मोहन भागवतांच्या मंदिर-मशिदीच्या विधानावरून आता कोणत्या नव्या वादाचा जन्म?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अभिनव गोयल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"अयोध्येतल्या राम मंदिराशी हिंदुची श्रद्धा जोडलेली आहे. मात्र, या मंदिराच्या निर्मितीनंतर मशिदीखाली मंदीर असल्याचे असेच वाद इतरत्र सुरू करून हिंदूंचा नेता बनण्याची स्वप्न काही लोक पाहत आहेत. हे स्वीकारार्ह नाही," असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत म्हणाले.
देशात मंदिर-मशीद वादाचे अनेक नवे अध्याय सुरू होत असताना त्यांचं हे वाक्य महत्त्वाचं आहे.
संभल, मथुरा, अजमेर आणि काशी यासारख्या अनेक धार्मिक स्थळांवर असलेल्या मशिदींच्या जागी प्राचीन काळात मंदीर असल्याचे दावे केले जात आहेत. अशातच प्रार्थना स्थळांविषयीच्या कायद्यावरूनही वाद सुरू झाला आहे.
हे वातावरण चिंताजनक असल्याचं 19 डिसेंबरला 'हिंदू सेवा महोत्सवा'च्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना मोहन भागवत यांनी म्हटलं. मंदिर मशिदीचं प्रकरण आता बंद करा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
"तिरस्कार आणि शत्रुत्वासाठी रोज नवनवीन प्रकरणं उकरून काढणं चांगलं नाही आणि असं चालणार नाही," असं ते म्हणाले.
मोहन भागवत यांच्या वक्तव्यानंतर राजकीय तणाव वाढल्याचं जाणवतंय. अनेक साधु संतांनीही त्यांच्या विरोधात मोर्चे काढलेत.
मोहन भागवतांच्या या भाषणाचा नेमका अर्थ काय होतो? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीला नवी दिशा द्यायचं काम ते करत आहेत का?


साधु-संतांनी उपस्थित केले प्रश्न
मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर स्वामी रामभद्राचार्य यांनी प्रश्न उपस्थित केलेत.
"हे त्यांचे खासगी विचार असू शकतात. ही आमची सार्वत्रिक भूमिका नाही. ते एखाद्या संघटनेचे प्रमुख असू शकतात, पण त्यांचं म्हणणं ऐकायला ते हिंदू धर्माचे मुख्य नाहीत. ते आमचे राज्यकर्ते नाहीत. उलट, आम्ही त्यांच्यावर राज्य करतो," एएनआयशी बोलताना ते म्हणाले.
"हिंदू धर्माच्या व्यवस्थेची ठेकेदारी आम्ही त्यांच्याकडे दिलेली नाही. हिंदू धर्माची व्यवस्था धर्मगुरूच्या हाती आहे; भागवतांच्या नाही. ते फक्त एका संघटनेचे प्रमुख आहेत. आमचे नाहीत. सगळ्या भारताचं प्रतिनिधित्व ते करत नाहीत," असं रामभद्राचार्य पुढे म्हणाले.

फोटो स्रोत, ANI
ज्योतिर्मठचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनीही मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे.
"प्रत्येक ठिकाणी मशीद शोधू नका असं म्हणणाऱ्या लोकांनीच तर हा मुद्दा पुढे रेटलाय आणि त्यावरून सत्ताही बळकावली आहे. आता सत्तेत आल्यानंतर त्यांना याचाच त्रास होऊ लागलाय," एबीपी माध्यमसंस्थेशी बोलताना ते म्हणाले.
"आता ब्रेक लावा असं ते म्हणत आहेत. तुम्हाला गरज होती तेव्हा गाडीचा एक्सीलेटर दाबून ठेवला होता आणि आता तुमच्या गरजेनुसार ब्रेक दाबायला सांगतायत. हे तर सोयीनुसार वागणं झालं. मात्र, न्यायाची प्रक्रिया कोणाची सोय पाहत नाही, तर सत्य काय आहे ते पाहते," अविमुक्तेश्वरानंद पुढे म्हणाले.

