You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'बिबट्यांनी खावं यासाठी आमची मुलं नाहीयेत'; बिबट्यांच्या संख्येतील वाढ आणि टोकाचा मानव-प्राणी संघर्ष : ग्राउंड रिपोर्ट
"आज माझी चिमुकली गेली, उद्या दुसर्यांची जाणार" – दिव्या बोंबे, मृत शिवन्याची आई, शिरूर
"बिबट्यांना खाण्यासाठी आम्ही आमची मुलं जन्माला घालत नाहीये" – अक्षदा केदारी, मृत सिद्धार्थची आई, जुन्नर
"मी सायकलीवरून शाळेत जात होतो, तेव्हा बिबट्या माझ्याकडंच बघत होता. मी एकटाच होतो, त्यामुळे लय घाबरलो." – अराध्य पाचपुते, वडगाव कांदळी, जुन्नर
"आम्ही वस्तीवर राहतोय, घराशेजारीच ऊस आहे. रात्री लघवी लागली तर बाहेर बाथरूमजवळ जायची पण भीती वाटतेय" – हौसा मुटके, वडगाव-कांदळी, जुन्नर
बीबीसी मराठीने पुणे जिल्ह्यातील जुन्नर भागात दौरा केला, तेव्हा स्थानिक लोकांनी ते बिबट्यांच्या दहशतीत कसे जगत आहेत, याविषयी सांगितलं.
ऊसाच्या शेतीत जन्मलेल्या आणि जंगल कधीही न पाहिलेल्या बिबट्यांनी जुन्नर परिसरात मोठी दहशत माजवलीय.
गेल्या दोन दशकांत पुणे जिल्ह्यातील जुन्नर वनविभागात 50हून जास्त लोकांचा जीव गेला आहे. तर शेतकऱ्यांकडील 26 हजारांहून अधिक पाळीव जनावरे फस्त केली आहेत.
दिवाळी संपली की पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोड सुरू होते. बिबट्यांचा अधिवास असलेलं हे ऊसाचं शेत अचानकपणे मैदानासारखं होतं.
त्यानंतर हे प्राणी अधिवास आणि अन्नाच्या शोधात असतात. दरवर्षी ऊसतोडीच्या हंगामानंतर मानव आणि बिबट्याचा हा संघर्ष वाढत जाताना दिसत आहे.
बिबट्यांच्या संख्येत वाढ होत असल्याची तक्रार गावकरी वारंवार करतात. जेव्हा आपण प्रत्यक्ष या परिसरात फिरतो, तेव्हा बिबट्यांचा वावर किती सहजपणे जाणवतो याची जाणीव होते.
हा रिपोर्ट करण्यासाठी मी नारायणगावाहून जुन्नरकडे निघालो होतो. रात्री दहा–साडेदहाच्या सुमारास राज्य महामार्गावरून जाताना आमच्या कारसमोरूनच एक बिबट्या निर्धास्तपणे रस्ता ओलांडताना दिसला. आम्ही कारमध्ये सुरक्षित होतो, पण इतक्या अचानक बिबट समोर येईल याची कल्पनाच नव्हती. हातातला मोबाईल काढून व्हीडिओ करण्याइतपतही धीर किंवा ताकद त्या क्षणी उरली नव्हती.
ज्याच्या दहशतीबद्दल आम्ही दिवसभर बोलत होतो, तोच अचानक समोर प्रकट झाल्याने अक्षरशः धक्का बसला.
यंदा दिवाळीच्या सुटीत पुण्याहून शिरूर तालुक्यातील पिंपरखेड या गावी आलेल्या चिमुकल्या शिवन्याचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला.
वस्तीवर राहणाऱ्या बोंबे कुटुंबाची घराला लागूनच शेती आहे. तिथून साधारण पाचशे मीटर अंतरावर भरदिवसा ही घटना घडली.
याविषयी बोलताना शिवन्याची आई दिव्या बोंबे सांगतात, "अशा घटना आता खूप वाढल्या आहेत. रोज कुठे ना कुठे काहीतरी घडतं. आज इथे, उद्या तिथे. याआधी शिवन्याचे वडील टू-व्हीलरवर जात असताना एका बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. फक्त आठवडाभरापूर्वीच बिबट्या आमच्या अंगणात शिरला होता. दहा मिनिटं गेट बंद राहिलं नाही, आणि तो आत घुसला. जर तो थेट घरात आला असता, तर आम्ही काय केलं असतं? मग आम्ही 24 तास घरातच बसायचं का?"
