लग्न न करता एकट्यानं राहण्याचे फायदे असतात का?

एकटेपणा- प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, फ्लोरा त्सापोवस्की

स्वत:च्याच सहवासात एकांतात वेळ घालवण्यापासून ते अविवाहित राहण्याचा आनंद घेण्यापर्यंत एकट्यानं आयुष्य जगणं, हे समाधानकारक, आनंददायी असू शकतं, असं तत्वज्ञान अलीकडच्या अनेक पुस्तकांमधून मांडलं जात आहे.

'परफेक्ट डेज्' या अलीकडच्या विम वेंडर्स यांच्या चित्रपटातील मुख्य पात्र हे टोकियोतील शौचालयाची सफाई करणारी व्यक्ती आहे.

तो दिवसभरातील त्याचे अनेक तास एकांतात किंवा एकटेपणात घालवतो. झाडांना पाणी घालतो, मनन-चिंतन करतो, संगीत ऐकतो आणि वाचन करतो. चित्रपटाची कथा जसजशी पुढे सरकत जाते, तसतशी नवीन पात्रं समोर येत जातात.

मात्र, तरीदेखील बहुतांश प्रेक्षकांना त्या मुख्य पात्राचे सुरुवातीचे क्षण खरोखरंच परिपूर्ण वाटतात. बीबीसीच्या निकोलस बार्बर यांनी त्याचं वर्णन 'अस्तित्वाच्या शांततेवर ध्यान करणं' असं केलं आहे. ते खरोखरंच मनाला भिडतं.

पुस्तकांपासून स्मार्टफोनपर्यंत, पॉडकास्टपासून ते व्हायरल होणाऱ्या टिकटॉक व्हीडिओच्या माध्यमांतून एकांताविषयी अधिकाधिक विचार करायला प्रवृत्त करणारा आणि सकारात्मक दृष्टीकोन आपल्यासमोर येतो आहे.

एकांतात जगण्यासाठी किंवा एकटं राहण्यासाठी यापेक्षा योग्य काळ कधीच नव्हता, असं वाटायला लागतं.

एकट्यानं जगण्यातील आनंद मांडणारं नवं साहित्य

गेल्या काही वर्षांमध्ये या विषयावर अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. आणखी काही पुस्तकं प्रसिद्ध होण्याच्या मार्गावर आहेत.

तर निकोला स्लॉसन यांचं 'सिंगल: लिव्हिंग अ कम्प्लीट लाईफ ऑन युवर ओन' हे पुस्तक फेब्रुवारी महिन्यात प्रकाशित झालं होतं, तर गेल्या महिन्यात एम्मा गॅनन यांची, 'टेबल फॉर वन' ही बहुप्रतिक्षित कादंबरी प्रकाशित झाली.

यश आणि उत्पादकतेच्या पारंपारिक कल्पनांबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्या बिगर-काल्पनिक (नॉन फिक्शन) पुस्तकांमधून गॅनन यांनी नाव कमावलं आहे.

विम वेंडर्सच्या 2023 मधील 'परफेक्ट डेज्' या चित्रपटाचं एकांतात जगण्याच्या, मात्र त्याचवेळी समाधानी अस्तित्वाच्या मांडणीसाठी कौतुक झालं होतं.

फोटो स्रोत, Courtesy of NEON

फोटो कॅप्शन, विम वेंडर्सच्या 2023 मधील 'परफेक्ट डेज्' या चित्रपटाचं एकांतात जगण्याच्या, मात्र त्याचवेळी समाधानी अस्तित्वाच्या मांडणीसाठी कौतुक झालं होतं.

त्यानंतर आता गॅगन आधुनिक नातेसंबंधावर लेखन करत आहेत. या प्रेमकथेत एका तरुणीला तिच्या जोडीदाराऐवजी एकटं राहण्यातच आनंद मिळतो, या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे.

या वर्षअखेरीस, सेल्फ-हेल्प श्रेणीतील आणखी दोन पुस्तकं प्रकाशित होत आहेत. 'द जॉय ऑफ सॉलिट्यूड: हाऊ टू रिकनेक्ट विथ युवरसेल्फ इन अ ओव्हरकनेक्टेड वर्ल्ड' आणि 'द जॉय ऑफ स्लीपिंग अलोन' ही ती दोन पुस्तकं आहेत.

