पुरुषांसाठी रात्री फिरण्याचे अनुभव वेगळे, बायका रात्रीला फक्त भीतीशीच रिलेट करतात- ब्लॉग

    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी

‘चला चक्कर मारून येऊ,’ मित्र म्हणाला. तेव्हा रात्रीचे 11 वाजून गेले होते. त्याची बायको आणि मी त्याच्याकडे बघायला लागलो, दोघींच्या मनात एकच विचार होता, ही काय वेळ आहे दिल्लीसारख्या शहरात चक्कर मारण्याची.

त्याचं म्हणणं की जेवण मस्त झालं आहे, आता जरा पाय मोकळे करायला हवेत.

सहा फुटाचा रस्ता ओलांडला की माझं घर आहे, पण “चला जेवण जास्त झालंय, चक्कर मारून येऊ रात्री 11 वाजता...” असलं धाडस मी कधीही केलं नसतं. परक्या शहरात एकटीने राहाताना तर नाहीच नाही.

मग आठवलं की आयुष्यात किती किती काय काय मिस केलं आपण. कॉलेजमध्ये असताना एक भारी ट्रीप ठरली होती. नाशिकहून मुंबईला निघायचं, खूप फिरायचं, खूप खायचं, मनसोक्त खरेदी करायची, रात्री मरीन ड्राईव्हला गप्पा मारत बसायचं, समुद्र अनुभवायचा, पहाटे तिथला सूर्योदय पहायचा आणि मग परतीची गाडी पकडून घरी येऊन झोपायचं.

आज इतक्या वर्षांनी कधीही या ट्रीपचा विषय निघाला की मित्र भरभरून बोलतात, तो कसा समृद्ध करणारा अनुभव होता याविषयी सांगतात, हसतात, नॉस्टेल्जिक होतात, पण ग्रुपमधल्या मुलींकडे सांगण्यासारखं काहीच नसतं. आम्ही नव्हतोच ना त्यात.

आता नोकरी करतानाही किस्से ऐकू येतात, कोणीतरी रात्री डोंगरदऱ्यात मुक्काम करून निरभ्र आकाशातलं चांदणं पाहिलं, कोणी लडाखला जाऊन नुस्त्या डोळ्याने आकाशगंगा पाहिली.

कोणी ब्रेकअप झाल्यानंतर रात्रभर शहरात पायी फिरला, तर कोणी आयुष्यातल्या सर्वात कठीण प्रसंगी गंगेवर (आम्ही नाशिककर गोदावरीला गंगाच म्हणतो) जाऊन रात्रभर बसला.

पुरुषांचे रात्रीचे अनुभव किती वेगळे आहेत.

बायका रात्रीला फक्त भीतीशीच रिलेट करतात.

वरती म्हटलं त्या मित्राच्या घरी याच विषयावरून गप्पा सुरू झाल्या. त्याची बायको आणि मी दोघीही वेगवेगळ्या राज्यांमधून, छोट्या शहरांमधून नोकरीसाठी दिल्ली आलोय.

आमची पहिली आठवण म्हणजे सेंट्रल दिल्लीतून मयूरविहारला जाताना यमुना नदी ओलांडताना लागणारा निर्जन पॅच. तिथे मोबाईलला रेंजही नसते. कॅबमधून जाताना किती वेळा तिथे नखशिखान्त भीती वाटली असेल.

ती आजही एवढ्या वर्षांनी गेली नाही. ‘मध्ये नदी आहे, झाडी आहे, कोणी खाली ढकलून दिलं तरी कळणार नाही!’ तिची प्रतिक्रिया.

रात्र म्हटली की रस्त्यात वाटणारी भीती, ऑफिसात वाटणारी भीती, मेट्रोत वाटणारी भीती, इतकंच काय, लिफ्टमध्ये रात्री 10 नंतर वाटणारी भीती.

माझ्या सगळ्या आठवणींत भीती आहेच.

एका बोलताना एक मैत्रीण बोलून गेली होती की मी कोणत्याही परिस्थिती समोर जर परका पुरूष असेल किंवा मी अनोळखी ठिकाणी असेन तर आसपासच्या कोणत्या गोष्टीचा स्वसंरक्षणासाठी म्हणून वापर करता येईल हे आधीच बघून ठेवते.

हे सगळं लिहिण्याचं कारण म्हणजे कोलकातात एका महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि खूनानंतर चर्चेत आलेली ‘रिक्लेम द नाईट’ ही चळवळ.

रात्रीवर महिलांचाही हक्क आहे आणि त्यावेळी त्यांना सुरक्षा मिळाली पाहिजे असा काहीसा उद्देश या चळवळीचा आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षं झाल्यानंतर महिलांना रात्री फिरण्याचं, सुरक्षित राहाण्याचं स्वातंत्र्य नसेल मग कोणता स्वातंत्र्यदिन साजरा करायचा?

