वृद्ध आई-वडिलांसोबतचा संघर्ष टाळण्यासाठी 'या' गोष्टी तुम्हाला मदतीच्या ठरू शकतात

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी न्यूज वर्ल्ड

आजची पिढी वृद्ध आई-वडिलांची काळजी घ्यायला अजून तयार नसल्याचं काही तज्ज्ञ सांगतात. वृद्ध आई-वडिलांविषयीची त्यांची मतं ऐकल्यानंतर वृद्धत्व म्हणजे संघर्षाचा गंभीर टप्पा असल्याचं जाणवू लागतं.

जसजसं तुमचं वय वाढत जातं तसतसं तुम्हाला इतर कोणाच्या तरी मदतीची गरज भासते.

मग दैनंदिन कामांपासून ते आर्थिक बाबींपर्यंत सगळ्याच बाबतीत या मदत गरजेची असते. मात्र ही जबाबदारी घेणाऱ्यावर याचा परिणाम होऊ शकतो असं तज्ज्ञ सांगतात.

ब्राझीलमधील साओ पाउलो विद्यापीठातील सायकोजर्माटॉलॉजीचे प्राध्यापक मानसशास्त्रज्ञ ड्युसिव्हानिया फाल्काओ म्हणाले, "काही प्रकरणांमध्ये, वृद्ध पालकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुलांवर दबाव असतो. विशेषत: पालकांना आरोग्याची समस्या असेल तर हा दबाव जाणवतो."

फाल्काओ पुढे म्हणाले, "सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनशैलीच्या दृष्टीने त्यांच्या वृद्ध पालकांची काळजी घेणं ही मुलांची जबाबदारी आहे आणि मुलांनी ते कर्तव्य समजलं पाहिजे."

अलीकडच्या काळात समाजात वृद्धांची संख्या वाढत असल्याने आव्हानेही वाढली आहेत.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार, जगातील अनेक देशांमध्ये वृद्धांची संख्या सतत वाढत आहे.

आकडेवारी सांगते की, 65 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या वृद्ध लोकांची टक्केवारी उर्वरित वयोगटाच्या तुलनेत जास्त आहे. वृद्धांचं आयुर्मानही वाढलंय. त्यामुळे वृद्धांची काळजी घेण्यात जास्तीचा वेळही खर्ची पडू लागलाय.

त्यामुळे वृद्ध पालकांशी कसं वागायला हवं? त्यातून निर्माण होणाऱ्या आव्हानांना कसं तोंड द्यायचं? या सगळ्या गोष्टी नीट समजून घेणं महत्वाचं आहे.

तज्ज्ञांच्या मते, कौटुंबिक व्यवस्था, सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक घटकांमुळे मुलांची आपल्या वृद्ध पालकांप्रती वागणूक बदलते.

हट्टी पालक विरुद्ध खंबीर मुलं

तज्ज्ञांच्या मते, आई-वडील आणि मुलांनी एकमेकांच्या आयुष्यातील टप्पे समजून घेणं ही मुख्य आव्हानं आहेत.

मुलांना आपले पालक आजारी पडू नये असं वाटतं, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी ते प्रयत्नशील असतात.

दुसरीकडे पालकांची मानसिकता वेगळीच असते. त्यांना दुसऱ्याच्या मदतीची गरज आहे हे माहीत असून देखील ते वास्तव लक्षात घ्यायला तयार नसतात. त्यांना आपलं स्वातंत्र्य गमवायचं नसतं, म्हणून कोणावरही अवलंबून न राहण्याचा ते प्रयत्न करतात असं वृद्धारोगतज्ज्ञ फर्नांडा आंद्राडे सांगतात.

आंद्राडे सांगतात, "बहुतेक प्रकरणांमध्ये, मुलं आणि पालकांची मतं भिन्न असतात. मुलांना त्यांच्या पालकांचे निर्णय स्वीकारायचे नसतात."

या सगळ्यात मुलं म्हणतात की, त्यांचे पालक हट्टी असतात आणि त्यांचं अजिबात ऐकून घेत नाहीत.

तज्ज्ञ म्हणतात, "आपल्या जवळच्या व्यक्तीला वृद्ध होताना पाहून, त्यांचे आजारपण, स्वतःवरील नियंत्रण गमावणे आदी गोष्टी पाहून मुलांना चिंता वाटू शकते."

पण जसं वय वाढेल तशी लोकं हट्टी होऊ लागतात.

एकटेपणा, प्रियजन, मित्र, कुटुंबातील सदस्य गमावणे, जीवाची भीती, जीवनाचा तिरस्कार ही त्यामागची कारणं आहेत.

