भारत-पाकिस्तान: फाळणीनंतर 75 वर्षांनी दोन भाऊ एकमेकांना भेटले आणि अश्रूंचा बांध फुटला

मोहम्मद सिद्दीक आणि मोहम्मद हबीब यांची गळाभेट
फोटो कॅप्शन, मोहम्मद सिद्दीक आणि मोहम्मद हबीब यांची गळाभेट
    • Author, मोहम्मद झुबैर खान,
    • Role, पत्रकार, बीबीसीसाठी

"मला व्हिसा द्यायला इम्रान खानला सांग ना, भारतात माझं कुणीच नाहीये."

"तू पाकिस्तानात ये. मी तुझं लग्न लावून देतो."

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भेटलेल्या दोघा भावांचा हा संवाद आहे.

मोहम्मद सिद्दीक आणि मोहम्मद हबीब यांच्या या विलक्षण भेटीने लाखो लोक गहिवरले आहेत. स्वातंत्र्यावेळी झालेली फाळणी या लोकांसाठी केवळ एखाद्या कथेपुरती मर्यादित नाही, तर ती त्यांच्या जगण्याचा भाग आहे.

या दोन भावांची फाळणीच्या वेळी ताटातूट झाली. त्यांचं कुटुंब अनागोंदीच्या काळात जालंधरहून पाकिस्तानला निघून गेलं. त्यांचे वडील मरण पावले.

सिद्दीक त्यांच्या बहिणीसोबत पाकिस्तानला पोचले. हबीब त्यांच्या आईसोबत भारतात राहिले. कालांतराने आईसुद्धा मरण पावली.

हे सगळं कसं घडलं, याची पूर्ण आठवण त्या दोघांनाही आता राहिलेली नाही. परंतु, 75 वर्षांनी कर्तारपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून दोघा भावांची पुन्हा भेट झाली. फाळणीच्या वेळी सुरू झालेल्या असंख्य कहाण्यांपैकी ही एक कहाणी आहे.

"ताटातूट झालेल्या दोघा भावांची पुन्हा भेट व्हावी यासाठी माझा भाऊ मोहम्मद हबीबला पाकिस्तानचा व्हिसा द्यावा, असं मी इम्रान खान यांना सांगणार आहे. आम्ही आयुष्याचा अखेरचा काळ एकमेकांसोबत घालवला, तर कदाचित आई-वडील आणि बहीण-भाऊ यांच्यापासून ताटातूट झाल्याचं दुःख कमी होऊ शकेल," असं मोहम्मद सिद्दीक सांगतात. पाकिस्तानात पंजाबमधील फैझलाबाद जिल्ह्यात चक-255 इथे ते राहतात.

ओझरती भेट

कर्तारपूरमध्ये या दोघा भावांच्या भेटीवेळी उपस्थित असणारे नासिर ढिल्लों यांच्या म्हणण्यानुसार ही भेट अतिशय भावूक करणारी होती. या प्रसंगी जवळपास शंभर लोक उपस्थित होते.

सर्वांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू होते. काही तासांच्या भेटीनंतर दोघे भाऊ पुन्हा विलग झाले, तेव्हा सर्वांचे डोळे पुन्हा पाणावले.

या दोघा भावांचा अनेक वर्षांनंतर दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदा संपर्क झाला. या दोन वर्षांमध्ये दर रोज ते एकमेकांशी व्हिडिओ कॉलद्वारे बोलले. मोहम्मद सिद्दीक यांना मोबाइल फोन वापरता येत नाही, पण त्यांची मुलं आणि गावकरी याबाबतीत त्यांची मदत करतात.

मोहम्मद हबीब यांनासुद्धा मोबाइल वापरता येत नव्हता, पण त्यांचे शीख मित्र त्यांना मदत करतात. मोहम्मद हबीब एका शीख कुटुंबासोबत राहतात.

आम्ही मोहम्मद सिद्दीक यांना भेटण्यासाठी चक-255 गावी पोचलो, तेव्हा ते त्यांचे भाऊ मोहम्मद हबीब यांच्याशी झूमद्वारे बोलत होते. मोहम्मद सिद्दीक त्यांचा भाऊ मोहम्मद हबीब यांना सांगत होते, "तुमची नातवंडं, पतवंडं तुमची आठवण काढतात. तुम्ही लग्न केलं नाहीत. पाकिस्तानात या, मी तुमचं लग्न लावून देतो."

मोहम्मद हबीब त्यांचा भाऊ मोहम्मद सिद्दीकला सांगता होते, "मला व्हिसा द्यायला इम्रान खानला सांग ना. भारतात माझं कोणीच नाहीये. या वयात मी एकटा पडलोय. इतक्या एकटेपणाने मला आयुष्य काढता येत नाहीये."