रात्रीच कशाला, दिवसाही बायका घराबाहेर असतील तर काहीतरी कारणासाठी हव्यात. बागेत, किंवा रस्त्याच्या कडेला गंमत बघत, चणे-फुटाणे खात वाहाणारी गर्दी पाहत निवांत बसलेल्या किती बायका पाहिल्यात तुम्ही? पुरुष दिसतात सगळीकडे.

“तुम्ही बाई असाल तर घराबाहेर का आहात, काय करत आहात याला काहीतरी कारण, स्पष्टीकरण हवं. कामावर जाताय का, येताय का? भाजी घ्यायला आलाय का, दवाखान्यात जाताय का? बायका रात्री रस्त्यावर असतील तर फोनवर तरी बोलत असतात, कानात इयरफोन घातलेले असतात, मान खाली करून चालतात, कोणाच्या डोळ्यात डोळे घालत नाहीत, एक भीती सगळीकडे व्यापून असते,” 'व्हाय लॉयटर' चळवळीच्या नेहा सिंग म्हणतात.

लॉयटर या शब्दाचा स्वैर अनुवाद म्हणजे निरुद्देश भटकत राहाणं.

नेहा सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यानी 2014 साली मुंबईत ही चळवळ सुरू केली. सार्वजनिक ठिकाणांवर महिलांचा तेवढाच हक्क आहे जेवढा पुरुषांचा आहे, रात्री बाहेर भटकण्याचाही महिलांना तेवढचा हक्क आहे जेवढा पुरुषांना आहे असं त्यांचं म्हणणं आहे.

गेली 10 वर्षं त्या स्वतः इतर महिलांना सोबत घेऊन मुंबईच्या रस्त्यांवर अधून मधून फिरत असतात.

“आम्ही फक्त चालत असतो, इथून तिथे. थकलो की बसतो, गप्पा मारतो, हसतो खिदळतो. अनेकदा वाईट अनुभवही येतात. पोलिस बऱ्याचदा थांबवतात. त्यांना वाटतं आम्ही देहविक्रय करणाऱ्या महिला आहोत. मग बराच वेळ आमची चौकशी चालते, आम्हाला आयकार्ड दाखवावे लागतात, आणि मग एकच प्रश्न वारंवार विचारला जातो, की काही काम नाहीये मग तुम्ही रात्रीच्या वेळी बाहेर कशाला फिरताय.”

हा प्रश्न विचारला जाऊ नये, बायकांचं सार्वजनिक ठिकाणी फिरणं, रात्री बाहेर असण्याची लोकांना, समाजाला यंत्रणेला सवय असावी म्हणून त्या हे करतात.

दहा वर्षांत काही बदललं का? असं विचारल्यावर म्हणतात,

“पुरुषांचं वागणं, समाजाची मानसिकता किंवा यंत्रणेचा दृष्टीकोन बदलला नाहीये. आतापर्यंत बायकांना हेच शिकवलं गेलं की तुमची सुरक्षितता तुमची जबाबदारी आहे, तुमच्याबाबतीत काही गैर घडलं तर ती तुमची चूक. तुम्ही कुठे होतात, काय कपडे घातले होते, तुम्ही समोरच्या उद्युक्त केलं का असे प्रश्न विचारले जातात.”

कोलकातामध्ये झालेल्या घटनेनंतरही आसामच्या सिलचर हॉस्पिटलने महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘मार्गदर्शक सूचना’ जाहीर केल्या. ज्यात म्हटलं होतं की, ‘त्यांनी अंधाऱ्या जागा, निर्जन जागांवर जाणं टाळावं, अगदीच आवश्यक असेल तर हॉस्टेल किंवा इतर राहात्या ठिकाणहून रात्री बाहेर पडावं आणि रात्री बाहेर जावं लागलंच तर वरिष्ठांना कळवावं, अनोळखी माणसांशी संपर्क टाळावा, बाहेर वावरताना सावध राहावं आणि संयमित वागावं म्हणजे तुमच्याकडे उगाचच कोणाचं लक्ष जाणार नाही’.

यातल्या सगळ्या सूचनांचं पालन महिला कर्मचाऱ्यांनी करायचं आहे, पण पुरुष कर्मचाऱ्यांनी महिला कर्मचाऱ्यांशी नीट वागावं, त्यांना असुरक्षित वाटू नये याची काळजी घ्यावी असं काहीच नाही.

मुळात पुरुषांनी महिलांवर लैंगिक अत्याचार करू नये याची काळजी का घेतली जात नाहीये?

यावरून सोशल मीडियात गदारोळ झाल्यानंतर या मार्गदर्शक सूचना मागे घेण्यात आल्या.

दुसरीकडे माध्यमांमध्ये जेव्हा लैंगिक अत्याचाराच्या बातम्या येतात तेव्हा त्यात जी भाषा वापरली जाते त्यावरही महिला हक्क कार्यकर्त्यांचा आक्षेप असतो.

