चंगेज खानाची पत्नी बोर्तेची कहाणी, जिच्यामुळे उभं राहिलं मंगोल साम्राज्य

पत्नी बोर्तेसोबत चंगेज खान (पेंटिंग)

फोटो स्रोत, Getty Images/Pictures from History / Contributor

फोटो कॅप्शन, पत्नी बोर्तेसोबत चंगेज खान (पेंटिंग)
    • Author, वकार मुस्तफा
    • Role, पत्रकार आणि संशोधक

बोर्ते यांचं तैमूजिनशी (चंगेज खानाचं खरं नाव) विवाह होऊन फार दिवस झाले नव्हते आणि तेवढ्यात तिचं अपहरण झालं.

पत्रकार एरिन ब्लॅकमोर यांनी त्यांच्या एका लेखात लिहिलं आहे की बोर्जीगन टोळीचा प्रमुख यसूगोई (चंगेज खानाचे वडील) यांच्याकडून हुइलोन या मरकित टोळीच्या एका महिलेचं अपहरण करण्यात आलं होतं. हुइलोन यांच्या पोटीच नंतर तैमूजिनाचा जन्म झाला. त्या अपहरणाचा बदला म्हणून मरकित टोळीने बोर्तेचं अपहरण करण्यात आलं होतं.

पत्नीचे अपहरण झाल्यावर तैमूजिन त्या मरकित टोळीवर चाल करुन गेला. त्यानंतर दोन्ही टोळ्यांमध्ये युद्ध झालं आणि त्यात मरकित टोळीचा पराभव झाला. तैमूजिननं बोर्तेची सुटका केली. त्यांचा प्रदेशदेखील जिंकून घेण्यात आला.

इशोर दा राशेविल्टज यांनी 'द सिक्रेट हिस्ट्री ऑफ द मंगोल्स' हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात, बोर्ते आणि तैमूजिन यांच्या मिलनाबद्दल असं म्हटलं आहे की, "लूटमार सुरू असताना, माणसं भीतीनं सैरावैरा पळत होती. त्यावेळेस त्या लोकांमध्ये तैमूजिन हाका मारत होता - बोर्ते! बोर्ते!"

"बोर्तेनं तैमूजिनचा आवाज ओळखला आणि ती पळत त्याच्याकडे गेली. ती रात्रीची वेळ होती. मात्र तरीदेखील रात्रीच्या चांदण्यात बोर्तेनं तैमूजिनच्या घोड्याची लगाम आणि दोरी ओळखली. तिनं पटकन लगाम पकडला. त्यावेळेस तैमूजिननं तिच्याकडे पाहिलं आणि बोर्तेला ओळखलं."

चंगेज खानाचं जीवनाबद्दलचं तत्त्वज्ञान

तैमूजिन याचप्रकारे टोळ्यांमागून टोळ्या जिंकत राहिला. त्याच्या राज्याचा विस्तार होत राहिला आणि तेराव्या शतकाच्या सुरुवातीला तैमूजिन हा चंगेज खान या नावानं प्रसिद्ध झाला. त्यानं अत्यंत विशाल अशा मंगोल साम्राज्याची स्थापना केली.

रिचर्ड ब्रेसलर यांनी 'द थर्टीन्थ सेंच्युरी: ए वर्ल्ड हिस्ट्री' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात रिचर्ड यांनी लिहिलं आहे की चंगेज खानानं युद्ध जिंकत दबदबा निर्माण केला.

"तो कोणतंही अधिकृत तत्त्वज्ञान जाणत नव्हता. स्टुअर्ट लेग यांनी 'द हार्टलँड' नावाचं पुस्तक लिहिलं आह. चंगेज खानाचा जीवनविषयक दृष्टीकोन या पुस्तकातील त्याच्या वक्तव्यांमधून लक्षात येतो. ते असं होतं, "शत्रूचा नायनाट करण्यात, त्याला पूर्णपणे संपवण्यात, त्याचं सर्वकाही जिंकून घेण्यात माणसाचा खरा आनंद आहे."

चंगेज खानानं या विचारांनी आयुष्यभर वाटचाल केली.

