अनाथाश्रमातली मैत्री, प्रेम, ताटातूट आणि तब्बल 45 वर्षांनी एकमेकांसोबत आलेल्या जोडप्याची गोष्ट

    • Author, बीबीसी
    • Role, रेडिओ -4

आयरीन 9 वर्षांच्या असताना त्यांना इंग्लंडमधील सदरलँडच्या अनाथाश्रमात आणलं होतं. नऊ वर्षांतला हा तिसरा अनाथाश्रम होता.

आयरीन सांगतात, "माझ्या आईचा मृत्यू झाल्यामुळे मला अनाथाश्रमात राहावं लागत होतं."

त्यावेळी अॅलन 7 वर्षांचे होते. लहानग्या ॲलनने खिडकीतून आयरीनला येताना पाहिलं.

ते सांगतात, "आयरीन गाडीतून उतरली. मला ती पाहताक्षणीच आवडली."

"मी लगेचच दारात गेलो. तिने मला पाहावं या उद्देशाने मी तिच्या आजूबाजूला घुटमळत होतो."

आयरीनना ही घटना स्पष्ट आठवते. त्या सांगतात, "दरवाजाजवळ एक मुलगा वाट पाहत होता. माझ्या तो कायम लक्षात राहील. त्यानंतर आमच्यात मैत्री झाली. आम्ही संपूर्ण वेळ एकत्र असायचो."

या दोघांनीही आपापली कुटुंबं गमावली होती.

आयरीन सांगतात, "आमच्यात खूप चांगली मैत्री होती. त्यावेळी तो माझं सर्वस्व होता."

अनाथालयातील मुला-मुलींना एकमेकांशी बोलण्याची किंवा एकत्र खेळण्याची परवानगी नव्हती. पण आयरीन आणि अॅलन कधीही वेगळे झाले नाहीत.

आयरीन सांगतात, "आमची आई जिवंत असावी असं आम्हाला नेहमी वाटायचं. शिवाय इतर कुटुंबीय कुठे असतील हा विचार करून देखील आश्चर्य वाटायचं."

"आम्ही जवळच्या टेकडीवर, बनी हिलवर खेळायला जायचो. आमचा वेळ खूप छान जायचा."

"आम्ही खेळायला गुपचूप जायचो आणि वेगवेगळं परत यायचो. असे दिवस काढणं आमच्यासाठी कठीण होतं, पण आमच्याकडे काही पर्यायही नव्हता."

अ‍ॅलन म्हणतात, "तो अनाथाश्रम एखाद्या तुरुंगासारखा होता."

आयरीन सोबत घालवलेल्या क्षणांबाबत अ‍ॅलन सांगतात, "आम्ही एकमेकांसोबत कोणत्याही विषयावर बोलू शकत होतो."

एके दिवशी बनी हिलवर जाऊन अॅलनने आयरीनला प्रपोज केलं.

ते सांगतात, "मला आठवतंय त्याने मला रानफूल दिलं आणि म्हटलं, मोठं झाल्यावर मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तू माझ्याशी लग्न करशील का?"

यावर तिने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, 'हो, पण तुला थोडं थांबावं लागेल.'

"मला माहीत होतं की, आम्ही गंभीर संकटात आहोत."

अनाथाश्रमातील लोक उन्हाळ्यात मुलांना घेऊन इंग्लंडमधील नॉर्थ यॉर्कशायरमधील व्हिटबी या समुद्रकिनारी फिरायला जायचे.

त्या सहलीला गेल्यावर आपण जंगलात पळून जाऊ, असं अॅलन आणि आयरीनने ठरवलं.

मात्र अनाथाश्रमातील एका व्यवस्थापकाला याची कुणकुण लागली.

त्यांचं रहस्य उघड झालं होतं आणि व्यवस्थापक संतापले होते.

अॅलन कबूल करतात की, "मला माहीत होतं की आम्ही मोठ्या संकटात आहोत, पण त्याचे परिणाम काय होतील याची आम्हाला कल्पना नव्हती."

ते कल्पनेपेक्षा जास्त गंभीर होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी आयरीन शाळेत गेल्या तेव्हा अ‍ॅलनला घेऊन गेले होते.

जेव्हा त्यांनी विचारलं की तो कुठे गेलाय, तेव्हा त्यांनी सांगितलं की त्याला दत्तक घेतलंय.

पण ते खोटं होतं.

अॅलन सांगतात, "त्यांनी मला एका कारमध्ये बसवलं आणि शहराच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या अल्पवयीनांसाठीच्या दुसऱ्या आश्रमात नेलं."

"तो एक अतिशय वाईट अनुभव होता. मी पुन्हा एका विचित्र ठिकाणी सापडलो होतो. इथे सर्व नवीन लोक होते."

मला अपराधी वाटतं होतं. आयरीनला कसं वाटत असेल या विचाराने माझा जीव कासावीस झाला. आपण काहीतरी चुकीचं केलंय म्हणून तिला काळजी वाटत असेल का?

त्यामुळे लहानगा अॅलन नव्या घरातून पळून जाण्याचा विचार करू लागला. त्याला त्याच्या मैत्रिणीला भेटायला जायचं होतं.

तिथे कसं जायचं त्याला माहीत नव्हतं, पण त्याने प्रयत्न केला आणि तो तिथे पोहोचलाही.

हिवाळ्याचे दिवस होते. तो रात्रभर एकेठिकाणी थांबला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो आयरीनला घेऊन बसस्थानकावर गेला. तिथे त्याला पोलिसांनी अडवलं आणि घेऊन गेले.

