खालिदा झिया यांचे पती झियाउर रहमान यांचा मृतदेह कबरीतून बाहेर काढून पुन्हा का दफन केला?

खालिदा झिया

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, खालिदा झिया यांचं याच आठवड्यात मंगळवारी (30 डिसेंबर) निधन झालं.
    • Author, रकीब हसनत
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) माजी अध्यक्षा खालिदा झिया यांचं नुकतच निधन झालं. त्यांना ढाका येथील शेरे-ए-बांगला नगरमध्ये त्यांचे दिवंगत पती झियाउर रहमान यांच्या कबरीजवळ दफन करण्यात आले.

बांगलादेशचे माजी राष्ट्रपती आणि मुक्ती युद्धातील प्रमुख कमांडर झियाउर रहमान यांची 30 मे 1981 रोजी चितगाव येथे लष्करी उठावाच्या वेळी हत्या करण्यात आली होती.

त्यानंतर त्यांचं पार्थिव आधी चितगावमधील रंगुनिया या डोंगराळ भागात दफन करण्यात आलं होतं.

नंतर तत्कालीन सरकारच्या पुढाकाराने त्यांचं पार्थिव ढाकाला आणण्यात आलं. त्यानंतर त्या वेळच्या शेर-ए-बांगला उद्यानामध्ये सरकारी इतमामात दफन करण्यात आलं होतं.

नंतर हुसेन मोहम्मद इरशाद यांच्या सरकारच्या काळात संसदेजवळील शेर-ए-बांगला नगरमधील या पार्कचं नाव 'चंद्रिमा उद्यान' ठेवण्यात आलं. त्यानंतर बीएनपी सरकारने या उद्यानाचं नाव बदलून 'झिया उद्यान' केलं होतं.

त्यानंतर सत्तेत आलेल्या अवामी लीग सरकारने या उद्यानाचं नाव पुन्हा 'चंद्रिमा उद्यान' केलं. परंतु, अवामी लीग सरकार पडल्यानंतर आता तिथे 'झिया उद्यान' असाच फलक दिसत आहे.

राजकीय इतिहासाचे अभ्यासक आणि लेखक मोहिउद्दीन अहमद सांगतात की, "या उद्यानाचं नाव बदलण्यामागे कोणतंही कारण असलं तरी झियाउर रहमान यांना सरकारी सन्मानाने दफन करण्याचा निर्णय तत्कालीन हंगामी राष्ट्रपती न्यायमूर्ती अब्दुस सत्तार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतला होता."

झियाउर रहमान यांच्या अंत्यसंस्कार आणि दफनविधीच्या वेळी अब्दुस सत्तार यांच्या मंत्रिमंडळात उपमंत्री असलेले एबीएम रुहुल हवलादार अमीनही उपस्थित होते.

अमीन यांनी बीबीसी बांगलाला सांगितलं की, "हा प्रस्ताव न्या.अब्दुस सत्तार यांनी मांडला होता. मंत्रिमंडळाने त्याला एकमताने मंजुरी दिली. नंतर लष्करप्रमुख इरशाद यांनीही या निर्णयाला पाठिंबा दिला.

झियाउर रहमान यांनी देशात बहुपक्षीय लोकशाहीची सुरुवात केली होती, म्हणूनच त्यांना संसद भवनाजवळ दफन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता."

आता खालिदा झिया यांच्या पक्षाने, म्हणजेच बीएनपीनेही त्यांना झियाउर रहमान यांच्या कबरीजवळच दफन करण्याचा निर्णय घेतला. खालिदा झिया यांना शासकीय इतमामात दफन करण्यात आलं आहे.

दीर्घकाळापासून आजारी असलेल्या खालिदा यांचं मंगळवारी (30 डिसेंबर) ढाका येथील एका रुग्णालयात निधन झालं होतं.

झियाउर रहमान यांचा अंत्यसंस्कार

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

तत्कालीन राष्ट्रपती झियाउर रहमान हे आपल्या पक्षातील स्थानिक नेत्यांमधील मतभेद मिटवण्यासाठी 29 मे 1981 रोजी दोन दिवसांच्या चितगाव दौऱ्यावर गेले होते.

त्या दौऱ्यात त्यांच्यासोबत असलेले पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या दिवशी झियाउर रहमान यांनी दिवसभर वेगवेगळ्या बैठका घेतल्या आणि ते रात्री उशिरा झोपायला गेले होते.

