कर्णबधीर मुलगी जन्मली, घरच्यांनी साथ सोडली, तिने जिद्दीने मुलीला ऑलिंपिकपर्यंत पोहोचवलं

    • Author, राहुल रणसुभे
    • Role, बीबीसी मराठी

“माझी दुसरी कुठली ओळख असण्यापेक्षा 'आदितीची आई' ही ओळख माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. आज आदितीला 299 मेडल्स मिळाले आहेत. त्यामध्ये इंटरस्कूल, सागरी, स्टेट लेव्हल, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय असे हे सगळे मेडल्स आहेत. आज आमचं घर बघितलं तर सगळं मेडल्सने भरलेलं आहे.“ हे शब्द आहेत छत्रपती संभाजीनगरच्या वैशाली निलंगेकर यांचे.

वैशाली या शहरातल्याच एका कान नाक घसा रुग्णालयात स्पीच अँड व्हाईस थेरपीस्ट म्हणून काम करतात.

तर 23 वर्षांची आदिती ही भारतीय पोस्ट खात्यात नोकरी करते.

त्यांच्या घरात पाऊल ठेवताच त्यांच्या शिस्तीचा, त्यांच्या निटनेटकेपणाचा अंदाज आपल्याला येतो.

एका बाजूला असलेल्या शोकेसमध्ये आदितीच्या मेडल्स आणि ट्रॉफ्यांनी गर्दी केली आहे, तर समोरच असलेल्या भिंतीवर आदितीच्या स्विमींगचं, तिच्या कार्याचं कौतूक केलेल्या अनेक फोटो फ्रेम्स, पेपरची कात्रणं आपलं लक्षं वेधून घेतात.

जेवढं नेटनेटकं आणि आकर्षक घर त्यांनी ठेवलं आहे, तेवढाच खडतर प्रवास त्यांनी त्यांच्या आयुष्यात केला आहे.

समथिंग इज राँग

वैशाली यांचं वयाच्या 21 व्या वर्षी लग्न झालं आणि लग्नानंतर वर्षभरात त्यांना मुलगी झाली. पण मुलीच्या जन्मानंतर तिच्या कमी ऐकू येत असल्याचं वैशाली यांच्या लक्षात आलं.

त्यानंतर मात्र त्यांची धावाधाव सुरू झाली. त्या दिवसाबद्दल वैशाली सांगतात,

“आदिती 16 महिन्याची असताना मला असं जाणवलं की, आदितीला पाठीमागून बोललेलं लक्षात येत नाहीये. ती रिस्पॉन्स देत नाही आणि थोडंसं मला सतत मनामध्ये असं वाटत होतं की, समथिंग इज रॉंग.”

त्यावेळी वैशाली लातूरमध्ये राहायच्या. त्यांनी स्थानिक डॉक्टरांकडे धाव घेतली. तेव्हा त्यांना पुण्याला जाऊन आदितीची टेस्ट करून घेण्यास सांगीतलं.

100% बहिरेपणाचा रिपोर्ट

पुण्यातल्या त्या टेस्टच्या दिवसाबद्दल वैशाली यांना आजही सर्व आठवतं.

त्या सांगतात “पुण्याला ज्यावेळेस आदितीच्या कानाची टेस्ट करण्यासाठी गेलो, तेव्हा मी फक्त एवढी प्रार्थना करत होते की, माझं बाळ ठार बहिरं नसावं. की ज्याला साईन लँग्वेज शिकवावी लागेल. कानाच्या मशीनने का होत नाही तिला ऐकायला यावं अशी माझी इच्छा होती.

आम्ही तिथे गेलो. ज्यावेळेस टेस्ट करण्यासाठी त्या रुममध्ये ते छोटसं वर्षभराचं बाळ माझ्या मांडीवर होतं, त्यावेळी मी किती तरी देव आठवले असतील. तरी असं कुठेतरी वाटायचं की, ऐकू येतं असा रिपोर्ट यावा. ती पंधरा मिनिटं माझ्यासाठी म्हणजे खूप वेगळी होती.

