टाइम ट्रॅव्हल: आपण भूतकाळात जाऊन इतिहासातील आवडत्या व्यक्तीला भेटू शकू का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
- Role, शब्दांकन: गुलशनकुमार वनकर, बीबीसी मराठी
28 जून 2009. इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठात एका रूममध्ये एका पार्टीला सुरुवात होणार. सगळीकडे फुगे लावले आहेत, फुलांचा सुगंध दरवळतोय, शँपेनच्या बाटल्या उघडल्या जात आहेत, पण पाहुणे अजून कुणीच आले नव्हते. ज्यांनी ही पार्टी आयोजित केली होती ते स्टीफन हॉकिंग वाट पाहतच राहिले. पण कुणीच आलं नाही. का?
याच रूमच्या एका कोपऱ्यात टांगलेल्या एका बॅनरवर काही खुणा सापडतात – Welcome Time Travellers, असं त्यावर लिहिलंय.
जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी या पार्टीचं निमंत्रण कुणालाच दिलं नव्हतं... त्या क्षणापर्यंत. ते दुसऱ्या दिवशी या पार्टीसाठीचं निमंत्रण पाठवतात, ज्यात ते म्हणतात, जर कुणी टाईम ट्रॅव्हलर असेल तर भूतकाळात येऊन माझ्या या पार्टीमध्ये भेटा.
पण या पार्टीला कुणीच आलं नाही, याचा अर्थ काय काढावा? भविष्यात कुणी या पार्टीला जाऊ शकेल का, तेही भूतकाळात जाऊन?
या लेखात आपण हाच गोंधळ सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत, की खरंच आपण भविष्यात किंवा भूतकाळात जाऊ शकतो का? विविध संशोधकांनी काय अभ्यास केला आहे आणि त्यातून काय समोर आलं आहे हे आपण पाहू.
लेखक आणि संशोधक जेम्स ग्लेक सांगतात की, 'मला टाईम ट्रॅव्हलच्या गोष्टी खूप आवडतात, कारण त्यात काही ना काही वेगळाच ट्विस्ट असतो.'
ग्लेक हे विज्ञान-तंत्रज्ञानाचे लोकप्रिय लेखक आहेत. टाईम ट्रॅव्हल म्हणजेच भूतकाळात किंवा भविष्यात जाता येणं, ही संकल्पना त्यांना इतकी भारी वाटली की त्यांनी त्यावर एक पुस्तकच लिहिलं आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे : Time Travel – A History.
टाइम ट्रॅव्हलची संकल्पना केव्हा अस्तित्वात आली?

फोटो स्रोत, Getty Images
ग्लेक सांगतात, " आपल्याला वाटतं तितकी टाइम ट्रॅव्हलची संकल्पना प्राचीन नाही. म्हणजे ग्रीक पुराणांमध्ये, शेक्सपीअरच्या नाटकांमध्ये याचा उल्लेख असावा, अशी एक आपली समजूत असते पण नाही. ही संकल्पना अगदीच ताजी आहे, 1895 मध्ये एच.जी वेल्स यांनी त्यांच्या The Time Machine या पहिल्या कादंबरीत याचा उल्लेख केला. आपण असं म्हणू शकतो की त्यांनीच संकल्पनेचा शोधच लावला."
वेल्स यांच्या या कादंबरीत एक टाईम ट्रॅव्हलर एका अशा यंत्राचा शोध लावतो ज्याने तो हजारो वर्षं पुढे भविष्यात जाऊ शकतो. तो पृथ्वीचा अंत कसा होईल, त्याची दृश्यं पाहून मग वर्तमानात परततो.
वेल्स यांच्या आधीही जगभरात अशा अनेक कहाण्या होत्या, ज्यात एखादी व्यक्ती गाढ झोपी जाऊन अचानक एका वेगळ्याच कालखंडात जागी व्हायची. पण असं करायला एखादं यंत्र बनवता येईल, याची कल्पना 19व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत कुणीच केली नव्हती. असं का? तर याचं उत्तर त्या काळात दडलंय जेव्हा The Time Machine हे पुस्तक आलं होतं.
