गाझामध्ये उपासमारीचं थैमान, आतापर्यंत 113 जणांचा कुपोषणामुळे मृत्यू

गाझा

फोटो स्रोत, Getty Images

गाझामधील हमासच्या आरोग्य मंत्रालयानं कुपोषणानं मृत्यू पावलेल्यांच्या संख्येची माहिती दिली आहे.

हमासकडून संचालित आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे की गेल्या 24 तासांमध्ये दुष्काळ आणि कुपोषणामुळे आणखी दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

यामुळे तिथे आतापर्यंत भूकेनं मृत्यू पावलेल्यांची संख्या 113 झाली आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस, या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणाले होते की, "गाझामधील 21 लाख लोक मूलभूत गरजांच्या तुटवड्याच्या गंभीर संकटाला तोंड देत आहेत. तिथे कुपोषण वाढत चाललं आहे. गाझामधील प्रत्येक घरावर उपासमारीचं संकट घोंघावतं आहे."

बीबीसी रेडिओ 5 लाईव्हशी बोलताना, इंडिपेंडंटचे मुख्य आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी बेल ट्रू म्हणाले, "गाझातील लाखो लोकांकडे पोट भरण्यासाठी पुरेसं अन्न नाही ही गोष्ट अतिशय स्पष्ट आहे."

ट्रू म्हणाले, "जगभरातील मानवाधिकार संघटना आणि मदत करणाऱ्या संस्थांना तिथे असणाऱ्या त्यांच्याच लोकांना अन्न उपलब्ध करून देण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे."

गाझामध्ये कुपोषणामुळे 81 मुलांचा मृत्यू - हमास

गाझामधील हमास संचालित आरोग्य मंत्रालयानं नुकतंच, गाझा पट्टीत दुष्काळ आणि कुपोषणामुळे झालेल्या आकडेवारीची विभागणी जारी केली आहे.

याआधीच्या माहितीत मंत्रालयानं सांगितलं होतं की गेल्या 24 तासात आणखी दोन जणांचा कुपोषणानं मृत्यू झाला आहे.

बीबीसी स्वतंत्रपणे या आकडेवारीची पडताळणी करू शकलं नाही. मात्र या मंत्रालयानं दिलेली आकडेवारी संयुक्त राष्ट्रसंघासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मोठ्या प्रमाणात अचूक मानली जाते.

  • ऑक्टोबर 2023 पासून कुपोषणामुळे मृत्यू झालेल्या 113 जणांपैकी 81 मुलं होती आणि 32 प्रौढ होते.
  • पाच वर्षांखालील 2,60,000 मुलांना पोषणाची गरज आहे.
  • 2025 मध्ये आतापर्यंत कुपोषणामुळे 1,556 बाळांचा अकाली जन्म झाला आहे.
  • 2025 मध्ये आतापर्यंत 28,600 हून अधिक कुपोषित मुलांची नोंद झाली आहे
  • 1,00,000 गरोदर महिला आणि स्तनपान देणाऱ्या माता अन्नाच्या तुटवड्यामुळे प्रभावित झाल्या आहेत

'जिथे पाहाल तिथे उपासमार दिसते'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

तहानी शेहादा या मानवीय मदत करणाऱ्या संस्थेच्या कर्मचाऱ्या बीबीसीला सांगितलं की, "गाझामधील लोक दररोज जिवंत राहण्याचा संघर्ष करत नाहीयेत, तर ते दर तासाला जिवंत राहण्यासाठी संघर्ष करत आहेत."

त्या म्हणाल्या की, "स्वयंपाक करणं आणि आंघोळ करणं यासारख्या साध्या गोष्टीदेखील खूपच विलासी झाल्या आहेत."

अन्नाशिवाय कामावर जाणं हे तहानी यांच्यासाठी रोजचंच झालं आहे. त्या पुढे म्हणतात, "मी काम करत राहते कारण ते करायलाच हवं."

"मला एक बाळ आहे. तो आठ महिन्यांचा आहे. ताज्या फळांची चव कशी असते, हे त्याला माहितच नाही."

तहानी म्हणतात की, गाझामधील युद्ध सुरू झाल्यापासून, अनेरा या मानवीय मदत करणाऱ्या संस्थेनं गाझामध्ये 1,700 ट्रक आणले आहेत. मात्र त्यातील फक्त 10 ट्रकच आत सोडण्यात आले आहेत - इथं आवश्यक असणाऱ्या मदतीच्या तुलनेत ते काहीच नाही.

