बाल्टिमोर जहाज अपघात : भारतीय कर्मचाऱ्यांचं कौतुक, जगभरात मर्चंट नेव्हीत असा आहे दबदबा

फोटो स्रोत, Getty Images
- Author, बीबीसी प्रतिनिधी
- Role, नवी दिल्ली
"जहाजावरच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचं जहाजावरचं नियंत्रण सुटल्याची माहिती मेरीलँड दळणवळण विभागाला अगदी वेळेत दिली. त्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांनी त्या पुलावर जाणारी वाहतूक थांबवली आणि अनेकांचे जीव वाचले,"
बाल्टिमोर शहरात झालेल्या जहाज अपघातानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत जहाजावरील भारतीय कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं.
26 मार्चला मध्यरात्री 1:30 वाजता अमेरिकेच्या बाल्टिमोर येथे पटॅप्सको नदीवर बांधण्यात आलेला फ्रान्सिस स्कॉट की हा पूल कोसळला.
बाल्टिमोर बंदरातून श्रीलंकेच्या कोलंबोकडे निघालेलं डाली हे मालवाहू जहाज या पुलाच्या एका खांबाला धडकलं आणि संपूर्ण पूल कोसळला.
या दुर्घटनेत पुलावर काम करणाऱ्या दोघांचे मृतदेह सापडले असून चार जणांचा शोध अजूनही सुरु आहे.
हे जहाज सिंगापूरचं असलं तरी त्यावर काम करणारे कर्मचारी भारतीय होते. त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली.
या घटनेमुळे जागतिक जलवाहतुकीमध्ये भारतीय खलाशांचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
मागच्या 13 वर्षांमध्ये या क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीयांची संख्या शेकडो पटींनी वाढली आहे.
मर्चंट नेव्हीमध्ये तयार झालेल्या नवनवीन रोजगाराच्या संधी, त्याबद्दल भारतीय तरुणांमध्ये आलेली जागरूकता आणि हे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची संख्या वाढल्यामुळे या क्षेत्रात भारतीय खलाशांनी अल्पावधीतच यश मिळवलं आहे.
आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने सागरी खलाशांसाठी ठरवलेल्या मानांकनांची पूर्तता करणाऱ्या देशांच्या यादीतही भारताचा समावेश आहे.
मर्चंट नेव्हीमध्ये भारतीय खलाशांची संख्या का वाढली? मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी हवी असेल तर काय करावं लागत? आणि सध्या या क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीयांची संख्या किती आहे? याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न.
आंतरराष्ट्रीय सागरी वाहतूक क्षेत्रात किती भारतीय काम करतात?
शिपिंग महासंचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार 2 लाख 85 हजार 454 भारतीय खलाशी सध्या या क्षेत्रात काम करत आहेत.
जगभरातल्या एकूण खलाशांपैकी 10% खलाशी हे भारतीय आहेत. जगभरातल्या एकूण मालवाहतुकीपैकी 90% मालवाहतूक ही समुद्रमार्गे होते.
14 मार्च 2023ला राज्यसभेचे खासदार तिरुचि सीवा यांनी संसदेत विचारलेल्या अतारांकित प्रश्नाला उत्तर देताना बंदरे, जहाजउद्योग आणि जलमार्ग राज्यमंत्री सरबानंद सोनोवाल यांनी दिलेल्या उत्तरात मागील काही वर्षांमध्ये मर्चंट नेव्हीमधल्या कर्मचाऱ्यांची मागणी वाढल्याचं सांगितलंय. याच उत्तरात मागच्या तीन वर्षांची आकडेवारीही देण्यात आलीय.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानुसार 2020मध्ये 2 लाख 24 हजार 478 भारतीय कर्मचारी मर्चंट नेव्हीमध्ये काम करत होते. 2021 ला ही संख्या थोडी कमी झाली 2 लाख 5 हजार 787 भारतीय कर्मचारी होते त्यानंतर 2022मध्ये ही संख्या 2 लाख 50 हजार 71वर जाऊन पोहोचली.
या क्षेत्रात अधिकाधिक भारतीयांनी करिअर करावं यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचंही सोनोवाल यांनी सांगितलं.
शिपिंग महासंचालनालयाच्या आकडेवारीनुसार 2010 मध्ये 62,267 भारतीय या क्षेत्रात काम करत होते. मागच्या 13 वर्षांमध्ये यात सुमारे पाच पटींनी वाढ झाली आहे.
