You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राजा ठाकूर: ठाण्याला हादरवणारे हत्या प्रकरण ते संजय राऊतांकडून 'सुपारी घेणारा गुंड' असा उल्लेख
गोष्ट 2007 ची. नगर सेवक देविदास चौगुले आपल्या भागात नव्याने तयार होणाऱ्या मंदिरात होणाऱ्या एका कार्यक्रमासाठी मंडपाची पाहणी करत होते.
नवी मुंबईच्या ऐरोलीतील साईनाथवाडीत 20 नोव्हेंबर 2007 ला या मंदिराचे उद्घाटन होणार होते. म्हणजेच देविदास यांच्या वाढदिवसालाच. पण त्याआधीच, अज्ञात हल्लेखोराने येऊन देविदास यांच्या छातीत पाच गोळ्या घातल्या आणि देविदास तिथेच गतप्राण झाले.
नवी मुंबईचे तत्कालीन पोलीस कमिश्नर रामराव वाघ यांनी त्यावेळी सांगितलं होतं की प्रथमदर्शनी या हत्येचा कुठलाही हेतू दिसत नाही. ही हत्या वैयक्तिक हेव्यादाव्यातून किंवा शत्रुत्वातून झाल्याचा अंदाज आहे.
या प्रकरणाचा ठपका पाच जणांवर आला. पोलिसांनी या प्रकरणात दीपक पाटील, इकलाख शेख, साजिद जुबेर बंगाली, रविद्र घारे, शिवकुमार सिंग या पाच जणांना अटक केली होती.
पुढे या आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका देखील झाली.
चार वर्षांनंतर...
कळव्यातील विटावा ब्रिजजवळून दीपक पाटील आपला मित्र किरण चौरे यांच्यासोबत स्कॉर्पियोतून जात होते. एका जीप विरुद्ध दिशेनी आली आणि त्या जीपने दीपक पाटील यांची कार थांबवली. त्यातून चार जण बाहेर उतरले आणि त्यांनी तलवार, रॉड काढून दीपक पाटील यांच्यावर हल्ला करण्यात आला असे हिंदुस्तान टाइम्सने म्हटले होते.
या हल्ल्याने भांबावून दीपक पाटील हे त्या ठिकाणाहून पळ काढत होते त्यावेळी अतुल देशमुख ऊर्फ बाटली या गुंडाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्या हल्ल्यात दीपक पाटील यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात किरण चौरेदेखील जखमी झाले होते.
या प्रकरणात अतुल देशमुख उर्फ बाटली, रविचंद उर्फ राजा ठाकूर, जयदीप साळवी, सुजित सुतार आणि राजा गवारी यांच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला.
ज्या कारमधून आरोपी उतरले आणि त्यांनी हल्ला केला ती कार चालवत होता राजा ठाकूर. या प्रकरणातील मुख्य आरोपी हा सुजित सुतार होता. दीपक पाटील आणि सुतार यांच्यात वैमन्यस्य होते.
गेल्या काही काळात त्यांचे नात्यात सुधारणा होऊ लागली होती पण सुतारचं म्हणणं होतं की दीपक पाटीलने वाळू पुरवण्याच्या व्यवसायात आपल्याला भागीदार करून घ्यावे.
याला पाटीलने नकार दिला आणि त्यानंतर त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. हे तेच दीपक पाटील ज्यांच्यावर देविदास चौगुलेच्या हत्येचा आरोप झाला होता आणि त्यातून त्यांची निर्दोष सुटका झाली होती.
ठाणे आणि नवी मुंबईत बिल्डर, मटेरिअल सप्लायर, कंत्राटदार यांच्यात व्यावसायिक कारणाने नेहमीच वाद-विवाद होताना दिसतात आणि ते विकोपाला गेले की त्याचं रूपांतर वैमनस्यात होऊन हिंसेच्या घटना देखील घडत असल्याची अनेक उदाहरणं आहेत.
या सर्व घटनाक्रमाची उजळणी करण्याचे निमित्त आहे. एक नाव. रवीचंद ठाकूर उर्फ राजा ठाकूर.
मुख्यमंत्र्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला जीवे मारण्यासाठी राजा ठाकूरला सुपारी दिली असे पत्र शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी लिहिले.
