बाल्टिमोर दुर्घटना ही जलमार्ग खुला करण्याची जगाच्या इतिहासातील अत्यंत अवघड मोहीम का बनली आहे ?

- Author, बर्ंड डेबसमन ज्युनियर,
- Role, बीबीसी न्यूज, बाल्टिमोर
बाल्टीमोर येथील पूल दुर्घटना ही फक्त अपघाताच्या दृष्टिकोनातून वेगळी नसून या अपघातानंतर हा जलमार्ग खुला करण्याची मोहीम देखील अपवादात्मक आहे.
हा जलमार्ग खुला करताना हे काम लवकरात लवकर मात्र तितक्याच सुरक्षितपणे पूर्ण करण्याची जबाबदारी अमेरिकन टीमवर आहे. या मोहिमेशी निगडित तांत्रिक बाबींचा हा आढावा.
मोडतोड झालेलं, विस्कटलेलं हजारो टन पोलाद आणि मेरिलॅंडमधील पॅटापस्को नदीच्या गडद पाण्यातून बाहेर येणारं कॉंक्रीट पाहून या अपघाताचा आढावा घेतल्यानंतर अमेरिकन लष्करातील कर्नल एस्टी पिनचेसिन या अपघाताबद्दल म्हणते की, ''हा एक अक्षम्य गोंधळ आहे.''
''या सर्व प्रकाराचं हेच सर्वांत योग्य वर्णन आहे,'' असं या अपघातानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेताना स्तब्ध झालेल्या लष्करातील वरिष्ठ अधिकारी या अपघाताच्या परिस्थितीबद्दल बोलताना म्हणाल्या.
रेनॉल्ड्स या नौदलाकडून संचलित जहाजाच्या डेकवरून बोलताना एस्टी यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्या म्हणतात, ''प्रचंड ताकदीनं तुटलेल्या, वाकलेल्या आणि चकणाचूर झालेल्या या पोलादाला बाहेर काढण्याच्या मोहिमेचं वर्णन करणं ही अतिशय कठीण बाब आहे.''
बाल्टिमोरच्या फ्रान्सिस स्कॉट स्की पुलाचे विखुरलेले अवशेष गोळा करून हा परिसर मोकळा करण्याची कामगिरी कर्नल पिनचेसिनला देण्यात आली आहे. डाली या 948 फुट लांबीच्या (289 मीटर) महाकाय मालवाहतूक करणाऱ्या जहाजाने टक्कर दिल्यानंतर पुलाचं अक्षरश: पोलादी कचऱ्यात रुपांतर झालं आहे. पुलाला टक्कर दिल्यानंतर या जहाजावर देखील पुलाचे पोलादी भाग पडले आहेत. त्यामुळे सध्या हे जहाज एकाच जागी उभं आहे. या अपघातात जहाजावरील काही कंटेनर्सचादेखील चुराडा झाला आहे.
या अपघात स्थळाकडे पाहिल्याबरोबरच झालेला विचका लक्षात येतो. मात्र हे सर्व अक्षम्य का? कारण इथं असलेल्या प्रत्येक गोष्टीमुळे या जहाजावर अडकलेल्या खलाशांच्या जीवाला धोका आहे.
26 मार्चला जहाजाने पुलाला टक्कर दिल्यानंतर संपूर्ण पूल काही सेकंदातच कोसळला. यात सहा कामगारांचा मृत्यू झाला आणि हे जहाजदेखील तिथेच अडकलं.
या प्रचंड मोठ्या दुर्घटनेतून बाहेर पडण्यासाठी अमेरिकन लष्कराचे इंजिनीअर्स, नौदल, तटरक्षक दल, मेरिलॅंडची सरकारी यंत्रणा आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या इतर खासगी कंपन्या यांना प्रचंड मोठी मोहिम हाती घ्यावी लागली आहे.
700 फूट रुंद (213 मीटर) आणि 50 फूट (15 मीटर) खोल जलमार्गाला मोकळं करणं, डाली या जहाजाला अपघात स्थळावरून बाहेर काढणं आणि पॅटापस्को नदीतील अंदाजे 3,000 ते 4,000 टन अवशेष किंवा भंगाराला नदीपात्रातून बाहेर काढणं हे या सर्व मोहिमेचं उद्दिष्ट आहे.
