांशी हस्तांदोलन करून निघून गेले. मतं कोण देतं? गरीब माणूस की श्रीमंत माणूस."
"आम्ही चार तास यांची वाट पाहिली. जर हस्तांदोलनच केलं नाही तर इतकी वाट पाहण्याचा काय उपयोग, तुम्हीच सांगा?"
शिक्षण आणि रोजगाराचाही मुद्दा
'वोटर अधिकार यात्रा' सुरू होण्याच्या आधीपासून महत्त्वाचा प्रश्न होता की, बिहारमध्ये सुरू असलेलं एसआयआर हा आगामी विधानसभा निवडणुकीतील प्रमुख मुद्दा होईल का?
या प्रश्नाचं कोणतंही स्पष्ट उत्तर या यात्रेतून मिळत नाही. मात्र वोटर अधिकार यात्रेत हळूहळू राज्यातील इतर मुद्दे जोडले जात आहेत.
या यात्रेत प्रश्नपत्रिका फुटणं, शिक्षण, रोजगार आणि आधीच सुरू असलेल्या कारखान्यांशी संबंधित सर्वसामान्य माणसं राहुल गांधीसमोर त्यांच्या मागण्या ठेवत आहेत.
भागलपूर शहरातील घंटा घर चौकात जमलेल्या लोकांसमोर भाषण करताना राहुल गांधींनी 'अग्निवीर'चा मुद्दा मांडला.
मुंगेर गन फॅक्टरी असोसिएशनच्या लोकांनी देखील राहुल गांधींची भेट घेऊन निवेदन दिलं आहे.
गन फॅक्टरी असोसिएशनचे संयुक्त सचिव बीबीसीला म्हणाले, "बदललेल्या धोरणांमुळे गन फॅक्टरीशी संबंधित 1500 कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचं संकट निर्माण झालं आहे.
आम्ही लोकांनी राहुल गांधींकडे आमच्या मागण्यांचं पत्र दिलं आहे, जेणेकरून विरोधी पक्षनेते म्हणून त्यांना संसदेत आमचा मुद्दा मांडता यावा."
तर आशा कार्यकर्त्यांनी देखील या यात्रेत त्यांच्या बॅनरसह निदर्शनं करत निवेदन सादर केलं.
आशा कार्यकर्त्या असलेल्या रेखा कुमारी म्हणाल्या, "आम्हाला किमान 26 हजार रुपयांचं मानधन जाहीर करण्यात यावं. तसंच सरकारनं आम्हाला सरकारी कर्मचारी बनवावं. आम्ही दिवसरात्र काम करतो आणि तरीदेखील काहीही मिळत नाही."
तर संतोला देवी म्हणतात की, "आमच्या भागात कारखाना हवा, जेणेकरून पुरुष-महिलांना रोजगार मिळेल. मुलांना शिक्षण देता येईल आणि त्यांना रोजगार मिळू शकेल."
जसजशी ही यात्रा पुढे सरकते आहे, तसतसे यात्रेवर होणारे राजकीय हल्लेदेखील वाढत आहेत.
लोजपा (आर)चे प्रमुख चिराग पासवान यांनी 'राजदला काँग्रेसची चमचेगिरी करणारा' म्हटलं आहे. तर जेडीयूचे नेते अशोक चौधरी यांनी म्हटलं आहे की, 'लालू यादव यांच्याबरोबर राहिल्यास बिहारमध्ये काँग्रेसला भवितव्य नसेल.'
अशा वक्तव्यांद्वारे महाआघाडीतील 'अंतर्गत फटी' अधोरेखित करण्याचा एनडीएचा प्रयत्न आहे.
बिहारमध्ये विरोधी पक्षाचा नेता कोण?
संपूर्ण यात्रेचा विचार केला तर महाआघाडीमध्ये उत्तम ताळमेळ दिसून येतो. तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये राहुल गांधींना मोठी स्पेस देणं, कन्हैया आणि पप्पू यादव यांच्याबद्दल सकारात्मक असणं महाआघाडीच्या एकतेसाठी चांगली बाब आहे.
