गदर 2 : सनी देओल, 'पाकिस्तान जिंदाबाद' आणि देशप्रेम

फोटो स्रोत, UNIVERSAL PR
- Author, वंदना
- Role, सीनियर न्यूज एडिटर, बीबीसी
अभिनेता सनी देओलच्या 'गदर 2' ने रिलीजच्या दोन दिवसांत 83 कोटींची कमाई केली आहे.
22 वर्षांपूर्वी आलेल्या 'गदर एक प्रेम कथा' या चित्रपटाच्या सिक्वेलमध्येही सनी देओल तारा सिंगच्या भूमिकेत आहे.
चित्रपट निर्मात्यांनी रविवारी (13 ऑगस्ट) सांगितलं की, चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रिलीज झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसांत एकूण 83 कोटींची कमाई केली आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केलं आहे.
चित्रपटाने पहिल्या दिवशी 40 कोटींचा व्यवसाय केला होता, तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने तब्बल 43 कोटींची कमाई केली होती.
झी स्टुडिओज निर्मित या चित्रपटात अभिनेत्री अमिषा पटेल सकिनाच्या भूमिकेत परतली आहे.
'गदर 2' चित्रपटात 1971 चा काळ दाखवण्यात आला आहे. आपला मुलगा चरणजीत सिंग याला पाकिस्तानी सैन्यापासून वाचवण्यासाठी तारा सिंगच्या पाकिस्तानच्या प्रवासाची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे.
'गदर' हा भारत-पाकिस्तान फाळणीच्या काळातील प्रेमकथेवर आधारित चित्रपट होता.

फोटो स्रोत, ANI
"आपका पाकिस्तान ज़िंदाबाद है इसमें हमें कोई ऐतराज़ नहीं. लेकिन हमारा हिंदुस्तान ज़िंदाबाद था, ज़िंदाबाद है और ज़िदाबाद रहेगा. हिंदुस्तान ज़िंदाबाद. इस मुल्क़ (पाकिस्तान) से ज़्यादा मुसलमान हिंदुस्तान में हैं,उनके दिलों की धड़कन यही कहती है कि हिंदुस्तान ज़िंदाबाद. तो क्या वो पक्के मुसलमान नहीं?"
(तुम्ही पाकिस्तानच्या नावाचा जयघोष करा आमचा आक्षेप नाही ,पण आम्ही हिंदुस्तानच्या नावाचा जयघोष करणार आणि करत राहणार,भारतामध्ये पाकिस्तान पेक्षा अधिक मुस्लिम आहेत.ते एकदिलानं हिंदुस्थान जिंदाबादचे नारे देत आहेत. तर मग तो खरा मुस्लिम नाही का?)
2001 मध्ये जेव्हा 'गदर' चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा सनी देओलच्या याच डायलॉगला थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाटासह प्रतिसाद मिळाला होता.
चित्रपटातील हे दृश्य 1947 नंतरचे आहे जेव्हा भारताची फाळणी करण्यात आली होती.या फाळणी नंतर दोन्हीबाजूला एमकेकांविषयी द्वेष निर्माण झाला होता.
या चित्रपटाच्या सीनमध्ये एक हिंदुस्थानी सनी देओल (तारा सिंग) त्याची पाकिस्तानी पत्नी अमिषा पटेल(सकीना)च्या शोधता पाकिस्तानात येतो, तिथं त्याच्यासमोर अट अशी ठेवली जाते की जर तारा सिंगला त्याची पत्नी हवी असेल तर त्याला त्याचा धर्म आणि देश सोडावा लागेल.
'गदर' हा त्याकाळात सर्वात हिट चित्रपटांपैकी एक होता,अनेकांनी हा चित्रपट पाकिस्तान विरोधी आणि मुस्लिमविरोधी असल्याचा आरोप केला.
राष्ट्रविरोधी की राष्ट्रवादी?
आता 'गदर' चा पार्ट 2 रिलीज होत असताना मनात प्रश्न येतो की तारा सिंग जेव्हा 'पाकिस्तान ज़िंदाबादचा नारा दिला, तर आजच्या काळात त्यांना देशद्रोही म्हणायचे का ? की सनी देओलनं भारताविरोधात एकही शब्द खपवून घेण्यास नकार दिल्यावर त्याला राष्टवादी म्हणायचे?
ज्येष्ठ चित्रपट समीक्षक रामचंद्रन श्रीनिवास म्हणतात,"आज कोणीही आपल्या चित्रपटात 'पाकिस्तान ज़िंदाबाद' म्हणत असेल तर तो निश्चितपणे देशद्रोही म्हटला जाईलं,जर तुम्ही याकडे फक्त एक फिल्मी डायलॉग म्हणून पाहिलं नाही तर."