ग्लेक या बद्दल सांगतात, "कल्पना करा की आपण आज एका टाईम मशीनमध्ये बसून 16व्या शतकातल्या इंग्लंडमध्ये पोहोचतो. तिथे दिसेल त्या पहिल्या शेतकऱ्याला विचारतो, की तुम्ही जे आयुष्य जगत आहात त्या पेक्षा तुमच्या येणाऱ्या पिढीचं आयुष्य निराळं कसं असेल, याविषयी तुमच्या काय कल्पना आहेत. त्यांना वाटेल की आपण मूर्खासारखे प्रश्न विचारतोय. कारण त्यांच्या मुलांचं आयुष्य अगदी त्यांच्या आयुष्यासारखंच असेल."
पण 19व्या शतकाच्या उंबरठ्यावर, जेव्हा HG वेल्स ते पुस्तक लिहत होते, तेव्हा औद्योगिक आणि तांत्रिक प्रगती होत होती. लोकांचा जीवनमान बदलत होतं. त्यांना वीजेची जादू दिसत होती, ते उडत्या गाड्यांची स्वप्न पाहू लागले होते. लोकांना दिसत होतं की भविष्य खरंच कसं वेगळं असू शकतं.
The Time Machine हे पुस्तक त्या काळी प्रचंड गाजलं. आणि यातून इतरांनाही टाईम ट्रॅव्हल या संकल्पनेभवती स्वतःचं विश्व आणि स्वप्न उभारण्याची प्रेरणा मिळाली. सिनेमातले हिरो भूतकाळात जाऊन आपल्या चुका सुधारू लागले, भविष्याचा वेध आधीच घेऊ लागले. याचं उदाहरण म्हणजे बॅक टू द फ्युचर हा चित्रपट. पण प्रत्येकालाच टाईम ट्रॅव्हल ही संकल्पना पटली नव्हती. याबद्दल ग्लेक सांगतात की "मी माझं पुस्तक लिहीत असताना मला आठवतं, चीन सरकारने टाईम ट्रॅव्हलच्या कहाण्यांवर बंदी आणली होती. सरकारला वाटायचं की अशा गोष्टींमुळे लोक एका अशा जगाची कल्पना करू शकतात, जे प्रत्यक्ष जगापेक्षा वेगळं असेल. आणि याच गोष्टी सरकारला धोका पोहोचवू शकतात." पर्यायी जगाचा विचार काहींना आनंद देणारा असतो तर काहींना अस्वस्थ करणारा. पण मग सिनेमा आणि पुस्तकांमध्ये सांगितल्याप्रमाणे टाईम ट्रॅव्हल खरंच शक्य आहे का?
भौतिकशास्त्रज्ञ का नाकारत नाही ही संकल्पना?
ग्लेक म्हणतात, की "आपण आजही 100 सायन्स फिक्शन लेखकांना हा प्रश्न विचारलात तर मला वाटतं त्यांच्यापैकी जवळजवळ सर्वांचं मत हेच असेल की ही फक्त एक सुंदर कल्पना आहे, एक फँटसी आहे. दुसरं काही नाही. पण तुम्ही जर शंभर भौतिकशास्त्रज्ञांना हाच प्रश्न विचारला तर त्यांच्यापैकी नक्कीच अनेक जण तुम्हाला सांगतील की आतापर्यंत तरी टाईम ट्रॅव्हल शक्य झालेलं नाही, पण याची शक्यता नाकारताही येणार नाही."
ही एक विचित्रच विसंगती आहे. चला तर मग, काही भौतिकशास्त्रज्ञांनाच विचारू या.