''या सर्व गोष्टींवर एकाच वेळी काम केलं जातं आहे,'' असं कर्नल पिनचेसिन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. त्या बाल्टिमोर जिल्ह्याच्या आर्मी कॉर्प्स ऑफ इंजिनीअर्सच्या कमांडर आहेत.
त्या म्हणतात, ''अर्थात सर्वाधिक प्राधान्य हा जलमार्ग खुला करण्यालाच आहे. कारण हा मार्ग खुला केल्यानंतरच येथील जहाजांची वाहतूक पुन्हा सुरळीत होणार आहे. हा मार्ग सध्या बंद झाल्यानं कंपन्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होतो आहे.''
हे बंदर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील सर्वाधिक व्यस्त बंदरांपैकी एक आहे. या भागातील पोलाद, अॅल्युमिनियम आणि शेतकी यंत्रांच्या बाबतीतील महत्त्वाचं केंद्र आहे. जनरल मोटर्स आणि होंडासारख्या कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या वाहतुकीसाठी या जलमार्गाचा वापर करतात. या बंदरातील व्यवसायावर जवळपास 15,000 जणांचे रोजगार अवलंबून आहेत. यातील 8,000 कर्मचाऱ्यांना तर इथं प्रत्यक्ष रोजगार आहे.
या मोहिमेमुळे या परिसराला एक वेगळंच स्वरूप आलं आहे. नौदलाची छोटी सोनार जहाजं, पोलिसांच्या बोटी, इथं काम करणारे मजूर, सात अजस्त्र क्रेन या सर्वांमुळं हा परिसर गजबजून गेला आहे. यातील चेसापीक या 1,000 टन क्षमतेच्या क्रेनचा वापर तर एकदा सीआयए या अमेरिकन गुप्तहेर संस्थेने पॅसिफिक महासागरात बुडालेली सोविएत रशियाची पाणबुडी बाहेर काढण्यासाठीदेखील केला आहे.
या पोलादाच्या कचऱ्याचे तुकडे करून एक-एक करत ते बाहेर काढले जाणार आहेत. इथून बार्जवर म्हणजे मालवाहतूक करणाऱ्या खास जहाजांवर लादून ते इथून बाहेर नेले जाणार आहेत.
''पोलादी कचऱ्याचा प्रत्येक थर बाहेर काढताना या टीमला प्रत्येकवेळी त्या पोलादी सांगड्याची पाहणी करावी लागते आहे. तो हलवताना काही अडचण तर येणार नाही ना, तो हलवण्याची आपली योजना बरोबर आहे ना याची खातरजमा करून घ्यावी लागते आहे,'' असं कर्नल पिनचेसिन यांनी सांगितलं. पोलादी सांगाडा हलवताना ''तिथं एखादी गोष्ट अस्थिर तर नाही ना?, तिथे काही तुटलेलं तर नाही? यातील एखादी गोष्ट आपल्या निरीक्षणातून सुटलेली तर नाही ना? या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो आहे.''
''हे सर्व काम करताना टीमला अतिशय शिस्तबद्धपणे आणि खूपच विचारपूर्वक काम करावं लागतं आहे.''

फोटो स्रोत, US Army Corps of Engineers
हे काम करताना आतापर्यतची सर्वाधिक जोखीम या अपघात स्थळाची, जहाजाची आणि चटकन नजरेस न येणाऱ्या, पाण्यात बुडालेल्या पोलादी सांगड्याची पाहणी करणाऱ्या पाणबुड्यांनी घेतली आहे.
पॅटापस्को नदीच्या या गढूळ तपकिरी पाण्यात शोध घेताना पाणबुड्यांना अनेकदा एक किंवा दोन फुटांपर्यतचं दिसतं आहे. त्यामुळे त्यापलीकडच्या परिसराची माहिती घेण्यासाठी त्यांना जवळच्या जहाजावरील तंत्रज्ञांची मदत घ्यावी लागते आहे.
कर्नल पिनचेसिन यांनी पाणबुड्यांच्या कामाबद्दल माहिती देताना सांगितलं की त्यांच्याकडून करण्यात येत असलेली पाहणी खूपच महत्त्वाची आहे. पोलादी सांगाड्यातील मोठाल्या भागांचे तुकडे करून ते सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी हे फारच आवश्यक आहे.