दिव्या पुढे म्हणतात, "सगळे म्हणतात की आम्ही तुमच्या भावना समजतो. आमच्यासमोर रडतात आणि निघून जातात. पण ही ठेच आयुष्यभर आमच्यासोबत राहणार आहे. तिच्या सगळ्या वस्तू अजूनही घरात आहेत. आज एखादी वस्तू दिसली की तिची आठवण ताजी होते."
बोंबे कुटुंबाने घरासमोरच्या अंगणाला तारेचं कुंपण केलं आहे. किंबहुना या भागातील बहुतेक सगळ्याच लोकांनी घरासमोर तारेचं कुंपण केलं आहे.
यावर्षी पावसाळा संपताच बिबट्याने शिरूर आणि जुन्नर तालुक्यात तीन चिमुकल्यांचा आणि एका आजीचा जीव घेतला आहे.
दुसरीकडे, बिबट्याने मुलाचा जीव घेतल्यानंतर जुन्नर तालुक्यातील कुमशेत येथील केदारी कुटुंबाने भीतीपोटी घर सोडून दुसरीकडे आश्रय घेतला आहे.
"बिबटे आता माणसांचा जीव घेऊ लागलेत. आज आमचं बाळ गेलं, उद्या दुसऱ्याचं जाईल. आता बिबटे वाड्या-वस्त्यांत फिरत आहेत. ज्याचं मूल जातं, त्यालाच यातना कळतात. सरकारला याचं काही वाटतं की नाही?" असं म्हणत मृत सिद्धार्थची आई अक्षदा केदारी ढसाढसा रडत होती.
केदारी कुटुंब मोलमजुरी करून पोट भरतं.
24 सप्टेंबर 2025 रोजी अक्षदा दुसऱ्यांच्या शेतात काम करून थकलेल्या अवस्थेत घरी परतल्या.
तेव्हा सिद्धार्थने आईला चपाती-भाजी खायची इच्छा व्यक्त केली होती. पण अक्षदाने थकव्यामुळे, "चपाती-भाजी उद्या करते, आता दाळ-भात खाऊ," असं मुलाला सांगितलं.
अंगणातील चुलीवर भात शिजत होता. सिद्धार्थ जवळच अभ्यास करत बसला होता.
अक्षदा दाळ आणण्यासाठी घरात गेल्या. त्याच क्षणी जवळच्या झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने सिद्धार्थवर हल्ला केला आणि त्याला ऊसाकडे ओढून नेलं.
मुलगा अंगणात दिसेनासा झाल्यावर पालकांनी शोधाशोध सुरू केली. घरात वीज नसल्याने अंगणापलीकडे काहीच दिसत नव्हतं, म्हणून शेजाऱ्यांकडून टॉर्च आणली. शेवटी सिद्धार्थचा छिन्नविछिन्न मृतदेह ऊसात पडलेला आढळला.
6 वर्षांच्या सिद्धार्थला पहिलीत जाऊन अवघे अडीच महिने झाले होते. पण मोठं झाल्यावर त्याचं पोलीस होण्याचं स्वप्न होतं.
"मी मोठा झाल्यावर पोलीस होईन. तुला काहीच काम करू देणार नाही. आई, मी खूप पैसे कमावून मोठं घर बांधीन," असं तो नेहमी म्हणायचा. अंगणातल्या ज्या ठिकाणाहून बिबट्याने सिद्धार्थला उचलून नेलं, त्याच जागी बसून अक्षदा मोठ्याने हुंदके देत हे सांगत होत्या.
जुन्नर वनविभागात एक हजाराहून अधिक बिबट्यांचं वास्तव्य असल्याचं सांगितलं जातं. मात्र नेमका आकडा किती आहे याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
धरणं, ऊसशेती आणि बिबटे
1960मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासून या भागात एकूण 5 मोठी धरणे बांधण्यात आली.
