You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रिया सरोज कोण आहेत, ज्यांच्याशी क्रिकेटर रिंकू सिंहचा साखरपुडा झालाय?
"आम्ही दोघं या क्षणाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होतो - जवळपास तीन वर्षांपासून - या क्षणाची वाट पाहण्यात गेलेला प्रत्येक सेकंद अद्भूत होता".
क्रिकेटर रिंकू सिंह आणि समाजवादी पार्टीच्या खासदार प्रिया सरोज यांनी त्यांच्या सोशल मीडियावर साखरपुड्याचे चार वेगवेगळे फोटो आणि त्याच्यासोबत वर उल्लेख केलेल्या काही ओळी पोस्ट केल्या आहेत.
दोघांचा लवकरच विवाह होणार आहे. परवा, 8 जूनला लखनौमधील एका हॉटेलात या दोघांचा साखरपुडा पार पडला. हा कार्यक्रम राजकारण आणि क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमाला समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव, त्यांच्या पत्नी आणि खासदार डिंपल यादव, समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन अशी नामांकित मंडळी उपस्थित होती.
अनेक माजी क्रिकेटर्स आणि बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला साखरपुड्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
एकमेकांना अंगठी घालत असताना क्रिकेटर रिंकू सिंहच्या भावी जोडीदार प्रिया सरोज खूपच भावनिक झाल्या होत्या. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर खूप शेअर केले जात आहेत. त्याचबरोबर प्रिया सरोज या कोण आहेत, तेही जाणून घेण्याची उत्सुकता दिसत आहे.
प्रिया सरोज कोण आहेत?
2024 च्या लोकसभा निवडणुकीत देशाच्या वेगवेगळ्या भागातून अनेक तरुण महिला खासदार निवडून आल्या. प्रिया सरोज या देखील संसदेत पोहोचणाऱ्या सर्वात तरुण महिला खासदारांपैकी एक आहेत. त्यावेळेस त्यांचं वय 25 वर्षे होतं.
प्रिया यांना कुटुंबातूनच राजकीय वारसा मिळाला आहे. त्यांचे वडील तुफानी सरोज समाजवादी पार्टीकडून तीन वेळा खासदार राहिलेले आहेत.
सध्या ते उत्तर प्रदेशातील केराकत मतदारसंघातून समाजवादी पार्टीचे आमदार आहेत. हा विधानसभा मतदारसंघ मछलीशहर लोकसभा मतदारसंघामध्ये येतो.
प्रिया सरोज मछलीशहर लोकसभा मतदारसंघातूनच 2024 मध्ये निवडून आल्या होत्या. त्यांना एकूण 4,51,292 मतं मिळाली होती.
मछलीशहर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.
संसद डॉट इनवर असलेल्या माहितीनुसार, प्रिया सरोज यांचा जन्म 23 नोव्हेंबर 1998 ला उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये झाला होता. त्यांनी नोएडाच्या अमिटी विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं आहे. याआधी त्यांनी दिल्ली विद्यापीठातून समाजशास्त्राची पदवी घेतली होती.
2024 मध्ये राजकारणात प्रवेश करण्याआधी प्रिया सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून काम करत होत्या. न्यायाधीश होण्याचं त्यांचं स्वप्न होतं.
मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जेव्हा समाजवादी पार्टीनं त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी राजकारणात पूर्णवेळ सक्रिय राहण्याचा निर्णय घेतला होता.
त्यावेळेस एका मासिकाशी बोलताना त्या म्हणाल्या होत्या, "आता मी कार्यकर्त्यांच्या केसेस घेण्यास सुरुवात करेन."
कसा झाला राजकारणात प्रवेश?
तसं पाहता, समाजवादी पार्टीला आधी प्रिया यांचे वडील तुफानी सरोज यांनाच मछलीशहर मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी द्यायची होती. पण ते आधीच आमदार होते. अशावेळी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना त्यांच्याजागी प्रिया सरोज या प्रबळ उमेदवार वाटल्या.
मग प्रिया सरोज निवडणूक लढवण्यास तयार झाल्या.
निवडणूक जिंकल्यानंतर एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रिया म्हणाल्या होत्या, "दहा वर्षांपूर्वी मी जेव्हा कधी वडिलांबरोबर लोकसभेत यायचे, तेव्हा लोक म्हणायचे की खासदाराची मुलगी आहे. आज दहा वर्षांनी मी संसदेत आले, तेव्हा लोक माझ्या वडिलांना पाहून म्हणाले की ते खासदाराचे वडील आहेत."
