होर्डिंग डिसॉर्डरः वस्तूंचा अनावश्यक साठा करण्याची सवय कशी लागते? त्यातून कशी सुटका करुन घ्यायची?

होर्डिंग

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

कपडे, रद्दी, पुस्तकं, भांडी, कटलरी, सीडी, कॅसेटस्, बॅगा, पिशव्या अगदी भंगारासारख्या वस्तूंनी आणि सामानानं भरलेली घरं, वस्तूंनी वाहाणारी कपाटं तुम्ही पाहिलेली आहेत का? किंवा या वस्तूंची एका प्रमाणाबाहेर गरज नसतानाही त्या साठवणाऱ्या व्यक्ती पाहिलेल्या आहेत का? त्यावरच आपण येथे माहिती घेणार आहोत.

आपल्या सर्वांना एका ठराविक मर्यादेपर्यंत गरजेच्या वस्तूंची आवश्यकता असते. मात्र कधीतरी आपल्याला या वस्तू लागतील या धारणेपोटी काही लोक कळत-नकळत वस्तू साठवत जातात. त्यांच्याच आयुष्यात मोठा अडथळा तयार होतो.

दैनंदिन कामकाजात या वस्तूंच्या पसाऱ्यामुळे आणि ढिगाऱ्यामुळे अनेक अडचणी येतात. यातील काही त्रास मानसिक पातळीवरही होत असतात. अशा लोकांना होर्डिंग डिसॉर्डर म्हणजेच वस्तू साठवण्याच्या सवयीमुळे तयार झालेली स्थितीचा त्रास होत असू शकतो.

वस्तू किंवा या ढिगाऱ्याचं प्रमाण एवढं वाढत जातं की त्या व्यक्तीला आपल्या घरातच इकडं तिकडं फिरणं कठीण होतं.

या ढिगाऱ्याचा, कचऱ्याचा, वस्तूंचा मनावरही परिणाम होतो. त्यामुळे अनेक नकारात्मक विचारही मनात येतात.

या वस्तू हव्याश्या वाटत असल्यामुळे जर कुणी त्यांची जागा बदलली किंवा त्या टाकून दिल्या तर वस्तू साठवणाऱ्या व्यक्तीला प्रचंड त्रास होऊ शकतो. त्या वस्तू टाकणाऱ्या व्यक्तीशी संबंध बिघडू शकतात, कौटुंबिक वादही होऊ शकतात.

वस्तूंचा साठा करण्याची सवय तारुण्यातही लागू शकते. वाढत्या वयोनुसार साठा वाढत गेला की त्याची समस्या होते आणि नंतर त्याचा अधिकच त्रास होऊ लागतो.

या साठ्यात वर्तमानपत्रं, जुनी बिलं, पावत्या, मासिकं, कपडे, प्लॅस्टिक किंवा धातूचे डबे, खोके, किंवा बाटल्या, किराणा वस्तूही असू शकतात.

होर्डिंग

फोटो स्रोत, Getty Images

अर्थात इथं वस्तू गोळा करणे आणि साठा करणे यातला फरक माहिती असणं आवश्यक आहे. पुस्तकं, स्टॅम्प्स, काडेपेटीचे कागद, देशोदेशीचं चलन, नाणी अशा वस्तू गोळा करण्याचा छंद असू शकतो. कारण त्याला एकप्रकारची शिस्त असते.

ते एका विशिष्ट पद्धतीनं गोळा केलं जातं, सुरक्षित ठेवलं जातं, मांडून ठेवलं जातं. वर्तमानपत्रातली कात्रणं व्यवस्थित कापून एका वहीत चिकटवणं वेगळं आणि वर्षानुवर्षं जुनी रद्दी घरात साठवणं वेगळं. त्यामुळे गोळा करण्याचा छंद आणि साठा करण्याची सवय यातला फरक माहिती असणं आवश्यक आहे.

वस्तू गोळा करणे आणि त्याचा साठा करणे यातला फरक कसा ओळखायचा याबद्दल मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कीर्ती तांडेल यांनी माहिती दिली.

ते म्हणाले, "छंद म्हणून वस्तू गोळा करण्यात एक आनंदी भावना असतं, गरज असते, नियोजन असते. ते प्रमाणबद्धता, नीटनेटकेपणा-सुटसुटीतपणा असतो."

होर्डिंग

फोटो स्रोत, Getty Images

"मात्र या होर्डिंग डिसॉर्डरमध्ये काहीही नियोजन नसतं. या वस्तू फेकायला सांगितल्या तर त्यांना ताण येतो, त्रास होतो. त्याची माहिती रुग्णाचे कुटुंबीय नीट सांगू शकतात. काही घरात चालायलाही जागा राहात नाही इतक्या वस्तू साठवल्या जातात. स्वयंपाकघरात इतक्या वस्तू ठेवतात की मूळ स्वयंपाकालाच जागा राहात नाही. सगळीकडेच पसारा असतो. त्यांच्या विचार आणि कृतीत कोणतंही नियोजन नसतं."

