You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लहान मुलांचं लैंगिक शोषण थांबवण्यासाठी काय करावं? वाचा
- Author, अनुजा कुलकर्णी
- Role, समुपदेशक, जिज्ञासा गायडन्स व कौन्सिलिंग सहसंस्थापक
- Reporting from, पुणे
काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका शाळेत नृत्य शिक्षकाने वेगवेगळ्या वेळी दोन ते तीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. यानंतर आणखी एका शाळेत तिसरीत शिकणाऱ्या एका मुलाने प्री-स्कूलमधील तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली.
लहान वयात मुलं आजूबाजूच्या लोकांवर विश्वास ठेवणं, नवीन नात्यांबद्दल शिकणं, खेळीमेळीनं वागणं, मैत्री करणं हे अनुभवतात. याच वयात त्यांच्यात आपल्यासाठी चांगलं आणि वाईट काय, हे ठरवण्यास सुरुवात होते.
अशा नाजूक वयात अशा पद्धतीच्या नकारात्मक आणि वेदनादायी अनुभवांनी मनावर किती खोल परिणाम होत असेल याचा विचार केला, तरी मन हेलावते. या पार्श्वभूमीवर लहान मुलांचं लैंगिक शोषण थांबवण्यासाठी काय करता येईल, हे जाणून घेऊयात.
मुलांना गुप्तांगाबद्दल बोलण्याची लाज वाटते
बऱ्याचदा मुलं स्वतःच्या गुप्तांगाबद्दल बोलायला बिचकतात, ओशाळतात. पालक काय विचार करतील याचा विचार करून मुले असुरक्षित स्पर्शाचा अनुभव आल्यानंतर देखील त्याबद्दल पालकांशी बोलायला कचरतात.
या सगळ्याची सुरुवात अगदी लहानपणी होते. मुलं चुकून किंवा कुतूहल म्हणून स्वतःच्या गुप्तांगाला हात लावतात, तेव्हा ते बघून पालक चिडून त्यांच्या हातावर फटका मारतात. चारचौघांमध्ये मुलांवर डोळे वटारतात, ओरडतात किंवा चिडवतात. अशा या वागण्यातूनच गुप्तांगाबद्दल लाज वाटण्यास सुरुवात होते.
ओरडल्याचे, मारल्याचे असे अप्रिय अनुभव मुलांना जवळच्या लोकांकडून आलेले असू शकतात. त्यामुळे असुरक्षित स्पर्शाचा अनुभव आला तरीही मुलं त्याबाबत पटकन पालकांशी बोलायला घाबरतात आणि ओशाळतात.
मुलांनी त्यांच्या गुप्तांगाला हात लावणं योग्य नाहीच, पण गप्पांमधून गुप्तांग कुठले? त्याची काळजी का घ्यायची? याबाबत सुसंवाद होऊ शकतो.
पालकांशी मोकळेपणाने बोलू शकतो हा मुलांना विश्वास हवा
तू माझ्याशी काहीही बोलू शकतोस किंवा शकतेस हा विश्वास पालकांनी मुलांना देणं गरजेचं आहे. आता बरेच पालक मुलांना 'तू मला काहीही सांगू शकतोस', असं म्हणतानाही दिसतात. परंतु कुठलीही गोष्ट सांगितल्यानंतर त्यावर येणारी त्यांची प्रतिक्रिया बऱ्याचदा चिडलेली, रागावलेली असते.
यामुळे मित्राबाबत गोष्टी सांगताना मुलं फारसा विचार करत नाहीत, पण स्वतःच्या बाबतीत खरी घडलेली गोष्ट मुलं फिरवून किंवा त्यात बदल करून सौम्य पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतात.
पालक म्हणून याचा अर्थ 'तू मला सांगितलेली प्रत्येक गोष्ट मी ऐकून घेईन आणि मला ते पटेल असं नाही, पण निदान सांगताना तरी तुला भीती वाटायचं कारण नाही' हा विश्वास आपल्या प्रतिक्रियांमधून कृतींमधून आपण मुलांना देऊ शकतो.