चंगेज खानानं एकापाठोपाठ एक विजय मिळवत मंगोल साम्राज्याची स्थापना केली

फोटो स्रोत, Universal History Archive/UIG via Getty Images

फोटो कॅप्शन, चंगेज खानानं एकापाठोपाठ एक विजय मिळवत मंगोल साम्राज्याची स्थापना केली

एरिन ब्लॅकमोर लिहितात, "तो (चंगेज खान) विजयामागून विजय मिळवत गेला. एकेक प्रदेश जिंकत गेला. त्यानं अनेक विवाह केले. त्याच्या शेकडो दासीदेखील होत्या. मात्र त्याची पहिली पत्नी बोर्ते, हीच त्याची सर्वात आवडती आणि सर्वात प्रभावशाली पत्नी होती."

"चंगेज खानच्या हृदयात बोर्तेचं विशेष स्थान होतं. मात्र ते फक्त वैयक्तिक नात्यापुरतंच नव्हतं तर मंगोल साम्राज्याच्या राज्यकारभारातदेखील बोर्तेचं महत्त्वाचं स्थान होतं."

ग्राफिक्स

मायकल बिरान आणि होडोंग किम यांनी 'द केंब्रिज हिस्ट्री ऑफ द मंगोल एम्पायर' हे पुस्तक संपादित केलं आहे.

या पुस्तकातून माहिती मिळते की मंगोल समाजात राजकारण, मुत्सद्देगिरी आणि लष्करी पातळीवर महिलांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.

"बोर्ते, खान कुटुंबाला सल्ला द्यायची. राजदूतांचं स्वागत करायची. मुत्सद्देगिरीशी संबंधित दौऱ्यावर जायची आणि दुसऱ्या राजांशी संपर्क करायची. सरकारच्या बैठकींमध्ये ती सहभागी व्हायची आणि युद्धाच्या मोहिमा आखायची."

"त्याचबरोबर धोरणांविषयीचे निर्णय आणि उत्तराधिकाराच्या निर्णयांमध्येही भाग घ्यायची. ती स्वत: शासक होऊ शकत नव्हती. मात्र खानाची विधवा असल्यामुळे ती राज्यकारभारातील तिच्या अधिकारांचा वापर करायची."

"चंगेज खानाच्या आई हुइलोन या मंगोल साम्राज्याच्या सुरुवातीच्या काळात खूप प्रभावशाली महिला होती. यसूगोईच्या मृत्यूनंतर त्यांनी गरीबीत मुलांचं संगोपन केलं. तैमूजिनला राजकारणाचे धडे दिले. पुढील काळात कुटुंबासाठी हुइलोन सारखी महत्त्वाची भूमिका बोर्तेनी बजावली."

बोर्तेचं अपहरण आणि सुटकेची कहाणी

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

1161 मध्ये ओलखोनुद टोळीमध्ये बोर्तेचा जन्म झाला होता. तैमूजिन (चंगेज खानाचं खरं नाव) बोर्जीगन टोळीतील होता. बोर्जीगन आणि ओलखोनुद टोळ्यांचे जवळचे संबंध होते.

त्यामुळे बोर्ते आणि तैमूजिनचा लहानपणीच साखरपुडा झाला होता. पुढे ते दोघे मोठे झाल्यावर दोघांचा विवाह झाला. त्यावेळेस बोर्तेचं वय 17 वर्षे तर चंगेज खानाचं वय 16 वर्षांचं होतं.

या दोघांचा विवाह झाल्यानंतर काही दिवसांतच मरकित टोळीनं या जोडप्याच्या छावणीवर हल्ला केला होता. तैमूजिन त्याचे सहा लहान भाऊ आणि आईबरोबर तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला होता. मात्र बोर्तेला पळता आलं नाही.

मरकित टोळीतील लोकदेखील प्रत्यक्षात बोर्तेसाठीच आले होते.

यासंदर्भातील कहाणी अशी आहे.

तैमूजिनची आई हुइलोनचा संबंध मरकित टोळीशी होता. तैमूजिनच्या वडिलांनी तिचं अपहरण करून तिच्याशी विवाह केला होता.

या घटनेला अनेक वर्षे उलटून गेली होती, तरीदेखील मरकित टोळी ही गोष्ट विसरू शकली नव्हती. त्यामुळे बोर्तेचं अपहरण करून त्यांना हुइलोन यांना पळवल्याचा बदला घ्यायचा होता.