समाजशास्त्रज्ञ आणि राजकीय विश्लेषक असलेले पुष्पेंद्र बीबीसीला म्हणाले, "विरोधी पक्षांसाठी ही यात्रा खूप महत्त्वाची होती. कारण या यात्रेच्या माध्यमातूनच लोकांना समजवण्याबरोबरच त्यांच्या मनात हा प्रश्न उपस्थित केला जातो आहे की त्यांच्या मतांची चोरी तर होत नाहीना?"
ते म्हणतात, "महाआघाडीच्या कार्यकर्त्यांसाठीही यात्रा चांगली आहे. कारण आपल्याला चुकीच्या पद्धतीनं हरवण्यात आलं, म्हणून आपण सत्तेत आलेलो नाही, याची त्यांना खात्री होत आहे."
"काँग्रेसनं या यात्रेत आघाडी घेण्याच्या मुद्द्याचा विचार करता, राजद आणि वैयक्तिक पातळीवर तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेसाठी ते चांगलं आहे."
रविवारी (24 ऑगस्ट) अररियामध्ये राहुल गांधी, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, सीपीआय (एम-एल) चे सरचिटणीस दीपांकर भट्टाचार्य आणि व्हीआयपी पार्टीचे नेते मुकेश सहनी यांच्यासह महाआघाडीच्या इतर नेत्यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांना एका पत्रकारानं प्रश्न विचारला की, "तेजस्वी यादव यांनी निवडणूक जिंकल्यानंतर तुम्हाला देशाचा पंतप्रधान करण्याची घोषणा केली आहे. मग बिहारमध्ये निवडणूक जिंकल्यानंतर तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री करण्याबाबत काँग्रेस पक्ष भूमिका का स्पष्ट करत नाही?"
राहुल गांधींनी या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर दिलं नाही. ते म्हणाले, "खूप चांगल्या प्रकारे एक पार्टनरशिप बनली आहे. सर्व पक्ष एकजुटीनं काम करत आहेत."
"कोणताही तणाव नाही आणि एकमेकांबद्दल आदर आहे. एकमेकांना मदत केली जाते आहे, त्यामुळे मजादेखील येते आहे. वैचारिक आणि राजकीयदृष्ट्या आम्ही एकत्र आहोत."
पुष्पेंद्र म्हणतात, "राजदची सर्वोत्तम कामगिरी होऊन गेली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांची कामगिरीदेखील चांगली होती. सुधारणेची सर्वाधिक शक्यता काँग्रेसला आहे. तर सरकार बनवण्यासाठी तेजस्वी यांना मात्र दुप्पट जागांची आवश्यकता आहे."
"त्यामुळेच पप्पू यादव, कन्हैया आणि इतर लोकांच्या बाबतीत देखील तेजस्वी यादव खूपच सकारात्मकपणे वागत आहेत."
महाआघाडीला निवडणुकीत या यात्रेचा फायदा होईल का? हा प्रश्नदेखील आहे.
या प्रश्नावर वरिष्ठ पत्रकार आणि लेखक अरुण श्रीवास्तव म्हणतात, "जेव्हा याप्रकारची यात्रा होते, तेव्हा लोक उत्साहानं सहभागी होतात. मात्र मोठा प्रश्न हाच आहे की महाआघाडीला हा उत्साह कितपत टिकवता येईल. दुसरा मुद्दा असा की, बिहारसारख्या तरुण राज्यात महाआघाडीशी तरुण कशाप्रकारे जोडले जाणार."
"मात्र इतकं नक्की आहे की या यात्रेचा आणि या यात्रेच्या ऊर्जेचा प्रभाव दुसऱ्या राज्यांमध्येदेखील दिसतो आहे. तसं नसतं तर अखिलेश यादव, स्टालिन किंवा इतर अनेक मुख्यमंत्री या यात्रेत सहभागी होण्यासाठी बिहारमध्ये आले नसते."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.