त्याशिवाय डॅनिएल श्रेबर यांच्या 'अलोन: रिफ्लेक्शन्स ऑन सॉलिटरी लिव्हिंग' याचा इंग्रजी अनुवाद देखील येतो आहे. 2023 मध्ये हे मूळ पुस्तक जर्मनीत प्रकाशित झालं होतं.

जगण्याविषयीच्या दृष्टिकोनात झालेला बदल

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

जगण्याचा एक नवीन दृष्टीकोन आणि मांडणी असलेल्या पुस्तकांची नवी लाट आली आहे. या पुस्तकांमध्ये उत्तम निरीक्षणं आणि उपयुक्त टिप्स आहेत.

ही पुस्तकं फक्त एकांतपणाबद्दलचा किंवा एकट्यानं जगण्यासंदर्भातील नकारात्मक दृष्टीकोन, त्याच्यावर होणारी टीका दूर करण्यावर केंद्रीत नाहीत. या पुस्तकांमध्ये एकट्यानं, एकांतात जगण्याचे फायदे आणि त्यातून मिळणारा आनंद याचीदेखील मांडणी करण्यात आली आहे.

ही पुस्तकं कोरोनाचं संकट आणि एकटेपणाचा कटू अनुभव घेतलेल्या तथाकथित 'एकटेपणाच्या साथी' बद्दल कल्पना असलेल्यांसाठी महत्त्वाची ठरू शकतात. हा शब्द 2023 मध्ये अमेरिकेतील सर्जन जनरल विवेक मूर्ती यांनी लोकप्रिय केला होता.

"कोरोनाच्या संकटानंतर एकटेपणावर प्रचंड लक्ष केंद्रित करण्यात आलं. ते खरोखरंच चांगल्या कारणामुळे करण्यात आलं होतं," असं रॉबर्ट कोप्लान म्हणतात.

ते ओटावातील कार्लेटन विद्यापीठात मानसशास्त्राचे प्राध्यापक आहेत. तसंच ते 'द जॉय ऑफ सॉलिट्यूड: हाऊ टू रिकनेक्ट विथ युवरसेल्फ इन अ ओव्हरकनेक्टेड वर्ल्ड' या पुस्तकाचे लेखक आहेत.

एकटेपणाच्या परिणामांबद्दल वाटणाऱ्या चिंतेमुळे, एकटेपणा किंवा एकांतपणाविषयी काहीसा नकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला, असं ते म्हणतात.

मात्र, आता या दृष्टिकोनात बदल होतो आहे. कोप्लान यांच्या मते, एकांतपणा आणि एकाकीपणामध्ये असणारा फरक हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक लेखकदेखील हीच भावना व्यक्त करतात.

कॅस्पर डेव्हिड फ्रेडरिक यांच्या, 'वँडरर अबॉव्ह द सी ऑफ फॉग' (1817) या प्रसिद्ध चित्रात एकांतपणाचं सौंदर्य टिपण्यात आलं आहे

फोटो स्रोत, SHK/ Hamburger Kunsthalle/ bpk. Photo: Elke Walford

फोटो कॅप्शन, कॅस्पर डेव्हिड फ्रेडरिक यांच्या, 'वँडरर अबॉव्ह द सी ऑफ फॉग' (1817) या प्रसिद्ध चित्रात एकांतपणाचं सौंदर्य टिपण्यात आलं आहे

"एकटेपणा किंवा एकाकीपणा ही काहीजणांसाठी गंभीर आणि हानिकारक समस्या असली, तरी ती एकांतापेक्षा खूप वेगळी अवस्था आहे. एखादी व्यक्ती कोणत्या तरी सकारात्मक कारणांसाठी एकांतपणाची निवड करत असते," असं पत्रकार हेदर हॅन्सन म्हणतात.

