बाल्टिमोरमध्ये पूल मोडला, त्या जहाजावर अडकलेल्या 20 भारतीयांचं काय होणार?

फोटो स्रोत, GETTY IMAGES
अमेरिकेतील बाल्टिमोरमधील 'फ्रान्सिस स्कॉट की' पूल कोसळून एक आठवडा उलटल्यानंतर देखील पुलाला टक्कर देणाऱ्या अपघातग्रस्त जहाजात जवळपास दोन डझन खलाशी अडकलेले आहेत.
डाली नावाच्या 948 फूट (289 मीटर) लांबीच्या मालवाहू जहाजावरील खलाशांपैकी बहुतांश खलाशी भारतीय आहेत. जहाजाची 'फ्रान्सिस स्कॉट की' पुलाशी टक्कर झाल्यानंतर यातील एकाला किरकोळ दुखापती झाल्या होत्या.
या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला.
दुर्घटनेचा तपास करणारे या गोष्टीचा शोध घेत आहेत की, जहाजाची पुलाशी टक्कर होण्यामागील नेमकं कारण काय होतं. या जहाजावरील खलाशी जहाज सोडून जाऊ शकणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
डाली नावाच्या या जहाजावर असलेल्या लोकांबद्दल आणि त्यांच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल नेमकी कोणती माहिती उपलब्ध आहे?
दुर्घटनेच्या वेळेस डाली नावाच्या कंटेनर वाहतूक करणाऱ्या जहाजावर 21 खलाशी हजर होते. हे जहाज श्रीलंकेला जाण्यासाठी 21 दिवसांच्या प्रवासावर निघाले असताना ही दुर्घटना झाली होती.
या जहाजावरील खलाशांमध्ये 20 खलाशी भारतीय नागरिक असल्याची माहिती भारताकडून देण्यात आली आहे.
सरकारच्या आकडेवारीनुसार, 3 लाख 15 हजार भारतीय जगाच्या सागरी वाहतूक उद्योगाशी जोडलेले आहेत. सागरी वाहतूक उद्योगातील एकूण कर्मचाऱ्यांच्या जवळपास 20 टक्के इतके हे प्रमाण आहे. या उद्योगातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत फिलिपाईन्सनंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो.
मागील आठवड्यात एका भारतीय अधिकाऱ्याने सांगितलं होतं की जहाजावरील सर्व खलाशांचे आरोग्य उत्तम आहे. दुर्घटनेत ज्या भारतीयाला दुखापत झाली होती आणि टाके घालावे लागले होते त्या भारतीयाचादेखील यात समावेश आहे.
या व्यतिरिक्त खलाशांची सुटका, त्यांचे कुटुंब आणि त्यांचा अनुभव याबद्दल फारच थोडी माहिती उपलब्ध आहे.

खलाशी जहाजावर कसे राहत आहेत?
डाली या कंटेनर जहाजावरील लोकांच्या संपर्कात जे मोजकेच लोक आहेत. त्यामध्ये जोशुआ मेसिक यांचा समावेश आहे. ते बाल्टिमोर इंटरनॅशनल सीफेयरर्स सेंटरचे संचालक आहेत. जहाजांवर काम करणाऱ्या खलाशी, अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी काम करणारी ही एक स्वयंसेवी संस्था आहे.
जोशुआ मेसिक यांनी बीबीसीला सांगितलं की, जहाजावर हजर असणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी त्यांनी काही सामान पाठवलं होतं. यामध्ये वाय-फाय हॉटस्पॉटचादेखील समावेश होता. त्यानंतर जहाजावरील खलाशांशी त्यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून संवाद साधला होता.
त्यांनी सांगितलं की, जहाजावरील खलाशी घाबरलेले आहेत आणि अपघाताची चौकशी केली जात असताना ते काहीही बोलायला तयार नाहीयेत.
जोशुआ यांनी पुढे सांगितलं की, "जितक्या लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यामधील कोणाशीही त्यांचं फारसं बोलणं झालेलं नाही. शनिवारपर्यत जहाजावरील खलाशांकडे वाय-फायची सुविधादेखील नव्हती आणि जगात त्यांच्याविषयी काय चर्चा सुरू आहे याबद्दल त्यांना काहीही कल्पना नव्हती. या अपघातासाठी त्यांना दोषी ठरवण्यात येतं आहे, खलनायक ठरवलं जातं आहे की नाही याबद्दल त्यांना निश्चित अशी काहीच माहिती नव्हती. त्यांना तर हेदेखील ठाऊक नव्हतं की या अपघातानंतर काय अपेक्षा ठेवाव्यात किंवा मनात काय इच्छा बाळगाव्यात."