मरकित टोळीनं हल्ला करताच, बोर्ते एका बैलगाडीत लपली होती. मात्र मरकित टोळीच्या लोकांनी तिला शोधून काढलं. ते तिला घोड्यावर बसवून घेऊन गेले. त्यानंतर तैमूजिननं त्याच्या पत्नीची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले.

चंगेज खान, पत्नी बोर्तेबरोबर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चंगेज खान, पत्नी बोर्तेबरोबर

मरकित टोळी भटकी होती. ती मध्य आशियात हजारो मैल पसरलेल्या गवताळ कुरणांमध्ये फिरायची. ते जिथे जातील तिथे तैमूजिनदेखील त्यांच्या मागावर असायचा. याच दरम्यान तैमूजिननं हळूहळू सहकारी जोडण्यास सुरूवात केली होती.

तैमूजिनचं एक वक्तव्यं प्रसिद्ध आहे. ते म्हणजे "मरकितांनी फक्त आमच्या टोळीलाच उद्ध्वस्त केलं नाही, तर माझी छाती फाडून माझं हृदय देखील ते घेऊन गेले आहेत."

शेवटी, मरकित टोळीनं सैबेरियात बैकल सरोवराच्या जवळ तंबू ठोकून मुक्काम केला. त्यावेळेस तैमूजिननं त्याच्या सहकाऱ्यांसह अत्यंत नाट्यमयरीत्या छापा मारत शत्रूच्या छावणीतून बोर्तेची सुटका केली.

काही इतिहासकारांच्या मते, ही चंगेज खानाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची घटना आहे. कारण या घटनेनं तो अशा मार्गावर चालू लागला, ज्यामुळे पुढे तो विश्वविजेता झाला.

बोर्ते आणि मंगोल साम्राज्याची स्थापना

'द केंब्रिज हिस्ट्री' या पुस्तकात लिहिलं आहे की, 1178 मध्ये बोर्तेचा विवाह तैमूजिनशी झाला. केटिया राईट यांनी एका लेखात लिहिलं आहे की बोर्ते, कौनकीरात टोळीचा प्रमुख दाई सचीन याची मुलगी होती.

या विवाहामुळे तैमूजिनच्या राजकीय आयुष्याची सुरूवात झाली.

या नात्यामुळे त्याला "एक सन्माननीय कुटुंबाची ओळख मिळाली आणि त्याला असे सहकारी, मित्र जोडण्याची संधी मिळाली, जे पुढे सत्तेच्या प्रवासात त्याच्याबरोबर राहिले. या विवाहामुळे तैमूजिनला कुटुंब बनवण्याची संधी मिळाली. मंगोल राजकीय आघाडी स्थापन करण्यासाठी ते खूप महत्त्वाचं होतं."

'द केंब्रिज हिस्ट्री' या पुस्तकानुसार, "बोर्ते, तैमूजिनला राजकारणात सल्ला द्यायची. या जोडप्याला नऊ अपत्यं झाली. त्यांची मुलं (जोची, चुगताई, ओगदे आणि तोली) मंगोल साम्राज्याच्या विविध प्रदेशाचे राजे झाले. ओगदेला चंगेज खानाचा उत्तराधिकारी म्हणून जाहीर करण्यात आला. नंतरच्या पत्नींपासून झालेल्या मुलांना हा अधिकार मिळाला नाही."

बोर्ते आणि चंगेज खानाचा विवाह बालपणीच ठरला होता

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बोर्ते आणि चंगेज खानाचा विवाह बालपणीच ठरला होता

टिमोथी यांनी 'द मंगोल एम्पायर' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की तैमूजिन (चंगेज खान) नंतर खान बनण्यास फक्त बोर्तेची मुलंच योग्य उमेदवार मानली गेली.

'द केंब्रिज हिस्ट्री' या पुस्तकात म्हटलं आहे की बोर्तेच्या मुलींचे (कौजीन, चेचगीन, अलाइका, तोमीलोन आणि आल अलतान) विवाह एलकर्ज, अवीरात, कौनकीरात आणि ऐगूर यासारख्या टोळ्यांमध्ये झाले. या टोळ्यांकडून मंगोल साम्राज्याला राजकीय आणि लष्करी ताकद मिळाली.