त्यानंतर काही तासांतच लष्करी अधिकाऱ्यांच्या एका गटाने चितगाव सर्किट हाऊसवर हल्ला करून झियाउर रहमान यांच्यावर गोळीबार केला, ज्यात ते जागीच ठार झाले. 30 मे सकाळी रेडिओवर पहिल्यांदा त्यांच्या निधनाची बातमी प्रसारित झाली.

राष्ट्रपतींच्या हत्येनंतर देशात निर्माण झालेल्या परिस्थितीत तत्कालीन उपराष्ट्रपती न्यायमूर्ती अब्दुस सत्तार यांनी हंगामी राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला.

त्यांनी 30 मे रोजी दुपारी रेडिओ आणि टेलिव्हिजनवर देशाला संबोधित करताना झियाउर रहमान यांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा केली.

दुसरीकडे, हत्येच्या काही तासांतच झियाऊर रहमान यांचा मृतदेह गोपनीय पद्धतीने चितगावमधील डोंगराळ भागातील रंगुनिया येथे नेण्यात आला.

त्या वेळी अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमध्ये झियाउर रहमान यांना रंगुनिया भागातील एका डोंगराच्या पायथ्याशी दफन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं.

खालिदा झिया यांना शासकीय इतमामात दफन करण्यात आले.

फोटो स्रोत, BNP

फोटो कॅप्शन, खालिदा झिया यांना शासकीय इतमामात दफन करण्यात आले.

30 मे सकाळी 8 ते 9 च्या सुमारास लष्कराचा एक गट चितगाव सर्किट हाऊसमध्ये आला होता. त्यांनी राष्ट्रपती रहमान यांच्यासह तिघांचे मृतदेह एका वाहनात ठेवून अज्ञात ठिकाणी नेले, असं वृत्त 'दैनिक संवाद'ने 2 जून 1981 रोजी प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने दिलं होतं.

लष्कराचे तत्कालीन मेजर रजाउल करीम रझा या घटनेनंतर 30 मे रोजी सकाळी सर्किट हाऊसमध्ये गेले होते. त्यांनीही बीबीसीला या घटनेचा तपशील दिला आहे.

हत्याकांडाची माहिती मिळाल्यानंतर त्याच दिवशी राष्ट्रपती रहमान यांचं पार्थिव ढाका येथे आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, असं तत्कालीन सरकारने सांगितलं होतं.

स्थानिक अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधता न आल्याने राष्ट्रपतींचे पार्थिव रेडक्रॉस या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे ढाकाला पाठवण्याची विनंती करण्यात आली होती, असं तत्कालीन पंतप्रधान शाह अजीजूर रहमान यांनी त्यावेळी पत्रकारांना सांगितलं होतं.

पण नंतर सरकारने एका निवेदनात चितगाव छावणीचे तत्कालीन जीओसी मेजर जनरल अबुल मंजूर यांनी ही विनंती फेटाळली होती, असं सांगितलं.

'दैनिक संवाद' मध्ये 31 मे 1981 रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, 30 मे रोजी बंगभवनमध्ये अंतरिम राष्ट्रपती न्या. अब्दुस सत्तार यांच्या मंत्रिमंडळाची पहिली औपचारिक बैठक झाली होती. त्या बैठकीत एका शोक प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती.

झियाउर रहमान यांच्या हत्येनंतर न्या. अब्दुस सत्तार यांनी हंगामी राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती तेव्हाची बातमी
फोटो कॅप्शन, झियाउर रहमान यांच्या हत्येनंतर न्या. अब्दुस सत्तार यांनी हंगामी राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती.

त्याच दिवशी ढाका येथे अब्दुस सत्तार यांनी म्हटलं होतं की, "आम्ही रेडक्रॉसच्या माध्यमातून चितगावहून राष्ट्रपतींचे पार्थिव आणण्याचे अनेक प्रयत्न केले. पण त्या लोकांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळेच आम्ही मृतदेह नसताना अंत्यसंस्काराची नमाज तिथेच अदा केली."

पण 31 मे रोजी उठावात सहभागी सैनिक आणि अधिकाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण झाले. अनेकांनी सत्तापालट करणाऱ्यांची साथ सोडून अंतरिम राष्ट्रपती अब्दुस सत्तार यांच्या सरकारच्या बाजूने निष्ठा दाखवायला सुरुवात केली. याचदरम्यान सरकारने लष्करातील बंडखोर अधिकारी आणि सैनिकांना आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले.

घटनाक्रम वेगाने बदलत असताना, मेजर जनरल मंजूर आणि कर्नल मतिउर रहमानसह अनेक सत्तापालट अधिकारी 31 मेच्या रात्री चितगाव छावणी सोडून पळून गेले.

