You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोलकाताः डॉक्टरांच्या आंदोलनात 'गुंडां'नी फोडलं रुग्णालय, तर पोलिसांनी फोडलं माध्यमांवर खापर
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी
कोलकातामधील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करुन हत्या झाल्यानंतर डॉक्टरांनी निदर्शनं केली. मात्र या दरम्यान 14-15 ऑगस्टमधील रात्री येथे हिंसाचार झाला आहे.
डॉक्टर निषेध आंदोलन करत असताना अज्ञात व्यक्तींच्या जमावानं रुग्णालयाच्या परिसरात प्रवेश करुन आंदोलनाची जागा, वाहनं तसेच सार्वजनिक संपत्तीचं नुकसान केलं.
या घोळक्यानं बलात्कार आणि हत्येच्या जागीही तोडफोड केल्याचा दावा सोशल मीडियात केला जात आहे.
मात्र कोलकाता पोलिसांनी हा दावा फेटाळला आहे. गुन्ह्याची जागा सेमिनार हॉल आहे, तेथे कोणीही हात लावलेला नाही. खोट्या बातम्या पसरवू नका, अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी म्हटलं आहे.
कोलकाताचे पोलीस आयुक्त विनित कुमार याबद्दल बोलताना म्हणाले, जे झालं ते माध्यमांतील आवाहनांमुळे झालं आहे.
पश्चिम बंगालमधील सत्ताधारी असलेल्या तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) राष्ट्रीय सरचिटणीस आणि लोकसभा खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी या गुंडशाही आणि हिंसेने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत अशी प्रतिक्रिया दिली आहे. यामागे असलेल्या सर्व लोकांची 24 तासांच्या ओळख पटवून कारवाई सुरू करू असंही ते म्हणाले.
तर हिंसा करणारे लोक टीएमसीचे गुंड होते असा आरोप विधानसभेतील विरोधीपक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी केला आहे.
कोलकाता पोलीस काय म्हणाले?
हिंसेनंतर माध्यमांशी बोलताना कोलकाता पोलीस आयुक्त विनित कुमार म्हणाले, हे सर्व माध्यमातील चुकीच्या मोहिमांमुळे झालं आहे. हे अयोग्य मीडिया कॅम्पेन आहे.
कोलकाता पोलिसांनी काय केलं नाहीये? कोलकाता पोलिसांनी सर्व काही केलं आहे. आम्ही (पीडित) कुटुंबीयांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला मात्र अफवा पसरत गेल्या, मला प्रचंड राग आला आहे.
पोलीस आयुक्त म्हणाले, "आम्ही काहीही चूक केलेलं नाही, पण या चुकीच्या मीडिया कॅम्पेनमुळे कोलकाता पोलिसांनी लोकांचा विश्वास गमावला आहे. या प्रकरणात फक्त एकच आरोपी आहे, असं आम्ही कधीच म्हटलं नव्हतं. शास्त्रीय पुराव्यांची वाट पाहात आहोत, ते मिळण्यास वेळ लागतो असं आम्ही म्हटलं होतं."
विनित कुमार म्हणाले, "केवळ अफवांच्या आधारे आम्ही एका तरुण पीजी विद्यार्थ्याला अटक करू शकत नाही. माझी विवेकबुद्धी या गोष्टीची साक्षीदार होऊ शकत नाही."
माध्यमांकडून आणि इतरांकडूनही आपल्यावर भरपूर दबाव असल्याचं ते सांगतात.
ते म्हणाले, "आम्ही जे केलंय ते एकदम योग्य केलंय यात मला आजिबात शंका वाटत नाही, आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. ते निष्पक्ष तपास करतील, आम्ही सीबीआयला पूर्ण मदत करू."
रात्री उशिरा काय घडलं?
बीबीसीचे प्रतिनिधी सलमान रावी यांनी आंदोलनस्थळी झालेल्या हल्ल्याला प्रत्यक्ष पाहिलं. ते म्हणाले काही अज्ञात लोकांनी रुग्णालयावर हल्ला केला, त्यानंतर तणावाचं वातावरण तयार झालं.
यावेळेस माध्यमातील काही लोकांवरही हल्ला झाला. कॅमेरामनवर हल्ला झाला. तिथल्या गाड्यांवरही हल्ले केले. काही पत्रकार बऱ्याच अवधीसाठी आत अडकून पडले होते.