त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड सुरू केली आणि बिबट्यांच्या अधिवासात या ऊसशेतीचं क्षेत्रही वाढलं. त्यामुळे भक्ष्याच्या शोधात कदाचित बिबटे जंगलाबाहेर पडू लागले, असं वन्यजीव अभ्यासक सांगत आहेत.
मुंबईतील वन्यजीव अभ्यासक निकीत सुर्वे सांगतात, "जुन्नर वन परिसरातील बिबट्यांना ऊसशेतीचा अधिवास मिळत गेला. सोबत त्यांना खायला पण मुबलक मिळू लागलं. भटकी कुत्रे, मांजर, शेतकऱ्यांच्या शेळ्या, मेंढ्या, वासरू यांची शिकार करून ते इकडे राहतात. वैज्ञानिक कारण पाहायचं झालं तर या प्रदेशात बिबट्यांना राहायला अनुकूल अधिवास आणि भक्ष्य असल्याने त्यांचा अधिवास वाढू लागला."
ऊस हे या भागातील परंपरागत शेतीचं पीक नाहीये. गेल्या 30 वर्षांत झालेला हा बदल आहे. ऊसशेतीमुळे पश्चिम महाराष्ट्राला सुबदत्ता मिळाली. ऊस हे नगदी पीक असल्याने लोकांकडे पैसा खेळू लागला. त्यामुळे भीमाशंकर अभयारण्य आणि कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य जंगलाजवळही ऊसशेतीचं क्षेत्र वाढलं.
परिणामी बिबट्यांना उंच ऊसाची शेती त्यांचं घर वाटू लागलं.
बिबट्या-मानव संघर्ष रोखण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न केले जातायत.
लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी वनविभागाची टीम गाव आणि वस्त्यांवर गस्त घालत आहे. तसंच लोकांच्या मागणीनुसार पिंजरे लावून बिबट्यांना अनेकदा पकडलंही जातंय.
स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांविषयी शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी निलकंठ गव्हाणे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "पहाटे आणि रात्री हा बिबट्यांचा सक्रिय काळ मानला जातो. तेव्हा ते शिकारीसाठी बाहेर पडतात. अशा वेळी वनविभागाकडून विशेष गस्त पथकं गावांत पाठवली जातात. त्या दरम्यान ग्रामस्थ, शेतकरी, दूध घालायला जाणारे लोक, अशा सर्वांना आम्ही थांबवून बिबट्यांबाबत जनजागृती करतो. कोणत्या काळजीच्या उपायांचा अवलंब करावा, याची माहिती देतो."
14 ऑक्टोबरच्या रात्री गस्त घालणाऱ्या वनविभागाच्या पथकासोबत आम्हीही गाव आणि आसपासच्या वस्त्यांमध्ये फेरफटका मारला.
दोन्ही बाजूंना पसरलेला दाट ऊस आणि त्यातून जाणारा अरुंद पाणंद रस्ता—या मार्गाने कार पुढे सरकत असताना मनात एकच विचार सतत घोळत होता, 'जर एखादी व्यक्ती याच वाटेने रात्री एकटी चालत असेल आणि अचानक समोर बिबट्या आला, तर?' हा विचारच क्षणभर हृदयाचा ठोका चुकवणारा होता.
'बिबट्या-मानव संघर्ष जुन्नरपुरता मर्यादित राहिला नाही'
बिबट्या–मानव संघर्ष आता केवळ जुन्नर भागात मर्यादित राहिला नसून महाष्ट्रातल्या इतर भागातही या प्रश्नाने रान पेटवलं आहे.
लोकांचा आणखी जीव जाणार नाही, याची गॅरंटी कोण घेणार? असा जाब हे लोक विचारतायत.
पूर्वी बिबट्यांचे हल्ले फक्त जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यापुरते मर्यादित होते. पण बिबट्यांची संख्या वाढत आहे आणि ऊस शेतीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे बिबट्या हा जुन्नरच्या बाहेर शिरूर, दौंड, तसेच काही प्रमाणात बारामती आणि इंदापूरपर्यंत पोहोचला आहे.
पुणे जिल्हा सोडून राज्यातील इतर भागांतही बिबट्या-मानव संघर्ष वाढला आहे.