पालकांना विश्वासाने काहीतरी सांगता येत आहे आणि तुम्ही ते शांतपणे ऐकून घेत आहेत असा तीन ते चार वेळा अनुभव आल्यावरच मुलं पालकांवर विश्वास ठेवायला लागतात.
मुलांबरोबरचा खेळ, आनंदाचे प्रसंग आणि दंगामस्ती
मुलांबरोबर फक्त गप्पाच पुरेशा नाहीत. त्यांच्याबरोबर चांगले अनुभवही घ्यायला हवते. खेळणं, मुलांबरोबर विनोद करणं, कधी मुलांना मजे मजेत त्रास देणं, उषांची फायटिंग करणं, मुलांच्या अंगावर पाणी उडवणं यासारख्या अनेक गोष्टींचा यात समावेश हवा.
यातून आपल्याबरोबर खेळणारी व्यक्ती आपल्याबरोबर आनंद अनुभवू शकते, तशीच ती व्यक्ती आपल्या दुःखात, भीतीमध्येही आपली साथ देऊ शकते, असा विश्वास मुलांना वाटतो.
हे वाचायला छान वाटत असेल आणि पटतही असेल, तरी आजच्या काळात मुलांसाठी पालकांना वेळ मिळणं ही अतिशय दुर्मिळ झालेली गोष्ट आहे. आपण मुलांसाठी पूर्णपणे उपलब्ध आहोत असा दिवसातला 30 ते 40 मिनिटांचा वेळ तरी हवाच.
असा वेळ प्रत्येक दिवशी दोन्ही पालकांना देता येईल असं नाही, परंतु कधी आई, कधी बाबा, कधी दोघांनी हा वेळ द्यावा. वेळ देणं ही शनिवारी किंवा रविवारी करायच्या क्रॅश कोर्समधली गोष्ट नाही. रोज एखादी खेळाची, एखादी छंदाची, जेवताना एकत्र गप्पा मारण्याची, पत्त्याचा डाव खेळण्याची, सायकल एकत्र चालवण्याची, व्यायाम एकत्र करण्याची, कुठली तरी कृती आपण मुलांबरोबर ठरवून घेऊ शकतो.
सोशल मीडिया आणि टेक्नॉलॉजीचा होणारा परिणाम
आता आणखी एक ज्वलंत मुद्दा म्हणजे आपल्या आयुष्यात सोशल मीडिया आणि टेक्नॉलॉजीचा होणारा परिणाम. बऱ्याचदा लहान मुलं इतर मुला-मुलींना असुरक्षितपणे स्पर्श होताना पाहतात. जेव्हा त्याबाबत नंतर त्यांच्याशी बोलणं होतं, तेव्हा असं जाणवतं की, त्यांनी हे टीव्हीवर, मीडियामध्ये, एखाद्या वेब सीरिजमध्ये किंवा जाहिरातीमध्ये बघितलेलं असतं.
आजकाल मुलं मोबाईलवर गेम्स खेळत असतानाही जाहिराती, चित्रपटांचे ट्रेलर, सीरियलच्या जाहिराती या सगळ्याच गोष्टी बघतात. यामुळे मुलांना नको तेवढं एक्सपोजर मिळतं. मुलं आई-वडिलांचा, आजी-आजोबांचा मोबाईल घेऊन घरात कुठल्यातरी कोपऱ्यात वेगळ्या खोलीत जाऊन बसतात. ते नक्की काय बघतात याची कित्येकदा घरातल्या मोठ्यांना माहिती देखील नसते.
बऱ्याचदा मुलांच्या हातात मोबाईल असताना त्यावर त्यांना काय दिसावं यावर पालकांचं नियंत्रण नसतं. यातूनच अयोग्य वयात नको त्या अनेक गोष्टी बघितल्या जातात. शक्यतो मुलांचा स्क्रीन टाईम हा मोठ्या स्क्रीनवर असावा. प्रत्येक वेळी मुलांबरोबर आपणही शेजारी बसणं शक्य होत नाही, पण निदान पेरेंट कंट्रोल वापरून आपण मुलं स्क्रीनवर काय बघत आहेत यावर लक्ष ठेऊ शकतो, नियंत्रण ठेऊ शकतो.
