इजिप्त: सोन्याने बनवलेले हृदय, जीभ, सुंता न झालेलं लिंग... ‘ही’ ममी आहे कोट्यवधींचा खजिना

ममी

फोटो स्रोत, एसएन सलीम, एसए सेद्दिक, एम. अल-हलवागी

    • Author, कॅथरिन आर्मस्ट्राँग
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

इजिप्तमधील एका संग्रहालयातील ममीमध्ये कोट्यवधी रुपयांचं सोनं असल्याचं आढळून आलं आहे. ही ममी 2300 वर्षांपूर्वीची असून ती 1916 मध्ये सापडली होती.

या ममीमध्ये हृदय, जीभ आणि शरीराच्या इतर अवयवांच्या जागी सोन्याचे अवयव असल्याचे आढळून आले. ही एका तरुणाची ममी आहे.

1916 मध्ये उत्खननात ही ममी सापडल्यानंतर त्याची तपासणी न करता ती संग्रहालयाच्या स्टोअर रूममध्ये इतर अनेक ममींसोबत ठेवण्यात आली होती. म्हणजे 100 वर्षांपेक्षाही जास्त काळ ही ममी तिथे पडून आहे.

नुकतेच कैरो विद्यापीठातील डॉ. सहार सलीम यांच्या पथकाने एका स्कॅनरने या ममीची तपासणी केली. त्यामध्ये ममीच्या आतमध्ये अनेक मौल्यवान गोष्टी आढळून आल्या आहेत.

संशोधकांनी केलेल्या तपासणीत संबंधित ममीमध्ये 39 वस्तू सापडल्या. त्यामध्ये बहुतांश वस्तू या सोन्याने बनवलेल्या आहेत. या कारणामुळे या ममीला गोल्डन बॉय म्हणून संबोधण्यात येत आहे.

या ममीच्या शरीरात जिभेच्या ठिकाणी सोन्याची जीभ आहे. तसंच हृदयाच्या ठिकाणीही सोन्याची वस्तू ठेवलेली आहे.

या ममीतील तरुणाचा सुंता झालेला नाही. लिंगाच्या ठिकाणीही सोन्याची वस्तू ठेवण्यात आलेली आहे.

ममी

फोटो स्रोत, एसएन सलीम, एसए सेद्दिक, एम. अल-हलवागी

डॉ. सहार सलीम यांनी याविषयी बोलताना सांगितलं, “मृत्यूनंतर जीवन आहे, असं इजिप्शियन लोक मानायचे. त्यामुळे मृत व्यक्ती पुढील जन्मात अधिक मजबूत व्हावी, अशी त्यांची इच्छा होती.

त्यांच्या मते, मृत्यू पश्चातच्या जगात त्या व्यक्तीला बोलण्याची संधी मिळावी, यासाठी त्यांनी त्या ममीला सोन्याची जीभ लावली होती.

संशोधकांनी केलेल्या तपासणीत ममीतील तरुण हा निरोगी आणि उच्चवर्गीय असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

त्या तरुणाच्या दात आणि हाडांच्या तपासणीत कुपोषणाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. त्याचा मेंदू आणि इतर अवयव काढून टाकण्यात आलेलं आहे.

ही ममी 1916 मध्ये इजिप्तच्या एडफू भागात सापडली होती.

सोन्याच्या पानांनी झाकलेली आणखी एक ममी

ममी

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पुरातत्त्व वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की त्यांना सोन्याच्या पानांनी झाकलेली ममी एका दगडी शवपेटीत सापडली आहे. ही शवपेटी गेली 4300 वर्षं उघडली नव्हती.

ही ममी हेकाशिप्स नावाच्या एका माणसाची आहे, आणि कदाचित इजिप्तमधल्या सर्वांत जुन्या ममींपैकी एक असावी असा अंदाज आहे. ही ममी जवळपास शाबूत अवस्थेत आहे आणि राजघराण्यातल्या सदस्याची नाही.

राजघराण्याचा सदस्य नसणाऱ्या माणसाची अशा प्रकारची ममी सापडणं हे दुर्मीळ आहे.

