उमरकोटः पाकिस्तानातल्या 'या' शहरात लोकसंख्या जास्त असूनही हिंदू अडचणीत का आहेत?

पाकिस्तान, हिंदू

''ते निवडणुकीच्या वेळी येतात आणि मतदानासाठी चला असं म्हणत आम्हाला घेऊन जातात. त्यानंतर अंगठा लावताच आम्हाला ठेंगा दाखवला जातो. अनेकदा ज्या गाडीमध्ये आम्हाला घेऊन जातात परत येण्यासाठी ती गाडीही मिळत नाही.''

70 वर्षीय विनी ओड, उमरकोटच्या गोठ रामजी ओडमध्ये राहतात. याठिकाणी अद्याप पाण्यासारख्या पायाभूत सुविधांचीही कमतरता आहे.

या गावाच्या आसपास कोणतंही आरोग्य केंद्र किंवा शाळा नाही. निवडून आलेले प्रतिनिधी मतदानानंतर याठिकाणी पुन्हा येणंही पसंत करत नाहीत.

पाकिस्तानात नुकत्याच झालेल्या जनगणनेनुसार उमरकोट जिल्ह्यामध्ये हिंदू लोक बहुसंख्याक आहेत. 10 लाख 73 हजार लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यात 52 टक्के हिंदू आहेत. तरीही या जिल्ह्यातील एकही हिंदू उमेदवार निवडून आलेला नाही.

कुठे आहे उमरकोट?

उमरकोट कराचीपासून जवळपास 325 किमी अंतरावर आहे. सम्राट अकबर आणि सिंध प्रांतातील लोक कथांमधील पात्र उमर मारवी यांचा जन्मही इथंच झाला होता.

या शहराचं नाव याठिकाणच्या किल्ल्याशी संबंधित आहे. त्याठिकाणी राजपूत ठाकूर कुटुंब आणि सुमरो शासक राहत होते.

उमरकोटच्या किल्ल्याला या परिसरातील राजकारणाचं केंद्र मानलं जात होतं. राजस्थानच्या मारवाड आणि मेहरान खोऱ्यांच्या मुख्य संगमावर हा वसलेला आहे. त्याच्या एका बाजुला वाळवंट तर दुसऱ्या बाजूला कालव्याच्या पाण्याने समृद्ध झालेला हिरवागार परिसर आहे.

कराचीहून मिट्ठीपर्यंत रस्ता तयार होण्यापूर्वी हे शहर व्यावसायिक हालचालींचं महत्त्वाचं केंद्र होतं आणि त्याला 'थार चा गेटवे' म्हटलं जात होतं.

थारमध्ये आजही खाद्य सामुग्रीसह गरजेच्या वस्तू या उमरकोटमधूनच पुरवठा केल्या जातात.

उमरकोटनंतर हिंदूंचं प्रमाण असलेला थार हा दुसरा मोठा जिल्हा आहे. याठिकाणी लोकसंख्येच्या जवळपास 40 टक्के हिंदू आहेत.

उमरकोटची अर्थव्यवस्था

प्रेम सागर हे स्थानिक भाजी मंडईचे माजी अध्यक्ष असून ते आडताचं काम करतात. त्यांचे पूर्वजही हेच काम करायचे. पाकिस्तानच्या स्थापनेपूर्वी केवळ माल्ही समुदाय आडत्यांचं काम करायचा. मात्र नंतर इतर समुदायही यात समाविष्ट झाले.

पाकिस्तान, हिंदू

प्रेम सागर यांच्या मते, ''आजही या भागामध्ये 80 टक्के दुकानं हिंदू समुदायाची आहेत. तर 20 टक्के मुस्लिमांची आहे. याठिकाणी भाजीपाल्याचं पिक जास्त प्रमाणावर होतं, तर फळं इतर ठिकाणांहून येतात.''

उमरकोटची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे कृषी क्षेत्रावर आधारित आहे. बहुतांश सावकार मुस्लीम आहेत. तर 80 टक्के हिंदू दलित समुदायातील आहेत. शहरांमध्ये दुकानदार हे प्रामुख्यानं उच्च जातीतील हिंदू आहेत. सराफा आणि खतं, बियाणांच्या दुकानांवर त्यांचंच नियंत्रण आहे.

उमरकोटचं राजकारण

पूर्वी हा भाग थरपारकरमध्ये होता. उमरकोटला जिल्ह्याचा दर्जा मिळाल्यानंतर 1993 पासून आतापर्यंतच्या निवडणुकीत याठिकाणी कायम पाकिस्तान पिपल्स पार्टीलाच विजय मिळाला आहे. तर पाकिस्तान मुस्लिम लीग (फंक्शनल) हा दुसरा मोठा पक्ष आहे.

त्याशिवाय पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ) आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ हे पक्षदेखील स्थानिक नेत्यांच्या मदतीनं या भागात पाय जमवण्याचा प्रयत्न करत असतात.