हे समजून घेण्यासाठी आपण नताशा हर्लीवॉकर यांची मदत घेऊ. लहानपणी वाचलेल्या पुस्तकांनीच त्यांना घडवलं. आज त्या ऑस्ट्रेलियाच्या पर्थमधील कर्टिन युनिव्हर्सिटीमध्ये Radio astronomer आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
नताशा सांगतात, "मी स्टीफन हॉकिंग्सचं A Brief history of Time वाचलं, तेव्हा मी 9 वर्षांची असेन. त्यातल्या बारीकसारीक गोष्टी मला कळत नव्हत्या. आणि त्यातून मला जाणवलं की आपलं विश्व कसं काम करतं. हे आपल्या सायन्स फिक्शनपेक्षा किती-किती वेगळं आहे. मला त्याविषयी कुतूहल निर्माण झालं. हे सगळं कसं काम करतं, मला आणखी जाणून घ्यायचं होतं."
आपल्याला खरंतर हे समजून घ्यायचंय की आपण खरंच वेळेत मागेपुढे जाऊ शकतो का. पण वेळ म्हणजे नेमकं काय, हे आधी समजून घ्यावं लागेल.
त्या पुढे सांगतात, "आपल्याला आपल्या जगाचे तीन डायमेन्शन माहिती आहेत. तुम्ही वर-खाली, मागेपुढे आणि उजवीकडे-डावीकडे जाऊ शकता, त्याविषयी लोकांना सांगू शकता. आणि त्यात होणारे बदल वेळेत पुढेच होत जातात. म्हणजे एखादं भांडं फुटलं तर तुम्ही ते पुन्हा मागे जाऊन जोडू नाही शकत."
पण शास्त्रज्ञ वेळेलाही एका वेगळ्या डायमेन्शनप्रमाणे वागवू लागले, ज्याला मोजता येतं. जणुकाही आपण एका 4D जगात राहतोय. पण इथेच एक मोठा प्रॉब्लेम येतो, प्रकाशाचा प्रॉब्लेम.
18व्या शतकाच्या सुरुवातीला, जेम्स मॅक्सवेल नावाच्या एका स्कॉटिश शास्त्रज्ञाने दावा केला की प्रकाश अर्थात लाईट एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहर आहे. पण जर लाईट एक लहर असेल, तर तिचा एक ठराविक वेग असेल, जो प्रत्येक माध्यमात बदलेल.
नताशा सांगतात, "समजा तुम्ही एक बॉलर आहात, तुम्ही धावून येता आणि बॉल फेकता. अशावेळी तुमचा वेग आणि तुम्ही ज्या वेगाने बॉल फेकलाय, अशा दोन्ही वेगातून त्या बॉलचा अंतिम वेग ठरतो. पण असंच जर तुम्ही धावताना हाती एक टॉर्च घेतला आणि तो ऑन केला, तर त्यामुळे त्या टॉर्चमधून बाहेर पडणाऱ्या प्रकाशकिरणांचा वेग जास्त असायला हवा. पण असं होत नाही."
याचं कारण म्हणजे लाईट किंवा प्रकाश नेहमी एकाच वेगानेच प्रवास करतो.
नताशा यांच्यानुसार कित्येक लोक अनेक दशकं हाच प्रयोग करून पाहत होते. पण त्यांना लाईटच्या वेगात कुठलाच बदल आढळत नव्हता. तेव्हा त्यांनी असा निष्कर्ष काढला की विश्वात एक गोष्ट स्थिर आहे ती म्हणजे वेळ नाही तर वेग. प्रकाशाचा वेग. Speed of Light.
तुम्ही शाळेत हा फॉर्म्युला शिकला असालच – Speed = Distance / time अर्थात एकूण अंतराला वेळाने भागलं की वेग कळतो. जर इथे तुम्ही हे समजायला गेलात की टाईम अर्थात वेळ कसा काम करतो तर ते गोंधळात टाकणारे होईल. कारण जर आपण टॉर्च हाती घेऊन धावत असू, आणि वेग तर बदलत नाही, म्हणजे याचा अर्थ वेळ आणि अंतर बदलायलाच हवं. त्यातूनच एक नवीन संज्ञा जन्माला आली – स्पेसटाईम.