"फेकायला सांगितलं की अँक्झायटीसारखा त्रास होतो. कुटुंबात भांडणं होत असतात, काही कुटुंबीय याला कंटाळून घरही सोडून जातात. ओसीडीमध्ये होर्डिंग बिहेवियर दिसतं. स्किझोऑब्सेसिव्ह या आजारातही ही हे दिसून येतं.

यंग टिनेजमध्ये म्हणजे अगदी तारुण्याच्या उंबरठ्यावरच्या किंवा पौगंडावस्थेतील लोकांत एडीएचडीमध्येही (अटेंशन डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसॉर्डर) याचं प्रमाण दिसतं."

वस्तू साठवण्याची सवय

अशाप्रकारची सवय असणाऱ्या लोकांना आपल्याला ही अनावश्यक सवय लागली आहे आणि तिचा आपल्यावर परिणाम होतोय हेच माहिती नसतं. बहुतांश लोकांना या सवयीची लाज किंवा अपराधी भावना मनात असते. त्यामुळे या त्रासाची कल्पना आली तरी ते मदत घेण्यास प्रयत्न करत नाहीत.

अशा वस्तू का साठवल्या जातात किंवा एखाद्या व्यक्तीला ही अनावश्यक वस्तू मोठ्या प्रमाणात साठवण्याची सवय का लागते याची काही कारणं असू शकतात. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्विसने म्हणजे एनएचएसने काही शक्यता सांगितल्या आहेत.

  • अत्यंत पराकोटीचं नैराश्य
  • स्किझोफ्रेनियासारखे मानसिक आजार
  • मंत्रचळ म्हणजे ओसीडी(ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसॉर्डर)
  • सारख्या आजार असणाऱ्यांना होर्डिंगची सवय लागू शकते.
  • एनएचएसने काही इतर शक्यतांबद्दल माहिती दिली आहे.
  • जसं की एकटं राहाणारी व्यक्ती, अविवाहित व्यक्ती, लहानपणी अत्यंत उपेक्षित आयुष्य वाट्याला आलं असेल किंवा वस्तू मिळाल्या नसतील तर,
  • घरात पिढ्यानपिढ्या वस्तू साठवण्याची सवय असेल तर किंवा वस्तू नीटनेटक्या ठेवण्याची सवय नसेल तर ही सवय लागू शकते असं एनएचएस म्हणतं.

तसंच या लोकांना आपल्याला पुढे कधीतरी या वस्तू लागतील असं वाटत असतं. बऱ्याचदा वस्तू मिळाली की आनंद होईल असं वाटतं पण अगदी थोड्याच काळात तो आनंद संपतो किंवा आनंद मिळतच नाही. त्यामुळे पुन्हा पुढच्या वस्तूची खरेदी अशा चक्रात ती व्यक्ती सापडण्याची शक्यता असते.

होर्डिंग

फोटो स्रोत, Getty Images

काही लोकांनी वस्तूंशी भावना जोडून ठेवलेल्या असतात. त्या घरातल्या इतर किंवा बाहेरच्या लोकांच्या असतीलच असं नाही. त्यांना या वस्तू पसारा किंवा निरर्थक वाटू शकतात. इतर लोकांना या वस्तू कचरा वाटू शकतात.

वस्तू साठवण्याची सवय लागलेल्या व्यक्तीलाही आपण चुकत आहोत याची जाणिव असू शकते मात्र पराकोटीची अपराधी भावना आणि लाजेखातर ते याबद्दल बोलणं किंवा कृती टाळतात.

या व्यक्तींना निर्णय घेण्यात अडथळे येत असतात. उदाहरणार्थ एखादी वस्तू आपल्याला खरंच गरजेची आहे का, ती लागणार आहे का, ती फेकली तर काय होईल, किती वस्तूंची गरज आहे अशा सोप्या निर्णयांनाही ते सामोरे जाऊ शकत नाहीत.

वस्तूंचा साठा करत असल्याची लक्षणं

होर्डिंग डिसॉर्डरची काही लक्षणंही एनएचएसने सांगितली आहेत.

  • या लोकांचा अत्यंत कमी किंमतीच्या किंवा अगदीच किंमत नसलेल्या वस्तूंचा अनावश्यक साठा करण्याचा कल असतो. यामध्ये रद्दी, जुनी बिलं, पिशव्या अशा वस्तूंचा समावेश होतो.
  • हा त्रास असणाऱ्या लोकांना साठा केलेल्या वस्तू नीट ठेवणं शक्य होत नसतं.
  • निर्णय घेण्यात अडथळे येत असतात.
  • रोजची स्वयंपाक, स्वच्छतेसारखी कामं करणं कठीण होत असतं.
  • ते या वस्तूंबद्दल एकदम भावनिक असतात. या वस्तूंना कोणी हात लावणं, त्या कोणाला वापरायला देणं त्यांना आवडत नाही
  • मित्र किंवा कुटुंबांशी त्यांचे संबंध ताणलेले असू शकतात.

