मासिक पाळीच्या काळात स्वच्छता कशी ठेवायची? महत्त्वाची माहिती

आजही जगभरातील कोट्यवधी महिलांना सुरक्षित आणि स्वच्छ मासिक पाळीच्या साधनांची उपलब्धता नाही.

केवळ मासिक पाळीविषयक साहित्याचा अभावच नव्हे, तर समाजात आजही या नैसर्गिक प्रक्रियेभोवती असलेली लज्जा, अज्ञान आणि भेदभाव हे महिलांच्या आरोग्य, शिक्षण आणि आत्मसन्मानासाठी मोठं आव्हान ठरत आहे.

मासिक पाळी ही आरोग्यदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची बाब असतानाही, तिच्याशी संबंधित गैरसमज आणि अस्वस्थ पद्धती अजूनही अनेक मुलींच्या आणि महिलांच्या दैनंदिन जीवनात अडथळा ठरत आहेत.

मासिक पाळीतील स्वच्छतेबद्दल बोलणं आजही अनेक भारतीय कुटुंबांमध्ये दुर्मीळ आहे. तुम्ही स्वतःलाच विचारा, आपल्या कुटुंबात मासिक पाळीबद्दल कधी आणि किती वेळा उघडपणे चर्चा झाली आहे?

याविषयी जागरूकता वाढत असली तरीही, याबाबत अजूनही संकोच आणि गैरसमजुतींचं सावट मोठ्या प्रमाणात आहे.

आता आपण सोशल मीडियावर महिलांचे अनुभव, स्वच्छतेचे महत्त्व आणि एखाद्या मुलीच्या पहिल्या मासिक पाळीच्या आनंद साजरा करतानाच्या पोस्ट्स व व्हीडिओज पाहतो. पण अजूनही यावर व्यापक प्रमाणात चर्चा होत नाही.

आज म्हणजे 28 मे रोजी मासिक पाळी स्वच्छता दिन आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया की चांगली मासिक पाळीतील स्वच्छता म्हणजे नेमकं काय? आणि महिलांकडून नेहमी कोणत्या सामान्य चुका होतात?

याबद्दल आम्ही मद्रास मेडिकल कॉलेजमधील माजी प्राध्यापिका आणि स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. प्रेमलता यांच्याशी संवाद साधला.

सॅनिटरी पॅड्स कसे निवडावेत?

तुम्ही कापसाच्या तंतूंपासून (कॉटन फायबर) बनवलेले सॅनिटरी नॅपकिन्स निवडायला हवेत. कापूस रक्त अधिक प्रभावीपणे शोषतो आणि कृत्रिम साहित्यांच्या तुलनेत कमी इरिटेशन निर्माण करतो.

नायलॉन किंवा इतर कृत्रिम कापडांनी बनवलेले नॅपकिन्स थोडे स्वस्त असू शकतात, परंतु, आरोग्य आणि आरामासाठी थोडे अधिक खर्च करणं नेहमी फायदेशीर ठरतं.

रियुजेबल कॉटन प्रॉडक्ट्स (पुन्हा वापरता येण्यायोग्य) जसं की पिरियड पँटीज आणि हायब्रिड कापडी पॅड्स जोपर्यंत प्रत्येक वापरानंतर नीट स्वच्छ करून वाळवले जात नाहीत, तोपर्यंत ते वापरणं टाळलेलं बरं.

हा पर्याय दीर्घकालीन दृष्टिकोनातून पर्यावरणपूरक आणि खर्चिकदृष्ट्या फायदेशीर असला तरी, योग्य स्वच्छता न केल्यास संसर्गाचा धोका वाढू शकतो.

मासिक पाळीच्या रियुजेबल उत्पादनांची स्वच्छता कशी ठेवावी?

डॉक्टर म्हणतात की, त्या सहसा पीरियड पँटीज आणि पुन्हा वापरता येणाऱ्या (रियुजेबल) कापसाच्या पॅड्ससारख्या उत्पादनांची शिफारस करत नाहीत. पण आता या वस्तू किंमत आणि पर्यावरणीय बाबी लक्षात घेऊन बाजारात उपलब्ध आहेत.