इस्रायलचं म्हणणं आहे की महत्त्वाच्या वस्तू, सामान गाझात पोहोचण्याची वाट पाहिली जाते आहे. मात्र मदत करणाऱ्या संस्थांचं म्हणणं आहे की त्यांना मदतीचं वाटप करण्यापासून रोखलं जातं आहे.

गाझा ह्युमॅनिटेरियन फाऊंडेशन (जीएचएफ), गाझातील लोकांना अन्नाची मदत करतं आहे. तर संयुक्त राष्ट्रसंघाचं म्हणणं आहे की 1,000 हून अधिक जण, मदत गोळा करत असताना, इस्रायलच्या सैन्याकडून मारले गेले आहेत.

गाझा

फोटो स्रोत, Getty Images

यूएनआरडब्ल्यूएचे प्रमुख म्हणतात की, त्यांच्याकडे असणारी 6,000 ट्रक इतकी मदत गाझामध्ये प्रवेश करण्यासाठी वाट पाहते आहे

युनायटेड नेशन्स रिलिफ अँड वर्क्स एजन्सी फॉर पॅलेस्टाईन रेफ्युजीस (यूएनआरडब्ल्यूए) या संस्थेचं म्हणणं आहे की गाझामधील दर पाचपैकी एक मूल आता कुपोषित आहे.

फिलिपी लाझ्झारिनी यांनी एक्स या सोशल मीडियावरील त्यांच्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की यूएनआरडब्ल्यूएच्या टीमनला दिसणारी बहुतांश मुलं "अशक्त, कमकुवत झाली आहेत आणि जर त्यांना तातडीनं आवश्यक ते उपचार मिळाले नाहीत, तर त्यांचा मृत्यू होण्याचा प्रचंड धोका आहे."

ते पुढे म्हणाले, "या मुलांची काळजी घेणाऱ्या पालकांचीदेखील प्रचंड उपासमार होते आहे. गाझातील अन्नाच्या अभावाचं संकट गंभीर होत चाललं आहे आणि त्याचा परिणाम सर्वांवरच होतो आहे."

यूएनआरडब्ल्यूएचे फ्रंटलाईन आरोग्य कर्मचारी "दिवसभरात जेमतेम एक छोटासा आहार घेऊन तग धरून आहेत. बहुतांश वेळा त्यांना फक्त डाळच खायला मिळते आहे," असं ते म्हणतात. कामावर असताना उपासमारीनं कर्मचारी बेशुद्ध पडल्याच्या वृत्तांवर प्रकाश टाकत ते ही माहिती देतात.

लाझ्झारिनी पुढे सांगतात की, "यूएनआरडब्ल्यूएकडे जॉर्डन आणि इजिप्तमध्ये 6,000 ट्रक अन्नधान्य आणि वैद्यकीय मदत आहे आणि ते गाझामध्ये प्रवेशाची वाट पाहत आहेत. त्यांनी इस्रायलकडे आग्रह धरला आहे की त्यांनी मानवीय मदत करणाऱ्या संस्थांना गाझामध्ये कोणत्याही बंधनाशिवाय आणि अव्याहतपणे मानवीय मदत करू द्यावी."

संयुक्त राष्ट्रसंघानं मदत करणाऱ्यांबद्दल काय सांगितलं?

आम्ही वृत्त देत असताना, गाझामधील हमासद्वारे संचालित आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे की 7 ऑक्टोबर 2023 पासून कुपोषणामुळे गाझामध्ये एकूण 113 जणांचा मृत्यू झाला आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाचं म्हणणं आहे की, गाझामध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या उपासमारीमुळे 'भयावह परिस्थिती' निर्माण झाली आहे.

तर गाझामधील रहिवासी बीबीसीला सांगत आहेत की, त्यांना भीती वाटते की जर मदत वितरित होत असलेल्या ठिकाणी पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला, तर त्यांना गोळ्या घातल्या जातील.

परिस्थितीच्या गांभीर्याची आठवण करून देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघानं म्हटलं आहे की 27 मे ला अमेरिका आणि इस्रायलचं समर्थन असलेल्या गाझा ह्युमॅनिटेरियन फाऊंडेशनकडून (जीएचएफ) नवीन मदत पद्धतीची सुरुवात झाल्यापासून अन्न शोधत असताना, इस्रायलच्या सैन्याकडून किमान 1,054 पॅलेस्टिनी मारले गेले आहेत.

गाझा

फोटो स्रोत, Getty Images

संयुक्त राष्ट्रसंघानं असंही म्हटलं आहे की, 21 जुलैपर्यंत जीएचएफच्या 'ठिकाणांच्या जवळ' 766 जण मारले गेले आहेत. तर 'संयुक्त राष्ट्रसंघ आणि इतर मानवतावादी संस्थांच्या मदत करणाऱ्या ताफ्यांजवळ' 288 जण मारले गेले आहेत.