वस्तूंचा साठा करण्याचा त्रास काय होतो?

मानसिक त्रासाप्रमाणे काही मोठे धोकेही या सवयीमुळे संभवतात. असा वस्तूंचा ढिगारा असणारी घरं धुळीनं भरलेली असतात. घर स्वच्छ करणंही कठीण होईल इतक्या वस्तू तेथे साठवलेल्या असतात. यामुळे अनेक प्रकारचे किडे, कीड, पाली, झुरळं, उंदीर, घुशी, ढेकूण, साप यांना शिरकाव करायला संधी मिळते.

या ढिगाऱ्यांखाली कोणी सापडण्याची शक्यता असते तसेच आग लागण्याचा मोठा धोका असतो.

अनावश्यक साठा करण्याच्या सवयीवर उपचार काय आहेत?

या मनोवस्थेवरील उपचारांबद्दल बोलताना डॉ. कीर्ती तांडेल म्हणाले, “होर्डिंग डिसॉर्डरमध्ये आपले विचार अतार्किक आहेत हे कळत असतं मात्र त्यावर काम करणं त्यांना शक्य होत नसतं. त्यावर उपचारासाठी त्यांना होणाऱ्या अँक्झायटीवर काम केलं जातं. सीबीटी, आरइबीटी या उपचारपद्धतींचा वापर केला जातो.

तीव्रतेनुसार औषधांचा आधार घेतला जातो. त्यांचा फार चांगल्या प्रकारे उपयोग होतो. औषधं आणि समुपदेशन दोन्हीचा फायदा होतो. यात कुटुंबालाही सहभागी करुन घ्यावं लागतं.”

होर्डिंग

फोटो स्रोत, Getty Images

होर्डिंग डिसॉर्डर म्हणजे साठवण्याच्या या आजारावर बिहेवियर थेरपी म्हणजे वर्तनासंदर्भातील उपचार कसे मदत करतात याबद्दल मानसोपचारतज्ज्ञ गौरी जानवेकर यांनी माहिती दिली.

त्या म्हणाल्या, “होर्डिंग डिसॉर्डरबरोबर नैराश्य, चिंता किंवा इतर लक्षणं दिसत असतील तर त्यावर औषधोपचारांची मदत घेतली जाते. मात्र फक्त होर्डिंग डिसॉर्डरवर मात करण्यासाठी बिहेवियरल थेरपीचा वापर होतो. सवयी आणि वर्तनासंदर्भातील दोषांवर किंवा बदलसांठी आरईबीटी, सीबीटी (रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी आणि कॉग्नायटिव्ह बिहेवियरल थेरपी) यांचा उपयोग होतो.

या उपचारांत आपल्या मनात येणाऱ्या चुकीच्या धारणांवर विचार करुन त्यांना आव्हान द्यायला शिकवलं जातं. होर्डिंग डिसॉर्डर असणाऱ्या लोकांना बहुतेकवेळा भविष्याच्या चिंतेमुळे अस्वस्थता असते त्यावर मात करावी लागते.

प्रत्येक गोष्ट आपल्या हाताशी असलीच पाहिजे असा विचार मनात येत असतो त्याला आव्हान या उपचारांत दिलं जातं. तसंच ते प्रत्येक विचाराचं भयंकरीकरण करतात ते थांबवण्यासाठी प्रयत्न केले जातात.”

होर्डिंग डिसॉर्डर

फोटो स्रोत, Getty Images

अशाप्रकारचे उपचार करणारे तज्ज्ञ त्या व्यक्तीला नीट मार्गदर्शन करतात. या वस्तूंचा कसा त्रास होतोय याची जाणिव होण्यास मदत करतात. अनावश्यक वस्तूंची जाणिव झाली की त्यापासून कशी सूटका करता येईल, निर्णय कसे घ्यायचे याबद्दल मार्गदर्शन केलं जातं.

उपचारांमुळे त्या व्यक्तीनं लगेच वस्तू फेकून दिल्या असं होत नाही, तर त्यांना सुरुवातीला फक्त समस्येची जाणिव होते. त्यांच्या मनात एक पुढचा दिशादर्शक नकाशा तयार होतो.

कशाप्रकारे टप्प्याटप्प्याने यातून सुटका करुन घ्यायची याचे एक नियोजन तयार होण्यास मदत होते, निर्णयक्षमता सुधारते. या उपचारांसाठी काही काळ देण्याची तयारी पाहिजे तसेच चिकाटी आणि शरीर-मन निरोगी राहावं यासाठी आपण हे करत आहोत यावर विश्वास असला पाहिजे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)