फोटो स्रोत, UNIVERSAL PR
इरा भास्कर या जेएनयूमध्ये सिनेमा स्टडीजच्या प्राध्यापक आहेत.
त्या सांगतात, "सध्याच्या घडीला चित्रपटात 'पाकिस्तान ज़िंदाबाद'वाला डायलॉग असेल तर तो देशद्रोही म्हटलं जाईल. पण तुम्ही हा चित्रपट कसा बनवला आहे यावर सर्व अवलंबून आहे."
" पठाण चित्रपटाचेच उदाहरण घ्या. यात नायिका आयएसआय आणि पाकिस्तानशी संबधित दाखवण्यात आली आहे. पण ती हिंसेच्या विरोधात आहे."
"हा चित्रपट हिट ठरला होता. मॅसेज देण्यासाठी अनेक पर्याय वापरले जाऊ शकतात. गदरमध्ये जे डायलॉग आहेत,आज ट्रोल करणारे ते स्वीकारणार नाहीत."
'गदर' फाळणीच्या वेदनांची गुंतागुंत दाखवू शकला का?
'गदर 1' और 'गदर 2' मध्ये 22 वर्षांचं अंतर आहे.या 22 वर्षात भारत किती बदलला आहे,सिनेमा किती बदलला आहे?
सिनेमा आणि सिनेमातलया क्रिएटिव्हिटीसाठी किती सूट दिली आहे? जेव्हा 2001मध्ये गदर चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा चित्रपटातील काही दृश्यांमुळं भोपाळ,अहमदाबादसारख्या शहरांमध्ये हिंसाचार झाला होता.
त्यावेळी बीबीसीशी बोलताना शबाना आझमी म्हणाल्या होत्या की,"हा चित्रपट राष्ट्रवाद,धर्म आणि अस्मिता या मुद्द्यांवर भ्रमित करतोय.आणि फाळणीच्या वेदनांची गुंतागुंत दाखवण्यात अपयशी ठरलाय. हा चिथावणीखोर चित्रपट असून यात, मुस्लिमांना परके असल्याचं दाखवण्यात आलंय."