इस्रायलच्या लष्करी झोनमध्ये असणाऱ्या ठिकाणांहून मदत वितरित करण्यासाठी जीएचएफ खासगी सुरक्षा कंत्राटदारांचा वापर करते.

इस्रायल आणि अमेरिकेचं म्हणणं आहे की, गाझामध्ये होणारी मानवीय मदत हमासनं चोरू नये म्हणून ही व्यवस्था आवश्यक आहे. मात्र, संयुक्त राष्ट्रसंघानं या व्यवस्थेशी सहकार्य करण्यास नकार दिला आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाचं असंही म्हणणं आहे की, ही व्यवस्था अनैतिक आहे आणि हमासनं पद्धतशीरपणे ही मदत वळवण्याचा कोणताही पुरावा देण्यात आलेला नाही.

हमास मानवीय मदतीत अडथळा आणत असल्याचा इस्रायली सैन्याचा आरोप

इस्रायलच्या सैन्याचं (आयडीएफ) म्हणणं आहे की, दक्षिण गाझामधी खान युनूसमधून बुधवारी (23 जुलै) एक रॉकेट डागण्यात आलं. ते राफाहमधील मदत वितरित केल्या जाणाऱ्या ठिकाणाजवळ पडलं.

हे रॉकेट डागण्यात आल्यानंतर, अमेरिका आणि इस्रायलचं समर्थन असलेल्या गाझा ह्युमॅनिटेरियन फाऊंडेशननं (जीएचएफ) गुरुवारी (24 जुलै) राफाहमध्ये "आठवडाभरासाठीची हजारो अन्नाची पाकिटं वाटली आहेत," असं आयजीएफनं टेलिग्रामवर म्हटलं आहे.

आयडीएफनं एक्स या सोशल मीडियावर टाकलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "नागरिकांना मदत मिळू नये म्हणून हमास आणि इतर दहशतवादी संघटना काहीही करतील."

या आठवड्याच्या सुरुवातीला, संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार कार्यालयानं म्हटलं होतं की, 27 मे ला जीएचएफनं काम सुरू केल्यापासून इस्रायली सैन्याकडून 1,000 हून अधिक जण मारले गेले आहेत.

शस्त्रसंधी न झाल्यानं ओलिस असलेल्या इस्रायली नागरिकांच्या कुटुंबीयांना तीव्र चिंता

गाझामध्ये ओलिस असणाऱ्या इस्रायली नागरिकांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे की, कतारमध्ये सुरू असलेल्या चर्चेतून शस्त्रसंधी न करताच इस्रायलच्या वाटाघाटी पथकाला माघारी बोलावण्यात आल्यामुळे त्यांना 'गंभीर चिंता' वाटते आहे.

गेल्या काही आठवड्यांमध्ये कतारची राजधानी असलेल्या दोहामध्ये इस्रायल आणि हमासमध्ये अप्रत्यक्ष चर्चा सुरू आहे. मात्र दोन्ही बाजू अद्याप करारावर सहमत झालेल्या नाहीत.

होस्टेजेस अँड मिसिंग फॅमिलीज फोरम हेडक्वॉर्टर्सनं एका निवदेनात म्हटलं आहे की, "वाटाघाटी खूपच लांबल्या आहेत आणि जाणाऱ्या प्रत्येक दिवसाबरोबर ओलिस परतण्याच्या शक्यतेला धोका निर्माण होतो आहे."

गाझा

फोटो स्रोत, Getty Images

"सर्व 50 ओलिसांना परत आणण्याची आणखी एक संधी गमावणं अक्षम्य ठरेल," असं त्यात पुढे म्हटलं आहे.

ते आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि इस्रायली अधिकाऱ्यांना आवाहन करत आहेत की, वाटाघाटी आणि करार न होण्यामागच्या कारणांबद्दल तात्काळ माहिती द्यावी.

इस्रायलची वाटाघाटी करणारी टीम माघारी बोलावल्यासंदर्भात पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एका वक्तव्यात म्हटलं आहे, "आज सकाळी (24 जुलै) हमासनं दिलेल्या प्रतिक्रियेनंतर पुढील सल्लामसलत करण्यासाठी वाटाघाटी करणार्या टीमला इस्रायलल माघारी बोलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे."

"वाटाघाटी यशस्वी व्हाव्या म्हणून कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थांनी केलेल्या प्रयत्नांचे आणि राजदूत विटकॉफ यांनी केलेल्या प्रयत्नांचं आम्ही कौतुक करतो."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)