तुम्ही म्हणाल आता ही काय भानगड? यामुळे फक्त तुमचाच गोंधळ उडतोय, असं नाही. सगळ्यांचंच असं होतं. आता कल्पना करा की तुमच्या हाती एक घड्याळ आहे. आणि तुमच्या मित्राच्याही हातात दुसरं एक घड्याळ आहे. दोन्ही घड्याळांचे ठोके एकाच वेळी एकसारखेच वाजतायत.
पण जर तुम्ही खूप वेगाने प्रवास करू लागलात, अगदी प्रकाशाच्या वेगाने तर तुम्हाला दिसेल की तुमच्या हातातलं घड्याळ मंदावतंय. खरंतर त्यात वेळ बदललेला नाहीय.

फोटो स्रोत, Getty Images
पण तुम्ही जितक्या वेगाने प्रवास कराल, अगदी प्रकाशाच्या वेगापर्यंत तितकं ते घड्याळ मंदावेल, आणि एक क्षण असा येईल की ते थांबलेलं दिसेल. प्रकाशाचा एक कण अर्थात फोटॉनसाठी हे सगळं एका क्षणात होतंय. म्हणजे एकाच क्षणी तो फोटॉन सूर्यातून बाहेर पडून, अंतराळातून कोट्यावधी किलोमीटरचा प्रवास करून पृथ्वी गाठतोय. हे सगळं चक्रावून टाकणारं आहे.
थकलात ना? मी पण! जर तुम्हाला जरा विश्रांती घेऊन हे सगळं समजून पुढे जायचं असेल तर मीसुद्धा जरा श्वास घेऊन घेतो. पण नताशा सांगतात की फक्त वेळच नाही तर गणितही तितकंच गोंधळवणारं आहे.
नताशा सांगतात की एखाद्या मोठ्या ग्रहाच्या प्रभावात किंवा ब्लॅकहोलमुळे टाईमस्पेसची भक्कम संकल्पनाही विरघळू शकते.
नताशा सांगतात, "आपल्या आयुष्यात याने फार काही फरक पडत नाही. पण आपल्या तंत्रज्ञानात यामुळे फरक पडतो. ज्या उपग्रहांचा वापर आपण टेलेकम्युनिकेशनसाठी करतो, ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या खूप बाहेर असतात. तरीही ते सतत पृथ्वीभवती फिरून आपलं लोकेशन शोधण्याचा प्रयत्न करत असतात. यासाठी त्यांना दर दोन मिनिटांनी स्वतःची वेळ ॲडजस्ट करावी लागते, नाहीतर ते काही मायक्रोसेकंदांनी मागेपुढे होत जातात आणि आपलं काम अचूकपणे करू शकत नाही."
म्हणजे वेळ प्रत्येक गोष्टीसाठी एकसारख्याच वेगाने नाही सरकत. याचा फायदा घेऊन आपण काही क्षण स्किप करून पुढे वा मागे जाऊ शकतो का?
तुम्ही कधी टाइम मशीन बनवलं आहे का?
प्रो. केटी मॅक या एक संशोधक आहेत. त्यांनी नेहमीच स्वतःसमोर मोठी उद्दिष्टं ठेवली आहे. स्वतःला आव्हान देणं त्यांना आवडतं. आज त्या North Carolina State University मध्ये Theoretical Astrophysicist म्हणून काम करतात.
त्या सांगतात, "मी कधी टाईम मशीन बनवायचा प्रयत्न नाही केला. पण हो, मी एक telekinesis (टेलेकिनेसिस) बनवायचा प्रयत्न नक्कीच केला. फक्त विचार करून वस्तू सरकवता आल्या तर किती मज्जा येईल, या कल्पनेने मला वेड लावलं होतं. पण मला त्यात कधी यश आलं नाही."