पोलादाचे तुकडे एकमेकांमध्ये अडकलेले असू शकतात. अतिशय दाबामुळं ते तिथं अडकलेले असू शकतात, असं त्या म्हणाल्या. जलमार्गातील धातूच्या विखुरलेल्या एका मोठ्या तुकड्याकडे खुणावत त्यांनी हे सांगितलं.
''या पोलादाच्या सांगड्यातून तुम्हाला जर काही भागाचे तुकडे करायचे असतील आणि तिथं जर तुम्हाला कल्पना नसलेला सांगड्याचा दाब असेल या भागात काम करणाऱ्या लोकांच्या जीवाला खूपच मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळंच हा सांगडा एकमेकांशी जोडलेला आहे का हे आम्हाला जाणून घ्यावं लागतं. त्यासाठीच पाणबुड्यांना पाण्यात जाऊन शोध घ्यावा लागतो. त्यांना अतिशय बारकाईने याची पाहणी करावी लागते...मात्र हे गढूळ पाण्यात करताना त्यांच्यासमोर असंख्य अडचणी असतात.'' असं त्यांनी पुढं सांगितलं.
या अपघातात बेपत्ता झालेल्या तीनजणांचे मृतदेह सापडले आहेत असं या अपघाताच्या तपास करणाऱ्यांना जर वाटलं की तर लगेच त्यांचा शोध घेण्यासाठी मेरिलॅंड राज्याच्या पोलिस दलाकडून घेतलेली पाणबुड्यांची एक स्वतंत्र टीम तयार आहे.
''या बेपत्ता माणसांचा अविरतपणे शोध घेतला जातो आहे. त्याचा या मोहिमेत काम करणाऱ्या लोकांच्या मनावर मोठा दबाव येतो आहे,'' असंही त्यांनी सांगितलं.
त्या म्हणाल्या, ''या माणसांच्या कुटुंबीयांना एकत्रितपणे ईस्टर साजरा करता येणार नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे.''
या मोहिमेत सहभागी असलेले आणि जलमार्गांचे तज्ज्ञ म्हणाले की या अपघाताच्या व्याप्तीची इतर कशाशी क्वचितच तुलना करता येईल.
''या मोहिमेला पार पाडण्यासाठी सुरूवातीला 6 कोटी डॉलरचा आपत्कालीन निधी उभारण्यात आला आहे. प्रत्यक्षात या कामाचा एकूण खर्च खूपच जास्त असण्याची शक्यता आहे,'' असे मेरिलॅंडचे डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते डेव्हिड ट्रोन यांनी सांगितलं. ते म्हणाले, ''या कामाचा खर्च 1 अब्ज डॉलरपर्यत पोचू शकतो.''
''या कामाची व्याप्ती हे प्रचंड मोठं आव्हान तर आहेच शिवाय ते अत्यंत गुंतागुंतीचं देखील आहे,'' असं ब्रिटिश रॉयल इंजिनीअर कॅप्टन डॅन होबन यांनी सांगितलं. हा अपघात झाला तेव्हा ते अमेरिकन आर्मी कॉर्प्सबरोबरच्या त्यांच्या नेहमीच्या कामात व्यस्त होते.
''ही खूपच क्लिष्ट परिस्थिती आहे. या पोलादी सांगड्याला कुठे कापता येईल आणि मग ते तुकडे बाहेर काढण्याची योजना कशी तयार करायची यावर इंजिनीअरिंगच्या दृष्टिकोनातून विचार केल्यावर हे काम खूपच गुंतागुंतीचं आहे असं लक्षात येतं'' असं कॅप्टन होबन म्हणाले. ते या मोहिमेत अमेरिकन टीमला मदत करत आहेत.
''इथं काम करणाऱ्या सर्वांची सुरक्षितता देखील महत्त्वाची आहे. प्रत्येकालाच हे काम लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे. मात्र तसं करत असताना ते सुरक्षिततेचा आणि कार्यक्षमतेचा देखील विचार करत आहेत. आम्हाला ही परिस्थिती आणखी गुंतागुंतीची करायची नाही. तेच या मोहिमेत सर्वात महत्त्वाचं आहे.''असं त्यांनी सांगितलं.