फोटो स्रोत, Getty Images
जोशुआ यांनी हेदेखील सांगितलं की, "हे सर्व खलाशी अतिशय नाजूक स्थितीत आहेत. त्यांनी काहीही बोलण्याचा प्रयत्न केल्यास याचा त्यांच्या कंपनीशी संबंध जोडला जाणार. माझा अंदाज आहे की सध्या त्यांना गप्प बसण्यास सांगितलं गेलं आहे."
अँड्रयू मिडलटन, बाल्टिमोरमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांची मदत करणारा 'एपोस्टलशिप ऑफ सी' नावाचा एक कार्यक्रम चालवतात. त्यांनी सांगितलं की जहाजाची पुलाशी टक्कर झाल्यापासून ते दिवसातून अनेक वेळा खलाशांशी बोलत आहेत.
अँड्रयू यांनी सांगितलं की, "या सर्वांनी हेच सांगितलं की ते सर्व बरे आहेत."
खलाशांना जहाजातून बाहेर पडण्याची परवानगी कधी देण्यात येईल?
अधिकाऱ्यांना माहिती दिली की, सध्यातरी जहाजावरील खलाशांना त्यातून बाहेर पडण्याची परवानगी देण्याचा कोणताही विचार नाही. सध्या जहाज स्थिर ठेवण्यावर काम सुरू आहे. अपघात स्थळावरून जोपर्यत जहाज हटवलं जात नाही तोपर्यत जहाजावरील खलाशांना जहाज सोडण्याची परवानगी दिली जाण्याची शक्यता फारच कमी आहे. ही एक अतिशय गुंतागुंतीची आणि लांबलचक प्रक्रिया आहे.
शुक्रवारी (29 मार्च) तटरक्षक दलाचे अॅडमिरल शैनन गिलरीथ यांनी सांगितलं होतं की, बाल्टिमोर बंदर आणि तिथे येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांसाठी मार्ग मोकळा करणं यालाच त्यांचं पहिलं प्राधान्य आहे. डाली जहाजाला तिथून हटवण्याचं काम तर त्यानंतरचं आहे.
इतकंच काय तर सर्वसाधारण परिस्थितीतदेखील अमेरिकन बंदरात आलेल्या जहाजांवरील परकी खलाशांना जहाजातून उतरण्याची परवानगी देण्यासाठी बरीच कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
व्हिसाव्यतिरिक्त खलाशांकडे तटावर फिरण्याची परवानगी देणारा योग्य पासदेखील असणं आवश्यक असतं. तरच ते जहाजातून खाली उतरू शकतात.
बंदरावरील कर्मचारी किंवा संबंधित यंत्रणेच्या देखरेखीखालीच त्यांना जहाजातून खाली उतरून टर्मिनलच्या गेटमधून बाहेर नेलं जाऊ शकतं. तसं तर ज्या स्वयंसेवी संस्था इथे येणाऱ्या जहाजावरील खलाशांसाठी काम करतात त्याच हे कामदेखील करतात.