दोघा भावांची ताटातूट कशी झाली?

मोहम्मद सिद्दीक यांना कुटुंबापासून ताटातूट झाल्याची गोष्ट चांगल्या तऱ्हेने आठवणीत आहे. त्या वेळी त्यांचं वय सुमारे 10 ते 12 वर्षं होतं. मोहम्मद हबीब यांना मात्र त्यांचे आई-वडील, भाऊ-बहीण यांची नावं तेवढी लक्षात आहेत आणि ते आता राहतात तिथल्या लोकांनी सांगितलेल्या गोष्टी माहीत आहेत. फाळणीच्या वेळी त्यांचं वय जेमतेम दीड-दोन वर्षं होतं.

आपलं मूळ गाव जागरावां जालंधरमध्ये होतं, असं मोहम्मद सिद्दीक सांगतात.

ते म्हणतात, "माझे वडील जमीनदार होते. आमच्या शेतांमध्ये बरेच खरबूज येत असत, ते मला आठवतं. मला आमच्या आईचीसुद्धा आठवण आहे."

त्यांची आई त्यांचा छोटा भाऊ मोहम्मद हबीब यांना घेऊन फूलवाला इथे माहेरी गेली होती. त्या गावाचं नाव आजही फूलवाला आहे आणि ते भारतातील भटिंडा जिल्ह्यात आहे.

ते सांगतात, "आई माहेरी गेल्यानंतरच्या दिवसांत आमच्या गावावर हल्ला झाला. गोंधळलेल्या अवस्थेत लोक तिकडून पळून जात होते. सर्वांनी पाकिस्तानच्या दिशेने जायला सुरुवात केली. प्रत्येक जण स्वतःचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात होता."

"मी वडील नि बहीण यांच्या सोबत होतो. दंगलीत माझ्या वडिलांचा मृत्यू कसा झाला ते मला माहीत नाही. मी बहिणीसोबत कसाबसा फैझलाबाद निर्वासित छावणीवर जाऊन पोचलो.

मोहम्मद सिद्दीक सांगतात, "फैझलाबाद निर्वासित छावणीवर माझी बहीण आजारी पडली आणि तिथेच ती मरण पावली. कसं कोण जाणे, पण त्या दिवसांमध्ये माझे काका माझा शोध घेत त्या छावणीत आले."

मोहम्मद हबीब सांगतात, "त्या गावात आणि प्रदेशात माझ्या ओळखीचं कोणीच नव्हतं. इथल्या लोकांनी मला सांगितलं की, दंगली सुरू झाल्या तेव्हा माझी आई माहेरी अडकली होती. दरम्यान फाळणी पूर्ण झाली. पाकिस्तान व भारत यांची निर्मिती झाली, तेव्हा त्यांचे वडील व बहीण मारले गेल्याची बातमी मिळाली, भावाबद्दल काहीच कळलं नाही."

"माझ्या आईला हा धक्का सहन झाला नाही. आधी तिची मानसिक स्थिती बिघडली आणि मग तिने जगाचा निरोप घेतला. तिच्या माहेरचे लोकसुद्धा पाकिस्तानाला निघून गेले."

"मी लहानपणापासून आजपर्यंत केवळ माझे सरदार मित्रच पाहत आलो. मी त्यांच्याच सोबत राहिलो आणि त्यांच्याच सोबत लहानाचा मोठा झालो."

मोहम्मद सिद्दीक यांच्या म्हणण्यानुसार, फाळणीनंतर येणारे काफिल्यातले लोक बरीच माहिती देत राहायचे. "माझी आईसुद्धा मरण पावल्याची बातमी मिळत होती. पण माझ्या आईच्या माहेरचे लोकसुद्धा निराश्रित होऊन पाकिस्तानात आलेले असल्यामुळे तिकडे काही संपर्क साधता येत नव्हता."

त्यांना मोहम्मद हबीब यांच्याबद्दल फारसं काही सांगता येत नव्हतं.

मोहम्मद सिद्दीक म्हणतात, "आमच्या काळी ओळखपत्र तयार केली जात नसत, पण पाकिस्तानचं जेवढं वय असेल त्याहून मी 10-12 वर्षांनी मोठा आहे. मी आयुष्यातले अनेक महिने नि वर्षं माझ्या भावाच्या आठवणीत काढले. आईच्या निधनाबद्दल माझी खात्री पटली होती. बहिणीचा आणि वडिलांचा मृतदेहसुद्धा पाहिला होता. पण माझा भाऊ जिवंत असेल, अशी मला कायमच खात्री वाटत होती."