मर्चंट नेव्हीमध्ये भारतीय कर्मचाऱ्यांची मागणी का वाढत आहे?
जगाला खलाशी पुरवणाऱ्या देशांच्या यादीत चीन आणि फिलीपिन्सनंतर भारत सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.
चीनचे सुमारे 33 टक्के खलाशी या क्षेत्रात काम करतात.
चीन आणि भारतीय खलाशांमध्ये सगळ्यांत मोठा फरक हा आहे की चीनचे खलाशी ही बहुतांश चिनच्याच जहाजांवर काम करतात. पण भारतीय खलाशी मात्र इतर देशांच्या जहाजांवरही काम करतात.
भारतीय सागरी खलाशांची मागणी वाढण्यामागे चार प्रमुख कारणं आहेत.
1. भारतात वाढत चाललेली साक्षरता.
2. सागरी प्रशिक्षण केंद्रांची संख्या आणि प्रशिक्षणाचा दर्जा.
3. भारतीय खलाशांचं इंग्रजी भाषेवर असणारं प्रभुत्व.
4. युरोपीय खलाशांचं वाढतं वय

फोटो स्रोत, Ministry of Ports, Shipping and Waterways/facebook
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार भारतात सध्या 166 सागरी प्रशिक्षण संस्था आहेत. पण त्यातला फक्त 50 टक्के जागाच भरल्या जातात. थोडक्यात काय तर या क्षेत्रात अजूनही मोठी संधी आहे.
रशिया युक्रेन युद्धामुळे या दोन्ही देशांमधून होणारा खलाशांचा पुरवठा कमी झाल्यामुळेही भारतीय खलाशांची मागणी वाढली आहे.
रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरु होण्याआधी सुमारे 15 टक्के खलाशी हे या दोन्ही देशांमधून येत होते.
महिला कर्मचाऱ्यांची संख्या कमी
सागरी वाहतूक आणि मर्चंट नेव्हीमध्ये भारतीय पुरुषांच्या तुलनेत महिला कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. 2021 ला फक्त 1599 भारतीय महिला मर्चंट नेव्हीमध्ये काम करत होत्या.
2022 ला ही संख्या 3327 वर गेल्याची माहिती सरबानंद सोनोवाल यांनी दिली होती.
बंदरे, जहाजउद्योग आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या मते, "मर्चंट नेव्हीमध्ये भारतीय महिलांचा सक्रिय सहभाग दिसून येत नाही कारण यातील संधींबाबत फारशी जागरूकता नाही.
शिपिंग कंपन्यांकडून महिलांना या क्षेत्रात येण्यासाठी पुरेसं प्रोत्साहन मिळत नाही आणि भारतीय महिलांमध्ये या क्षेत्राबाबत एक प्रकारचा पूर्वग्रह दिसून येतो."
18 मे 2023ला झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना श्रीपाद नाईक यांनी महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
मर्चंट नेव्हीमध्ये करियर कसं करतात?
भारतात मर्चंट नेव्हीमध्ये करिअर करण्यासाठी खालील पायऱ्या आहेत :
1. फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित हे तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण होणं आवश्यक आहे.
2. IMU CET, ऑल इंडिया मर्चंट नेव्ही एंट्रन्स टेस्ट (AIMNET) सारख्या प्रवेश परीक्षा देऊन किंवा खाजगी शिपिंग कंपन्यांकडून प्रायोजकत्व मिळवून यासाठी प्रशिक्षण घेता येतं.
3. मान्यताप्राप्त डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय चाचण्या करून घ्याव्या लागतात.
दहावीनंतरही मर्चंट नेव्हीतील करियरसाठी काही कोर्सेस आहेत. दहावी उत्तीर्ण झाल्यांनतर पूर्व सागरी प्रशिक्षण संस्थां(pre-sea training institutes)मध्ये नावनोंदणी करता येते.
या संस्था सागरी अकादमीमध्ये सामील होण्याची इच्छा असणाऱ्या पूर्वप्रशिक्षण देतात.
बारावीनंतर किंवा प्री-सी ट्रेनिंगनंतर बी. एस्सी. इन नॉटिकल सायन्स ही पदवी मिळवता येते. यामध्ये पदविका अभ्यासक्रमही उपलब्ध आहे.
हे शिक्षण झाल्यानंतर सागरी मालवाहतूक करणाऱ्या जहाजांवर नोकरीसाठी किंवा इंटर्नशिपसाठी अर्ज करता येतो.











