बुद्धिबळाच्या खेळाचे प्रकार कोणते?

मॅग्नस कार्लसन आणि डी. गुकेश

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मॅग्नस कार्लसन आणि डी. गुकेश, नॉर्वे चेस टूर्नामेंट
    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी

रंगात आलेला बुद्धिबळाचा एक सामना... भारताच्या गुकेशने एक खेळी केली... आणि वैतागलेल्या कार्लसनने टेबलवर दाणकन हात आपटत आपला पराभव स्वीकारला... सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हीडीओ तुम्हीही पाहिला असेल...

नॉर्वे चेस टूर्नामेंटमध्ये वर्ल्ड चॅम्पियन गुकेशने, वर्ल्ड नंबर 1 मॅग्नस कार्लसनला हरवलं. क्लासिकल चेस प्रकारात यापुढे खेळावं की नाही याचाच विचार आता करायला हवा, अशी प्रतिक्रिया कार्लसनने या मॅचनंतर दिली.

विश्वनाथन आनंदपासून ते आता गुकेश, प्रज्ञाननंद, कोनेरू हंपी, वैशाली, विधित गुजराती या सगळ्यांची नावं आपण सातत्याने ऐकतोय...आणि त्यासोबत क्लासिकल चेस, रॅपिड चेस हे शब्दही... बुद्धिबळाचे हे प्रकार काय आहेत? आणि त्यांची खासियत काय आहे...

बुद्धिबळाचा इतिहास

Chess... म्हणजे बुद्धिबळ... 6 व्या शतकाच्या सुमारास आशियामध्ये या खेळाचा उदय झाला आणि नंतर त्याचा युरोपात प्रसार झाला असं सांगितलं जातं. 'चतुरंग' नावाच्या भारतीय खेळापासून याचा उगम झाल्याचंही म्हटलं जातं. यालाच फारसी आणि अरेबिकमध्ये म्हटलं गेलं - शतरंज.

बुद्धिबळाचे मोहरे

फोटो स्रोत, Getty Images

या बुद्धिबळाच्या पटावर काळे-पांढरे असे 8X8 असे 64 चौकोन म्हणजे घरं असतात. डाव खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूंकडे असतात 16 सोंगट्या किंवा मोहरे. काळ्या आणि पांढऱ्या रंगांचे 16-16 मोहरे. या सोंगट्यांना मोहरे म्हणूनही ओळखतात. पांढरे मोहरे असणारा खेळाडू पहिली चाल करतो. आणि ज्या खेळाडूचा राजा धोक्यात येतो, तो वाचवणं शक्य नसतं - तेव्हा चेकमेट होऊन तो खेळाडू हरतो.

बुद्धिबळाचे वेगवेगळे प्रकार आहेत. यामध्ये खेळाचा वेग - म्हणजे डावामध्ये चाल करण्यासाठी खेळाडूंना किती वेळ मिळतो, हे प्रत्येक प्रकारात बदलतं. Time Control चं हे गणित बुद्धिबळाच्या खेळात तुम्ही करत असलेल्या चालीइतकंच महत्त्वाचं असतं.

Fédération Internationale des Échecs म्हणजे इंटरनॅशनल चेस फेडरेशन - FIDE (फिडे) ही संस्था बुद्धिबळासाठीची नियामक संस्था आहे.

हीच संस्था वर्ल्ड चेस रँकिंग्स जाहीर करते.

क्लासिकल चेस प्रकार

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

क्लासिकल चेसला स्टँडर्ड चेस किंवा स्लो चेस असंही म्हणतात.

बुद्धिबळातला हा लाँग फॉर्म आहे. क्रिकेटमधल्या टेस्ट मॅचसारखा. अधिक काळ चालणारा.

यामध्ये प्रत्येक खेळाडूकडे चाल करण्यासाठी पुरेसा वेळ हातात असतो. साधारण तासभर तरी.

बुद्धिबळाच्या सामन्यामध्ये दोन्ही खेळाडूंच्या बाजूला घड्याळं असतात, हे तुम्ही पाहिलं असेल. प्रत्येक खेळाडू चाल खेळल्यानंतर आपल्या बाजूचं घड्याळ बंद करतो आणि प्रतिस्पर्ध्याचं घड्याळ चालू होतं.

नॉर्वे चेस टूर्नामेंटमध्ये प्रत्येक खेळाडूकडे होती 120 मिनिटं. आणि पहिल्या 40 चालींसाठी म्हणजे चालींसाठी इन्क्रिमेंट म्हणजे वाढीव वेळ मिळत नाही. FIDE (फिडे) वर्ल्डकपसाठी पहिल्या 40 चालींसाठीची मर्यादा होती 90 मिनिटांची.

पुढच्या प्रत्येक चालींसाठी खेळाडूंना ठराविक एक्स्ट्रा वेळ मिळतो. त्यामुळेच क्लासिकल चेसचे गेम्स कित्येक तास चालू शकतात.

इथे प्रत्येक चालीआधी विचार करण्यासाठी वेळ असतो, म्हणूनच चुका होण्याची शक्यता फार कमी असते.

शिवाय प्रतिस्पर्ध्याचे यापूर्वीचे गेम्स, त्याचे डावपेच याच्या तपशीलांचाही खेळाडूंनी अभ्यास केलेला असतो. त्यांनी स्वतःची रणनीतीही आखलेली असते.

डी. गुकेश

फोटो स्रोत, FIDE

अनेकदा हे गेम्स ड्रॉ होतात.

