You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अनेक जोडप्यांना दुसरं मूल होण्यात अडचणी का येतात? जाणून घ्या कारणं आणि उपचार
- Author, सुमनदीप कौर
- Role, बीबीसी पंजाबी
"आम्ही नवीन घरात राहायला गेल्यानंतर काही दिवसांत मी गर्भवती राहिले. तेव्हा माझ पहिलं मूल सहा वर्षांपेक्षा जास्त वयाचं होतं. सगळे खूप आनंदात होते. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. आठ महिन्यांची गर्भवती असताना माझा गर्भपात झाला."
या भावना व्यक्त करताना रेखा यांनी त्यांची दुसऱ्या मुलाला जन्म देण्याच्या सगळ्या आशा संपुष्टात आल्या असल्याचं सांगितलंय.
दिल्लीत राहणाऱ्या रेखा आणि त्यांच्या पतीला दोन मुलं हवी होती. पण त्यात त्यांना यश आलं नाही. रेखा तीनवेळा गर्भवती राहिल्या. पण प्रत्येकवेळी त्यांना गर्भपाताचा सामना करावा लागला.
"या दरम्यानच्या काळात आम्ही अनेक डॉक्टरांना भेटलो आणि त्यांनी सांगितलेल्या सर्व चाचण्याही करून घेतल्या," असं त्या म्हणाल्या.
"रिपोर्ट्स पाहिल्यानंतर डॉक्टरांनी सर्व काही ठीक असून कोणतीही शारीरिक समस्या नाही असं सांगितलं. पण 2018 मध्ये 8 महिन्यांनंतर गर्भपात झाल्यानंतर मी आशा सोडून दिली," असं रेखा यांनी सांगितलं.
पण समस्या केवळ रेखा यांच्यापुरतीच मर्यादित नाही. सध्याच्या काळात विशेषतः शहरी भागात, असे प्रकार वारंवार समोर येत आहेत.
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीननं अलिकडेच केलेल्या अभ्यासातून असं दिसून आलं की, गेल्या काही वर्षांपासून भारतात दुसऱ्या अपत्यावेळचं वंध्यत्वाचे (दुसरे अपत्य जन्माला घालण्यातील समस्या) प्रमाण वाढत आहे.
याचा अर्थ म्हणजे, विवाहित जोडप्यांना पहिलं अपत्य जन्मल्यानंतरही दुसरे मूल होण्यात मात्र अडचणी येतात.
एका अभ्यासानुसार 1992-93 मध्ये भारतात दुय्यम वंध्यत्वाचा दर 19.5 टक्के होता. तर 1998-99 मध्ये हा दर जवळजवळ सारखाच राहिला. पण 2005-06 मध्ये हा दर 2.9 टक्क्यांनी वाढला. तर 2015-16 च्या दशकात दुय्यम वंध्यत्वाच्या प्रकरणांमध्ये 5.9 टक्क्यांनी वाढ झाली. हा दर 28.6 टक्क्यांपर्यंत पोहोचला.
दुसऱ्या अपत्यावेळचं वंध्यत्व म्हणजे काय?
दुसऱ्या अपत्यावेळच्या वंध्यत्वाबाबत समजून घेण्यासाठी आम्ही दिल्लीतील दोन वैद्यकीय तज्ज्ञांशी बोललो.
वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज आणि सफदरजंग हॉस्पिटलमधील प्रसूती आणि स्त्रीरोगशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. सुमित्रा बचानी यांच्या मते, दुय्यम वंध्यत्व ही अशी स्थिती असते, ज्यात जोडप्याला आधी बाळ किंवा गर्भधारणा आणि गर्भपात झालेला असतो. पण दुसऱ्यांदा मात्र त्यांना गर्भधारणा होण्यात अनेक अडचणी येत असतात.
"दुसऱ्या अपत्यावेळच्या वंध्यत्वासाठी महिला आणि पुरुष दोघंही तेवढेच जबाबदार असू शकतात", असं मत दिल्लीतील शालीमार बागमधील मॅक्स सुपर स्पेशालिटीमधील प्रसूती आणि स्त्रीरोगशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस.एन.बसू म्हणतात.