इतकंच काय तर काही लोक इतरांवर, त्यांच्या स्वतःच्या मुलांवर अवलंबून राहू इच्छित नसतात.

फर्नांडा विचारतात, "कल्पना करा की तुम्ही तुमच्या आयुष्याची 50 वर्ष मुक्तपणे जगलात. तुम्ही बाजारात जाऊन तुम्हाला हव्या त्या गोष्टी विकत आणल्या. तुमची सगळी कामं तुम्ही स्वतः केली. वैयक्तिक स्वच्छतेबाबत काळजी घेतली. पण आता या सगळ्यासाठी तुम्हाला इतरांवर अवलंबून राहावं लागलं तर तुम्हाला कसं वाटेल?"

बऱ्याच जणांना आपलं स्वातंत्र्य गमवायचं नसतं त्यामुळे ते स्वतः गाडी

चालवतात. त्यांना डॉक्टरांकडे जायचं नसतं. किंवा भूतकाळात जी कामं स्वतः केलेली असतात, आता देखील ती कामं स्वतःहून करायची असतात.

अशावेळी मुलं आणि पालकांमध्ये संघर्ष सुरू होतो. दोघांमध्ये मतभिन्नता असते. अशावेळी दोघांनीही मन मोकळं करून बोललं पाहिजे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

बहुतेक वेळा ते कोणत्या टप्प्यात आहेत आणि त्यांची मानसिक स्थिती समजून घेऊन पुढे जाणं महत्त्वाचं असतं. वयोमानानुसार पालकांच्या गरजा ओळखणं देखील महत्वाचं आहे.

स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ रिओ डी जनेरियोचे प्राध्यापक रेनाटो व्हेरास यांनी सांगितलं की, या टप्प्यावर एका पिढीतील अंतरामुळे पालक आणि मुलांमध्ये विसंवाद तयार होतो. आणि याचा परिणाम नातेसंबंधावर होतो.

"या समस्येवर मात करण्यासाठी पालकांनी त्यांच्या मुलांशी मोकळेपणाने बोलायला हवं. त्यांना पिढ्यांमधील अंतर समजावून सांगायला हवं."

"ते खूप महत्वाचं आणि गंभीर आहे. कारण अनेक पालक मुलांशी

बोलतच नाहीत. पालक त्यांना हवं ते करतात त्यामुळे ही समस्या आणखीन वाढली आहे."

पालकांची भूमिका समजून घ्या

ड्यूसिव्हानिया फाल्काओ म्हणतात, "स्वतंत्र राहू इच्छिणाऱ्या पालकांना कशा पद्धतीने समजून घेता येईल याविषयी मुलांनी विचार केला पाहिजे. त्यांच्या निर्णयांचा आदर केला पाहिजे. आणि यातूनच सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांचं नातं पुढे जाईल."

वृद्धांबद्दलचे समज आणि गैरसमज सोडून द्या.

अनेक जणांना स्वतंत्र राहायला आवडतं, पण त्यांना इतरांबरोबर ही राहायला आवडतं.

बऱ्याच प्रकरणांमध्ये, विशेषत: जेव्हा पालकांच्या जबाबदाऱ्यांचा विचार केला जातो, तेव्हा पुरुषांपेक्षा स्त्रियांवरचं ओझं जास्त असतं. त्यांच्यावर असलेला दबाव वाढू शकतो.

असं म्हणतात की, वय वाढलं की पालक लहान मुलांसारखं वागू लागतात.

फर्नांडा सांगतात, "मुलं कोऱ्या कागदासारखी असतात, त्यांना सर्वकाही शिकवावं लागतं. पण वृद्धांच्या बाबतीत तसं नसतं. त्यांना अनेक गोष्टींचे अनुभव असतात. त्यामुळे मुलं आणि वृद्धांमध्ये फरक असतो. दोन्ही वेगवेगळे टप्पे आहेत."

त्या पुढे सांगतात, "वडिलांना हृदयविकाराचा झटका आलेला असेल आई अल्झायमरने त्रस्त असेल तर कुटुंबात तणाव वाढतो. मुलांवर परिणाम होतो. खर्च वाढतो."

"दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर पालकांकडे अधिक लक्ष देणारी मुलं तुलनेनं फारच कमी असतात."

निरोगी म्हातारपण

म्हातारपणी आई-वडिलांना नेमक्या कोणत्या प्रकारच्या आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं हे सांगणं कठीण आहे.