जिथं जिथं असे दावे केले जातील तिथं तपास केला जावा असं त्यांचं म्हणणं आहे. यासाठी एक वेगळं प्राधिकरण बनवावं असंही त्यांनी सुचवलं आहे. अशा दाव्यांवर या प्राधिकरणामार्फत झटपट विचार केला जाईल आणि पुरावे पाहून सत्य शोधलं जाईल असं त्यांना वाटतं.
या सगळ्यावर रामदेव बाबांनीही मत मांडलंय. पीटीआयशी बोलताना ते म्हणाले, "बाहेरच्यांनी आक्रमण करून आपली मंदिरं, धार्मिक स्थळं, सनातन्यांची गौरव चिन्हं नष्ट केली आणि देशाचं नुकसान केलं."
तीर्थक्षेत्रांना आणि देवदेवींच्या मूर्तींना नासवण्याचं काम करणाऱ्यांना शिक्षा देणं हे न्यायालयाचं काम आहे. हे काम करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असंही रामदेव बाबा पुढे म्हणाले.
'दिल्लीचा आशिर्वाद'
संघ प्रमुखांनी मुस्लिमांना सोबत घेऊन जाण्याचं आणि मशिदीत मंदीर न शोधण्याचं आवाहन करण्याची ही पहिली वेळ नाही.
नागपुरात 2022 साली बोलतानाही मोहन भागवत म्हणाले होते, "इतिहास आपण बदलू शकत नाही. त्यात आजच्या हिंदूंचा किंवा आजच्या मुस्लिमांचाही वाटा नाही. हे सगळं त्या काळी घडलेलं आहे. प्रत्येक मशिदीत शिवलिंग कशाला पहायचं? आता आपल्याला कोणतंही आंदोलन करायचं नाही."
काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण करतानाही मोहन भागवतांनी केलेलं एक विधान खूप गाजलं होतं. तेव्हा ते भारतीय जनता पक्षाला उद्देशून बोलत आहेत असं म्हटलं गेलं.

फोटो स्रोत, ANI
"जो मर्यादेचं पालन करत काम करतो, अभिमान ठेवतो, पण अहंकारी नसतो तोच खऱ्या अर्थानं सेवक म्हणवला जातो," ते म्हणाले होते.
पण यावेळी केलेल्या वक्तव्याकडे राजकीय विश्लेषक वेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात. ज्येष्ठ पत्रकार आणि अनेक वर्षांपासून संघाचं जवळून निरीक्षण करणारे शरद गुप्ता हे भागवतांनी यावेळी केलेलं एक वाक्य लक्षात आणून देतात. राम मंदिरावरून राजकारण करून लोक हिंदूंचा नेता व्हायचा प्रयत्न करत आहेत, हे ते वाक्य.
"नरेंद्र मोंदींकडे कुणी वाकड्या नजरेनं पाहतंय ही गोष्ट सहन न करू शकणाऱ्या भाजप नेत्यांच्या सांगण्यांवरून ही टीका केली गेली असावी," असं ते म्हणाले.
असंच म्हणणं ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनीही मांडलं. "मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर ज्यापद्धतीने धर्मगुरू, बुवाबाबा वगैरे लोक आक्षेप घेत आहेत, सोशल मीडियावर अंधभक्त भागवतांना संघ सोडायला सांगत आहेत ते पाहता हे सगळं दिल्लीचा आशिर्वाद असल्याशिवाय शक्य होणार नाही असं वाटतं," वानखेडे म्हणाले.