2024 मध्ये हॅन्सन यांनी 'सॉलिट्यूड: द सायन्स अँड पॉवर ऑफ बीईंग अलोन' या पुस्तकाचं नेट्टा वेन्स्टाईन आणि थुय-व्ही टी गुयेन यांच्याबरोबर सहलेखन केलं. हॅन्सन यांनी "आपण काही काळासाठी खूपच एकाकी झालो आहोत", असं सांगताना प्रसारमाध्यमांना पाहिलं आहे.

मात्र, त्या या दृष्टिकोनाच्या उलट मांडणी करतात. त्या म्हणतात, "या एकांतपणात लोक त्यांच्या आयुष्याबद्दल विचार करत आहेत, चिंतन करत आहेत. हे त्यांच्या लक्षात येतं आहे की, त्यांना फायदेशीर ठरणाऱ्या वेगवेगळ्या कारणांसाठी ते एकांताची निवड करत आहेत."

कोट कार्ड

'कोरोनाच्या संकटापासून एकटेपणा आणि स्वत:हून निवडलेला एकांतवास, यामधील फरक आपल्याला समजून घेता आला आहे,' असं एम्मा गॅनन म्हणतात. "शांतपणे, निवांतपणे जगण्याच्या" त्या मोठ्या समर्थकदेखील आहेत.

कोरोनाच्या काळात लोकांनी टोकाच्या गोष्टी अनुभवल्या. काहींना त्यांच्या प्रियजनांबरोबर एकत्र राहता आलं, तर काहींना त्याच्या उलट कित्येक महिने कोणत्याही माणसाच्या संपर्कात न येता राहावं लागलं.

या टोकाच्या गोष्टींमुळे, "एकाकीपणा आणि एकांतात आनंदानं राहणं यामधील फरक बारकाईनं जाणून घेण्याची संधी मिळाली," असं गॅनन म्हणतात.

तरुणाईची एकट्यानं जगण्यास वाढती पसंती

जेन झी आणि मिलेनियल्स (तरुणाई) प्रेमसंबंध आणि एकट्यानं जगणं याचा उत्साहीपणे स्वीकार करताना, नातेसंबंधांचं काळजीपूर्वक पूनर्मूल्यांकन करताना या योग्य वेळी दिसत आहेत. जेन-झी, मिलेनियल्स या संकल्पना तरुणाईच्या वेगवेगळ्या वयोगटांसाठी वापरल्या जातात.

गॅनन यांच्या नव्या कादंबरीत कदाचित एका तरुणीनं स्वत:बरोबरच्या नात्याबद्दल सजग होण्याचं काल्पनिक चित्रण असेल. मात्र, अनेक वाचकांसाठी ते वास्तव असेल. असे लोक जे आयुष्यात 'स्थिरावण्या'संदर्भातील अधिकाधिक कालबाह्य होत चाललेल्या सामाजिक अपेक्षांशी लढत आहेत.

2023 च्या अमेरिकेतील एका सर्वेक्षणानुसार, दर पाचपैकी दोन जेन-झी आणि मिलेनियल्सला विवाह ही एक कालबाह्य झालेली परंपरा वाटते.

राष्ट्रीय सांख्यिकी विभागानुसार, यूकेमध्येच फक्त अर्ध्याहून अधिक जेन झी तरुण आणि तरुणी लग्न करतील असा अंदाज आहे.

लेखिका एम्मा गॅनन यांनी, 'टेबल फॉर वन' या त्यांच्या नवीन कादंबरीत एकट्यानं जगण्यातील आनंद मांडला आहे

फोटो स्रोत, Paul Storrie

फोटो कॅप्शन, लेखिका एम्मा गॅनन यांनी, 'टेबल फॉर वन' या त्यांच्या नवीन कादंबरीत एकट्यानं जगण्यातील आनंद मांडला आहे

एप्रिल महिन्यात, टिकटॉकवर एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्याला 10 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले होते आणि जवळपास 37,000 कॉमेंट्स आल्या होत्या. त्यात एकटं राहायला आवडणाऱ्या तरुणी किंवा महिलेबरोबर डेटिंग करण्याबाबतचा एका माणसाचा दृष्टीकोन दाखवण्यात आला होता.