या नातेसंबंधांमुळे युद्ध न करताच जवळच्या राज्यांचा समावेश मंगोल साम्राज्यात करण्यास मदत झाली. या मुलींच्या पतींनी म्हणजे तैमूजिनच्या जावयांनी देखील मंगोल लष्करी मोहिमांमध्ये भाग घेतला. उदाहरणार्थ ख्वारिज्मवर हल्ला (1219) आणि उत्तर चीनमध्ये मिळवलेला विजय (1211-1215, 1217-1223).

टिमोथी मे यांच्या मते, बोर्तेनं अनेक अनाथ मुलांना देखील दत्तक घेतलं होतं. यात कतकूनियान आणि बोदानियान यांचा समावेश होता.

बोर्तेनं या मुलांचा सांभाळ स्वत:च्या मुलांसारखाच केला. त्यांच्या या कृतीमुळे मंगोल साम्राज्यातील त्यांची प्रतिमा आणि सामाजिक प्रतिष्ठा खूप वरच्या स्तरावर पोहोचली.

राजकारण आणि लष्करी मोहिमांमध्ये बोर्तेचा सल्ला

एन ब्रॉडब्रिज यांनी 'वीमेन अँड द मेकिंग ऑफ द मंगोल एम्पायर' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्या लिहितात की बोर्तेचं महत्त्व सर्वांना माहित होतं.

बोर्ते खूपच बुद्धिमान आणि चतुर होती. तिनं तिची सासू हुइलोनच्या काही जबाबदाऱ्या स्वत:वर घेतल्या. यात संपूर्ण टोळीच्या अर्थव्यवस्थेपर्यंतच्या महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश होता.

"पहिली पत्नी म्हणून बोर्ते, तैमूजिनच्या टोळीची छावणी आणि गुरा-ढोरांवर देखरेख करायची. फक्त इतकंच नाही, तर ती वैयक्तिक साधनसंपत्ती, नोकर, दासी, तैमूजिनच्या इतर पत्नी आणि शाही सुरक्षा रक्षकांवर देखील लक्ष ठेवायची."

"या सर्वांची संख्या हजारांहून अधिक असायची. मंगोल परंपरेनुसार, पती आणि पाहुण्याच्या आदरातिथ्याची जबाबदारी तिच्यावरच होती. तिच्या छावणीतच अनेक महत्त्वाचे करार आणि आघाडी झाल्या."

"ती तैमूजिनला महत्त्वाचा सल्ला द्यायची. तिचा सल्ला गांभीर्यानं घेतला जायचा आणि बोर्तचं कुटुंब राजकारण आणि युद्धात चंगेज खानाचे सक्रिय सहकारी होते."

"मंगोल समाजात बोर्तेचं स्थान खूप वरचं होतं. राजकारण आणि लष्करी मोहिमांच्या बाबतीत चंगेज खान, बोर्तेचा सल्ला घ्यायचा."

ग्राफिक्स

बोर्तेनं ही जबाबदारी आणि तिच्यावर टाकण्यात आलेला विश्वास अत्यंत सार्थ ठरवला. उदाहरणार्थ, जामूका हा चंगेज खानाचा जवळचा मित्र होता. बोर्तेचं अपहरण झाल्यानंतर तिची सुटका करण्यास याच जामूकानं मदत केली होती.

मात्र हळूहळू परिस्थिती बदलत गेली आणि जामूका राजकीय शत्रू होत गेला. त्यावेळेस बोर्तेनं तैमूजिनला जामूकाबरोबरची मैत्री संपवण्याचा सल्ला दिला होता. 1204 मध्ये तैमूजिननं जामूकाचा लढाईत पराभव केला आणि त्याची हत्या घडवून आणली.

टिमोथी मे यांच्या मते, याशिवाय बोर्तेनं संपूर्ण आशियामध्ये पसरलेल्या व्यापारी मार्गांची व्यवस्था सांभाळली. त्या मार्गांवरून प्रवास करणारे मंगोल अधिकारी आणि व्यापाऱ्यांना सल्ला देण्याचं काम देखील बार्तोनं केलं.

ऐतिहासिक नोंदींनुसार, तिनं ही जबाबदारी अत्यंत प्रभावीपणे पार पाडली. याच्या अनेक उदाहरणांची कागदपत्रं उपलब्ध आहेत.

