ऑपरेशन सिंदूर ते 'जीएसटी'मधील सुधारणा; लाल किल्ल्यावरील भाषणात पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

आज स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केलं.

लाल किल्ल्यावर पोहोचण्यापूर्वी पंतप्रधान मोदी राजघाटावर गेले होते. तिथे त्यांनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.

पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवर 12 व्यांदा तिरंगा फडकावला आहे.

आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

'ऑपरेशन सिंदूर आक्रोशाची अभिव्यक्ती'

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय.

पहलगाम हल्ला आणि त्यानंतर राबवण्यात आलेले 'ऑपरेशन सिंदूर' यावर ते बोलतील, याची शक्यता वर्तवली जात होती.

त्यानुसार, त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य केलंय.

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात आलेल्या या ऑपरेशनबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय की, "आमच्या वीर सैनिकांनी शत्रूंना कल्पनेपलीकडची शिक्षा दिली आहे. पहलगाममध्ये ज्याप्रकारे हल्ला झाला आणि धर्म विचारुन मारण्यात आलं. ते पाहता, संपूर्ण भारत आक्रोश करत होता.

संपूर्ण जग या संहाराने धक्क्यात होतं. ऑपरेशन सिंदूर त्याच आक्रोशाची अभिव्यक्ती आहे. बावीस तारखेनंतर आम्ही आमच्या सैन्याला खुली सूट दिली.

आपल्या सैन्याने ते करुन दाखवलं, जे अनेक दशके कधी झालं नव्हतं. शेकडो किलोमीटर शत्रूंच्या परिसरात जाऊन दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.

पाकिस्तानची झोप आता पूर्ण झाली आहे. पाकिस्तानमध्ये झालेला नुकसान इतकी आहे, की दररोज नवनवी माहिती समोर येत आहे."

'अण्वस्त्रांची धमकी सहन करणार नाही'

गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तानकडून अनेक प्रकारची वक्तव्यं येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानला उद्देशून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, "आता दहशतवादाला पोसणाऱ्यांना आम्ही वेगळं ठरवणार नाही. हे मानवतेचे समान शत्रू आहेत.

आता भारताने ठरवलंय की, अण्वस्त्रांची धमकी आम्ही सहन करणार नाही. इथून पुढेही, जर शत्रूंनी असा प्रयत्न सुरुच ठेवला, तर आमचं सैन्यचं सारं काही निश्चित करेल त्यानुसार, आम्ही सडेतोड उत्तर देऊ."

'रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही...'

सिंधू जलकराराबाबतही पंतप्रधान मोदींनी भाष्य केलंय.

ते म्हणाले की, "भारताने ठरवलंय की, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही. देशातील लोकांना हे कळलंय की, सिंधू जलकराराचं स्वरुप हे भारताचं शोषण करणारं आहे.

भारतातून निघणारं पाणी शत्रूंची शेती पिकवत आहे आणि आमच्या देशातील शेतकऱ्यांची शेती पाण्याविना तडफडत आहे. हा असा करार होता, ज्याने देशातील शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे.

भारताच्या हक्काचं जे पाणी आहे, त्यावर अधिकार फक्त भारताच्या शेतकऱ्यांचाच आहे. भारत अजिबात सिंधू कराराचे तोटे सहन करणार नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी हा करार आम्हाला मंजूर नाही."

स्वातंत्र्यदिन 2025

'स्वत:चं स्पेस स्टेशन'

पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत अवकाश क्षेत्रात कमालीची कामगिरी करत आहे आणि संपूर्ण देश हे सर्व पाहत आहे. ते म्हणाले की, भारत स्वतःचं अंतराळ स्थानक बांधण्याच्या दिशेने काम करत आहे.

ते म्हणाले की, "आपले ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला अंतराळ स्थानकामधून परतले आहेत आणि येत्या काही दिवसांत भारतात येत आहेत."

"आपण अंतराळात आपल्या बळावर आत्मनिर्भर भारत गगनयानची तयारी करत आहोत. आपण आपलं स्वतःचं अंतराळ स्थानक बांधण्याच्या दिशेनं काम करत आहोत."

पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "देशाला विकसित करण्यासाठी, आपण आता समुद्र मंथनाकडेही वाटचाल करत आहोत. आपल्या महासागरांमध्ये तेल आणि वायूचे साठे शोधण्यासाठी आपल्याला मिशन मोडमध्ये काम करायचे आहे."

'लढाऊ विमानांचे जेट इंजिन भारतातच बनवले पाहिजेत'

पंतप्रधान मोदींनी 'आत्मनिर्भर भारत'वर भर दिला आणि म्हटलं की लढाऊ विमानांचे इंजिन भारतातच तयार केले जावेत.

पुढे ते म्हणाले की, "लाल किल्ल्यावरुन, मी तरुण शास्त्रज्ञ, प्रतिभावान तरुण, अभियंते, व्यावसायिक आणि सरकारच्या सर्व विभागांना आवाहन करतो की, आपलं स्वतःचं 'मेड इन इंडिया' लढाऊ विमानांसाठी जेट इंजिन असलं पाहिजेत."

पुढे त्यांनी म्हटलं की, "विकसित भारताचा आधार 'आत्मनिर्भर भारत' आहे. जर एखादा दुसऱ्यावर अधिक निर्भर झाला, तर स्वातंत्र्याचा प्रश्नच धूसर होऊ लागतो."

"आत्मनिर्भरता केवळ आयात, निर्यात, रुपये, पाऊंड अथवा डॉलरपर्यंत मर्यादीत नाहीये. याचा अर्थ याहून अधिक व्यापक आहे. आत्मनिर्भरता थेट आपल्या ताकदीशी निगडीत आहे."

दिवाळीला जीएसटीची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवाळीला जीएसटीची भेट देणार असल्याचं म्हटलंय.

ते म्हणाले की, "जीएसटीमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात येतील. नेक्स्ट जनरेसन जीएसटी रिफॉर्म्स आणले जातील. त्यातून लोकांना, उद्योगांना मोठ्या प्रमाणावर कर सवलती मिळणार आहेत.

स्वातंत्र्यदिन 2025

यासोबतच, पंतप्रधान मोदी यांनी विकसित भारत रोजगार योजना लागू करण्याची घोषणा केली आहे

या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रामध्ये पहिली नोकरी मिळवणाऱ्यांना सरकारकडून 15 हजार रुपये दिले जातील. त्या कंपन्यांना देखील सरकार प्रोत्साहन देईल. या योजनेमुळे साडेतीन कोटी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असं पंतप्रधानांनी म्हटलं.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचाही उल्लेख केला.

त्यांनी म्हटलं की, "आज मी अभिमानाने या गोष्टीचा उल्लेख करु इच्छितो की, आजपासून 100 वर्षांआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म झाला होता. राष्ट्राच्या सेवेची 100 वर्षे हा एक अत्यंत गौरवास्पद आणि सोनेरी अध्याय आहे."

पंतप्रधान मोदींनी पुढे म्हटलं की, "व्यक्ती निर्माण ते राष्ट्रा निर्माण या संकल्पासोबतच, भारतमातेच्या कल्याणाचं ध्येय घेऊन स्वयंसेवकांनी मातृभूमीच्य उत्थानासाठी आपलं आयुष्य समर्पित केलं आहे. सेवा, समर्पण, संघटन आणि अप्रतिम शिस्त ही या संघटनेची ओळख आहे."

पुढे त्यांनी म्हटलं की, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज जगातील एक प्रकारे सर्वांत मोठी स्वयंसेवी संस्था आहे. हा शंभर वर्षांचा इतिहास समर्पणाचा इतिहास आहे."

"आज लाल किल्ल्यावरुन, या 100 वर्षांच्या राष्ट्र सेवेच्या प्रवासामध्ये योगदान देणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचं मी आदरपूर्वक स्मरण करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या भव्य आणि समर्पित प्रवासाचा देशाला अभिमान आहे. हा प्रवास आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहिल."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)