मुलांची स्व संकल्पना
माझ्या मुलाला सुरक्षित वाटण्यासाठी मुळात त्याला किंवा तिला स्वतःबद्दल चांगलं वाटणंही तितकंच महत्त्वाचं आहे. संशोधन असं सांगतं की, ज्या मुलांची स्व संकल्पना म्हणजेच स्वतःबद्दलची भावना स्वास्थ्यपूर्ण आणि सुरक्षिततेची आहे ती मुलं असुरक्षित व नकोसे वाटणारे स्पर्श, तसं इतरांचं वागणं, कटूतेनं बोलणं असं काहीही सहन करणं पसंत करत नाहीत.
अशा मुलांना प्रत्यक्ष प्रतिकार करता आला नाही, तरी ते स्वतःला अशा व्यक्ती किंवा घटनेपासून लांब करण्याचा प्रयत्न करतात. अर्थात ही समज येण्यासाठीही कमीत कमी 6 ते 7 वर्षाचे वय व्हावे लागते. परंतु या वयानंतरही 'इमोशनल वल्नरेबिलिटी' टाळता येण्यासारखी आहे. मुलांमध्ये आत्मविश्वासाची भावना कुठल्या गोष्टींमधून निर्माण करता येईल हे दोन्ही पालकांनी मुलांबद्दलच्या निरीक्षणातून, त्यांना आवडणाऱ्या कृतींमधून शोधायला हवे.
असुरक्षित स्पर्श जाणवला तर प्रतिकार
असुरक्षित स्पर्शासंदर्भातला सर्वात शेवटचा आणि कळीचा मुद्दा म्हणजे कोणाहीकडून असुरक्षित स्पर्श जाणवला, तरी प्रतिकार करणं आणि अशा व्यक्तीपासून स्वतःला लांब नेता येणं महत्त्वाचं. असुरक्षित स्पर्शाच्या बाबतीत बऱ्याचदा असे प्रकार ओळखीच्या किंवा जवळच्या वाटणाऱ्या व्यक्तींकडूनच केले जातात. त्याचमुळे मुले गोंधळतात आणि बुचकळ्यात पडतात.
मला जवळचा वाटणारा व्यक्ती मला त्रास कसा देऊ शकेल? याबाबत मी कोणालाही सांगितलं, तरी माझ्यावर विश्वास कोण ठेवेल? मी त्या व्यक्तीबद्दल इतरांना सांगितल्यानं माझ्याकडून तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती दुखावली जाईल का? असे प्रश्न उपस्थित होऊन बऱ्याचदा होणारा गैरप्रकार मोठ्या काळासाठी सहन केला जातो.
कधी कधी गैरप्रकार करणारी व्यक्ती मुलांना ब्लॅकमेलही करत असते. त्यामुळं मुलांबरोबर याविषयी बोलत असताना कुठल्याही व्यक्तीबाबतीत असुरक्षित वाटले, तरी तो अपवाद नसतो हे सांगणं महत्त्वाचं आहे. त्रास देणाऱ्या माणसाची चूक असते आणि त्रास सहन करणारा माणूस चुकीचा नसतो हे देखील मुलांना वारंवार सांगणं गरजेचं आहे.
आपलं आयुष्य गुंतागुंतीचंही झालं आहे. अशा जीवनशैलीमध्ये टिकाव धरण्यासाठी मुलांना त्यांचं बालपण सुरक्षितपणे उपभोगता आलं पाहिजे. मुलांना सोयी सुविधा, शिक्षण देताना पालक म्हणून आपण मुलांच्या मानसिक स्वास्थ्याचा आणि सुरक्षिततेचाही तितकाच विचार करायला हवा.
लैंगिक छळ ही एक प्रकारची मानसिक विकृतीच आहे, पण निदान कुटुंबातील विश्वासार्हता आणि मुलांचं मनोबल, कडक होत जाणारे कायदे, शिक्षा यामुळे या विकृतीला खीळ बसणं शक्य होईल.
लेखातील मतं वैयक्तिक आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)