अनेक महिलांना हे विश्लेषण महत्त्वाचं वाटलं आणि त्यांना ते त्यांच्याशी संबंधित वाटलं. निकोला स्लॉसन त्यांच्या लोकप्रिय सबस्टॅक, द सिंगल सप्लिमेंटवर आधारित 'सिंगल: लिव्हिंग अ कम्प्लीट लाईफ ऑन युवर ओन टर्म्स' हे पुस्तक लिहिलं.

टिकटॉकच्या या व्हीडिओला मिळालेला प्रतिसाद पाहून निकोला यांना आश्चर्य वाटलं नाही.

"गेल्या दशकापासून किंवा त्याहून अधिक काळापासून यूकेमध्ये एकटं राहणाऱ्या लोकांची संख्या सातत्यानं वाढते आहे," असं निकोला म्हणतात.

त्या याकडे लक्ष वेधतात की, एकटं राहणाऱ्या लोकांना स्वीकारलं जातं आहे, हा एक सांस्कृतिक बदल होतो आहे.

"आता स्वातंत्र्य आणि मुक्तपणा, विशेषकरून संसार, कुटुंब या गोष्टीला दिला जाणार नकार, यावर लक्ष केंद्रीत केलं जातं आहे. कारण महिलांना या गोष्टीची जाणीव होते आहे की, आधीच्या पिढ्यांमध्ये महिलांकडून ज्या गोष्टींची अपेक्षा केली जात होती, त्या आता त्यांनी सहन करण्याची आवश्यकता नाही."

कलाकृतींमधून एकांताच्या सौंदर्यावर भाष्य

असं असलं तरी, एकटं राहण्यासंदर्भातील आपल्या तीव्र सांस्कृतिक कुतूहलाची मूळं खोलवर रुजलेली आहेत. शतकानुशतकं, कलाकारांनी एकांतपणाचं सौंदर्य टिपण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे.

जर्मन रोमँटिसिस्ट कॅस्पर डेव्हिड फ्रेडरिकपासून ते 20 व्या शतकातील अमेरिकन कलाकार एडवर्ड हॉपरपर्यंत ते दिसून येतं.

कॅस्पर फ्रेडरिकच्या 'वँडरर अबॉव्ह द फॉग' (1817) या महान कलाकृतीसह अनेक कलाकृतींमध्ये त्याचं प्रतिबिंब उमटतं. 'वँडरर अबॉव्ह द फॉग' ही कलाकृती जर्मनीतील हॅम्बर्गर कुन्स्थेल आर्ट म्युझियममध्ये आहे. एडवर्डच्या एकट्या शहरवासियांच्या चित्रांमध्येही तेच उमटलं आहे.

व्हिटनी म्युझियममधील 'द न्यूयॉर्कर'च्या 2022 च्या हॉपरबाबतच्या पुनरावलोकनात नमूद केलं आहे की, "तो दाखवत असलेल्या शहरी जीवनाबद्दलची प्रत्येक गोष्ट वेगळी आहे, सांप्रदायिक नाही आणि तरीदेखील त्याच्या एकाकीपणाच्या प्रतिमा दुखद, स्वावंलबनाबद्दल अभिमान असलेल्या वाटतात."

डॅनिएल श्रेबर यांना वाटतं की जोडीदाराशिवाय एकट्यानं राहणाऱ्या आणि एकाकी असणाऱ्या लोकांमधील परस्परसंबंधाना, पारंपरिकपणे अधिक महत्त्व दिलं गेलं आहे.

ते पुढे म्हणतात, "आता समाजाला ही बाब अधिक चांगल्या प्रकारे समजली आहे की, रोमँटिक प्रेम हे काही जगण्याचं एकमेव मॉडेल नाही किंवा फक्त त्याचीच इच्छा बाळगली जावी असं नाही. जगण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. पारंपारिक पद्धतीनं रोमँटिक वाटणारं नातं असणं, तितकं आवश्यक नाही."

एकांत की एकटेपणा

पीटर मॅकग्रा, स्वत:ला 'बॅचलर' म्हणवतात आणि कोलोरॅडो विद्यापीठात मार्केटिंग आणि मानसशास्त्राचे प्राध्यापक आहेत. "सोलो: बिल्डिंग अ रिमार्केबल लाईफ ऑफ युवर ओन" या पुस्तकात पीटर मॅकग्रा अशाच प्रकारचा मुद्दा मांडतात.