पूर्वी हिंदू समुदायातील सदस्य उमरकोट नगरसमितीच्या अध्यक्षपदापासून विधानसभेपर्यंत निवडले जात होते. पण जनरल जिया-उल-हक यांनी अल्पसंख्याकांसाठी निवडणुकीची स्वतंत्र व्यवस्था केली.

उमरकोट जिल्ह्यात सध्या एक नॅशनल असेंब्ली आणि चार विधानसभेच्या जागा आहेत. मात्र मुख्य प्रवाहातील बहुतांश पक्ष या जागांवरून अल्पसंख्याक उमेदवारांना तिकिट देत नाहीत.

तिकिटाऐवजी राखीव जागा

उमरकोटमध्ये नोंदणी असलेल्या मतदारांचा आकडा 5 लाख 34 हजारांपेक्षा जास्त आहे. त्यात 54 टक्के पुरुष मतदार आहेत. 2018च्या सार्वत्रिक निवडणुकीत 49 उमेदवार मैदानात होते. त्यांच्यापैकी नऊ अल्पसंख्याक समुदायाचे होते. त्या

सर्वांना मिळून अवघी 1741 मतं मिळाली होती. या उमेदवारांमध्ये पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) च्या नीलम वालजी यांचाही समावेश होता.

पाकिस्तान, हिंदू

''राजकीय पक्षांनी याठिकाणी एक परंपरा तयार केली आहे. ते भिल्ल, कोहली, मेंघवार, माल्ही बरदारी अशा विविध समुदायांच्या उमेदवारांमध्ये आरक्षित जागांचं वाटप करतात. तसं करून ते संपूर्ण समुदायाची मतं मिळवतात,'' असं नीलम वालजी म्हणाल्या.

''अल्पसंख्याक उमेदवारांना तिकीट न मिळण्याचं दुसरं कारण म्हणजे त्यांची आर्थिक स्थिती. सार्वत्रिक निवडणुकीत कोट्यवधींचा खर्च होतो. एवढा पैसा कोणी खर्च करत नाही. एखाद्याची तशी ऐपत असली तरी, त्याला आरक्षित मतदारसंघ दिला जातो,'' असं नीलम वालजी सांगतात.

"याठिकाणचं प्रतिनिधित्व वास्तविक नाही. याठिकाणी 98 टक्के हिंदू समुदाय मतदान करतो. तर मुस्लिमांचं प्रमाण कमी आहे. विशेषत: महिला मतदान करायला बाहेर पडत नाहीत. उच्च वर्गातील महिला मतदान करत नाही, बहुतांश अल्पसंख्याक महिलाच मतदान करतात.

लालचंद माल्ही उमरकोटचे राहणारे आहेत. तसंच राखीव जागेवरून ते पीटीआय पक्षाचे नॅशनल असेंब्ली सदस्य आहेत. त्यांच्या मते, हिंदू लोकसंख्येचं बहुमत असूनही राजकीय पक्ष बहुतांश अल्पसंख्याकांना सामान्य मतदारसंघातून तिकीट देत नाही.

प्रभाव आणि निष्ठेनुसार दिले जाते तिकिट

सिंध प्रांतामध्ये तीन टर्मपासून पाकिस्तान पिपल्स पार्टीची सत्ता आहे.

उमरकोटमध्ये एका नॅशनल असेंबली आणि चार विधानसभा मतदारसंघापैकी दोन सय्यद जाती आणि दोन तालपूर कुटुंबाकडे आहेत. पक्षाप्रती असलेली निष्ठा आणि समुदायावरील प्रभाव याआधारे उमेदवाराचा निर्णय घेतात, असं पाकिस्तान पिपल्स पार्टीचे अध्यक्ष निसार अहमद खोडो म्हणाले.

"मीरपूर खास, उमरकोट आणि थारमध्ये बिगर मुस्लीम लोकसंख्या जास्त आहे. आम्ही त्याठिकाणी एक आदर्श निर्माण केला आहे. सिनेटर कृष्णा कुमारी आहेत तर सर्वसामान्य मतदारसंघातून थारमधून महेश कुमार मलानी प्रतिनिधी आहेत. उमरकोटमध्ये अल्पसंख्याकांच्या जोरावर युसूफ तालपूर विजय मिळवतात. त्यांचा त्याठिकाणी प्रभाव आहे. त्यांचा आवाज दाबला जाऊ शकत नाही. त्यांनी खट्टू मल यांना प्रतिनिधित्व गेत सल्लागार बनवलं आहे.

सरकारी नोकऱ्यांमधून वंचित

सरकारी नोकऱ्या प्रामुख्यानं शिक्षण, आरोग्य, पोलीस आणि नगरपालिका विभागात आहेत. केवळ नगरपालिका समितीमध्ये एकूण 209 कर्मचारी आहेत, त्यापैकी 60% मुस्लीम आहेत.