ज्यावेळेस तिचा रिपोर्ट आला आणि त्यात 100% हिअरिंग लॉस आहे असं होतं. त्यावेळी मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा प्रचंड रडली असेल.”

हे सांगताना आजही त्यांचे डोळे पाणावतात.

कुंटुंबीयांकडून झाला विरोध

या मानसिक धक्क्यातून त्या अजून सावरत नाहीत, तोच अजून एक मानसिक आघात त्यांच्यावर झाला. त्या घटनेबाबत त्या सांगतात,

“समाजात आजही अपंगत्व असलेलं मुल स्वीकारण्याची तयारी नाहीये. मला वाटायचं की बाळाला ऐकू येत नाही, मग ते हेरिंग एड वापरेल वगैरे... पण, या सगळ्या गोष्टीला माझ्या सासरकडून विरोध झाला.

ते म्हणाले की सेकंड चाइल्ड आपण होऊ देऊ. तिच्या नशिबाने तिचं जे व्हायचं असेल ते तसं होईल. तिला आपण सांभाळू. पण ही गोष्ट लपवणं मला मान्य नव्हतं. याच्यामुळे मग आमचं मॅरेज लाईफ थोडंसं डिस्टर्ब झालं. आमच्यामध्ये वाद सुरू झाले.”

वैवाहिक आयुष्य कोलमडलं

ज्या काळात त्यांना ज्यांच्याकडून खऱ्या आधाराची गरज होती त्यांनीच माघार घेतल्यावर वैशाली एकट्या पडल्या.

त्यांच्या पतीचाही त्यांच्या निर्णयाला विरोध होता. त्यामुळे आपण एकट्यानेच आदितीचा सांभाळ करायचा हे त्यांनी मनाशी पक्क ठरवलं आणि त्यांच्या पतीपासून त्या वेगळ्या झाल्या.

या सर्व काळात माहेरच्यांनी त्यांना साथ दिली. त्यांनी वैशालींच्या निर्णयाचा आदर केला. मात्र वैशाली माहेरी जाऊनही राहिल्या नाहीत. त्यांनी आदितीची जबाबदारी एकट्याने उचलली आणि त्या औरंगाबादला (आताचं छत्रपती संभाजीनगर) आल्या.

स्वतःच ट्रेनिंग द्यायला सुरुवात

आदिती सव्वा वर्षांची असताना तिच्या स्पीच थेरपीसाठी वैशाली ट्रेनरचा शोध घेऊ लागल्या. मात्र एवढ्या लहान मुलांना स्पेच थेरपी देता येत नाही हे कळाल्यावर त्यानी स्वतःच आदितीला स्पीच ट्रेनिंग द्यायचं ठरवलं.

त्यांनी मुंबई येथील अली यावर जंग स्पीच अँड हिअरिंग डिसॅबलिटिज सेंटरची काही पुस्तकं आणि संशोधन वाचून त्याप्रमाणे आदितीला घरीच ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली.

“माझं MA Bed झालं आहे. त्यामुळे मुलांना कसं सांभाळायचं हे मला माहिती होतं. या ट्रेनिंगमध्ये मी तिला पुस्तकामध्ये दाखवून समजावून सांगायची, तिच्याशी संवाद साधायची. याच्यामध्ये तीन टप्पे येतात.

एकतर तुम्हाला ऐकायला शिकवायचंय, दुसरं म्हणजे तुम्हाला ऐकलेला शब्द बोलायला शिकवायचंय आणि त्या शब्दाला अर्थ द्यायला सांगायचं. तिसरा म्हणजे कम्युनिकेशन. तुम्हाला समाजाशी बोलता आलं पाहिजे तुमचं बोलणं सगळ्याला समजलं पाहिजे आणि सगळ्यांचं बोलणं तुम्हाला समजलं पाहिजे या सगळ्या आघाडीवर लढायचं होतं.”