फोटो स्रोत, UNIVERSAL PR
इरा भास्कर आणि रामचंद्रन श्रीनिवास या दोघांचीही यावर वेगवेगळी मतं आहेत.
रामचंद्रन श्रीनिवास सांगतात,"मी याच्याशी पूर्णपणे सहमत नाही. फाळणीच्या वेळेचं राजकीय वातावरण, भीषण परिस्थिती, लोकांच्या ज्या भावना होत्या, त्याच लेखक शक्तिमान यांनी आपल्या 'गदर' चित्रपटात दाखवल्या होत्या.
"ज्या प्रकारे फाळणी झाली, पाकिस्तानला इस्लमिक देश आणि भारताला हिंदू देश अशी ओळख मिळाली.या काळात भारत आणि पाकिस्तानमध्ये द्वेष निर्माण झाला होता. दोन्ही बाजूच्या लोकांनी आपली घरं आणि प्रियजन गमावले होते. ते त्यांनी चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला. मला हे मान्य नाही की कोणाच्या वेदना कमी दाखवल्या आहेत."
यश चोप्रा यांनी फाळणी कशी दाखवली?
इरा भास्कर सांगतात की, "गदर चित्रपटात समतोल दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. फर्स्ट हाफमध्ये तो अधिक मानवीय आहे, तर सेकंड हाफमध्ये फसलाय. पाकिस्तानला नकारत्मक पद्धतीनं दाखवण्यात आलंय. हा सगळं हिंसाचार मुस्लिम समाजानं सुरु केलेला दिसतो. शेवटी तो 'कट्टर राष्ट्रवादी' (jingoistic)बनतो. 'गदर' चित्रपट हा 'वीर झारा' सारखा नाही. 'वीर झारा' मध्ये भारत आणि पाकिस्तानशी संबधीत प्रेम कहाणी सुरेखपणे मांडली आहे.
" खरं तर यश चोप्रा यांनी भारत-पाकिस्तान आणि धर्माबद्दल अनेक संवेदनशील चित्रपट बनवले आहेत.
'धूल का फूल' आणि 'धर्मपुत्र' सारखे चित्रपट त्यांनी बनवले होते. (धर्मपुत्रमध्ये एकाअशा हिंदू तरुणाची कथा दाखवण्यात आली आहे, ज्यात फाळणीपूर्वी मुस्लिमांनी भारत सोडून जावं म्हणून काम करणाऱ्या लोकांसोबत हा तरुण असतो. नंतर हे उघड होतं की, हिंदू परिवारात वाढलेल्या या तरुणाचे खरे आई-वडील मुस्लिम आहेत.)

फोटो स्रोत, UNIVERSAL PR
"धर्मपुत्र चित्रपटाबाबत सेन्सॉर बोर्ड साशंक होतं. बीआर चोप्रा आणि यश चोप्रा यांनी हा चित्रपट पंडित नेहरूंना दाखवला तेव्हा त्यांनी हा चित्रपट प्रत्येक महाविद्यालयात दाखवायला हवा असं म्हटलं होतं. आजच्या सरकारमध्ये असं होत नाही."
आमना हैदर पाकिस्तानामध्ये 'समथिंग हॉटे' नावाचा युट्युब चॅनल चालवतात आणि सिनेमावर लक्ष ठेऊन असतात.
त्या सांगतात "राजकीय ध्रुवीकरणामुळं दोन्ही देशांतील चित्रपट निर्मात्यांना भारत-पाक थीमवर चित्रपट बनवणं अवघड झालं आहे. चित्रपटात एकमेकांची व्यक्तिरेखा घेणं पण अवघड आहे.कारण तसं केलं तर अविश्वास आणि संशयाच वातावरण निर्माण होतं.
हे पाहून खूप छान वाटत की, पाकिस्तानी नाटकांना भारतात एवढं प्रेम मिळतं तसंच कमली आणि जॉयलॅन्डसारख्या चित्रपटांना दाद मिळतेय. त्याचप्रमाणे पाकिस्तानामध्ये बॉलीवूडची खूप क्रेझ आहे आणि सध्या रणवीर सिंगचे चाहते रॉकी और रानी की प्रेमकहानी कसा पाहता येईल याचा विचार करत आहेत." (पाकिस्तानात सध्या हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शित करण्यावर बंदी आहे)
'तू मुस्लिमांना मारत होतास, तर मग मला का सोडून दिलं?'
'गदर'बद्दल बोलायचं झालं तर काही ठिकाणी या चित्रपटावर टीका केली जाते, पण अनेक ठिकाणी या चित्रपटात हिंसाचारानं त्रस्त झालेल्या,फाळणीमुळं ज्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं,अशा प्रत्येक व्यक्तीची व्यथा मांडलेली दिसते.
उदाहरणार्थ- फाळणीच्या वेळी सकीना( अमिषा) तिच्या कुटुंबासह लाहोरला जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढू शकत नाही आणि काही लोक तिच्यावर हल्ला करतात. पण दंगलखोरांच्या गर्दीत उपस्थित असलेला तारा सिंग (सनी) हा सकीनाला बघताच थांबतो.