पाकिस्तान, हिंदू

''जेव्हा नोकऱ्यांची संधी येते तेव्हा त्या शहरातील मोठ्या लोकांनाच मिळतात. एखाद्याचे वडील शेतकरी असतील तर ते मुलांना शेतीच करावी लागणार आहे असं शिकवतात. एखादा मिस्त्री असेल तर मुलाला तेच काम शिकवतो. एखादा नोकर असेल तर तो मुलाना माझ्यानंतर मालकांचा नोकर तू बनणार असंच शिकवतो," असं नीलम म्हणाल्या.

नॅशनल असेंब्लीचे सदस्य लाल मल्ही यांच्या मते, ''सरकारी नोकऱ्यांच्या आपल्या समाजाशी संबंध आहे. तुमचं प्रतिनिधित्व नसेल तर कोटाच काय पण मेरीट असूनही तुम्हाला नोकरी मिळत नाही. त्यामुळं अल्पसंख्याक समुदाय चांगल्या नोकरीपासून वंचित राहतो.''

मेवा राम परमार एक सामाजिक कार्यकर्ता आहेत. हिंदु समुदायात शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचं काम ते करतात. ''रोजगाराचा संबंध शिक्षणाशीच आहे. जर शिक्षण नसेल तर सार्वजनिक किंवा खासगी क्षेत्रात रोजगार मिळणार नाही. अल्पसंख्यांकांमध्ये बहुतांश अनुसुचित जातीतील आहेत. ते गरीबीमध्ये जीवन जगत आहेत. शिक्षण आणि उच्च शिक्षणाचं तर स्वप्नही ते पाहू शकत नाहीत. त्यामुळं आर्थिक स्थिती यात अडथळा ठरत आहे,'' असं ते म्हणाले.

पाकिस्तान, हिंदू

फोटो स्रोत, LALMALHI

"याठिकाणी हिंदूंचं बहुमत आहे मात्र निवडून आलेल्यांमध्ये त्यांचा प्रतिनिधी नाही. तर अल्पसंख्याक असलेल्या मुस्लीम लोकसंख्येचे प्रतिनिधी आहेत. सरकारी नोकऱ्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप असतो, त्यामुळं या स्थितीत अल्पसंख्याक वंचित राहतात."

धर्मांतरानंतर भेटलं घर

मीरपूर खास, उमरकोट रोडजवळ एक गाव आहे. मरियम नगर नावाच्या या गावात राहणाऱ्यांचा पेहराव आणि जीवनशैली हिंदू कोल्ही समुदायासारखी आहे. मात्र त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. त्यांच्या घरांवर आता क्रॉसची चिन्हं असून गावात मंदिराऐवजी चर्च आहे.

''माझ्या पतीचे आजोबा ख्रिश्चन होते. त्यांच्या कुटुंबातील आजोबा आजींनी धर्मांतर केलं होतं. आमच्या जातीतील लोकांनी आम्हाल हा धर्म का निवडला? असं विचारलं. त्यावर आम्हाला प्रार्थना शिकायला मिळते, चांगली गाणी ऐकता येतात, सुविधा मिळतात शिक्षणही चांगलं मिळतं,'' असं नेली नोंद म्हणाले.

पाकिस्तान, हिंदू

उमरकोटमध्ये काही मोठ्या सावकारांवर 'बंधुआ मजुरी' (गुलाम बनवणे) चे आरोप लागले आहेत. अशा सावकारांच्या खासगी तुरुंगातून सुटणारे बहुतांश कोहली समुदायाचे आहेत.

मरियम नगरमधील रहिवाशांच्या मते, आधी ते बेघर होते. सावकारांकडे राहायचे. मग एका फादरने त्यांना ही जमीन घेऊन दिली. त्यावर घरंही बांधून दिली. त्याशिवाय शाळा, चर्च आणि चांगल्या सुविधा दिल्या. त्यांची दीडशेपेक्षा अधिक कुटुंबं आहेत. उमरकोटमधील अशा जवळपास तीन कॉलनी ख्रिश्चन बनल्या आहेत.

उमरकोटमध्येही धर्मांतराची प्रकरणं समोर आलेली आहेत. साधारणपणे याठिकाणी बळजबरी धर्मांतराचे आरोप लावण्यात आलेले आहेत.

उमरकोटचे राजकीय आणि आर्थिक चढ-उतार त्यांच्या ठिकाणी आहेत, मात्र या जिल्ह्यातील धार्मि सौहार्द आजही कायम आहे. मोहरम असो किंवा होळी, दिवाळी सगळीकडे तसं वातावरण असतं.

पीर पथोरो उमरकोटमधील धार्मिक सौहार्दाचं मोठं केंद्र आहे. याठिकाणी हिंदू-मुस्लीम दोघंही येतात. त्याला 'आधा मुल्तान'ही म्हटलं जातं. या दरबाराशी संबंधित घंवर सिंह यांच्या मते, ''आम्ही मुल्तान वाल्यांना पीर समजतो. त्यांचे भाविक याठिकाणी येतात. या ठिकाणाला वेगळं असं महत्त्व आहे."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)