You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अर्धा नर आणि अर्धी मादी अशा आत्यंतिक दुर्मिळ पक्ष्याचे फोटो पाहिलेत का?
कोलंबियात आढळून आलेल्या या पक्षाची उजवी बाजू नराची आहे तर डावी बाजू मादेसारखी आहे. या पक्ष्यामुळे पक्षीशास्त्रातले तज्ज्ञ आश्चर्यचकित झाले आहेत.
कोलंबियातल्या डॉन मिगेल अभयारण्यात जॉन मुरिलो हे पक्षीप्रेमी पक्षी पाहत होते, तेवढ्यात त्यांना एक आगळावेगळा पक्षी दिसला.
हा पक्षी नेहमीच्या पक्ष्यांपेक्षा फारच वेगळा होता. त्या पक्ष्याची जात होती वाईल्ड ग्रीन हनीक्रीपर. तसा हा पक्षी सामान्यपणे या जंगलात दिसतो. मग या विशिष्ट पक्ष्यात असं काय वेगळं होतं?
त्या पक्ष्याचे डाव्या बाजूचे पंख हिरवे होते आणि उजव्या बाजूचे पंख निळे होते.
आता तुम्ही म्हणाल, त्यात काय. पक्ष्यांचे पंख असतातच रंगीबेरंगी.
पण गंमत अशीये की, या प्रजातीत हिरवे पंख मादांचे असतात तर निळे पंख नरांचे. आता या विशिष्ट पक्ष्यात दोन्ही रंगाचे पंख होते म्हणजे हा पक्षी अर्धा नर, अर्धा मादा होता.
मुरीलो यांना पक्षी जगतातला नवाच शोध लागला होता. त्यांनी आपला शोध न्यूझीलंडच्या ओटॅगो विद्यापीठात प्राणीशास्त्राचे प्राध्यापक आणि पक्षीनिरीक्षण असणाऱ्या हेमिश स्पेन्सर यांना सांगितला.
प्राध्यापक स्पेन्सर बीबीसीशी बोलताना म्हणाले, “मी फारच उत्तेजित झालो आहे. अनेक पक्षी निरीक्षकांना साधे-साधे पक्षीही दिसत नाहीत. जॉनने जो शोध लावला तो मला पाहाता आला याचा मला फारच आनंद झाला.”
ते कोलंबियात सुट्टी घालवण्यासाठी आले होते.
अर्धी मादी आणि अर्धा नर असे पक्षी फारच दुर्मिळ आहेत. त्यांच्या मते न्यूझीलंडमध्ये तर असाही एकही पक्षी दिसल्याची नोंद नाही.
प्राध्यापक स्पेन्सर यांनी पक्ष्यांच्या अभ्यासाला वाहिलेल्या एका मासिकात मुरिलो आणि इतर तज्ज्ञांसह एक लेख लिहिला. त्यात असं म्हटलं की, “गायनांड्रोमॉर्फ म्हणजे असे जीव ज्यांच्या एका शरीराच्या एका बाजूला नराची लक्षणं असतात तर एका बाजूला मादीची. पक्ष्यांमध्ये असं फारच क्वचित वेळा आढळतं.”
ही रचना अनेक प्राण्यांमध्ये, किटकांमध्ये आढळून येते. उभयलिंगी प्राणीही असतात. पण पक्षी नसतात.
जॉन मुरिलो यांना दिसलेला पक्षी हा गेल्या 100 वर्षातली अशा प्रकारच्या पक्ष्याची फक्त दुसरी नोंद आहे.
“पक्ष्यांची लिंगभिन्नता आणि त्यांचं प्रजजन तसंच लैंगिक जीवन समजण्यासाठी अशा विशिष्ट पक्ष्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे,” प्राध्यापक स्पेन्सर यांनी ओटॅगो विद्यापीठाच्या पत्रकात म्हटलं.
“या पक्ष्याच्या उदाहरणावरून दिसतं की पक्ष्यांच्या अनेक प्रजातींमध्ये मादी आणि नराची लक्षणं दाखवणारे पक्षी असतील,” या पत्रकात पुढे म्हटलं आहे.
पण हा पक्षी जन्माला कसा आला?
स्पेन्सर म्हणतात की, मादी आणि नर दोघांसारखे पंख असणं हे तिथल्या पेशींच्या क्रोमोझोम्समुळे झालं असावं. त्याचा हार्मोनल बदलाशी संबंध नसावा.
अशी लक्षणं कीडे, फुलपाखरं, विंचू-खेकड्यासारखे कवचधारी प्राणी, कोळी, पालींच्या प्रजाती आणि उंदीर-घुशींच्या प्रजातींमध्ये आढळून येतात.
ते पुढे म्हणतात, “पेशींचं विभाजन होताना काहीतरी गल्लत झाली असेल, त्यातच दोन स्पर्म्सचं दोनदा फलन झालं असेल त्यामुळे हा पक्षी जन्माला आला.”
21 महिने तरी दिसत होता
डॉन मिगेल अभयारण्यात पक्ष्यांना खाण्यासाठी खास जागा तयार केल्या आहेत.
इथे ताजी फळं आणि साखरेचं पाणी ठेवलं जातं त्यामुळे अनेक पक्षी इथे अन्नाच्या शोधात येतात. पक्षी निरीक्षकांना इथे अनेक पक्ष्यांचं दर्शन होतं.
या विशिष्ट पक्ष्याचं स्पेन्सर, मुरिलो आणि इतर अभ्यासकांनी निरीक्षण केलं.
त्यांनी आपल्या लेखात म्हटलं, “हा पक्षी कमीत कमी 21 महिने या भागात असावा. याचं वागणं याच्या प्रजातीतल्या इतर पक्ष्यांसारखंच आहे. पण अनेकदा तो आपल्या प्रजातीचे इतर पक्षी उडून जायची वाट पाहायचा आणि मगच पक्ष्यांसाठी टाकलेली फळं खायला यायचा.”
“नंतर मात्र तो आपल्या जागेसाठी भांडू लागला. तो आपल्याच जातीच्या इतर पक्ष्यांना त्याच्या खाण्याच्या जागी येऊ द्यायचा नाही,” असंही त्यांनी नमूद केलं. पण तो असं का करत असावा याचं कारण तज्ज्ञांकडे नव्हतं.
“त्या विशिष्ट पक्ष्याने आपल्या प्रजातीतल्या इतर पक्ष्यांशी संबंध ठेवला नाही आणि त्याच्या प्रजातील्या इतर पक्ष्यांनीही त्याला टाळलं. त्याला प्रजनन करण्याची संधी मिळाली असेल असं वाटत नाही,” असंही त्या लेखात पुढे म्हटलं आहे.
जरी या पक्ष्याने प्रजनन करून आपला वंश पुढे नेला नसला तरीही पक्षी जगतावर आपली एक मोठी छाप सोडली आहे हे नक्की.
हेही वाचलंत का?
बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.