कैरोच्या दक्षिणेला असणाऱ्या सक्वारा नावाच्या दफनभूमीत ही ममी सापडली आहे. 15 फुट खोल खड्ड्यात ही ममी होती. इथे तीन थडगीही सापडली आहेत.

यातलं एक थडगं ‘गुप्त रक्षकाचं’ आहे.

या तिन्हीपैकी सगळ्यात मोठं थडगं एका खुनुमदेजेफ नावाच्या माणसाची असावी. हा माणूस धर्मगुरू आणि उच्चकुलीन लोकांचा निरिक्षक म्हणून काम करायचा.

दुसरं थडगं मेरी नावाच्या एका माणसाची आहे ज्याला ‘गुप्त रक्षक’ असं पद दिलं होतं. या पदामुळे त्याला काही विशिष्ट धार्मिक विधी करण्याचा अधिकार मिळाला होता.

तिसरं थडगं फातेक नावाच्या न्यायाधीश आणि लेखकाचं आहे. त्याच्या थडग्याजवळच या भागात उत्खननात सापडलेल्या मुर्तींपैकी सर्वात मोठ्या मुर्ती सापडल्या आहेत.

मातीची भांडी, तसंच इतरही काही गोष्टी इथे सापडल्या आहेत.

उत्खननात सापडलेल्या वेगवेगळ्या वस्तू आणि मुर्त्या

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, उत्खननात सापडलेल्या वेगवेगळ्या वस्तू आणि मुर्त्या

पुरातत्त्व अभ्यासक, तसंच इजिप्तचे पुरातन गोष्टी विभागाचे माजी मंत्री झाही हवास यांनी सांगितलं की सापडलेल्या सगळ्या गोष्टी ख्रिस्तजन्मापूर्वी 2500 ते 2000 वर्षं जुन्या आहेत.

या उत्खननाचा भाग असणारे पुरातत्त्व शास्त्रज्ञ अली अबू देशीश यांनी म्हटलं की, “हा शोध खूप महत्त्वाचा आहे कारण यामुळे कळतं की त्यावेळेच्या राजांचा त्यांच्या अवतीभोवती राहाणाऱ्या सर्वसामान्य माणसांशी कसा संबंध होता.”

सक्वारामध्ये गेल्या 3000 वर्षांपासून मृतदेह आणि ममींचं दफन होत आहे आणि युनेस्कोने या भागाला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिला आहे. प्राचीन इजिप्तची राजधानी असणाऱ्या मेंफीसमध्ये ही दफनभूमी स्थित आहे.

इथे साधारण 10-15 पिरॅमिड आहेत. यातल्या एका पिरॅमिडजवळ असणाऱ्या तळघरात या नव्या ममी सापडल्या आहेत.

26 जानेवारीला सापडलेल्या या नव्या ममी, दक्षिण इजिप्तमधल्या लक्सर शहरात सापडलेल्या रोमन शहराच्या दुसऱ्याच दिवशी सापडल्या आहेत. लक्सर शहरातल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे की त्यांना रोमन काळातलं एक संपूर्ण रहिवासी शहर सापडलं आहे. हे शहर ख्रिस्तजन्मानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकातलं असावं.

पुरातत्त्व शास्त्रज्ञांना या ठिकाणी रहिवासी इमारती, मिनार आणि धातूकाम होत असेल अशी ठिकाणं सापडली आहेत. या ठिकाणी भांडी, हत्यारं आणि रोमन नाणी सापडली आहेत.

गेल्या काही वर्षांत इजिप्तमध्ये काही मोठे पुरातत्त्वीय शोध लागले आहेत. इजिप्तच्या पर्यटनाला चालना देणं हाही इथल्या पुरातत्त्वीय मोहिमांचा उद्देश आहे.

सरकारला आशा आहे की या वर्षी सुरू होणार ग्रँड इजिप्शियन संग्रहालय येत्या 2028 पर्यंत 3 कोटी पर्यंटकांना आकर्षित करेल.

पण काही टीकाकारांचं म्हणणं आहे की इजिप्तचं सरकार पर्यटनाला चालना देण्यासाठी फक्त माध्यमांमध्ये चमकतील अशा पुरातत्त्वीय शोधांना प्राधान्य देतंय आणि संशोधनात्मक अभ्यासाकडे दुर्लक्ष करतंय.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)