त्यांच्या मते, त्यामुळंच दाम्पत्ये वैद्यकीय सल्ल्यासाठी येतात तेव्हा त्यांचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्यासह दोघांच्याही आरोग्याची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय चाचण्याही केल्या जातात.
"जगभरात दुसऱ्या अपत्यावेळच्या वंध्यत्वाची प्रकरणं वाढत आहेत," असंही डॉ.एस.एन. बसू म्हणाले.
पर्यावरण, जीवनशैली आणि वैद्यकीय घटक अशा वंध्यत्वाचे प्रमाण वाढण्यास हातभार लावतात, असं अभ्यासातून दिसून आल्याचंही ते सांगतात.
दुसऱ्या अपत्यावेळच्या वंध्यत्वाची कारणे
दोन्ही तज्ज्ञांनी दुय्यम वंध्यत्वामागे असलेली काही कारणंही सांगितली.
उशिरा मूल जन्माला घालणे : बहुतांश जोडप्यांना कुटुंब नियोजन उशिरा करण्याची इच्छा असते. पण वाढत्या वयानुसार प्रजनन क्षमता नैसर्गिकरित्या कमी होत असते.
शुक्राणुंच्या दर्जात घट : गेल्या दशकांमध्ये शुक्राणुंची संख्या आणि त्यांच्या गतिशीलतेत लक्षणीय घट झाल्याचं संशोधनांतून दिसून आलं आहे. त्याची संभाव्य कारणं प्रदूषित वातावरण, आहार आणि तणाव ही असू शकतात.
पचनासंबंधीचे आजार : लठ्ठपणा, मधुमेह आणि पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) सारख्या परिस्थितींचा प्रजनन संप्रेरकं आणि ओव्हुलेशनवर परिणाम होऊ शकतो.
तज्ज्ञांच्या मते, प्लास्टिकची भांडी आणि कंटेनरचा वापर, प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांमध्ये आढळणारी रसायनं आणि प्रदूषकांमुळे हार्मोनल कार्यात समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळं पुरुष आणि महिला दोघांच्याही प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो.
लैंगिक संबंधामुळे पसरणाऱ्या संसर्गाचे (STIs) वाढते प्रकार : जर तुम्हाला STIs संबंधी समस्या असेल आणि त्यावर उपचार केले नाहीत, तर त्यामुळं प्रजननाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
महिलांशी संबंधित मुद्दे
तज्ज्ञांच्या मते, दुसऱ्यांदा गर्भधारणा होण्यास अडचणी निर्माण करणारी महिलांशी संबंधित अनेक कारणे आहेत.
स्त्रिया एका ठरावीक वयापर्यंत नैसर्गिकरित्या गर्भधारणा करू शकतात. तज्ज्ञांच्या मते, महिलांना वयाच्या 35 वर्षांनंतर गर्भधारणेत अडचणी येऊ शकतात. हार्मोन्समधील असंतुलन हीदेखील एक समस्या आहे. पीसीओएस, थायरॉईड किंवा प्रोलॅक्टिनचे वाढलेले प्रमाणही अडचणीचे ठरू शकते.
तसंच, ट्यूमर, एंडोमेट्रियल पॉलिप्स अशा गर्भाशयाशी संबंधित समस्याही कारणीभूत ठरू शकतात. शिवाय फॅलोपियन ट्यूबची स्थिती यामुळंही अडचणी निर्माण होऊ शकतात.
कधीकधी महिला पहिल्या प्रसूतीनंतर पूर्णपणे तंदुरुस्त झाल्या नसल्यामुळंही त्यांना दुसऱ्या गर्भधारणेत समस्या निर्माण होतात.
पुरुषांशी संबंधित मुद्दे
शुक्राणुंचा दर्जा कमी होणे, वय वाढणे, प्रदूषित वातावरणाच्या संपर्क येणे आणि जुनाट आजार या सर्वांमुळे शुक्राणुंची संख्या कमी होऊ शकते.
अंडकोषांमधील वाढलेल्या नसा किंवा व्हॅरिकोसेल्समुळे अंडकोष जास्त गरम होऊन त्यामुळं शुक्राणुंच्या उत्पादनावर नकारात्मक परिणाम होतो.