फोटो स्रोत, ANI
नंतर आत्महत्येचा प्रयत्न करणारी सकीना ही सनी देओलला विचारते, 'तू मुस्लिमांना मारत होतास तर मग मला का सोडून दिलं?'
संपूर्ण चित्रपटात जिथे सनी (तारा सिंग ) गर्जना करताना, हॅन्ड पम्प उखडताना, पैसा वसूल अशा शब्दांचे उच्चारण करताना दिसतो, त्याच तारा सिंगला सकीनाने केलेला प्रश्न विचार करायला लावतो.
ते सांगतात, "ही (फाळणीची) कहाणी फक्त तुमची आणि माझी नाही. ती हजारो शीख,हिंदू,मुस्लिमांची आहे जे चालते फिरते मृतदेह बनले आहेत. ज्यांच्यात काही जीव उरला नाही, ज्यांना ना जगण्याची इच्छा आहे.दंगलीत आपल्या शीख कुटुंबातील हत्येच्या दुःखात तो बुडालेला आहे."
अमिषा आणि सनीचा सामना
सकीना ( आमिष पटेल) ही बहुधा या चित्रपटातील एकमेव अशी व्यक्तिरेखा आहे की जी धर्माच्या नावावर होणाऱ्या हिंसेवर प्रश्न विचारण्याच धाडस करत आहे.
ती विचारते, "कुणाला हिंदुस्तान पाहिजे कुणाला पाकिस्तान... माणसांना माणसांची गरज नाही.राजकीय लोक मतभेद निर्माण करतात आणि त्याचे परिणाम लोकांना भोगावे लागतात.आम्ही हे कदापि सहन करणार नाही."
धार्मिक उन्माद आणि वेडेपणाच्या गर्तेत 'गदर' चित्रपटातील एक वेड्या माणसाची व्यकिरेखा-वली लक्षात राहते. फाळणीनंतर वली पाकिस्तनचा नागरिक झाला. पण मानसिकदृष्ट्या तो अजूनही गांधींच्या भारतात आहे.
म्हणूनच जेव्हा लाहोर विमानतळाजवळ संगीत वाजणारी मिरवणूक निघते, तेव्हा तो म्हणतो की, 'नेहरूजी येत आहेत का? ब्रिटिश परत जा, हा देश आहे..शेतजमिनीचा तुकडा नाही की त्याची वाटणी होईल.'

फोटो स्रोत, UNIVERSAL PR
कारगिल युद्धांनंतर 'गदर' आला
वली याचं हे पात्र मंटोच्या टोबा टेक सिंहच्या कथेतली पात्र बिशन सिंगची आठवण करून देतो.
तुम्हाला माहित नसेल तर फाळणीनंतर बिशन सिंहला लाहोरच्या मेंटल हॉस्पिटलमधून भारताच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवण्याचा आदेश देण्यात आला होता. पण त्याचं गाव हे पाकिस्तानात आहे आणि त्याला एक नवीन देश भारतात पाठवण्यात येत आहे, हा आदेश मानण्यास तो नकार देतो की
'गदर'च्या वलीला सुद्धा लोक वेडा समजतात, पण समजूतदारांच्या दुनियेत तोच बहुदा तर्कावर बोलतो.आजही या चित्रपटाबाबत मतमतांतरे विभागली आहेत.तरी त्या काळात या चित्रपटानं कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले होते.हे नाकारता येत नाही.
गदर चित्रपट भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या कारगिल युद्धाच्या दोन वर्षांनंतर प्रदर्शित झाला होता.अशा वातावरणात जेव्हा गदर आला, तेव्हा बहुधा सीमेपलीकडे टक्कर घेणारा 'हिंदुस्तानी' पाहण्यासाठी दर्शक सज्ज झाले होते.

