You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे : 'शाखा आमचीच, पोलीस बाजूला करून समोर या, मग बघू'
शिवसेनेतील दुफळीनंतर पुन्हा एकदा दोन्ही गटांमध्ये संघर्ष निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी हा संघर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील मुंब्रा येथील शाखेच्या मुद्द्यावरून सुरू झाला आहे.
शिवसेनेच्या मुंब्रामधील मध्यवर्ती शाखेवर बुलडोजर फिरवण्यात आला. त्यानंतर ठाकरे गटानं आक्रमक भूमिका घेत या संपूर्ण प्रकरणावर टीका केली आहे.
शिंदे गटानं पाडलेल्या जागेवर पुन्हा लगेचच भूमीपूजन करून नव्या शाखेच्या पुनर्बांधणी करण्याचं कामही सुरू केलं आहे. पण हा वाद आता चिघळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
ज्यावेळी या शाखेवर बुलडोजर फिरवण्यात आला, त्यावेळी त्याठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते बसले होते, त्यांना खेचून बाहेर काढत पाडावाडी करण्यात आल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी केला.
'आमची शाखा तिथंच भरणार, पाहू कोण आडवतो'
उद्धव ठाकरे म्हणाले, "काही दिवसांपूर्वी सत्तेचा माज आलेल्यांनी बुलडोजरने शिवसेनेची शाखा पाडली. पण आज खरा बुलडोजर घेऊन मी मुंब्र्याच्या रस्त्यावर आलो आहे. आज आमचे पोस्टर फाडले. या नेभळटांना एवढंच सांगतो की, त्यांची मस्ती लोक निवडणुकांत फाडतील."
- पोलिसांनी शाखेच्या मालकापासून शाखाचोरांचं रक्षण केलं म्हणून त्यांचं अभिनंदन. प्रशासन किती हतबल झालं आहे हे महाराष्ट्रानं पाहिलं.
- खोके सरकारनं शाखा पाडून तिथं खोकं आणून ठेवलं, ते लवकरात लवकर उचलावं नसता ते खोकं आम्ही उचलून फेकून देऊ. सगळी कागदपत्रे आपल्याकडं आहेत.
- आमच्या शिवसेनेची शाखा तिथं भरणार पाहू कोण आडवं येतो.
- पोलिसांना बाजुला आणि मग समोर या मग पाहू. दिल्लीच्या हातातील बाहुल्यांनो तुमच्यात हिम्मत नाही, पण आमच्या मर्दांना पोलिसांच्या धाकाने घाबरवत असाल तर पोलिसांना बाजुला ठेवा आणि मग समोर या.
- आमच्या केसाला धक्का लागला तर तुमचे सगळे केस महाराष्ट्र उपटून टाकल्याशिवाय राहणार नाही.
- मुंब्राकरांशी हिंदीतून साधला संवाद. हे जे काही घडत आहे, ते मान्य आहे का. निवडणूक कोणतीही आली तरी जे गद्दार आहेत त्यांचं डिपॉझिट जप्त करण्याचा निश्चय करा.
- हे काही दिवसांचे पाहुणे आहेत. नंतर कुठे फिरणार ते पाहू. या नेभळटांना कोणीही थारा देता कामा नये.
- मी लढायला तयार आहे, मैदानात उतरलोय. पण मी ज्यांच्यासाठी लढतोय त्यांच्यापैकी किती मला साथ देतील हे मला पाहायचं होतं.
- तिकडं सगळे किरायाचे तट्टू आहेत, त्यामुळं किरायाचा तट्टू अश्वमेधाचा घोडा होऊ शकत नाही.
- पोलिसांनी आज चोरांचं रक्षण केलं आहे. पण त्यांनी मधमाशाच्या पोळ्यावर दगड मारला आहे.
- जनतेच्या सेवेसाठी जी शाखा सुरू होती, ती पुढेही त्याचठिकाणी सुरू राहील. त्यापेक्षा उत्तम शाखेचं पुनर्निर्माण करू.
शाखेजवळ उद्धव ठाकरे पोहोचल्यानंतर नेमकं काय घडलं?
मुंब्र्तील शाखेच्या अलिकडे पोलिसांनी बॅरिकेडिंग केलं होतं. त्याच्या पुढे पोलिसांनी उद्धव ठाकरेंना जाऊ दिलं नाही. त्या बॅरिकेडपासूनच शाखा पाहून उद्धव ठाकरेंची गाडी परतली.
त्याआधी उद्धव ठाकरेंशी बोलून पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना परत जाण्याची विनंती केली. कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते, असं पोलिसांनी सांगितलं. पण उद्धव ठाकरे शाखेला भेट देण्यावर ठाम होते. जाऊ दिलं नाही, तर घेराव घालून बसणार अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी पोलिसांशी बोलताना मांडली.
यावेळी पोलिसांशी बोलताना अनिल परब यांनी पोलिसांना म्हटलं की, उद्धव ठाकरेंसह पोलिसांसोबत जाऊन पाच जण जाऊन पाहणी करून येतील. पण तेही पोलिसांनी मान्य केलं नाही.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे पोलिसांना म्हणाले की, आमची काय चूक आहे ते सांगा आम्ही आल्यापावली परत जाऊ. संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे, तुम्ही असे हतबल होऊ नका असं उद्धव ठाकरे पोलिसांना म्हणाले.
पोलिसांनी त्यानंतरही ऐकलं नाही, त्यामुळं उद्धव ठाकरे गाडीतून उतरून बॅरिकेड्सजवळ पोहोचले. पोलिसांशी चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा गाडीत बसले. त्यांची गाडी हळू हळू पुढे निघाली.
यानंतर बोलताना अनिल परब म्हणाले की, उद्धव ठाकरेंना शाखा कुठे आहे ते पाहायचं होतं. बॅरिकेड्सच्या मागून त्यांनी शाखेची पाहणी केली. शाखा पाहण्याचा उद्देश सफल झाला.
पोलिस मिंधे सरकारचं काम करत आहे, त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत, असा आरोपही अनिल परब यांनी केला. तर पोलिसांच्या माध्यमातून शिंदे गटाचे गुंड त्याठिकाणी आणून ठेवले आणि पोलिसांच्या माध्यमातूनच लफंग्यांना संरक्षण दिलं, असं विनायक राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाच्या दोन्ही कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत.
शिंदे गटाचे माजी नगरसेवक राजन किणे यांना सुद्धा नोटीस देण्यात आली आहेस तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वागताचे बॅनर मुंब्रा भागात लावण्यात आले होते, ते देखील फाडण्यात आल्याचं आव्हाडांनी ट्वीट केलं आहे.
नेमकं काय घडलं?
दोन नोव्हेंबरला ठाकरे गटाचे मुंब्रा शहरप्रमुख विजय कदम आणि काही पदाधिकारी शाखेत बसले होते.
त्यावेळी शिंदे गटाचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक राजन किणे हे त्यांच्या समर्थकांसह या शाखेत आले. त्यांनी या शाखेचा ताबा घेतला. त्यानंतर रात्री ही शाखा बुलडोजरने जमीनदोस्तही करण्यात आली.
या शाखेसाठी दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. ज्या ठिकाणची हा शाखा पाडली तिथे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नवी शाखा उभारणीची तयारी केली.
उद्धव ठाकरे आता याबाबत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)