आंदोलनाच्या जागी भरपूर तोडफोड झाली. येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये अनेक वाहनं आणि रुग्णालय परिसर अत्यंत वाईट स्थितीत असल्याचं दिसतं.
या हिंसाचारानंतर आर. जी. कर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी एक व्हीडिओ संदेश प्रसिद्ध केला आहे.
डॉक्टर म्हणतात, "आर. जी. कर येथे घडलेल्या घटनेनंतर आम्ही काही दिवस आंदोलन करत आहोत. रात्री 11 वाजता ऑल फिमेल मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात महिला डॉक्टर्स शांततेत सहभागी होणार होत्या, तेव्हा बाहेर अचानक ही सगळी गर्दी एकवटली."
ते म्हणाले, "पोलीस ही गर्दी रोखू शकले नाहीत, सर्व जमाव आत घुसला. आम्ही आमचा जीव वाचवून पळालो, जे समोर येतील त्यांना ते मारत होते, डॉक्टरांनाच सर्वांत जास्त जखमा झाल्या आहेत. सर्व लोक वेगवेगळ्या ठिकाणी लपले होते. महिलांवरही या जमावाने हल्ला केला."
डॉक्टरांनी सांगितलं, "जमावाने आंदोलनस्थळी मंच, खुर्च्या, पंखे सर्व तोडून टाकले."
ते म्हणाले, "हा जमाव वेगवेगळ्या वॉर्डांत आणि महिलांच्या हॉस्टेलमध्येही घुसल्याचं कानावर आलं आहे. इमर्जन्सी वॉर्ड नष्ट केला आहे. तिथं काहीच राहिलेलं नाही. पोलीस प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. ते आम्हाला मदत करू शकत नव्हते. आम्हाला वाचवा, असं आम्ही लोकांना आवाहन करत आहोत. परंतु आमचं आंदोलन थांबणार नाही. ते सुरूच राहाणार," असं आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी म्हटलं आहे.
तृणमूल काँग्रेसचे खासदार काय म्हणाले?
यावर अभिषेक बॅनर्जी यांनी ट्वीट केलं आहे. ते म्हणाले, "एक लोकप्रतिनिधी या नात्याने मी आताच कोलकाता पोलीस आयुक्तांशी चर्चा केली आहे. तसेच या हिंसेसाठी जबाबदार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख पटवून त्यांच्यावर 24 तासांच्या आत कारवाई करा. ते कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असले तरी ही कारवाई सुरू करा असं सांगितलं आहे. आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांच्या मागण्या योग्य आणि न्यायसंगत आहेत. त्यांच्या मागण्या अगदी मुलभूत आहेत. त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी ते सरकारकडे मागणी करत आहेत. त्यांच्या संरक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे."
तर भाजपा नेते शुभेंदू अधिकारी लिहितात, "ममता बॅनर्जी यांनी आपल्या टीएमसीच्या गुंडांना आर. जी. कर रुग्णालयाजवळ चाललेल्या अराजकीय आंदोलनात पाठवलं. त्यांना वाटतं की सगळ्या जगात त्या एकमेव समजूतदार व्यक्ती आहेत आणि आपणच आंदोलकांच्या वेशात गुंडांना पाठवलं हे लोकांना कळणार नाही असं त्यांना वाटतं."
तोडफोड करणाऱ्यांना पोलिसांनी अगदी सुरक्षितरीत्या परिसरात येऊ दिलं आणि तेथील पुरावे नष्ट करुन ते सीबीआयच्या हाती लागू नयेत यासाठी प्रयत्न केले असा आरोपही त्यांनी केला.
अधिकारी सांगतात, "या जमावाने निवासी डॉक्टर्स आणि पीजी ट्रेनी आणि इंटर्न्स करत असलेल्या आंदोलनस्थळी जाऊन तिथला मंचही तोडला. त्यावरुन ते टीएमसीचे गुंड होते हे स्पष्ट होतं. शुभेंदू सांगतात, आंदोलकांच्या समर्थनासाठी लोक आले असते तर ते मंच कसा तोडतील?"
संपूर्ण राज्यात आंदोलन होत असताना आर. जी. करमध्येच हिंसा कशी झाली असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यांनी यामध्ये पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली असून या हिंसेची दखल सीबीआयनेही घ्यावी असं म्हटलं आहेय
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरुमद्वारे प्रकाशित)