मुंबई: 'मृतदेहाचा वास येऊ नये म्हणून मुलीने परफ्युमच्या 100-200 बाटल्या वापरल्या'

मुंबईच्या लालबाग परिसरात एका महिलेनी आपल्याच 55 वर्षीय आईची हत्या करून मृतदेहाचे इलेक्ट्रिक मार्बल कटर आणि कोयत्याच्या मदतीने तुकडे केल्याचं समोर आलं आहे, ही हत्या किरकोळ वादातून झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत.

विशेष म्हणजे हत्येच्या तब्बल दोन ते तीन महिन्यांनंतर पोलिसांनी घरातूनच महिलेच्या शरीराचे तुकडे जप्त केले आहेत. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी रिंपल जैन नावाच्या चोवीस वर्षीय महिलेला अटक केली आहे.

या महिलेनी पोलिसांना सांगितले की तिने घरात 100-200 परफ्युमच्या बाटल्या आणून दुर्गंध लपवला होता.

20 तारखेपर्यंत त्या मुलीला पोलीस कोठडी आहे. 100-200 परफ्युमच्या बाटल्या तिने मृतदेहाचा वास येऊ नये म्हणून विकत घेतल्या होत्या ही माहिती तिने पोलिसांना दिली आहे.

सांगितलं जातय की मयत वीणा जैन यांच्या शेजाऱ्यांनी त्यांचा भाऊ सुरेशकुमार पोरवाल, 60 यांना त्यांची बहीण गेल्या कित्येक दिवसांपासून बेपत्ता असल्याचं सांगितलं.

मंगळवारी पोरवाल यांची मुलगी वीणा जैन यांना महिन्याच्या खर्चाचे पैसे देण्यासाठी वीणा यांच्या इब्राहीम कासम चाळ येथील घरी आली मात्र रिंपल ने तिला घरी घेतले नाही. त्यानंतर पोरवाल आले असता त्यांना देखील घरी न घेतल्याने त्याला संशय आला दरवाजा तोडून त्यांनी घरात प्रवेश केला असता वीणा तर सापडली नाही पण घरातून दुर्गंधी आली आणि त्याचा संशय आणखी बळावला.

त्याने थेट काळाचौकी पोलीस स्टेशन गाठले, पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता सुरुवातीला हरवल्याची तक्रार नोंदवली आणि घरी जाऊन पाहणी केली असता घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्लास्टिकच्या गोणीत गुंडाळलेले मृतदेहाचे तुकडे आढळले.

वीणा यांच्या शरीरापासून त्यांचे हात पाय वेगळे करण्यात आले होते, धड हे प्लास्टिकच्या गोणित गुंडाळून कपाटात ठेवण्यात आले होते तर हात पाय हे स्टीलच्या टाकीतून जप्त करण्यात आले. तुकड्यांना किडे पडले असून त्यातून दुर्गंधी येत होती.

त्यांनी तात्काळ डॉक्टर आणि इतर तज्ञांच पथक घटनास्थळी बोलावून घेतलं आणि त्यानंतर मृत महिलेच्या भावाच्या तक्रारीवर गुन्हा नोंद करत रिंपलला अटक केली. आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार किरकोळ वादातून हत्या केल्याची माहिती मिळाली.

आई आणि तिच्या मुलीमध्ये नेमक्या कोणत्या कारणावरून वाद होता ज्याची परिणीती हत्त्येत झाली आणि त्यानंतर आईच्या शरीराचे तुकडे करण्यापर्यंत मुलगी धजावली आणि यात आणखीन कोणी सहभागी आहे का याचा सध्या काळाचौकी पोलीस तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं?

मुंबईच्या लालबाग परिसरातील एका चाळीत तब्बल तीन महिन्यांपासून आईच्या मृतदेहासोबत राहत असलेल्या तरूणीला पोलिसांनी 15 मार्च रोजी ताब्यात घेतलं आहे.