अनेक घटक वृद्धत्वावर परिणाम करतात. हवामान, आरोग्य सुविधा, अनुवांशिक समस्या असं बरंच काही. पण एखादा वृद्ध व्यक्ती आजारी पडेलच किंवा त्यातच त्याचा मृत्यू होईल असं मानण्याची गरज नसल्याचं तज्ज्ञ सांगतात.

वृद्धांना असणारी शारीरिक आणि मानसिक आरोग्य समस्या, कार्यक्षमतेत बदल आणि कमी झालेली क्षमता या सर्व गोष्टींना एखादी मोठी समस्या मानली जाऊ नये. तुमचं म्हातारपण आरामात घालवण्याचा प्रयत्न करा.

कोणत्याही वेळी मुलाने पालकांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार असलं पाहिजे.

फर्नांडा सांगतात, "म्हातारपण, आजारपण, मृत्यू... आपण हे समजून घेतलं पाहिजे की म्हातारपण ही शारीरिक स्थिती किंवा अवलंबित्वाची अवस्था आहे."

"आजकाल आपण निरोगी आणि कठोर परिश्रम करणारे अनेक वृद्ध लोक पाहतो. हे आपल्यासाठी नवीन आहे. संस्कृती बदलायला वेळ लागतो. वृद्ध पालकांशी समन्वय साधण्याची पद्धत प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असू शकते."

तज्ज्ञांच्या मते, जर मुलांनी या टप्प्यावर त्यांच्या पालकांना साथ दिली आणि त्यांना जुनाट आजारांवर मात करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं

तर त्यांची जीवनशैली सुधारण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर पालकांनी स्वतःला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी ठेवण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी पुस्तकं वाचली पाहिजेत.

फाल्कोवा म्हणतात, "या टप्प्यावर पालकांना भावनिक आधार देणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच त्यांची मानसिक स्थितीही जाणून घेतली पाहिजे. नैराश्य, एकटेपणा आणि चिंताग्रस्त लोकांना ताबडतोब वैद्यकीय मदत घेण्यास प्रोत्साहित केलं पाहिजे."

मजबूत संबंध

काही वृद्धांनी बीबीसीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात शांतता हवी असेल तर वेळेपूर्वी नियोजन करणं महत्त्वाचं आहे.

जी मुलं त्यांच्या पालकांशी वैद्यकीय सेवा, आर्थिक निर्णय आणि इतर पूर्वनियोजनावर चर्चा करतात त्यांना या टप्प्याचा सामना करण्यास अडचण येत नसल्याचं फाल्काओ सांगतात.

ही चर्चा ज्या कुटुंबात होऊ शकत नाही तिथे समस्या निर्माण होतात.

फाल्काओ सांगतात, "वृद्धत्वाबद्दल जागरूकता असणं खूप महत्वाचं आहे. यामुळे आपण भविष्यातील आव्हानांसाठी तयार राहतो. परिणामी, तुम्ही निःसंशयपणे एक चांगलं जीवन जगू शकता."

फर्नांडा म्हणाल्या, "वडिलांसोबत राहिल्याने, त्यांच्या जबाबदाऱ्या घेतल्याने मजबूत संबंध निर्माण होतात."

त्या पुढे सांगतात, "एखाद्याच्या आयुष्यात येणारी आव्हानं, वयानुसार येणाऱ्या समस्या, मर्यादा प्रत्यक्ष पाहता येत असल्याने, वृद्धापकाळात कोणकोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे हे तरुणांना आधीच कळून येतं.

यावर फाल्काओ म्हणतात की, वृद्धांना प्राधान्य देणाऱ्या आणि निर्णय प्रक्रियेत त्यांचा समावेश करणाऱ्या कुटुंबांमध्ये पालक-मुलांचे संबंध अधिक दृढ असतात.

संशोधनात असं दिसून आलंय की, ज्या मुलांचं आपल्या वृद्ध पालकांशी घट्ट नातं असतं ते त्यांच्या मुलांवरही तेवढंच प्रेम करतात.

फाल्काओ म्हणतात, "आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो आपण समजून घेतला पाहिजे तो म्हणजे आव्हानं असूनही आयुष्याच्या शेवटाकडे जाताना काहीतरी नवीन करण्याची आणि शिकण्याची संधी असली पाहिजे."

"वृद्धावस्थेतील आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि त्यांना सामोरं जाण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन स्वीकारणं आणि त्या अवस्थेची लवकर जाणीव होणं हे निरोगी आणि परिपूर्ण जीवनासाठी मोठं योगदान देऊ शकतं हे विसरू नका."