त्यामुळे जर तुम्ही ही उत्पादने वापरत असाल, तर योग्य स्वच्छता राखणं खूप महत्त्वाचं आहे.

सुरक्षित वापरासाठी डॉक्टरांच्या काही टिप्स पुढीलप्रमाणे-

  • वापरल्यानंतर ती वस्तू लगेच कोमट पाण्यात भिजत ठेवा.
  • सौम्य साबणानं व्यवस्थित धुवा, तीव्र डिटर्जंट्स किंवा प्रतिजैविक (अँटीसेफ्टिक्स) पदार्थांचा वापर टाळा.
  • सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ते पूर्णपणे थेट सूर्यप्रकाशात वाळायला हवं. सूर्यप्रकाश नैसर्गिक प्रतिजैविक/जंतूनाशक म्हणून काम करतो.

त्या म्हणाल्या, "अयोग्य स्वच्छता किंवा कोरडेपणामुळं संक्रमणाचा किंवा संसर्गाचा धोका वाढू शकतो. म्हणून, ही उत्पादने पर्यावरणपूरक असली तरी, स्वच्छता प्रथमस्थानी असणं आवश्यक आहे."

आपण दिवसातून किती वेळा पॅड बदलावेत?

सामान्यत: सॅनिटरी पॅड्स दिवसातून चार वेळा बदलणं चांगलं असतं. मेन्स्ट्रुअल कप वापरताना, तो दर 6 ते 8 तासांनी 'रिकामा' (अनलोड) करणं योग्य आहे.

परंतु, हे वेळापत्रक काटेकोरपणे पाळणं आवश्यक नाही. काही महिलांना जास्त रक्तस्राव होऊ शकतो. अशा परिस्थितीत, पॅड पूर्णपणे भिजेपर्यंत वाट न पाहता, प्रत्येक तीन तासांनी ते बदलणं चांगलं आहे.

मासिक पाळीचा कप वापरताना काय लक्षात ठेवलं पाहिजे?

डॉ. प्रेमलता म्हणाल्या की, मासिक पाळीचा कप हा दीर्घकालीन, किफायतशीर पर्याय म्हणून आणला गेला. हा अनेक वर्षांपर्यंत पुन्हा-पुन्हा वापरता येतो, विशेषत: प्रवासादरम्यान, ज्यामुळं तो एक सोयीचा पर्याय ठरतो.

पीरियड पँटीज आणि रियुजेबल कॉटन पॅड्सप्रमाणेच कप पूर्णपणे स्वच्छ करणं आवश्यक आहे. सुमारे चार मिनिटं ते पाण्यात उकळवा आणि नंतर सौम्य, सुगंध नसलेल्या साबणानं धुवा.

जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त कप असतील, तर त्यांचा वापर ते वेळोवेळी बदलून करणं चांगलं. एकाच कपाचा संपूर्ण दिवसभर वापर करू नका आणि तो योग्य पद्धतीनं स्वच्छ करणं महत्त्वाचं आहे. नेहमी पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडा कप वापरा.

डॉ. प्रेमलता सांगतात की, मासिक पाळी ही एक अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे. या काळात अनेक महिलांना पोटदुखी होणं सामान्य आहे. या त्रासाचा सामना करण्यासाठी वेदनाशामक औषध घेणं पूर्णपणे योग्य आहे.

यामध्ये काहीही चुकीचं नाही. मासिक पाळीच्या वेदना तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करू नयेत, असं त्या सांगतात. जर तुम्हाला तीव्र किंवा सातत्यानं पोटदुखी होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि योग्य उपचार घेणं महत्त्वाचं आहे.

मासिक पाळीच्या दरम्यान कोणत्या आरोग्यदायी सवयी लावून घ्याव्यात?