गतकाळाची आठवण सांगताना ते म्हणतात, "पाकिस्तानात माझे काकाच माझे पालक होते. आम्ही फैझलाबादमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी राहिलो. मग आम्हाला चक-255 मध्ये जमीन देण्यात आली, त्यानंतर आम्ही या गावी आलो."

"माझं लग्नसुद्धा चुलतबहिणीसोबत झालं. आयुष्यभर शेती करत राहिलो."

भारतात राहणारे मोहम्मद हबीब त्यांच्या गतकाळाबद्दल आणि बालपणाबद्दल फारसं बोलायला इच्छुक नाहीत. ते म्हणतात, "मायबाप नसलेल्या मुलासोबत काय झालं असेल आणि काय होत असेल. माझी आई मला सोडून जिथे मेली त्या गावात मी माझं आयुष्य काढलं, इतकंच."

लग्न का केलं नाही, संसार का थाटला नाही, याबद्दलसुद्धा मोहम्मद हबीब काहीच सांगत नाहीत. ते इतकंच म्हणतात की, "माझे सरदार मित्र आणि फूलवालामधील लोकच माझ्यासाठी सर्व काही आहेत. त्यांनी माझी माझ्या भावाशी भेट घडवून दिली."

संपर्क कसा झाला?

मोहम्मद सिद्दीक यांना त्यांच्या भावाची खूप आठवण येत असे.

ते सांगतात, "माझा भाऊ जिवंत आहे, असं मला मनातून वाटायचं. त्याला भेटायची तीव्र इच्छाही मला वाटत असे. मी पीर आणि फकीर लोकांनाही जाऊन भेटलो. सगळे जण म्हणाले, प्रयत्न करत राहा, म्हणजे तुझा भाऊ नक्कीच सापडेल."

ते सांगतात, "सर्व गावाला माझ्या आयुष्याची ही कहाणी माहिती आहे. मी आमच्या इथल्या जमीनदाराला आणि आता जमीनदाराचा मुलगा मोहम्मद इशराक यांनासुद्धा माझी गोष्ट सांगितली होती. मोहम्मद इशराक सुमारे दोन वर्षांपूर्वी नासिर ढिल्लोंसोबत माझ्याकडे आला. त्याने मला सगळा तपशील विचारला आणि ते कॅमेऱ्यावर रेकॉर्ड केलं."

"त्यानंतर काही दिवसांनी ते नि मोहम्मद इशराक पुन्हा मला भेटायला आले. माझा भाऊ सापडल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी मला भावाशी बोलणंही करून दिलं."

नासिर ढिल्लों सांगतात, "चक-255 मधील जमीनदार मोहम्मद इशराक माझे मित्र आहेत. माझे दुसरे मित्र लव्हली सिंग आणि मी फाळणीवेळी ताटातूट झालेल्या लोकांची एकमेकांशी भेट घडवून आणतो. त्यासाठी आम्ही यू-ट्युबवर पंजाबी लहर नावाचा चॅनल सुरू केला आहे."

ते पुढे म्हणतात, "मोहम्मद सिद्दीक यांच्या आयुष्याची कहाणी यू-ट्युबद्वारे प्रसिद्ध केली, तेव्हा तो व्हिडिओ फूलवाला इथल्या डॉक्टर जगभीर सिंग यांनी बघितला. त्यांनी सोशल मीडियावरून आम्हाला संपर्क साधला. मग आम्ही त्यांच्याशी फोनवर बोललो. मोहम्मद सिद्दीक यांनी सांगितलेली नावं डॉक्टर जगफीर सिंग यांनी आम्हाला सांगितली."

डॉक्टर जगभीर सिंग म्हणतात की, मोहम्मद हबीब किंवा हबीब खान यांना गावातले सगळे लोक शिका या नावाने ओळखतात. "त्यांचं खरं नाव या भागात खूपच कमी लोकांना माहीत आहे. त्यातला एक मी आहे. मी माझ्या घरातील ज्येष्ठांकडून शिका यांच्या आयुष्यातल्या घडामोडींबद्दल ऐकलं होतं. खुद्द शिका यांनीसुद्धा मला अनेकदा ती गोष्ट सांगितली होती."

काहीही करून आपल्या भावाशी भेट व्हावी, अशी शिका यांची इच्छा होती. "पण फोटो, पत्ता यातलं काहीच नसताना अशी भेट शक्य नव्हती. अखेरीस दोन वर्षांपूर्वी पंजाबी लहर या यू-ट्युब चॅनलमुळे हे शक्य झालं.

गेल्या दोन वर्षांमध्ये काय झालं?

