मराठी तरुणाने गाईच्या गोठ्यात सुरू केलेली आयटी कंपनी 'शार्क टँक' इंडिया'मध्ये पोहोचते तेव्हा

    • Author, शाहिद शेख आणि आशय येडगे
    • Role, बीबीसी मराठी

दादासाहेब पांडुरंग भगत..दोन वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यातील सांगवी नावाच्या छोट्याशा गावात एका गायीच्या गोठ्यात सुरू केलेल्या आयटी कंपनीचा हा मालक आता थेट शार्क टँकच्या तिसऱ्या सिझनमध्ये जाऊन पोहोचला आहे.

दादासाहेब भगतने 'बोट (BOAT) या सुप्रसिद्ध हेडफोन कंपनीचे मालक अमन गुप्ता यांच्याकडून तब्बल 1 कोटींची गुंतवणूक मिळवण्यातही यश मिळवलं आहे.

पण शार्क टँकमध्ये पोहोचण्याचा, तिथे उभं राहून स्वतःचा व्यवसाय देशातील बड्या गुंतवणुकदारांना समजावून सांगण्याचा त्याचा प्रवास काही सोपा नव्हता.

सध्या दादासाहेब आपली कंपनी पुण्यातून चालवतो.

सांगवीसारख्या एका छोट्याशा खेड्यात जन्मलेल्या दादासाहेब भगत यांनी आज कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारी एक आयटी कंपनी उभी केली आहे.

शार्क टँकमध्ये दादासाहेब यांच्यासोबत काय घडलं?

दादासाहेब यांनी त्यांच्या डिझाईन टेम्प्लेट (designtemplate.io) नावाच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याचं आवाहन शार्क टॅंकमधील उद्योजकांना केलं होतं.

या कार्यक्रमात काही मिनिटांमध्ये तुम्हाला स्वतःचा व्यवसाय आकड्यांसह समजावून सांगावा लागतो.

ज्यात तुमच्या कंपनीची आर्थिक उलाढाल किती आहे, तुमच्या उत्पादनातून किती नफा कमावला जाऊ शकतो, तुम्ही आजवर किती पैसे कमावले आहेत, तुमचा भविष्यासाठीचा प्लॅन काय आहे आणि तुम्ही तुमच्या कंपनीबाबत किती मोठं स्वप्न पाहिलं आहे हे सांगून शार्क टॅंकमधल्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी तयार करावं लागतं.

दादासाहेब भगत मात्र सादरीकरणावेळी थोडासा गडबडला.

समोर बसलेल्या मोठमोठ्या लोकांकडे पाहून तो गोंधळला आणि त्याच्या तोंडातून एक शब्दही फुटेना. त्यामुळे दादासाहेबला त्याचं सादरीकरण थांबवावं लागलं.

तिथे उपस्थित असलेल्या राधिका गुप्ता यांनी त्याला पाणी दिलं आणि पाणी प्यायलानंतर मात्र दादासाहेबला मागे वळून पाहावंच लागलं नाही.

दादासाहेबने आधी स्वतःचा इथपर्यंतचा प्रवास सांगितला. शार्क टॅंकमधल्या उद्योजकांना त्यांनी उभारलेल्या आयटी कंपनीची सफर घडवली.

यासोबतच कोरोनाकाळात गायीच्या गोठ्यात कशा पद्धतीने व्यवसाय वाढवला, ग्रामीण भागातील तरुणांना कशा नोकऱ्या दिल्या हे उलगडून सांगितलं आणि शेवटी त्यांच्या कंपनीच्या 2.5 मालकीच्या बदल्यात 1 कोटी रुपये गुंतवण्याचं आवाहन त्यांनी गुंतवणुकदारांना केलं.

लेन्सकार्टचे मालक पियुष बन्सल आणि बोटचे मालक अमन गुप्ता यांनी दादासाहेब भगत यांच्या कंपनीत दहा टक्के भागीदारीच्या बदल्यात एक कोटी रुपये गुंतवण्याची तयारी दाखवली.