आदितीची शालेय शिक्षणाला सुरूवात

वैशाली यांनी आदितीला कधीच स्पेशल चाईल्ड म्हणून वागवलं नाही. त्यांनी तिचं संगोपन सामान्य मुलींप्रमाणेच करायचं ठरवलं.

त्यामुळे त्यांनी तिला सामान्य मुलांच्या शाळेतच शिकवण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णयही काही सोपा नव्हता. कारण सामान्य मुलांमध्ये वावरताना तिच्याबद्दलचं कुतुहल त्यांच्यात होतं.

त्या सांगतात, “मी आदितीला घेऊन बालवर्गात ज्यावेळेस जायचे ना. तेव्हा तिथल्या मुलांना मी तिचं हिअरींगएड दाखवलं. त्यांच्यासाठी हे नवीन होतं. त्या मुलांना वाटायचं हिच्या कानामध्ये काय आहे? आणि मग मी त्यांना ते नेऊन दाखवलं की, आपण कसं आपल्याला कमी दिसत असेल तर चष्मा वापरतो ना.. तसं ती ऐकण्यासाठी हे मशीन वापरते. मी त्या प्रत्येक मुलाच्या हातात ते मशीन दिलं आणि त्यांची क्यूरॅसिटी संपवली.”

आदितीचा शाळेचा प्रवास सुरू झाला. आता आदिती बऱ्यापैकी बोलायला लागली होती. तेव्हा वैशाली यांच्या मनात विचार आला की, आपल्यासारखाच बऱ्याच जणांना असा प्रॉब्लेम येत असेल. तेव्हा मी आदितीसोबतच तिच्यासारखी जी मुलं होती, त्यांना ट्रेनिंग द्यायला, त्यांना बोलतं करायला सुरूवात केली.

एकट्याने घर चालवायचं म्हणटलं, तर पैसा हा लागतोच. परंतु आदितीला घरात एकटं सोडून नोकरी करणं वैशाली यांना शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी आदितीच्या शाळेतच नोकरी करायची हे ठरवलं.

आदितीचं संपूर्ण शालेय शिक्षण छत्रपती संभाजीनगरच्या सेंट लॉरेन्स हायस्कूलमध्ये झालंय. वैशाली यांचं बीएड असल्यामुळे त्यांनाही याच शाळेत नोकरी मिळाली. यामुळे त्यांना आदितीकडे 24 तास लक्ष ठेवणं शक्य झालं.

स्विमिंगला सुरूवात

आदितीचं बोलणं अधिक स्पष्ट होण्यासाठी स्विमिंग फायदेशीर ठरू शकतं असं वैशाली यांना वाटलं आणि आदितीचा जलतरणपटूचा प्रवास सुरू झाला.

“मला असं एक जाणवलं की आपलं जे बोलणं असतं ते सगळं श्वासांवरती असतं. श्वास आणि उच्छवास. मग मला असं वाटलं की, स्विमिंगला जर आदितीला आपण टाकलं, तर त्या ब्रीदिंग पॅटर्नमुळे तिचं बोलणं अजून क्लिअर होईल. तिला स्पष्ट बोलता येईल. त्यामुळे अडीचाव्या वर्षी तिचं स्वीमिंग सुरू केलं. सुरूवातीला काही स्पर्धा वैगेरे हा प्रकार काही डोक्यातच नव्हता. तिला बोलता यावं फक्त एवढंच वाटायचं.

अदिती प्रचंड रडायची. स्विमिंग पूलवर घेऊन गेल्यानंतर दोन तास आमचा धिंगाणा असायचा. मग थोड्या दिवसांनी तिच्यात हळूहळू आवड निर्माण झाली. तिच्या वयाच्या अडीचव्या वर्षी सुरू झालेला स्विमिंगचा प्रवास आजतागायत चालूच आहे,” असं त्या गर्वाने सांगतात.