मोहम्मद सिद्दीक सांगतात, "नासिर ढिल्लों आणि मोहम्मद इशराक यांनी दोन वर्षांपूर्वी मोहम्मद हबीबशी व्हिडिओ कॉलद्वारे मला बोलणं करवून दिलं होतं. आम्ही बोलायला लागल्यावर आधी मी आईवडिलांचं नाव विचारलं. ते त्याने बरोबर सांगितलं. मी माझं नाव सांगितल्यावर तेसुद्धा त्याने बरोबर सांगितलं.

"त्याने तिथल्या लोकांकडून स्वतःच्या कुटुंबीयांबद्दल ज्या गोष्टी ऐकल्या होत्या, त्या सांगितल्या. तो तपशीलसुद्धा खरा होता."

आपल्याला भेटायला सिद्दीक यांनी पाकिस्तानात यावं असं हबीब यांना वाटत होतं आणि तसं शक्य नसेल तर आपण भारतात येऊ असं हबीब म्हणाले, पण त्यात बऱ्याच अडचणी होत्या.

मोहम्मद इशराक सांगतात, "त्यानंतर मोहम्मद सिद्दीक यांचं ओळखपत्र आणि पासपोर्ट तयार केला."

जगभीर सिंग म्हणतात, "शिका यांचं काही रेशन कार्ड वगैरेसुद्धा नव्हतं. भारत आणि पाकिस्तान, दोन्ही बाजूंनी व्हिसा मिळवायचा प्रयत्न करायचा, असं मी, नासिर ढिल्लों आणि मोहम्मद इशराक यांनी ठरवलं. परंतु, दुर्दैवाने कोरोना उद्भवल्यामुळे हे शक्य झालं नाही."

भेट कशी झाली?

नासिर ढिल्लों सांगतात, "त्या दरम्यान कर्तारपूर कॉरिडॉर उघडण्यात आल्याचं कळलं. मग त्या मार्गाने प्रयत्न करून दोघा भावांची भेट घडवून आणायची, असं आम्ही ठरवलं. किमान त्यांची एकदा तरी भेट घडवून आणायची होती."

कर्तारपूर कॉरिडॉर उघडल्यावर आम्ही दरबार साहिब इथे आशीर्वाद घेण्यासाठी जायचं ठरवलं, असं जगफीर सिंग सांगतात. "दोन्ही गोष्टी एकाच वेळी व्हाव्यात अशी आमची इच्छा होती. ताटातूट झालेल्या भावांची भेटही झाली असती आणि दर्शनही झालं असतं."

यानंतर बुकिंग केल्याचं ते म्हणतात. "त्यात काही अडचण आली नाही. दोन्ही बाजूची सरकारं आणि प्रशासनं यांनी आम्हाला सहकार्य केलं. त्यानंतर 10 जानेवारीला आम्ही कर्तारपूरला पोचलो, तेव्हा मोहम्मद सिद्दीक त्यांच्या कुटुंबीयांसोबत आणि संपूर्ण गावकऱ्यांसोबत तिथे आलेले होते."

मोहम्मद सिद्दीक सांगतात, "मी माझ्या भावासाठी भेट म्हणून कपडे घेऊन गेलो होतो. त्यानेसुद्धा आमच्यासाठी कपडे आणले होते. त्याने पाकिस्तानला यावं अशी माझी इच्छा आहे. माझ्याकडे पाकिस्तानला ये, असं मी त्याला सांगितलं, तेव्हा तो माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडत राहिला आणि त्याने होकार दिला."

"आम्ही दोघंही बसून रडत राहिलो. आमच्या आईवडिलांची आठवण काढली. आम्ही दरबार साहिबमध्ये भेटत होतो. त्या निमित्ताने आम्ही आमच्या आईवडिलांसाठी आणि नातेवाईकांसाठीसुद्धा प्रार्थना केली. तो दिवस कसा गेला ते कळलंही नाही. निरोपाची वेळ आली, तेव्हा आम्ही त्याला दूर जाताना बघत होतो."

मोहम्मद हबीब सांगतात, "फूलवालामध्ये लोक माझी काळजी घेतात. पण आता (पाकिस्तानात) नातवंडांसोबत बसून थोडा वेळ खेळावं असंही वाटतं. मी मरेन तेव्हा माझ्या नातलगांनी माझ्यावर अंत्यसंस्कार करावेत, असं वाटतं."

"माझ्यासारख्या म्हाताऱ्याचा कोणाला काही त्रास नाही. दोन वेळचं जेवण सिद्दीक मला देईल. फक्त मला व्हिसा मिळवून द्यावा. नाहीतर माझ्या या दुःखी जीवनाचा शेवटसुद्धा दुःखीच होईल."कर्तारपूर कॉरिडॉर: फाळणीच्या वेळी ताटातूट झालेले दोन भाऊ 75 वर्षांनी भेटले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)