टाइम मशीनबाबत त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला, की जर वेळ प्रत्येक गोष्टीसाठी एकसारख्याच वेगाने नाही सरकत, तर मग मानवासाठीही तो वेगवेगळा असू शकतो का?
म्हणजे पृथ्वीभवती वेगाने प्रदक्षिणा घालणाऱ्या International Space Station मधल्या अंतराळवीरांना वेळ वेगळा जाणवतोय का? त्यांच्या वयात काही फरक पडतोय का?
याचं उत्तर त्या देतात, "हो खरंतर. सगळ्या गोष्टींचा विचार केला तर कळतं की त्यांचा वेळ आपल्या वेळापेक्षा जरा संथगतीने पुढे जातोय. जर तुम्ही त्या अंतराळ केंद्रात वर्षभर राहिला तर तुमच्या पृथ्वीवरील वयापेक्षा तुमचं तिथलं वय साधारण 10 मिलिसेकंद कमी राहिलं असतं. म्हणजे फार काही नाही."
चित्रपटांमध्ये तर सरळ अनेक वर्षं किंवा शतकंही आपण पुढे मागे जातो असं दाखवलं जातं, ते कसं सैद्धांतिक स्तरावर कसं शक्य होऊ शकतं?
याबद्दल केटी सांगतात, यासाठी सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला प्रचंड वेगाने दीर्घकाळ प्रवास करावा लागेल. म्हणजे जर तुम्ही एका रॉकेटमध्ये बसून जवळजवळ प्रकाशवेगाने पृथ्वीपासून दूर जाल, आणि मग मागे वळून परत पृथ्वीवर याल, तर मग तुमच्या या यात्रेच्या वेळेपेक्षा जास्त वेळ पृथ्वीवर लोटून गेला असेल.
म्हणजे केटी म्हणतायत की जो काळ तुमच्यासाठी 10 वर्षांचा असेल तो पृथ्वीवर 100 वर्षांचा असू शकतो. म्हणजे भविष्यात प्रवास करणं सैद्धांतिकदृष्ट्या शक्य आहे. पण प्रत्यक्षात?
केटी पुढे सांगतात, "आपल्याकडे आज असलेले रॉकेट्स पाहता, आपण अजूनही या शक्यतेपासून बरंच दूर आहोत. म्हणजे आज आपल्याकडे असलेल्या रॉकेटने सूर्यापर्यंत जाऊन परत यायलाही एक लाख वर्षं लागू शकतात. हा खूप मोठा काळ आहे. यात अनेक धोकेही आहेत – म्हणजे इतक्या लांबच्या प्रवासादरम्यान अपघातांची शक्यताही वाढते.

फोटो स्रोत, Getty Images
केटी सांगतात की याला आणखी एक पर्याय आहे – की आपण ब्लॅकहोलपर्यंत प्रवास करून, तिथे काही वर्षं घालवून परत यावं. कारण तिथेही आपला वेळ पृथ्वीच्या तुलनेत मंदावलेला असेल.
जर आपण याचा तुलनात्मक अभ्यास केला तर हा पर्याय आपल्याला त्यातल्या त्या सुरक्षित वाटू शकतो.
त्याबद्दल काय करता येईल असं विचारलं असता केटी सांगतात, "हे करता येईल. पण याचेही विचित्र धोके आहेत. जर तुम्ही ब्लॅक होलच्या खूप जवळ गेलात तर तिथे गुरुत्वाकर्षण इतक्या झपाट्याने बदलतं की तुमच्या शरीर विद्रुप होऊ शकतं. म्हणजे जर तुम्ही पायाकडून ब्लॅक होलच्या दिशेने गेलात तर तुमचे पाय तुमच्या डोक्यापेक्षा जास्त ओढले जातील. याला spagettification म्हटलं जातं."