याविषयी अधिक माहिती देताना वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (WII) येथील वन्यजीव संशोधक कुमार अंकीत सांगतात की, गेल्या तीन दशकांत ऊस शेती वाढल्याने बिबट्यांना राहण्यासाठी, पिल्ले वाढवण्यासाठी आणि जगण्यासाठी नवे ठिकाण मिळाले आहे. शिवाय, ऊस तोडणीच्या हंगामात पिल्लांची हालचाल वाढते आणि त्यामुळे माणसांशी त्यांचा अधिक संपर्क होतो.
WII येथील कुमार अंकित आणि प्राध्यापक बिलाल हबीब अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील वन्यजीव घटकांचा अभ्यास करत आहते.
संसदीय अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या दरम्यान दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत राज्यात दोनशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, यातील सर्वाधिक मृत्यू हे विदर्भातील वाघांच्या हल्ल्यात झाले आहेत.
मात्र, आवाक्याबाहेर गेलेल्या बिबट्यांच्या संख्येसमोर सरकारी प्रयत्न अपुरे ठरत असल्याचं पीडित नागरिकांचं म्हणणं आहे.
मृत शिवन्याचे वडील शैलेश बोंबे सांगतात, "वारंवार आम्ही प्रशासनाला कळवलं. आमच्या परिसरात ही सातवी–आठवी घटना आहे. बळी गेलेले वेगळे, जखमी वेगळे, पशुधन वेगळं. आमदार–खासदार येतात, विचारतात आणि निघून जातात. पण काहीच होत नाही. शेतकऱ्यांचं जीवन एवढं सर्वसामान्य झालंय का? कुत्र्यासारखं मरण आहे. कुत्र्यांचं तरी बरंय, त्यांच्यासाठी वेगळ्या खोल्या आहेत. आम्हाला दिवसाढवळ्या भीती वाटते."
दुसरीकडे, बिबट्या हा वन्यजीव संरक्षण कायद्यातील अनुसूची क्रमांक एकमध्ये समाविष्ट असल्याने त्याला सर्वोच्च संरक्षित प्रजातीचा दर्जा मिळाला आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत.
'बिबट्या दिसला की त्याला ठार करा' – वनमंत्री गणेश नाईक
12 नोव्हेंबर 2025 रोजी शिरूर तालुक्यातील जांबूत येथे बोलताना वनमंत्री गणेश नाईक यांनी गाववस्तीत वारंवार दिसणाऱ्या संशयित बिबट्यांना ठार करण्याचे निर्देश दिले आहेत.
"गावांमध्ये बिबटे आता भटक्या कुत्र्यांसारखे सहज दिसू लागले आहेत. त्यामुळे त्यांची संख्या कमी करणे आवश्यक आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
तर 18 नोव्हेंबर 2025 रोजी मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी सरकारी पातळीवर होणाऱ्या प्रयत्नांचा वनमंत्री गणेश नाईक यांनी पुण्यात आढावा घेतला.
मानव–बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी तातडीने निधीची मागणी सादर करावी, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि जागतिक स्तरावरील उपाययोजना अंमलात आणाव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.
बिबट्या नसबंदीबाबत केंद्राची मान्यता मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. नाईक यांनी जंगलांजवळ बांबू लागवड करून बिबट्यांना अटकाव करता येईल का याबाबत अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, 2014 पासून बिबट्या–मानव संघर्षात सातत्याने वाढ होत असल्याचं कुमार अंकित यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
त्यांच्या मते, या परिसरात बिबट्यांची घनता अत्यंत जास्त असून दर शंभर चौरस किलोमीटरमध्ये तब्बल 6 ते 7 बिबटे आढळून आले आहेत. ही संख्या बिबट्यांसाठीच्या नैसर्गिक क्षमता-सीमेपेक्षा अधिक असल्याने मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र होत चालल्याचं ते सांगतात.
ते पुढे म्हणाले, "बिबट्यांची संख्या प्रभावीपणे नियंत्रणात आणली नाही तर येत्या काळात लोकांच्या मनात भीती वाढतच जाणार आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष बिबट्यांच्या हल्ल्यांची संख्याही लक्षणीयरीत्या वाढू शकते. त्यामुळे हा प्रश्न गांभीर्याने हाताळण्याची गरज आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)