संजय राऊत यांनी राजा ठाकूर यांचे नाव घेतल्यानंतर सोशल मीडिया, माध्यमं या ठिकाणी सर्वत्र राजा ठाकूर कोण आहे याबद्दल चर्चा होताना दिसत आहे. राजा ठाकूरनी विविध माध्यमांना मुलाखती दिल्या आणि संजय राऊत यांनी विनाकारण आपली बदनामी केल्याचे म्हटले. राजा ठाकूरची पत्नी पूजा ठाकूर यांनी संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार देखील दाखल केली.
राजा ठाकूरनी आपला संजय राऊत यांना धमकी देणे किंवा त्यांना मारण्याबद्दलचा कट या प्रकाराशी काहीही संबंध नसल्याचे माध्यमांना पुन्हा पुन्हा सांगितले आहे पण गुन्हेगारी पार्श्वभूमीची छाया त्यांच्या वर्तमानकाळावरही पडलेली दिसत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धेचे आयोजन
राजा ठाकूरला दीपक पाटील हत्याप्रकरणात कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजा ठाकूर पुन्हा पोलिसांसमोर हजर न होता, तो फरार झाला.
यानंतर ऑक्टोबर 2019 मध्ये ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने येऊरच्या साई ढाबा येथे सापळा रचून राजा ठाकूरला बेड्या ठोकल्या. त्यानंतर पुन्हा राजा ठाकूरला जामीन मिळाला आणि आता तो सध्या बाहेर आहे.
काही दिवसांपूर्वी ठाण्यात एकनाथ शिंदे पितापुत्रांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठाकूर याने भव्य कबड्डी सामान्यांचे आयोजन करत शहरभर शिंदे यांना शुभेच्छा देणारे बॅनरही लावले होते, असे लोकसत्ताने म्हटले आहे.
संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार
2017 मध्ये ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत राजा ठाकूरच्या पत्नी पूजा ठाकूर या निवडून आल्या होत्या.
त्यावेळी मी उद्धव ठाकरे यांच्यावतीनेच निवडणूक लढले आणि जिंकले होते पण आता शिंदे आणि ठाकरे असे दोन गट पडल्यानंतर मला आणि माझ्या पतींना शिंदे गटांचं समर्थक म्हटले जात आहे.
याआधी या लोकांना गट-तट आठवले नाही का असा सवाल पूजा ठाकूर यांनी संजय राऊतांना केला.
राजा ठाकूरला गुंड संबोधल्याने पत्नी पूजा ठाकूर यांनी कापूर बावडी पोलीस स्टेशनमध्ये संजय राऊतांविरोधात तक्रार दिली आहे.
त्यानंतर माध्यमांशी बोलताना पूजा ठाकूर यांनी सांगितलं की, “संजय राऊतांनी माझ्या पतीला गुंड संबोधित केल्याने तक्रार दाखल केली. माझ्या पतीला गुंड बोलणारे संजय राऊत कोण आहेत. त्यांच्याकडे काय पुरावा आहे. कोणीतरी तुम्हाला संपर्क केली आणि तुम्ही वक्तव्य करत आहात, त्याला अर्थ नाही.”
राजा ठाकूर हे श्रीकांत शिंदेंचे निकटवर्तीय असल्याचे वारंवार माध्यमात म्हटले जात आहे. याबाबत बोलताना पूजा ठाकूर म्हणाल्या, लोकांच्या कामानिमित्त माझं किंवा माझ्या पतींचं श्रीकांत शिंदेंशी भेटणं किंवा बोलणं होतं. याचा अर्थ असा नाही की आम्ही कुणाविरोधात कट करत आहोत.
एबीपी माझाशी बोलताना राजा ठाकूर यांनी म्हटले होते की श्रीकांत शिंदेंकडे काय एवढंच काम आहे का, कुणाची सुपारी देण्याचं. संजय राऊत यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही आपण त्यांच्याविरोधात तक्रार करणार आहोत.
संजय राऊतांनी पत्रात काय म्हटलंय?
संजय राऊत यांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, "गेली 40 वर्षे मी सार्वजनिक जीवनात आहे. राजकारणाबरोबर पत्रकारिता करत आहे. मला अनेकदा ठार मारण्याच्या धमक्या येत असतात व तसे प्रयत्नही झाले.
"मी आज आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की, माझ्यावर हल्ला करण्याचा कट ठाण्यात शिजल्याची माहिती अत्यंत विश्वसनीयरीत्या समजली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील एक गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली असून, मला समजलेली ही माहिती अत्यंत जबाबदारीने आपल्या निदर्शनास आणत आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)