ते म्हणतात, "एकट्यानं जगण्याबाबत आणि विवाह संस्थेची सुरुवात का झाली यामागची कारणं समजून घेण्यात अपयश येण्यामागे अनेक जुन्या धारणा आहेत. यातील बहुतांश व्यावसायिक व्यवस्था म्हणून आहेत."

ते पुढे म्हणतात, "खरं सांगायचं तर आपल्याला आनंदी राहण्यासाठी जोडीदाराची आवश्यकता आहे, या रोमँटिक कॉमेडी, प्रेमगीतं आणि जेन ऑस्टिन यांच्या कादंबऱ्यांमधून मिळणाऱ्या संदेशाला आधार देणारा कोणताही डेटा नाही."

एकटेपणा- प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Reuters

पीटर म्हणतात, "आपण जर एकाच व्यक्तीची किंवा गटाचा एका दीर्घ कालावधीत अभ्यास करून मिळणाऱ्या डेटाकडे पाहिलं तर सोलोमध्ये संदर्भ देण्यात आलेल्या अनेक अभ्यासातून असं दिसून येतं की जर वैयक्तिक आनंद विवाह किंवा कुटुंबाभोवती फिरत राहिला तर तो दीर्घकाळ टिकत नाही.

'द जॉय ऑफ स्लीपिंग अलोन' मध्ये म्हटलं आहे तसं, अगदी नातेसंबंधातदेखील पारंपरिक दिनचर्या थांबवून किंवा बदलून, एकटेपणात अधिक वेळ घालवता येतो.

या पुस्तकाच्या लेखिका सिंथिया झॅक योगासनं आणि ध्यान शिकवतात. सिंथिया यांच्या लक्षात आलं की अनेक महिला त्यांच्या जोडीदारांबरोबर झोपण्यापेक्षा एकटं झोपण्याला पसंती देतात.

'आपल्याला काय हवं आहे, काय वाटतं, भीती आणि मर्यादित धारणा सोडून देण्यासाठी अधिक संधी मिळवण्याच्या आणि निवडीचं अधिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या' मुद्द्याला मांडण्यासाठी त्यांनी पुस्तक लिहिण्याचा ठरवलं. त्यांनी मूळ पुस्तक स्पॅनिशमध्ये लिहिण्याचा निर्णय घेतला होता.

एकट्यानं मजेत कसं जगायचं?

जर एकट्यानं जगणं, एकट्यानं काम करणं या विचारात सर्वत्र मोठ्या प्रमाणात वाढ होत असेल आणि त्याला वाईटदेखील मानलं जात नसेल, तर मग यातून जास्तीत जास्त आनंद कसा मिळवायचा? काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सर्वजण सहमत आहेत.

ते म्हणजे, एकटं राहणं आणि त्याचवेळी इतरांशी संवाद ठेवणं. एकट्यानं जगण्याची सक्ती होण्यापेक्षा तसं जगण्याचं ठरवण्याची क्षमता असणं, महत्त्वाचं आहे.

"एकट्यानं जगण्यात यश आल्याचं सर्वात मोठं लक्षण म्हणजे, असं जगण्यात काहीतरी महत्त्वाचं आणि अर्थपूर्ण आहे, असं वाटून एखाद्या व्यक्तीनं असं जीवन जगण्याचं ठरवणं," असं हॅन्सन म्हणतात.

ते पुढे म्हणतात की, एकांतपणा हे एखाद्या शिल्पकामासारखं आहे. आपण आपल्याला हवं तसं ते घडवू शकतो.

मॅकग्रा यांच्या मते, ते योग्यच आहे. किंबहुना 'अंधरुणात लोळून, धूम्रपान करून उबर ईट्सवर जेवणाची ऑर्डर' देत बसण्यापेक्षा तेच अधिक चांगलं आहे.

त्याऐवजी ते, एकांतात सर्जनशीलतेला चालना देण्याचा आणि एकांतातात चांगला वेळ घालवण्याचा, चालण्याचा किंवा धावण्याचा, कॅफेमध्ये लोकांचं निरीक्षण करण्याचा, संग्रहालयात जाण्याचा सल्ला देतात.