पीटर फोर्ड हे अनेक वर्षांपासून मर्चंट मरिनर आहेत. पायाभूत सुविधांचे प्रकल्प हे त्यांची कंपनी स्कायरॉक अॅडव्हायझर्सचं वैशिष्ट्यं आहे. पीटर म्हणतात, ''बाल्टिमोर दुर्घटनेच्या या मोहिमेतील गुंतागुंतीमुळे हे काम अधिक जोखमीचं झालं आहे. 2021 मध्ये सुएझ कालव्यात अडकलेल्या एव्हर गिव्हन या जहाजाला बाहेर काढण्यासारख्या इतर क्लिष्ट मोहिमांच्या तुलनेत बाल्टिमोरच्या मोहिमेतील जोखीम अधिक आहे.''
''आम्ही यासारखं यापूर्वी कधीही पाहिलेलं नाही. हे खूपच कठीण आहे. पाण्यावर आणि पाण्याखाली असलेल्या सांगड्याचं हे मिश्रण आहे. पोलादी सांगडा अक्षरश: जहाजावर पसरला असून तोच जहाजाचा तोल साधतो आहे.''
''एकदा का या मोहिमेसाठीच्या टीमनं पोलादी सांगड्याचे तुकडे करून ते बाहेर काढण्यास सुरूवात केली की त्या पोलादी सांगड्यांची आणि जहाजाची हालचाल यामुळं हे काम अतिशय धोकादायक होणार आहे,'' असा अंदाज फोर्ड वर्तवतात.
''पोलादी सांगडा कापताना एखाद्या कर्मचाऱ्याकडून चूक झाली आणि पोलादाचे ते धारदार तुकडे जहाजावर जिथं इंधन साठवलेलं आहे त्या भागावर जाऊन कोसळले तर किंवा जहाजातील काही ज्वलनशील पदार्थांची गळती झाली आणि ते समुद्रात इतस्तत: पसरले तर, देव करो असं अजिबात होऊ नये,'' असं फोर्ड म्हणाले.

हा लाकडी ठोकळ्यांचा खेळ आपण कधीही हारू नये असंच प्रत्येकाला वाटतं आहे.
सध्यापुरतं तरी ही मोहिम अगदी सुरूवातीच्या टप्प्यात आहे. जहाज आणि अपघात स्थळाचा नेमका आढावा घेण्यावरच मोहिमेचं मुख्य लक्ष केंद्रित आहे. छोटे तुकडे बाजूला करून जलमार्गाचा छोटे भाग तात्पुरत्या स्वरुपात खुले करण्यात आला असून त्यातून मर्यादित स्वरुपात जलवाहतूक सुरू करण्यात आली आहे.
एप्रिलअखेरपर्यत या 280 फूट (80 मीटर) रुंद आणि 35 फूट (10 मीटर) खोल जलमार्गातील एका बाजूची जलवाहतूक खुली करण्याची अमेरिकन आर्मी कॉर्प्स ऑफ इंजिनीअर्सची योजना आहे. या जलमार्गातून बार्जसारखी मालवाहतूक जहाजं आणि काही रोल ऑन रोल ऑफ जहाजांद्वारे कार आणि यंत्रसामुग्रीची वाहतूक करता येईल.

फोटो स्रोत, Getty Images
मे महिन्याच्या अखेरीपर्यंत संपूर्ण जलमार्ग मोकळा करून जलवाहतुकीसाठी खुला होण्याचा अंदाज आहे, असं या मोहिमेची जबाबदारी असणाऱ्या संयुक्त कमांडनं 4 एप्रिलला जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
अर्थात हवामान किंवा मोहिमेत अचानक उद्भवणाऱ्या अडचणींमुळं जलमार्ग खुला होण्याची तारीख बदलू शकते.
काम झटकन पूर्ण व्हावं यासाठी आम्ही ते हळूहळू करायला हवं. हळूहळू काम करणं म्हणजेच काटेकोरपणे काम करणं. हळूहळू काम पूर्ण करणं म्हणजेच झटपट काम पूर्ण करणं. हे एक दीर्घकाळ चालणारं काम आहे, असं कर्नल पिनचेसिन यांनी सांगितलं.