फोटो स्रोत, ANI
'लगान' आणि 'गदर'ची देशभक्ती
गदर आणि लगान हे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले. मला भोपाळमधले ते दिवस आठवतात जेव्हा लोक 'गदर'चा शो झाला की 'लगान' बघायला जायचे आणि 'लगान' पाहणारे 'गदर' पाहायला जायचे. दोन्ही चित्रपटात देशभक्तीची भावना होती पण चित्रपटाच्या कथा अगदी वेगळ्या होत्या.
'लगान'ची देशभक्ती ही एकजुटीच्या आभासी भावनेत बुडालेली होती, जिथे क्रिकेटला हिंसा नव्हे तर शस्त्र बनवलं गेलं
'गदर'ची देशभक्ती ही 'लाउड'आणि आक्रमक होती, ज्याच्या केंद्रस्थानी एक प्रेमकथा होती.
'गदर'च्या यशामागील रहस्य

फोटो स्रोत, UNIVERSAL PR
उणीवा असूनही गदर -1 लोकांनी मोठ्या मनानं स्वीकारला.
इरा भास्कर म्हणतात की, "चित्रपटाच्या उत्तुंह यशामागे अनेक कारणं आहेत. 'गदर' ही फाळणीची कथा आहे आणि त्यात एक छान प्रेमकथा दाखवण्यात आलीय. हिंसा आणि द्वेषाच्या वातावरणात वेगवेगळ्या धर्माच्या दोन जणांची एक नाजूक प्रेमकथा ही मजबूतपणे समोर आलीय. फाळणीच्या अनेक चित्रपटांप्रमाणे हा शोकांतिका असेलला चित्रपट नव्हता. गदरमध्ये हॅप्पी एंडिंग पाहायला मिळते.
सोबत यात कट्टर राष्ट्रवाद दाखवण्यात आलाय,यात भारत हा पाकिस्तानवर वर्चस्व गाजवताना दाखवला आहे. हेही चित्रपट होण्यामागचं कारण आहे."
'ढाई किलो का हाथ' वाल्या सनी देओलच्या हातातून हॅन्डपम्प उखडून टाकणे, त्यानं एकट्यानं पाकिस्तानी लष्कराच्या जवानांचा सामना करताना पाहणे आणि त्यातली लव्ह स्टोरी आणि कट्टर राष्ट्रवादाचा तडका यामुळे गदर चित्रपट हा हिट ठरला. चित्रपटाचं संगीतहही प्रभावी होतं.
आनंद बक्षी यांची गीतं आणि उत्तम सिंह यांचं संगीत चित्रपट हिट होण्यास कारण ठरले.
जेव्हा सनी म्हणाला, "आपण सर्व याचं मातीतले आहोत"
चित्रपटाच्या डायलॉग्सवर शिट्या आणि टाळ्यांच्या कडकडाट व्हायचा.
उदाहरणार्थ- जेव्हा तारा सिंगचा साथीदार दरमयान सिंह (विवेक शोख) पाकिस्तानात जातो आणि टोमणा मारतो "बेटा बेटा होता है और बाप बाप होता है..."
दरमयान सिंह हा साईड रोलमध्ये असला तरी हे नाव एक प्रकारे गदर चित्रपटाचा आत्मा आहे. फाळणीमुळं दोन देशांमध्ये विभागल्या गेलेल्या लोकांची ही कथा आहे.
प्रश्न सुरुवातील पासून एकच आहे की आजचा तारा सिंग कसा असेल, जो देशाच्या सन्मानासाठी काहीही करू शकणारा, जो भारत आणि पाकिस्तान दोन्हीबद्दल बोलतो.अगदी प्रेमासाठी आपला धर्म ही सोडण्यास तयार असलेला? किंवा या सर्वांच्या मध्ये कुठेतरी?
गदर -2 रिलीज होण्यापूर्वी तारा सिंग म्हणजेच अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओल यांनी म्हटलं होतं की, "सगळ्या गोष्टी मानवतेच्या आहेत. सीमापार दोन्ही बाजूला तेवढंच प्रेम आहे. हा एक राजकीय खेळ आहे जो द्वेष निर्माण करतो. लोकांनी एकमेकांशी भांडावं किंवा लढावं असं जनतेला वाटत नाही. शेवटी आपण सर्व याचं मातीतले आहोत."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