हे भयंकर वाटत असलं तरी हेच टाईम ट्रॅव्हलचे पर्याय असल्याचं केटी सांगतात. आणि त्यातही तुम्ही फक्त पुढे जाऊ शकता. मागे नाही. म्हणजे भूतकाळात मागे जाणं अशक्यच आहे. खरंच?
आपण भूतकाळात जाऊ शकतो का?
डॉ. ल्यूक बुचर एडिनबरा विद्यापीठात theoretical Physicist आहेत. आपण काळात मागे जाऊ शकतो का, याचा शोध घेणंही त्यांच्या कामाचाच एक भाग आहे.
ते म्हणतात "लहानपणी पाहिलेला Back to the Future मला आजही आठवतो. मला तो पिक्चर खूप आवडला होता. काय भारी टाईम मशीन होतं त्यात."
त्यांच्या कामाची कल्पना येण्यासाठी थोडंस सविस्तर सांगतो की कल्पना करा तुम्ही एक चित्र काढत आहात, एक कण इकडून तिकडे प्रवास करतोय. तुम्ही त्यासाठी एक सरळ रेष काढाल. ल्यूक प्रयत्न करतायत की हा कण मागे वळून त्याच्या सुरुवातीच्या ठिकाणी परत जाईल. यालाच ते टाईम ट्रॅव्हल म्हणतात.
आपल्या दुसर्या तज्ज्ञांनी आपल्याला सांगितलं की एखाद्या वस्तूची वेळ स्थिरावण्यासाठी तिचा वेग खूप वाढवावा लागतो. आणि इथेच अडचण येते.
बुचर सांगतात, स्पीड ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचा वेग अख्ख्या विश्वाची वेगमर्यादा असते. आणि तो कण मागे वळवणं म्हणजे ही मर्यादा ओलांडणं, जे की शक्य नाहीय. कुठल्याच सामान्य ठिकाणी हे शक्य नाहीय.
म्हणजे एका नॉर्मल स्पेसमध्ये काळात मागेपुढे जाणं शक्य नाहीय. पण जर स्पेसटाईमचा आकारमान वेगळा असेल तर हे शक्य होईल का? ल्युक यांच्यासारखेच काही स्पेस सायन्टिस्ट याचाच विचार करतायत. हे कसं शक्य होईल, यासाठी ते वेगवेगळे गणितातले इक्वेशन लिहून पाहतात.

फोटो स्रोत, Getty Images
स्पेसटाईम प्रत्यक्षात नसतं. ती आपल्या डोक्यातली एक संकल्पना आहे. पण तिच्या मदतीने आम्ही काही महत्त्वाचे प्रश्न विचारू शकतो, जसं की कुठल्या पदार्थात, कुठल्या माध्यमात आपण स्पेसटाईमची आपल्या सोयीनुसार मोडतोड करू शकतो का.
ल्यूक यांनी संशोधनातून वर्महोल नावाच्या आकारासाठीचं गणिती सूत्र बनवलंय. 1939 मध्ये आईन्स्टाईन आणि नॅथन रोझन यांनी सर्वांत आधी याच आकाराची संकल्पना मांडली होती.
ही म्हणजे एक अशी ट्यूब जिचं एक टोक एका स्पेसटाईममध्ये आहे तर दुसरं टोक दुसऱ्या स्पेसटाईममध्ये. म्हणजे ही ट्यूब एका ठिकाणाहून किंवा वेळेतून दुसऱ्या ठिकाणी किंवा वेळेत जाण्यासाठीचा एकप्रकारचा शॉर्टकट असेल. सायन्स फिक्शन सिनेमा आणि नॉव्हेल्समध्ये अशा वर्महोल्सचा वारंवार उल्लेख होत राहिलाय. पण अशी गोष्ट खरोखरंच अस्तित्वात असण्याची शक्यता फारच कमी असते.