आदिती आता बऱ्यापैकी बोलू शकते. आदितीला राज्यस्तरिय, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर 181 सुवर्ण, 91 रौप्य, 27 कांस्य अशी एकूण 299 पदकं मिळाली आहेत.

गोल्डन गर्ल ते डेफ ऑलिम्पिक

“ती ज्यावेळेस आठ वर्षाची होती त्यावेळेस तिला नॅशनलचे चार गोल्ड मेडल मिळाले आणि गोल्डन गर्ल म्हणून ती फेमस झाली. त्याच्यानंतर साडेपाच वर्षाची असताना तिने उरण ते गेटवे ऑफ इंडिया हे19 किलोमीटरच अंतर साडेतीन तासांमध्ये कापलं आणि मग एक एक करत स्विमिंगमधले टप्पे सुरू झाले,” हे सांगताना त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती.

आदितीने 2013, 2017 आणि 2022 अशा तिन्ही वर्षी डेफ ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलंय. तर 2022 च्या ऑलिम्पिकमध्ये आदिती 6 आणि 7 व्या स्थानावर होती. तर भारतीय जलतरणपटूंच्या टीमची 2022 मधील डेफ ऑलिम्पिकमधील कामगिरी चांगली होती. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी त्या सर्वांचं भेटून स्वागत केलं होतं.

तर जून 2023 मध्ये आदितीला सामान्य स्पोर्ट्स कोट्यातून भारतीय पोस्ट खात्यात नोकरीही लागली आहे.

नॉर्मल मुलांसोबत प्रॅक्टिस करणं आव्हानात्मक

नॉर्मल मुलांसोबतच्या प्रॅक्टीसबद्दल आदिती सांगते,

“आम्ही नॉर्मल मुलांसोबत प्रॅक्टीस करतो त्यावेळेस आम्हाला कोचकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. ते शिटी मारतात. पण आम्हाला ऐकू येत नसल्याने आम्हाला त्यांच्याकडे लक्ष ठेवावं लागतं. टास्क देताना, शेड्यूल सांगताना आम्हाला त्यांच्याकडे लिप रिडिंगसाठी सारखं पाहावं लागतं.

या सर्व गोष्टी फॉलो करून मला प्रॅक्टिस करावी लागते. पण तसं बघायला गेलो तर नॉर्मल आणि डेफ यांच्या प्रॅक्टिसमध्ये काहीच फरक नाहीये. प्रक्टिस तर सारखीच करावी लागले आम्हाला.”

वैशाली यांच्या आयुष्याचं एकच ध्येय होतं ते म्हणजे आदितीला तिच्या पायावर उभं करण्याचं आणि आता ते जवळपास पूर्ण होत आलंय.

आदितीला सरकारी नोकरीही लागली आहे. लोकांच्या बोलण्याचा, समाजाचा एकल मातेकडे पाहाण्याचा दृष्टिकोन अशा कसल्याच गोष्टींचा वैशाली यांनी त्यांच्यावर परिणाम होऊ दिला नाही.

या सर्वांबदद्ल त्या सांगतात, “लोक काय बोलतात? लोक काय म्हणतात? किंवा मला कोण पाठिंबा द्यायला किंवा सपोर्टला उभं राहिलंय किंवा नाही राहिलंय? हा विचार करण्याचा माझ्याकडे वेळही नव्हता, आणि कदाचित मी तो विचार केला नाही म्हणून हे सगळं मी करू शकले.”

तर आदिती आणि वैशाली यांचं आई-मुलगी नाही तर एखाद्या मैत्रिणीप्रमाणे नातं असल्याचं जाणवतं. आदितीने आईबद्दल एक छोटीशी कविताही केली आहे.

“आई तू किती ग्रेट आहेस,

देवाने पाठवलेली सप्रेम भेट आहेस...

पण खरं तर, आईची जागा कोणीच नाही घेऊ शकत,

जशी शामची आई आहे, तशी एक माझी आई आहे.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)