1989 मध्ये इव्हान निकोलिक आणि गोरान आर्सोविक यांच्यात बेलग्रेडमध्ये झालेली मॅच हा आजवरचा सर्वात प्रदीर्घ क्लासिकल चेस सामना आहे. तब्बल 20 तास 15 मिनिटं आणि 269 चालींचा हा सामना - ड्रॉ झाला होता.

रॅपिड चेस

क्लासिकल बुद्धिबळापेक्षा हा आहे- थोडा वेगवान प्रकार... म्हणजे क्रिकेटच्या वन-डे मॅचसारखा. टेस्ट मॅचपेक्षा वेगवान, पण टी-20 पेक्षा स्लो.

याचे नियम क्लासिकल चेससारखेच असतात. पण प्रत्येक खेळाडूकडे संपूर्ण डाव खेळण्यासाठी 10 ते 60 मिनिटांचाच कालावधी असतो.

घड्याळाचा ताण या प्रकारात थोडा वाढतो, त्यामुळे चुका होण्याची शक्यताही वाढते. वेळ जसा संपत येतो - तसं स्लॉग ओव्हर्ससारखं प्रेशर येतं. या टप्प्यात खेळाडू रिस्क घेऊन चाली करतात.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

ब्लिट्स चेस

हा सर्वात वेगवान आहे. क्रिकेटच्या T20 सारखा. ..किंवा टेनिसच्या टाय ब्रेकरसारखा

इथे प्रत्येक खेळाडूला संपूर्ण डाव संपवण्यासाठी जास्तीत जास्त 10 मिनिटं मिळू शकतात. या प्रकारात खेळाडूंना फास्ट विचार करावा लागतो आणि तत्पर हालचाली कराव्या लागतात. 2006 मध्ये पहिल्यांदा वर्ल्ड ब्लिट्झ चेस चॅम्पियनशिप खेळवण्यात आली होती.

ऑनलाईन बुद्धिबळ खेळणाऱ्यांमध्ये हा प्रकार लोकप्रिय आहे.

ऑनलाईन खेळणाऱ्यांमध्ये लोकप्रिय असणारा आणखीन एक प्रकार - बुलेट चेस. हा ब्लिट्झचाच एक प्रकार आहे. यामध्ये खेळाडूंकडे अतिशय कमी वेळ असतो. जेमतेम 3 मिनिटं.

Chess 960 किंवा फिशर रँडम चेस

आधीच्या सगळ्या प्रकारांत बुद्धिबळाचे मोहरे एका विशिष्ट पद्धतीनेच मांडल्या जातात. पण एक असा प्रकार आहे जिथे मात्र मोहऱ्यांची रचना वेगळीच असते. याचं नाव - Chess 960 किंवा फिशर रँडम चेस बॉबी फिशर नावाच्या चेस चॅम्पियने हा प्रकार शोधला. यामध्ये शिपायांची प्यादी नेहमीसारखी दुसऱ्या आडव्या रांगेत असतात. पण पहिल्या रांगेतल्या हत्ती - घोडे - उंट - राणी - राजाची मांडणी तुम्ही तुम्हाला हवी तशी करू शकता.

महत्त्वाच्या बुद्धिबळ स्पर्धा

गुकेश आणि कार्लसनची मॅच झाली ती नॉर्वे चेस टूर्नामेंट 2013 पासून होतेय. म्हणजे कार्लसनचा उदय होण्याआधीपासून. मॅग्नस कार्लसन नॉर्वेचा आहे.

भारताचे बुद्धिबळ खेळाडू

फोटो स्रोत, @aicfchess

फोटो कॅप्शन, 2024 चेस ऑलिम्पियाड जिंकणारा भारतीय संघ

टाटा स्टील चेस - 1938 पासून नेदरलँड्समध्ये होणारी ही स्पर्धा बुद्धिबळातली विम्बल्डन मानली जाते. फक्त 1945 साली - दुसऱ्या महायुद्धामुळे ही स्पर्धा झाली नव्हती.

चेस ऑलिम्पियाड - बुद्धिबळाचं हे ऑलिम्पिक भारतीयांना माहितीच हवं. कारण सप्टेंबर 2024 मध्ये भारतीय टीम्सने ओपन आणि विमेन अशा दोन्ही कॅटेगरीमध्ये जिंकत दुहेरी सुवर्ण पटकावलं होतं.

रॅपिड अँड ब्लिट्झ वर्ल्ड चॅम्पियनशिप - 2024 मध्ये भारताच्या कोनेरू हंपीने महिलांसाठीची रॅपिड चेस चॅम्पियशिप जिंकली होती. तर ब्लिट्झ प्रकारात मॅग्नस कार्लसन आणि इयन नेपोम्नियाची जिंकले होते.

FIDE Grand Swiss आणि FIDE World Cup या स्पर्धा FIDE कडून आयोजित केल्या जातात.

बुद्धिबळाच्या जगातली दुसऱ्या क्रमांकाची महत्त्वाची स्पर्धा - Candidates Tournament. 8 सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये याचे सामने होतात. हीच स्पर्धा डी गुकेश 2024 मध्ये जिंकला होता.

आणि सगळ्यात महत्त्वाची स्पर्धा - World Chess Championship. कँडिडेट्स स्पर्धा जिंकलेला खेळाडू आधीच्या वर्षीच्या वर्ल्ड चेस चॅम्पियनला आव्हान देतो. या मॅचमध्ये जो जिंकेल तो नवा वर्ल्ड चेस चॅम्पियन ठरतो. गुकेशने 2024 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.