त्याला आयरीनला बघायचं होतं. पण जेव्हा जेव्हा तो पळून जायचा तेव्हा तेव्हा त्याला परत पकडलं जायचं.

'तो सर्वात वाईट क्षण होता'

पुढे अनेक वर्ष सरली. अॅलन एका नव्या मुलीच्या प्रेमात पडला, पण त्याचं आयरीन वरचं प्रेम यत्किंचित कमी झालेलं नव्हतं. त्याच्या प्रेयसीने एकदा जिम मध्ये भेटलेल्या आयरीन नामक महिलेचा उल्लेख केला. ती किशोरवयीन असताना अनाथाश्रमात राहत होती, असं तिने अॅलनला सांगितलं.

अॅलन सांगतात, "तिचं नाव ऐकताच माझ्या अंगाचा थरकाप उडाला. मला वाटलं,की हे कसं शक्य आहे?"

अॅलन त्याच्या प्रेयसीला घेऊन जिममध्ये गेला आणि त्याने पाहिलं तर तिथे आयरीन होती.

अॅलन सांगतात, "तो सर्वोत्तम आणि सर्वांत वाईट क्षण होता."

ते दोघे नात्यात होते, भेटल्यावर त्यांना खरोखर कसं वाटलं ते शब्दात व्यक्त करू शकत नव्हते.

पण त्याच वेळी त्यांना एकत्र राहणं देखील चुकीचं वाटत होतं.

आयरीन सांगतात, "मला त्याच्यासोबत पळून जायचं होतं. मला माझी नोकरी सोडायची होती, सर्व काही सोडून पळून जायचं होतं, पण मला शक्य झालं नाही."

अॅलन सांगतात, "हे खूप कठीण होतं. त्यांना माहीत होतं की वेळ योग्य नाही."

"पण आम्हाला 100 टक्के एकत्र राहायचं होतं. आम्हाला आमच्यामध्ये कोणालाही येऊ द्यायचं नव्हतं."

पण ते दुसऱ्यांदाही वेगळे झाले.

अॅलन कामासाठी स्कॉटलंडला गेला होता. त्यामुळे आयरीनला वाटलं की तो तिला पुन्हा कधीच भेटणार नाही.

जिममध्ये झालेल्या भेटीनंतर बरीच वर्ष गेली आणि ते पुन्हा एकमेकांना भेटले.

आयरीन म्हणते, "मी माझी गाडी घेऊन शहराच्या चौकातून निघाले होते इतक्यात मला अॅलन दिसला."

"तो परत आलाय हे मला समजलं, त्यामुळे मी त्याला शोधणार होते."

तीन महिने त्यांनी एकमेकांचा शोध घेतला.

अॅलन रोज दुकानात जायचे आणि एक-दोन तास आयरीनला शोधण्याचा प्रयत्न करायचे.

'दरवर्षी ते गायब व्हायचे'

10 मे 2004 रोजी पहाटे 1 वाजता त्यांना वेगळं होऊन 45 वर्ष पूर्ण झाली होती. आणि त्याच वेळेस बरोबर पंचेचाळीस वर्षानंतर आयरीनला अॅलन रस्त्यात दिसले.

त्या सांगतात, "मी त्याला मोठ्याने हाक मारली. मला पाहताच तो माझ्याकडे धावला आणि मला उचलून घेतलं. यावेळी तो म्हणाला, मी आयुष्यभर या स्त्रीवर प्रेम केलंय. मी हिला परत माझ्यापासून वेगळं होऊ देणार नाही."

अॅलन सांगतात, "तो क्षण फार भावनिक होता."

"गेलेली सर्व वर्ष मागे सोडून आम्ही पुन्हा टेकडीवर गेली."

ते मोठ्याने ओरडत आयरीनला सांगत होते की, "आज आपण मुक्त आहोत. आपल्याला एकत्र राहता येईल."

समोर लोक जमले होते तरीही त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली.

त्या क्षणी त्यांना संपूर्ण जग बदलल्यासारखं वाटतं होतं.

अॅलन सांगतात, "आम्ही जे काही अनुभवत होतो ते असून नसल्यात जमा होतं, आमच्या आयुष्याला अर्थ उरला नव्हता. पण आता आम्ही पुन्हा एकत्र आलो होतो."

आयरीन सांगतात, "आम्ही एकत्र जेवण केलं आणि रात्रभर गप्पा मारल्या. आमच्या आयुष्यात काय काय घडलं हे सगळं आम्ही एकमेकांना सांगितलं."

"आणि तेव्हापासून आम्ही कधीही बोलणं थांबवलं नाही," असं अॅलन सांगतात.

बालपणीची मैत्री लवकरच प्रेमसंबंधात बदलली.

2007 मध्ये त्यांनी बनी हिलवर लग्न केलं. याच ठिकाणी अॅलन यांनी आयरीन यांना प्रपोज केलं होतं.

त्यांच्या हनिमूनसाठी ते व्हिटबीला गेले.

आयरीन म्हणतात, आता आयुष्य खूप 'सुंदर' आहे.

"माझ्या कुटुंबाला अॅलन आवडतात."

यावर ॲलन म्हणतात, "मलाही एक नवं कुटुंब मिळालं आहे."

"ज्या दिवशी आम्ही पुन्हा भेटलो, तेव्हा मला घर असल्याची जाणीव झाली."

आम्ही आजही मजामस्ती करतो, आम्ही एकमेकांना हसवतो. अॅलन म्हणतात, हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ आहे.

"हे अगदीच अद्भुत आहे... ज्या दिवशी आम्ही पुन्हा भेटलो त्या दिवशी माझं आयुष्य पुन्हा सुरू झालं."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)