आणखी एक प्रसंगी, चंगेज खानाचा जवळचा सहकारी तैब तंगगरी यानं चंगेज खानाच्या भावाचा अपमान केला. त्यावर बोर्तेनं लगेचच प्रतिक्रिया व्यक्त केली. तिनं चंगेज खानाकडे हट्ट केला की तैबला कठोर शिक्षा देण्यात यावी.

ब्लॅकमोर यांनी इतिहासकार डोना हामिन यांचा संदर्भ देत लिहिलं आहे की या प्रसंगी चंगेज खानानं बोर्तेचा सल्ला मानला. त्यानं जनतेमध्ये शांतता निर्माण केली आणि स्वत:चं नेतृत्व भक्कम केलं.

ब्लॅकमोर यांच्या मते, "बोर्तेनं दूत, सल्लागार आणि प्रशासकाची भूमिका बजावली. तिनं साम्राज्याच्या राणीची भूमिका पार पाडली."

"अर्थात बोर्तेच्या आयुष्याचे अनेक पैलू इतिहासाच्या पडद्याआड आहेत. मात्र, साम्राज्याची निर्मिती आणि रोजचा राज्यकारभार यात महिलांनी किती महत्त्वाची भूमिका बजावली, या गोष्टीचं ती उत्तम उदाहरण आहे."

चंगेझ खान

फोटो स्रोत, Getty Images

ब्रॉडब्रिज लिहितात, "चंगेज खानाला पत्नीच्या रुपात एक अशी जोडीदार मिळाली, जिच्यावर तो पूर्ण विश्वास ठेवू शकत होता. तसंच संपूर्ण साम्राज्याला देखील अशाच महिलांची आवश्यकता होती. जर मंगोल साम्राज्यात या महिला नसत्या, तर कदाचित ते साम्राज्यदेखील निर्माण झालं नसतं."

"ती संपूर्ण आयुष्यभर चंगेज खानाची मोठी पत्नी राहिली. ती बहुतांश वेळ पतीबरोबरच असायची. अर्थात ती जेव्हा पतीबरोबर नसायची, तेव्हा साम्राज्याच्या काही प्रदेशांचा राज्यकारभार चालवत होती."

ब्रॉडब्रिज यांनी बार्तो यांचा समावेश चंगेज खानाच्या आयुष्यातील सर्वात प्रभावशाली महिलांमध्ये केला आहे. बार्तोशी निगडीत कहाण्या या गोष्टीचा पुरावा आहेत.

चंगेज खान ज्यावेळेस लढायांमध्ये व्यस्त असायचा, तेव्हा बोर्ते मंगोलियामध्ये राहून साम्राज्याच्या कारभार चालवण्यास मदत करायची. तिच्या वैयक्तिक मालकीची जमीन खिरलन नदीच्या किनाऱ्यावर होती.

टिमोथी मे यांच्यानुसार, पती चंगेज खानाचा मृत्यू झाल्यानंतर 1230 मध्ये बोर्तेचा मृत्यू झाला. आपल्या जीवनकाळात बोर्ते मंगोल साम्राज्यातील अत्यंत सन्माननीय व्यक्ती बनली होती.

"बोर्तेनं फक्त पतीची सल्लागार म्हणून काम केलं नाही, तर स्वत:च्या मुलींना देखील विविध गोष्टींचं प्रशिक्षण दिलं. यात साम्राज्याच्या कारभारात प्रतिनिधी होणं, दूताची भूमिका बजावणं आणि राज्यकारभारात सक्रिय भूमिका पार पाडणं या गोष्टींचा समावेश होता."

आशियातील विषयांचे लेखक मॅक्स लू यांच्या मते, "सध्याच्या मंगोलियात असलेले होलोन आणि चाहान सरोवरं उन्हात एकमेकांना सुंदर साथ देतात. मंगोल लोकांसाठी ती पवित्र ठिकाणं आहेत. त्याचं कारण देखील तसंच आहे."

"कारण चंगेज खान आणि महाराणी बोर्ते यांचा विवाह इथेच झाला होता. या दोघांच्या आयुष्यभराच्या नात्याचं ही सरोवरं प्रतीक बनली आहेत."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.