तसंच ते म्हणतात की, तुम्हाला हवं त्याप्रमाणे ते पटापट किंवा शांततेत करा. त्याप्रमाणेच 'संगीत ऐकत आंघोळ करणं' किंवा अगदी एखादा ऑनलाईन कोर्स करणं देखील चांगलं.

एकटं राहणं तुमच्यासाठी चांगलं का असू शकतं?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एकटं राहणं तुमच्यासाठी चांगलं का असू शकतं?

जे लोक अविवाहित आहेत त्यांना त्यांच्या जोडीदाराचा शोध संपण्याची वाट पाहण्याऐवजी एकांतात आनंद घेण्याचा सल्ला दिला जातो, असं स्लॉसन म्हणतात.

त्या म्हणतात, "मी स्थिरस्थावर होईपर्यंत किंवा मला जोडीदार मिळेपर्यंत, विविध गोष्टी करण्यापासून स्वत:ला दूर ठेवायची."

"मात्र, तुम्ही आयुष्यात चांगलं घडण्याची पाहत असाल किंवा आयुष्य जगण्याची सुरुवात करण्याची वाट पाहत असाल तर त्याऐवजी तुम्हाला जे आयुष्य मिळालं आहे ते पुरेपूर जगण्याची आणि त्यात शक्य तितका आनंद घेणं महत्त्वाचं असतं."

"जेव्हा तुमच्यावरील सामाजिक दबाव वाढतो तेव्हा कोणत्याही प्रकारच्या विचाराला किंवा पद्धतीला बळी पडू नका. यातील चांगली गोष्ट म्हणजे आता तुम्हाला आयुष्य जगण्यासाठी पर्यायी विचार आहे," असं मॅकग्रा सुचवतात.

"अधिक व्यापकपणे विचार करता, एकटं जगताना किंवा एकांतातील वेळ हा क्षमता आणि शक्यतांनी भरलेला असतो. मला वाटतं की एकांतपणात सर्जनशीलतेला प्रेरणा मिळते. त्यात जीवनाचा रस वाहतो आणि समस्या सोडवण्यास त्यातून प्रोत्साहन मिळतं," असं गॅनन म्हणतात.

त्या एकांतपणाकडे एक साहस म्हणून किंवा स्वत:शी जोडून घेण्याची, अंतरंगात डोकावण्याची संधी म्हणून पाहण्यास सांगतात.

एम्मा ग्रॅनन म्हणतात, "मऊ ब्लँकेट, संगीताचा स्वर आणि अन्नाचा स्वाद याचा आनंद घ्या. तुम्ही एकटं असताना पाहू शकता, गंध घेऊ शकता, स्पर्श करू शकता आणि जाणून घेऊ शकता."

झॅक म्हणतात की अधिक अंतर्मुख झाल्यामुळे एकांतपणाची किंवा एकट्यानं जगण्याची अधिक खोल समज निर्माण होऊ शकते. त्या एकांतातील क्षणांकडे लक्ष देण्याचा आणि या क्षणांना वारंवार होणाऱ्या कृतींमध्ये बदलण्याचा सल्ला देतात. हे क्षण निवांतपणा देतात आणि चिंतनास मदत करतात.

"तुम्ही एकटं असताना सर्वाधिक आनंद तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे होतो, हे स्वत:ला विचारा? तुम्ही निवडलेल्या क्षणांचं सोनं करा आणि या क्षणांची जास्तीत जास्त कदर करा," असं त्या म्हणतात.

आणि आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, योग्य ताळमेळ साधणं.

कोप्लान म्हणतात, "समाजात राहणं, मिसळणं याची माणसाला आवश्यकता असते. मात्र त्याचबरोबर मी असं देखील म्हणेन की माणसांना एकांतपणाची देखील आवश्यकता असते."

"दोन्हीमध्ये योग्य ते संतुलन, ताळमेळ साधणं हे आनंदासाठी आणि कल्याणासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. प्रत्येकासाठी हे संतुलन, ताळमेळ वेगळ्या प्रकारचा असतो."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)