"हे नरेंद्र मोदी म्हणाले असते तर सगळ्यांनी अशाच पद्धतीने टीका केली असती का? मोहन भागवत यांच्याविरोधात मोकळेपणानं बोललं जातंय. दिल्लीतले सत्ताधिकारी आणि मोहन भागवत यांच्याविरोधातली ही लढाई आहे," ते म्हणाले.
दुसरीकडे ज्येष्ठ पत्रकार आणि संघावर पुस्तक लिहिणारे विजय त्रिवेदी यांना मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा अर्थ साधाच असल्याचं वाटतं. सध्या देशात सुरू असणाऱ्या गोष्टी त्यांना आवडणाऱ्या नाहीत असं ते सांगतात.
"नरेंद्र मोदींसोबत त्यांचं काही भांडण सुरू असेल असं दिसून येत नाही. त्यांच्या वक्तव्यावर शंका घेणं म्हणजे अप्रामाणिकपणा करण्यासारखं आहे. हिंदू मुस्लिमांच्या ऐक्याचं ते आजच नाही, तर गेल्या अनेक वर्षांपासून समर्थन करत आहेत," ते म्हणाले.
त्यांची प्रतिमा चांगली करण्यासाठी ते अशा पद्धतीची वक्तव्य करतायत असंही नाही. सामाजिक ऐक्य बिघडवण्याचे प्रयत्न करणाऱ्यांना त्यांचं हे बोलणं लागू होतं, असंही त्रिवेदी पुढे म्हणाले.
संघाचा प्रभाव
2024 च्या लोकसभा निवडणुकीवेळी भारतीय जनता पक्ष आणि संघामध्ये असणारे मतभेद समोर आले होते.
सुरुवातीच्या प्रचारानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी 'इंडियन एक्स्प्रेस' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत 'भाजपला आता संघाची गरज नसल्याचं' म्हटलं होतं.
अशोख वानखेडे म्हणतात की जे. पी. नड्डा यांच्या या वक्तव्यानंतर मोहन भागवत आक्रमक झाले होते.
"पक्ष संघटनेवर नेहमी संघाचं वर्चस्व राहिलं आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार असतानाही असंच होतं. पण आता इंदिरा गांधींच्या काँग्रेसची होती तशी स्थिती उद्भवली आहे. सत्ता आणि संघटन एकाच व्यक्तीच्या हाती गेल्यानं संघाला त्रास होतोय. त्यांच्या हातातल्या गोष्टी निसटून जातील अशी भिती त्यांच्या मनात आहे," वानखेडे म्हणाले.

फोटो स्रोत, ANI
सरसंघचालकाचं भाषण फार महत्त्वपूर्ण मानलं जातं. खूप विचार करून, राजकीय रणनितीप्रमाणे त्यांच्याकडून वक्तव्यं केली जातात असंही त्यांनी पुढे सांगितलं.
दुसरीकडे ज्येष्ठ पत्रकार शरद गुप्ता यांचं म्हणणं आहे की, मोहन भागवतांना सोडून नरेंद्र मोदींच्या पाठी उभे राहणारेही काही लोक संघात आहेत.

संघावरची मोहन भागवत यांची पकड कमजोर होत चाललीय असं त्यांचं म्हणणं आहे. संघाची विचारधारा पुढे चालवण्यासाठी भागवत किती सक्षम आहेत असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
"पंचजन्य हे संघाचं मुखपत्र. हिंदू धर्माची प्रतीकं जिथं लपली आहेत, जिथं हिंदू मंदिरं तोडली गेलीयत ते सगळं परत घेण्याची गरज आहे या विचारांची वकिली यावेळेच्या अंकात संपादकीय लेखात केली आहे. संघाचंच मुखपत्र, सरसंघचालकाच्याच विरोधात लिहित असेल तर त्याला काय म्हणणार?" गुप्ता विचारतात.
संघ प्रमुखांच्या बोलण्याचा परिणाम काय होणार?
सरसंघचालकाच्या अशा बोलण्याचा जमिनी स्तरावर काय परिणाम होत असतो? संघाशी जोडलेल्या संघटना, संस्था मोहन भागवतांचं म्हणणं खरंच ऐकतात का?
ज्येष्ठ पत्रकार विजय त्रिवेदी म्हणतात की, संघ प्रमुखाचं वक्तव्य म्हणजे आदेश नाही जो सगळ्यांनी ऐकावा.
"देशात संघ स्वयंसेवकांची संख्या जवळपास एक कोटी आहे. हिंदूंची लोकसंख्या 80 कोटी आहे. हिंदू संघाशी जोडले आहेत असं मानलं तरी प्रत्यक्षात ते खरं नाही. त्यामुळे भागवतांच्या वक्तव्याचा थेट परिणाम जमिनी स्तरावर दिसेलच असं काही नाही," त्रिवेदी सांगतात.