फोटो स्रोत, Reuters
डाली जहाजावरील खलाशांकडे जहाजावरून खाली उतरण्याची परवानगी असणारी सर्व आवश्यक कागदपत्रे आहेत की नाही हेदेखील अद्याप स्पष्ट नाही.
बाल्टिमोर दुर्घटनेतून मार्ग काढण्यासाठी बनवण्यात आलेल्या एकात्मिक टीमने सोमवारी बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं की, 'या अपघाताचा तपास किती दिवस चालेल हे अद्याप निश्चित नाही. जोपर्यत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यत जहाजावरील खलाशांना जहाजावरच राहावं लागणार आहे.'
चिराग बाहरी हे एक अनुभवी भारतीय खलाशी आहेत. ते आता ब्रिटनमधील इंटरनॅशनल सीफेअरर्स वेलफेअर अँड असिस्टंस नेटवर्कचे इंटरनॅशनल ऑपरेशन्स मॅनेजर आहेत. चिराग यांना वाटतं की डाली जहाजावरील सर्व खलाशांना त्यांच्या घरी परतण्यास अनेक महिन्यांचा कालावधी लागू शकतो.
चिराग सांगतात की, 'असं होऊ शकतं की काही आठवड्यानंतर खलाशांमधील काही कनिष्ठ खलाशांना घरी जाण्याची परवानगी दिली जाईल. मात्र वरिष्ठ खलाशांना अपघाताचा तपास पूर्ण होईपर्यत अमेरिका सोडता येणार नाही.'

फोटो स्रोत, Reuters
खलाशांना काय हवं?
डाली जहाजावरील खलाशांकडे खाण्यापिण्याचं साहित्य आणि इतर आवश्यक वस्तू भरपूर प्रमाणात आहेत. कारण ते श्रीलंकेला जाण्यासाठी 21 दिवसांच्या प्रवासाची तयारी करून बंदरातून निघाले होते.
ज्या स्वयंसेवी संस्था जहाजांवरील खलाशांसाठी काम करतात त्यांच्याकडून देखील डाली जहाजावरील खलाशांना मदत किंवा सामान मिळू शकेल.जोशुआ मेसिक यांनी सांगितलं की, यामध्ये शिजवलेलं अन्न आणि इतर साहित्याचाही समावेश असेल.
चिराग बाहरी आणि जोशुआ मेसिक म्हणतात की, 'खलाशांची बहुतांश गरज मनोवैज्ञानिक स्वरुपाची आहे.'
जोशुआ म्हणाले की, जहाज चालवणारे खलाशी जेव्हा दीर्घकाळासाठी जगापासून अलिप्त आणि रिकामे बसतात, तेव्हा वेळ घालवणं आणि नैराश्य हाताळणं हे त्यांच्यासमोरील सर्वात मोठं आव्हान असतं. वेळ घालवण्यासाठी ते व्हिडिओ गेम खेळतात किंवा सोशल मीडियावर वेळ घालवतात.

फोटो स्रोत, reuters
जोशुआ मेसिक यांनी सांगितलं की, "जहाजावरील खलाशी तेव्हा सर्वाधिक आनंदी असतात जेव्हा ते सर्व एकत्र येऊन एकमेकांबरोबर मजेत वेळ घालवतात. मात्र दुर्दैवाने हे नेहमी होत नाही."
त्याचवेळी चिराग बाहरी यांना वाटतं की, "या दुर्घटनेमुळे जहाजावरील खलाशी प्रसारमाध्यमांच्या झोतात आले आहेत आणि नेमकं कशामुळं हा अपघात झाला आणि याला जबाबदार कोण हे पाहायला हवं. अशा परिस्थितीत आपले मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी या खलाशांना मदतीची आवश्यकता असणार आहे."
चिराग सांगतात, "आज प्रत्येकजण या दुर्घटनेचं कोडं सोडवण्याच्या मागे लागलेला आहे. हे सर्व थांबलं पाहिजे."
ते पुढे म्हणाले, "जहाजावरील खलाशांना आधीच धक्का बसला असून ते तणावग्रस्त असतील. ते अजूनही परकी भूमीवर एका जहाजात अडकलेले आहेत. आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. जेणेकरून या संकटसमयी त्यांना दोष दिला जात नाही असा विश्वास त्यांच्यात निर्माण करता येईल."