मेजर जनरल मंजूर पळून गेल्यानंतर चितगावची लष्करी छावणी पुन्हा सरकारच्या ताब्यात आली. त्यानंतर पोलिसांनी मंजूरला अटक करून छावणीत आणलं, पण नंतर त्याचाही गोळी लागून मृत्यू झाला.

सरकारच्या पुढाकाराने झियाउर रहमान यांना राजकीय सन्मानाने दफन करण्यात आले होते तेव्हाची बातमी
फोटो कॅप्शन, सरकारच्या पुढाकाराने झियाउर रहमान यांना राजकीय सन्मानाने दफन करण्यात आले होते.

खालिदा झिया यांना त्याच कबरीजवळ दफन करण्यात आलं

तत्कालीन ब्रिगेडियर हन्नान शाह यांना 1 जून रोजी झियाउर रहमान यांचं पार्थिव सापडलं होतं.

नंतर बीबीसी बांगलासोबतच्या चर्चेत त्यांनी सांगितलं की, झियाउर रहमान यांचं पार्थिव शोधण्यासाठी ते कापताई रोडवर गेले होते. केवळ अंदाजाच्या आधारावर नवीन कबरीचा शोध लावला गेला होता.

स्थानिक ग्रामस्थांनी एका छोट्या डोंगराकडे इशारा करत ब्रिगेडियर हन्नान आणि त्यांच्या टीमला लष्करी अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी तिथे एका व्यक्तीचं दफन केल्याचं सांगितलं होतं.

ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हन्नान शाह लष्करी जवानांसोबत त्या ठिकाणी पोहोचले. तेथील एका कबरीवर ताजी माती दिसत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

तिथे खोदकाम केल्यावर राष्ट्रपती झियाउर रहमान आणि दोन इतर लष्करी अधिकाऱ्यांचे पार्थिव सापडले. रहमान यांचं पार्थिव तिथून चितगावच्या लष्करी छावणीत नेण्यात आलं आणि 1 जूनला हेलिकॉप्टरने राजधानी ढाका येथे ते पाठवण्यात आलं.

दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 जूनला रहमान यांचं पार्थिव सामान्य लोकांना श्रद्धांजली वाहता यावी यासाठी सकाळी 11 वाजेपर्यंत संसद भवनात ठेवण्यात आलं होतं.

2 जूनच्या वृत्तपत्रांमध्ये वृत्तसंस्थांचा हवाला देत बातम्या प्रकाशित करण्यात आल्या. त्यात सांगितलं गेलं की, "माजी राष्ट्रपती झियाउर रहमान यांचा नमाज-ए-जनाजा आज म्हणजे मंगळवारी (2 जून) दुपारी 12.30 वाजता माणिक मियाँ एव्हेन्यू येथे होणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता नवीन संसद भवनजवळील तलावाच्या काठावर त्यांच्या पार्थिवाचे दफन केले जाईल."

त्याच्या दुसऱ्या दिवशी, 3 जूनला, 'दैनिक इत्तेफाक'ने वृत्त दिलं की, "माजी राष्ट्रपतींचे पार्थिव दफन करण्यासाठी शेर-ए-बांगला नगर पार्क निवडले गेले आहे. हे पार्क नवीन संसद भवन आणि तलावाच्या उत्तर, तसेच गणभवनाच्या पूर्वेकडे आहे."

संशोधक मोहिउद्दीन अहमद यांनी बीबीसी बांगलाला सांगितलं की, "त्यावेळी न्या. सत्तार यांच्या अंतरिम सरकारने झियाउर रहमान यांना राजकीय सन्मानाने दफन करण्यासह अनेक निर्णय घेतले होते. दफनासाठीची जागाही त्यांनीच ठरवली होती."

एबीएम रुहुल अमीन हवलादार सांगतात की, "संसद भवन परिसरात झियाउर रहमान यांना दफन करण्याच्या निर्णयावर सर्वांचं एकमत झालं होतं. दफनविधीच्या वेळी अवामी लीगचे तेव्हाचे अनेक खासदारही उपस्थित होते. पक्षीय मतभेद बाजूला ठेवून समाजातील सर्व स्तरातील लोक अंत्यसंस्कारात सहभागी झाले होते."

आता सुमारे 44 वर्षांनंतर झियाउर रहमान यांची पत्नी खालिदा झिया यांना त्याच कबरीशेजारी दफन करण्यात आले आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)