या प्रकरणात संबंधित तरूणीनेच आपल्या आईचा खून केला, असा संशय पोलिसांना असल्याची माहिती मुंबईच्या झोन 4 चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे यांनी दिली.

मुंबईतील लालबागसारख्या गजबजलेल्या ठिकाणी अशा प्रकारची घटना समोर आल्यामुळे या बातमीने आजूबाजूच्या परिसरात खळबळ माजली आहे.

नेमकं प्रकरण काय?

लालबागमध्ये एक 55 वर्षीय महिला आपल्या 24 वर्षीय मुलीसोबत गेल्या 16 वर्षांपासून राहत होती.

पूर्वी विरारमध्ये राहत असलेली ही महिला आपल्या पतीच्या निधनानंतर लालबाग परिसरात वास्तव्याला आली.

याठिकाणी जवळच महिलेचा भाऊसुद्धा राहत असल्यामुळे भेटणं सोयीस्कर होईल या उद्देशाने आई आणि मुलगी लालबागमधील एका इमारतीत फ्लॅटमध्ये राहायचे.

महिलेचा भाऊ नियमितपणे आपल्या विधवा बहिणीची भेट घेत असे. भाऊ महिलेला उदरनिर्वाहासाठी दरमहा आर्थिक मदतही करायचा.

मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून भावाची आपल्या बहिणीसोबत भेटच होऊ शकली नाही. भाऊ कधीही महिलेच्या घरी गेला असता त्याची भाची त्याला कोणतं ना कोणतं कारण सांगून दारातूनच परत पाठवून द्यायची.

कपाटात ठेवला होता मृतदेह

मंगळवारी (14 मार्च) महिलेचा भाचा (संबंधित भावाचा मुलगा) आपल्या आत्याची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी गेला होता.

पण त्यालाही त्याच्या आतेबहिणीने परत पाठवून दिलं. पण तरुणीच्या अशा विचित्र वागण्यामुळे तिच्या मामेभावाला संशय आला. त्याने थेट काळाचौकी पोलीस चौकी गाठून घटनाक्रम कथन केला.

संबंधित तरुणाच्या तक्रारीवरून काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संबंधित तरुणीला दरवाजा उघडण्यास सांगितलं.

पोलीस घरामध्ये प्रवेश करण्याची परवानगी मागत असतानाही तरूणी आपली आई झोपली आहे, असंच कारण त्यांना सांगत होती.

पण, अखेरीस पोलीस संबंधित फ्लॅटमध्ये शिरले. आत शिरताच पोलिसांना घरात दुर्गंधीचा दर्प आला. संपूर्ण घराची झडती घेतली असता मानवी मृतदेह वेगवेगळ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये तुकडे करून भरून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आला.

मृतदेहाच्या तुकड्यांना किड्यांचा प्रादुर्भाव होऊन ते कुजलेल्या अवस्थेतही होते.

यानंतर पोलिासांनी घटनास्थळी केईएम रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह फॉरेन्सिक विभागाचं पथकही बोलावलं.

सर्व मानवी अवयवांचा पंचनामा करण्यात आला आहे. तसंच मृतदेहाचं शवविच्छेदनही करण्यात येत आहे.

तरुणीची उडवाउडवी

मृतदेह बराच काळ ठेवल्यामुळे कुजलेल्या अवस्थेत होता आणि त्यातून प्रचंड दुर्गंधही येत होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन केईएम रुग्णालयात पाठवून दिला.

तरुणीकडे याबाबत चौकशी केली असता, याबाबत मला काही माहीत नाही, असं म्हणत तिने उडवाउडवीची उत्तरे दिली.

महिलेचा मृतदेहाचे तुकडे सुमारे तीन महिन्यांपासून पडून असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

संबंधित तरूणी इतके महिने मृतदेहासोबत राहत होती. शिवाय, बराच काळ ती घराबाहेरही पडलेली नव्हती.

पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती प्रवीण मुंढे यांनी माध्यमांना दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)