मासिक पाळी दरम्यान काही टिप्स पाळल्या पाहिजेत असं डॉ प्रेमलता सुचवितात.

मुली/महिलांनी सुती अंतर्वस्त्रं निवडावीत ज्यामुळं हवा खेळती राहील, ओलावा कमी होईल आणि संसर्ग टाळता येईल.

  • योनीचा भाग तुमच्या मासिक पाळीदरम्यान अधिक संवेदनशील असतो, आणि शेव्हिंग केल्यामुळे तिथे बारीक कट होऊ शकतात, ज्यामुळं बॅक्टेरिया आणि व्हायरल संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
  • डॉक्टर सांगतात की, पूर्णपणे शेव्ह करण्याऐवजी ते ट्रीम करणं चांगलं आहे. प्युबिक हेअर महिलांना त्या भागातील संसर्गापासून वाचवतात.
  • जर जास्त रक्तस्राव किंवा तीव्र वास येत असेल, तर महिलांनी अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हे काही गंभीर आरोग्य समस्यांचे संकेत असू शकतात आणि याकडे दुर्लक्ष करू नये.
  • या भागाला पुढून मागे स्वच्छ करणं आवश्यक आहे. यामुळे गुदद्वाराच्या भागापासून योनीमध्ये बॅक्टेरियाचे संक्रमण रोखण्यास मदत होईल, आणि विशेषतः मूत्रमार्गातील संसर्ग (यूटीआय) आणि एचआयव्हीचा धोका कमी करण्यास मदत होईल.
  • जर महिला टॅम्पॉन्स वापरत असतील, तर काही महिलांना संसर्ग होण्याची अधिक शक्यता असू शकते. जर तुम्हाला इरिटेशन, दुर्गंधी किंवा कोणतीही अस्वस्थता जाणवली तर त्वरित आपल्या स्त्री रोगतज्ज्ञांशी संपर्क साधा.

मासिक पाळीच्या असुरक्षिततेचे संकट आणि महिलांवरील परिणाम

2022 च्या जागतिक बँकेच्या अहवालानुसार, संपूर्ण जगभरात सुमारे 500 दशलक्ष महिलांना सुरक्षित आणि स्वच्छ मासिक पाळीची उत्पादनं उपलब्ध नाहीत. परंतु ही समस्या पुरवठा नसण्याच्या पलीकडे आहे.

हल्ली मासिक पाळीच्या पुरवठ्याची कमतरता ही महिलांसमोर असलेली एकमेव समस्या नाही, असं अहवालात नमूद केलं आहे. मासिक पाळी ही महिलांच्या जीवनाचा एक नैसर्गिक आणि आरोग्यदायी भाग आहे.

तरीदेखील अनेक समुदायांमध्ये महिलांना त्यांच्या मासिक पाळीच्या काळात अजूनही भेदभावाचा सामना करावा लागतो आणि हे लांच्छनास्पद मानलं जातं.

काही संस्कृतींमध्ये, महिलांना याबद्दल उघडपणे बोलण्याचीही परवानगी नाही. योग्य माहिती आणि सुरक्षित संसाधनांच्या अभावामुळे, अनेक महिलांना असुरक्षित मासिक पाळीच्या पद्धतींचा अवलंब करावा लागतो.

मासिक पाळीच्या संदर्भातील सामाजिक बंदी आणि चुकीची माहिती महिलांना लज्जा, अपमान आणि कधी कधी लिंग आधारित हिंसाचाराच्या परिस्थितीत ढकलून देतात.

जागतिक बँकेच्या अहवालात पुढे इशारा देण्यात आला आहे, "पिढ्यान् पिढ्या महिलांसाठी चुकीच्या मासिक पाळीच्या पद्धतीमुळे सामाजिक आणि आर्थिक असमानता अधिकच वाढली आहे.

ज्यामुळं त्यांना शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता आणि एकूणच सर्वांगीण मानवी विकासापासून वंचित राहावं लागलं आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)