उत्खननात सापडले बिबट्याप्रमाणे झाडावर चढून शिकार करणाऱ्या मगरींचे अवशेष, काय सांगतं हे संशोधन

    • Author, लाना लॅम
    • Role, सिडनी

वैज्ञानिकांनी ऑस्ट्रेलियातील मगरीचे सर्वांत प्राचीन अंड्यांचे कवच शोधले आहेत. हे अंड्यांचे अवशेष 'ड्रॉप क्रॉक्स' प्रजातीचे असावेत. हे प्राणी शिकार करण्यासाठी झाडांवर चढायचे.

हे अंड्यांचे कवच 5.5 कोटी वर्षे प्राचीन असल्याचा अंदाज आहे. क्विन्सलँडमधील एका मेंढपाळाच्या अंगणात ते सापडले. त्यावरील संशोधन जर्नल ऑफ व्हर्टेब्रेट पॅलिओन्टोलॉजीमध्ये प्रकाशित झालं.

हे अंड्याचे कवच फार पूर्वी नामशेष झालेल्या मगरींच्या एका प्रजातीचे आहेत. मेकोसुशिन या नावानं ही प्रजाती ओळखली जाते. कोट्यवधी वर्षांपूर्वी जेव्हा ऑस्ट्रेलिया हे अंटार्क्टिका आणि दक्षिण अमेरिकेला जोडलेला होतं. त्या भूभागावर असणाऱ्या नद्या, सरोवरं, तळे यात या मगरी राहत असत.

या संशोधनाचे सह-लेखक प्राध्यापक मायकल आर्चर म्हणाले की 'ड्रॉप क्रॉक्स' ही एक 'विचित्र कल्पना' होती. मात्र यातील काही मगरी "कदाचित बिबट्याप्रमाणे शिकार करत होत्या - रात्रीच्या वेळेस तिथून नकळत वावरत असलेल्या प्राण्यांची त्या झाडावरून खाली येऊन शिकार करत असत."

प्राचीन मेकोसुशिन मगरी

प्राध्यापक आर्चर न्यू साऊथ वेल्स विद्यापीठात जीवाश्मशास्त्रज्ञ आहेत. ते म्हणाले की मेकोसुशिन मगरींची जवळपास पाच मीटरपर्यंत वाढ होत असे. साधारण 5.5 कोटी वर्षांपूर्वी त्या मोठ्या प्रमाणात आढळत असत. जवळपास 38 लाख वर्षांपूर्वी म्हणजे तुलनेनं अलीकडच्या काळात ऑस्ट्रेलियात आढळणाऱ्या खाऱ्या आणि गोड्या पाण्यातील मगरींच्या बराच आधीचा तो काळ होता.

'ड्रॉप क्रॉक' मगरींच्या अंड्याचे कवच अनेक दशकांपूर्वी सापडले होते. मात्र स्पेनमधील वैज्ञानिकांच्या मदतीनं अलीकडेच त्याचं विश्लेषण करण्यात आलं.

प्राध्यापक आर्चर म्हणाले की "ही एक विचित्र कल्पना आहे", परंतुं यातील काही कदाचित "जंगलातील जमिनीवर राहणारे शिकारी होते."

यापूर्वी क्वीन्सलँडमधील दुसऱ्या भागात तरुण मेकोसुशिनचे जीवाश्म, 2.5 कोटी वर्षे जुन्या अवशेषांमध्ये सापडले होते. आताचे निष्कर्ष या पूर्वीच्या शोधात भर घालतात.

"यातील काही स्पष्टपणे त्यांच्या आयुष्याचा किमान काही काळ झाडांवर घालवणारे 'ड्रॉप क्रॉक्स'देखील होते," असं आर्चर म्हणाले.

ऑस्ट्रेलियातील जुनं उत्खनन स्थळ आणि तिथे झालेलं संशोधन

1980 च्या दशकाच्या सुरूवातीपासूनच, प्राध्यापक आर्चर मुरगॉन या छोट्या शहरात उत्खनन करणाऱ्या वैज्ञानिकांच्या गटाचा भाग आहेत. मुरगॉन हे शहर ब्रिस्बेनच्या वायव्येला जवळपास 270 किमी (168 मैल) अंतरावर आहे. वैज्ञानिकांचा हा गट तिथे एका मातीच्या खाणीत उत्खनन करतो आहे.

गेल्या काही दशकांमध्ये हे ठिकाण ऑस्ट्रेलियातील सर्वात जुन्या जीवाश्म स्थळांपैकी एक म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे. पूर्वी हे ठिकाण दाट जंगलानं वेढलेलं होतं.

"हे जंगल जगातील सर्वात जुन्या ज्ञात गाणाऱ्या पक्षांचं (साँगबर्ड्स), ऑस्ट्रेलियाील सर्वात जुने बेडूक आणि साप, दक्षिण अमेरिकेशी संबंध असलेले असंख्य छोट्या सस्तन प्राण्यांचं तसंच जगातील सर्वात जुन्या ज्ञात वटवाघळांपैकी एकाचं निवासस्थान होतं," असं डॉ. मायकल स्टीन म्हणाले. ते या अहवालाचे सह-लेखक आहेत.

अशी झाली होती आर्चर यांच्या उत्खननाला सुरूवात

प्राध्यापक आर्चर यांना आठवतं की कसं 1983 मध्ये ते आणि त्यांचा एक सहकारी "कारनं मुरगॉनला गेले होते. तिथे त्यांनी रस्त्याच्या कडेला त्यांची गाडी पार्क केली होती आणि त्यांचे फावडे हाती घेतले होते. मग तिथल्या एक घराचं दार ठोठावलं होतं आणि विचारलं होतं की आम्ही तुमच्या अंगणात खोदकाम करू शकतो का."

ते पुढे म्हणतात, "त्या घरातील लोकांना त्यांच्या मेंढ्यांच्या गोठ्याखाली असलेल्या प्रागैतिहासिक खजिन्याबद्दल आणि त्या भागात कासवांच्या कवचाचे जीवाश्म आधीच सापडले होते, हे समजावून सांगितल्यानंतर, ते हसले होते आणि म्हणाले होते, अर्थातच ! "

"आणि अधिक स्पष्टपणे सांगायचं तर, 1983 पासून उत्खनन केल्यापासून या ठिकाणी आम्हाला सापडलेल्या अनेक आकर्षक जीवाश्मांवरून, आम्हाला माहीत आहे की तिथे आणखी उत्खनन केल्यास आम्हाला आणखी बरीच आश्चर्य दिसतील."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)