शेवटी बीडच्या या तरुण उद्योजकाने दिल्लीच्या अमन गुप्ता यांना त्याच्या कंपनीची 10% मालकी दिली आणि एक कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवण्यात यश मिळवलं.

पुण्याच्या आयटी कंपनीत ऑफिसबॉय म्हणून काम सुरू केलेल्या दादासाहेब भगत यांनी शार्क टॅंकसारख्या कार्यक्रमात पोहोचणं आणि तिथे जाऊन एक कोटींची गुंतवणूक उभी करणं ही गोष्ट खरोखर प्रेरणादायी म्हणावी लागेल.

शार्क टॅंकमध्ये कसे पोहोचला दादासाहेब?

शार्क टॅंकमधील अनुभवाबद्दल दादासाहेबांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की मी सुरुवातीला थोडासा घाबरलो पण जेव्हा राधिका यांनी धीर दिला तेव्हा मात्र माझी भीती गेली आणि मी बोललो.

दादासाहेब सांगतो की, "मी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतो, त्यामुळे 'शार्क टॅंक' टीमने मला काँटॅक्ट केला. नंतर मी तिथे अप्लाय केलं होतं, कधी विचारही पण नव्हता केला की मी शार्क टॅंकमध्ये जाईन असा. आपल्याला कुणी 1 लाख रुपयेसुद्धा देत नाही तर 1 कोटी तर खूप लांबची गोष्ट आहे."

"माझे आई-वडील हे आजही शेती करतात, शार्क टॅंक काय आहे हे त्यांना माहीत नाही, रात्री त्यांना मोबाईलवर पूर्ण एपिसोड दाखवला पण शेवटपर्यंत त्यांना हे पैसे कशासाठी मिळाले हे कळलं नाही, पण एक नक्की होतं की मला मोबाईलवर पाहिल्यानंतर माझ्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आपला मुलगा काहीतरी चांगलं करत असल्याचं समाधान जाणवत होतं.

"आता फंडिंग मिळाल्यानंतर मला जगातील सर्वात मोठं प्रिमियम डिझाईन मार्केट बनवायचं आहे, त्यासाठी आणखी काही कंपन्या आमच्यासोबत इन्वेस्ट करण्यासाठी तयार होत आहे," असं दादासाहेबने सांगितलं.

दादासाहेब भगत यांनी सुरुवात कशी केली?

शार्क टॅंकमध्ये जाण्याचा आणि तिथे जाऊन एक कोटी मिळवण्याचा अनुभव जरी स्वप्नवत वाटत असला तरी त्याला मोठ्या कष्टातून जावं लागल्याचं आपल्याला त्याच्याशी बोलल्यावर लक्षात येतं.

2020 मध्ये बीड जिल्ह्यात कोरोनाच्या काळात त्याने गायीच्या गोठ्यात आपल्या कंपनीची सुरुवात केली होती.

ही कंपनी सुरू करण्याआधी दादासाहेब पुण्यात नोकरी करायचा. इन्फोसिस या कंपनीमध्ये ऑफिसबॉय म्हणून तो काम करायचा.

इन्फोसिसमध्ये रात्रपाळी करून दिवसा प्रोग्रामिंगचे क्लास केले आणि संगणक युगात जगण्यासाठी आवश्यक असणारी डिजिटल कौशल्ये आत्मसात केली.

दादासाहेब भगतच्या कंपनीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही 'मन की बात' या कार्यक्रमात कौतुक केलं होतं.

दादासाहेबने फक्त कंपनी सुरूच नव्हती केली तर गावातल्या मुलांना देखील रोजगार मिळवून दिला.

काही मुलं फ्रीलान्स म्हणूनही तिथे काम करत होते. डिझाईन टेम्प्लेटच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार सध्या त्यांच्याकडे पंधरापेक्षा जास्त कर्मचारी काम करतात.

शार्क टॅंकमध्ये मिळालेल्या गुंतवणुकीतून व्यवसायाचं मार्केटिंग आणि कंपनी वाढवण्यासाठी पैसे खर्च करणार असल्याचं दादासाहेब म्हणाले.

हेही नक्की वाचा