फोटो स्रोत, Getty Images
बुचर सांगतात, "जेव्हा तुम्ही हे प्रमेय सोडवू पाहता तेव्हा एका ठिकाणी नेमके अडकता, ज्यामुळे हे वर्महोल असण्याची, ते खुलं असण्याची शक्यता नाहीशी होते. कारण अशा स्पेसटाईमला खुलं राहायला निगेटिव्ह एनर्जी लागते. आता निगेटिव्ह एनर्जी म्हणजे काय, तर कल्पना करता येईल अशी सर्वांत कमी ऊर्जा. म्हणजे जर मी एका काळोख्या खोलीत बसलोय, जिथे वीज नाहीय, उजेड नाहीय. तर तिथेही ऊर्जा असतेच.
भौतिकशास्त्रज्ञांनुसार स्वतःचं वजन असलेल्या प्रत्येक वस्तूला ऊर्जा असते. म्हणजे निगेटिव्ह एनर्जी आणायला तुम्हाला खोलीतल्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक कण काढून घ्यावा लागेल. आणि त्यासाठी ल्यूक यांना फिजिक्सच्या दुसऱ्याच एका शाखेचा आधार घ्यावा लागेल – क्वांटम मेकानिक्स.
क्वांटम मेकानिक्समध्ये जर एखाद्या ठिकाणी कडेकोट व्हॅक्यूम तयार करण्यात यश आलं, आणि त्यातूनही काही ऊर्जेचे कण काढून घेता आले, तर त्याची एनर्जी ही सैद्धांतिकदृष्ट्या व्हॅक्यूमपेक्षाही कमी असेल.

फोटो स्रोत, Getty Images
आणि एवढं सगळं केल्यावर वर्महोलचं काय होईल? असं विचारलं असता, बुचर सांगतात, "वर्महोल लगेच कोसळतं. पण तुम्ही या वर्महोलमधून एखादा मेसेज पाठवू शकाल. लाईटच्या रूपातला सिग्नल खरंतर या वर्महोलमधून जायला हवा तत्त्वतः"
म्हणजे हेही अवघडच आहे. म्हणजे आपलं इतिहासात जाऊन शेक्सपिअर किंवा शिवाजी महाराजांना भेटायचं स्वप्न कदाचित पूर्ण होणार नाही का? इतिहासात मागे जाता येईल की नाही?
यावर बुचर यांचं उत्तर असं आहे की तुम्ही एक तासही मागे जाऊन स्वतःला नाही भेटू शकणार. पण हे होऊच शकत नाही, असं गणितातून तरी अद्याप सिद्ध झालेलं नाही. त्यामुळेच हे आजही एक न सुटलेलं कोडं आहे. पण हो, इतिहासात डोकावून पाहिलं की अशाच काही मूलभूत प्रश्नांमधून अनेक उत्तरं सापडतात.
यातून निष्कर्ष काय निघतो?

फोटो स्रोत, Getty Images
या तज्ज्ञांची मतं विचारात घेऊन हाच प्रश्न पुन्हा विचारू या, की टाईम ट्रॅव्हल शक्य आहे का?
आजवर टाईम मशीनसारखं काहीच अस्तित्वात आलेलं नसलं तरीही, फिजिक्स आपल्याला हे सांगतं की आपण कुठे आहोत, त्यानुसार वेळेचा वेग बदलू शकतो. जर आपण काही जोखीम पत्करू शकलो तर काही क्षण नक्कीच स्किप करून पुढे जाऊ शकतो, पण काळात मागे जाणं हे जास्त अवघड, आणि बहुदा अशक्यच मानलं जातंय. पण हो, याच उत्तराच्या शोधात आपण विश्वाच्या उत्पत्तीची इतर रहस्य उलगडू शकतोय.
आणि हो, जर कुणी टाईम ट्रॅव्हलर हा एपिसोड ऐकत असेल तर त्यांना सांगू इच्छितो, तुम्ही 2009 मध्ये नक्की जा, तिथे कदाचित इंग्लंडच्या एका खोलीमध्ये स्टीफन हॉकिंग तुमच्यासाठी शँपन घेऊन वाट पाहतायत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