महिलेवर बलात्कार ‘झाला’ असं म्हणतो आपण, पण महिलेवर बलात्कार ‘केला’ असं का म्हणत नाही?

कोणीतरी हा गुन्हा केलेला आहे, तो अचानक नैसर्गिकरित्या घडून आलेला नाही.

कदाचित महिलांना आता याची जाणीव होतेय, दुसरं कोणी केलेल्या गुन्ह्यासाठी आपल्याला जबाबदार ठरवणं त्यांना मान्य नाहीये ही त्यातल्या त्यात बरी गोष्ट.

“गेल्या दहा वर्षांत बायकांना हे जाणवलं की माझ्यावर झालेला लैंगिक अत्याचार ही माझी चूक नाहीये. तुम्ही माझ्या सुरक्षेसाठी काय केलं असा प्रश्न त्या सरकारला, समाजाला प्रश्न विचारतात. तुम्ही एकीकडे म्हणतात की 2024 मध्ये महिलांना समानता आणि स्वातंत्र्य मिळालं आहे, आणि दुसरीकडे रोजच बायका भीतीच्या छायेखाली जगतात. कोलकाता प्रकरणात म्हटलं की ती एकटीच का सेमिनार रूममध्ये जाऊन झोपली, किंवा मागे घडलेल्या एका प्रसंगात म्हटलं की कॅब केली तर ती का झोपली? सतत सावध, सतत भीती हे कसलं स्वातंत्र्य,” नेहा सिंग विचारतात.

कामासाठी, नोकरीसाठी, मजेसाठी, चांदणं पाहाण्यासाठी, जेवणासाठी, डोकं शांत करण्यासाठी अशा कोणत्याही कारणासाठी माझ्यासकट सगळ्या बायकांना रात्री भटकण्याचं स्वातंत्र्य हवं आणि त्यासाठी सुरक्षेची हमी हवी.

आणि या स्वातंत्र्यावर हल्ले करणारं कोण असतं, तर तुमच्या आमच्या घरातले पुरुषच.

बाईची जागा घरातच आहे, तिने बाहेर पडू नये अशी मानसिकता अजून बदलली नाही. आजही ‘सातच्या आत घरात’ चा आग्रह धरला जातो कारण घरात त्या सुरक्षित राहतील असं म्हणतात.

“पण प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे?” नेहा विचारतात. “सर्वात जास्त लैंगिक अत्याचाराची प्रकरण घरात होतात. हे करणारे नातेवाईक असतात, शिक्षक असतात, ओळखीतले असतात. पण तरी घराबाहेरच सगळं असुरक्षित आहे असं कसं म्हणणार.”

नेहा आणि त्याच्या सहकारी महिला जेव्हा रात्रीच्या वेळी फिरत असतात तेव्हा त्यांचा पाठलाग करणारे, त्यांच्यावर कमेंट करणारे पुरुष सामान्य घरातले असतात, सगळेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे नसतात. पण तरी रात्रीच्या वेळी महिला बाहेर आहेत इतकंच पाहून त्यांना त्रास देत असतात.

“आम्हाला जे त्रास देतात त्यांना आम्ही थांबवतो आणि त्यांच्याशी आत्मविश्वासाने बोलतो. त्यांना सांगतो की जसे तुम्ही आता बाहेर आहात तसेच आम्ही आहोत. त्यात काय, आणि बोलल्यानंतर लक्षात येतं की या पुरुषांनी कधी रात्रीच्या वेळी बाहेर फिरणाऱ्या महिला पाहिल्याच नाहीयेत, त्यामुळे त्यांना माहितीच नाही की अशा महिलांशी कसं वागावं, म्हणून ते शिट्या मारतात, आवाज काढतात, आमच्या भोवती गोळा होतात.”

पण प्रत्येकीकडे त्रास देणाऱ्या पुरुषाशी संवाद साधण्याचा वेळ, तेवढी हिंमत असेलच असं नाही, आणि संवाद साधूनही तो त्रास देणार नाही असंही नाही.

नेहा म्हणतात की दरवेळी अशा लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या तरच बायका रस्त्यावर येतात, असंही चालणार नाही.

जर सार्वजनिक ठिकाणी, रात्रीच्या वेळी फिरण्याचा आणि सुरक्षित राहाण्याचा हक्क हवा असेल तर बायकांचं या ठिकाणी, यावेळी सतत दिसणं नॉर्मलाईज करावं लागेल. तेव्हाच सरकार, समाज आणि यंत्रणा या बदलांची दखल घेईल.

नाहीतर रात्री निरभ्र आकाशात चांदणं बघण्याची, वारं अनुभवण्याची किंवा अगदी मध्यरात्री रिकाम्या झालेल्या रस्त्यावर फुटबॉल खेळण्याची बायकांची स्वप्नं स्वप्नच राहतील.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.