याच मुलाखतीत लग्नाबद्दलच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या होत्या की, याबद्दलचा निर्णय त्यांचे वडील घेतील.
रिंकू सिंह आणि प्रिया सरोजचं नातं
याच वर्षी जानेवारी महिन्यात रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांच्या लग्नाची जोरदार चर्चा होऊ लागली होती. नंतर या गोष्टीला दुजोरा देखील मिळाला होता की लवकरच या दोघांचं लग्न होणार आहे.
8 जूनला साखरपुड्याच्या आधी पीटीआय या वृत्तसंस्थेशी प्रिया सरोज यांचे वडील तुफानी सरोज, क्रिकेटर रिंकू सिंह आणि त्यांच्या मुलीमध्ये असलेल्या नात्याबद्दल बोलले होते.
ते म्हणाले होते, "रिंकू आणि प्रिया एक वर्षाहून अधिक काळापासून एकमेकांना ओळखतात. ते एकमेकांना आवडत होते. मात्र त्यांना कुटुंबाची परवानगी हवी होती. दोघांच्याही कुटुंबाची या विवाहाला परवानगी आहे. यावर्षी 18 नोव्हेंबरला हा विवाह होणार आहे."
प्रिया यांनी लहानपणापासूनच सत्ता आणि राजकारण जवळून पाहिलं आहे. तर रिंकूचा प्रवास संघर्षमय राहिला आहे. क्रिकेटमधील सुपरस्टार होण्याआधी रिंकूचं कुटुंब कठीण परिस्थितीतून जात होतं.
टीव्हीवरील एका कार्यक्रमात रिंकू सिंहनं सांगितलं होतं की, एक वेळ अशी होती की त्याला कोचिंग सेंटरमध्ये साफसफाई करण्याची नोकरी करावी लागली होती. मात्र नंतर रिंकून क्रिकेट लक्ष केंद्रीत केलं आणि खूप मेहनत घेतली.
रिंकू सिंहचा प्रवास
रिंकूचे वडील स्वत: गॅस सिलिंडरची डिलिव्हरी करायचे. आयपीएलच्या 2023 च्या मोसमात रिंकूनं जेव्हा एकाच षटकात पाच षटकार ठोकले, त्यानंतर रिंकूचं नशीबच पालटलं. एका रात्रीत तो लोकप्रिय झाला.
त्यावेळेस रिंकू कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत होता. तेव्हा आयपीएलच्या या टीमनं रिंकूच्या प्रवासाशी संबंधित एक व्हीडिओ शेअर केला होता.
या व्हीडिओत रिंकू म्हणतो, "माझ्या वडिलांची इच्छा होती की मी रिकाम्या वेळेत क्रिकेट खेळावं. त्यांच्यामुळेच माझं क्रिकेटबद्दलचं वेड कधीही कमी झालं नाही. माझ्याकडे चेंडू विकत घेण्यासाठी देखील पैसे नव्हते. मात्र माझ्या या प्रवासात अनेकांनी मला मदत केली."
रिंकू सिंह उत्तर प्रदेशातील अलीगढचा आहे. फार थोड्या जणांना हे माहित आहे की, मे 2019 मध्ये बीसीसीआयनं रिंकूवर तीन महिन्यांची बंदी घातली होती. कारण क्रिकेट नियामक मंडळाची परवानगी न घेता रिंकू आबूधाबीमध्ये एक टी-20 स्पर्धा खेळण्यास गेला होता.
त्यावेळेस रिंकू खूपच निराश आणि दु:खी झाला होता. मात्र यातून रिंकू सावरला आणि स्वत:च्या खेळात सुधारणा करत राहिला. 2023 च्या ऑगस्टमध्ये रिंकूचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झालं होतं.
प्रिया सरोज यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, त्यांना जरी आयुष्यात संघर्ष करावा लागला नसला तरी त्यांच्या वडिलांनी अनेक आव्हानांना तोंड देत राजकारणात स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे.
त्या म्हणतात, "अनुसूचित जातीतील असल्यामुळे सर्व प्रकारचा भेदभाव सहन करूनही त्यांनी स्वत:चं स्थान निर्माण केलं. माझे आजोबा शेतकरी होते. कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नव्हती."
"1999 मध्ये माझे वडील पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत उभे होते. त्यावेळेस लोकांनी वर्गणी गोळा करून त्यांच्या निवडणूक प्रचाराचा खर्च केला होता. त्यांनी मोटरसायकलवरूनच निवडणुकीचा सर्व प्रचार केला होता."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.