संघ आणि भाजपनं मिळून एक मोठं सैन्य उभं केलंय. ते सैन्य आता उर्जेनं भरलंय. ती उर्जा कमी करणं सोपं नाही, असं शरद गुप्ता म्हणतात.
"हिंदुत्वाच्या वाघावर आरूढ होणं आणि तो चालवणं सोपं आहे, पण त्यावरून उतरणं फार अवघड. भाजप आणि संघानं मिळून संपूर्ण देशाला हिंदुत्वाच्या दरीत ढकलून दिलंय. आता तिथून वर येता येत नाही. जे तसा प्रयत्न करतात त्यांना टीकांना आणि ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. त्यातून मोहन भागवतही सुटले नाहीत," असं ते म्हणतात.

काँग्रेसने केली टीका
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील (पूर्वीचं ट्वीटर) पोस्टमध्ये म्हटलं, "मोहन भागवत यांचं विधान संघाची कार्यप्रणाली किती धोकादायक आहे ते दाखवतं. ते बोलतात ते आणि करतात ते यात जमीन-आसमानचा फरक आहे."
"आरएसएसची काम करण्याची पद्धत स्वातंत्र्यकाळापेक्षा आज जास्त धोकादायक आहे. ते बोलतात त्याच्या एकदम उलट वागतात," ते पुढे म्हणतात.
मंदीर मशिदीचा वाद काढून राजकारण करणं चुकीचं आहे असं मोहन भागवतांना वाटत असेल, तर अशा नेत्यांना त्यांचा संघ पाठिंबा का देतो याबद्दल ते काहीच का बोलत नाहीत? आरएसएस भाजपमध्ये मोहन भागवतांचं म्हणणं ऐकलं जात नाही का? असे प्रश्नही जयराम रमेश विचारतात.
"त्यांच्या वक्तव्याबद्दल ते खरंच गंभीर असतील, तर सामाजिक बंधुतेला धक्का पोहोचवणाऱ्या कोणत्याही नेत्याला भविष्यात संघ पाठिंबा देणार नाही, असं त्यांनी सार्वजनिकरित्या जाहीर करावं," असंही त्यांनी पुढे म्हटलं.

फोटो स्रोत, ANI
"पण ते असं करणार नाहीत. कारण मंदीर मशीद वाद संघाच्या सांगण्यावरूनच उकरले जात आहेत. अशा फूट पाडणाऱ्या मुद्द्यांवरून जनतेला भडकवून दंगल घडवून आणणाऱ्यांचा अनेकदा संघाशी संबंध असल्याचं समोर येतं."
ते बजरंग दलाची, विश्व हिंदू परिषदेशी किंवा भाजपशी संबंधित असतात आणि संघ वकिलापासून ते खटला लढवण्यापर्यंत त्यांची सगळी बडदास्त ठेवतो, असंही जयराम रमेश म्हणाले.
"समाजाची दिशाभूल करण्यासाठी भागवत अशी वक्तव्य करत आहेत हे तर स्पष्टच आहे. अशा गोष्टींनी आरएसएसची पापं धुतली जातील, त्यांची प्रतिमा सुधारेल असं त्यांना वाटतं. पण त्यांचं सत्य देशासमोर आहे," असं जयराम रमेश यांनी म्हटलं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