तसंच हार्मोनल विकार, कमी टेस्टोस्टेरॉन किंवा इतर प्रजनन संप्रेरकांमध्ये असलेल्या असंतुलनाचाही शुक्राणुंवर परिणाम होऊ शकतो.
जीवनशैली आणि पर्यावरणीय
लठ्ठपणा किंवा अचानक खूप जास्त वजन कमी होणे या दोन्हीमुळं हार्मोन्सचं संतुलन आणि ओव्हुलेशनमध्ये समस्या निर्माण होऊ शकते.
धुम्रपान आणि मद्यपान हेदेखील अंडी आणि शुक्राणुंच्या गुणवत्तेशी संबंधित आहेत. दीर्घकालीन ताणामुळे हार्मोन्सचं संतुलन बिघडून ओव्हुलेशन आणि शुक्राणूंवर परिणाम होऊ शकतो.
कीटकनाशके, धातू आणि अंतःस्रावी यंत्रणेला नुकसान पोहोचवणारी रसायनंही प्रजनन क्षमता कमी करू शकतात.
याशिवाय वय हा पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम करणारा सर्वात मोठा घटक आहे.
महिलांमध्ये प्रजननासाठी 20 ते 35 वर्षे हे वय योग्य असल्याचं मानलं जातं. उल्लेखनीय बाब म्हणजे, भारतीय महिलांमध्ये रजोनिवृत्तीचे वय पाश्चात्य महिलांपेक्षा कमी आहे.
गर्भपात आणि गुणसुत्रांसंबंधी विकृती (डाउन सिंड्रोम सारखे) याचा धोका वयानुसार वाढण्याची शक्यता असते.
दुसरीकडे, पुरुषांच्या शरिरात आयुष्यभर शुक्राणुंची निर्मिती होत असते. पण 40-45 वर्षांनंतर त्याचा दर्जा कमी होतो, त्यामुळे गर्भधारणेचा दर कमी होतो आणि मुलांमध्ये अनुवांशिक विकृतींचा धोका वाढतो.
दुसऱ्या अपत्यावेळच्या वंध्यत्वावरील उपचार
दुसऱ्या अपत्यावेळचं वंध्यत्व यावर शक्यतो जीवनशैलीतील बदल, वैद्यकीय उपचार आणि कृत्रिम प्रजननासारख्या गर्भधारणेच्या इतर सहाय्यक तंत्रज्ञानाच्या आधाराने उपचार केले जाऊ शकतात.
निरोगी वजन, ताण कमी करणे आणि तंबाखू आणि मद्य टाळणे असे जीवनशैलीतील बदल यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
ओव्हुलेशन ट्रॅक करणे हादेखील एक मार्ग असू शकतो आणि यासाठी अनेक अॅप्स उपलब्ध आहेत.
पीसीओएस, अँडोमेट्रिओसिस किंवा थायरॉईड इत्यादींवर वेळीच उपचार घ्यायला हवे. फायब्रॉइड्स आणि ट्यूबल ब्लॉकेजवर उपचारासाठी शस्त्रक्रिया कराव्या लागू शकतात.
अनेक प्रकरणांमध्ये, डॉक्टर हार्मोनल थेरपीची शिफारस करतात.
इतर पर्याय संपल्यास IUI, IVF अशा सहाय्यक प्रजनन पद्धतींची (ART) मदत घेता येऊ शकते.
वैद्यकीय मदत कधी घ्यावी?
35 वर्षांखालील महिला ज्या 6 महिने ते एक वर्ष गर्भधारणेचा प्रयत्न करत आहेत परंतु त्यात यश मिळत नसेल, अशावेळी वैद्यकीय मदतीचा विचार करावा.
त्याशिवाय अनियमित मासिक पाळी किंवा पूर्वी गर्भपातासारख्या प्रजनन आरोग्याच्या समस्या असतील तरीही वैद्यकीय मदत घ्यावी.
पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शन किंवा शुक्राणुंची संख्या कमी असेल तर उपचार आवश्यक आहेत. एखाद्या जोडप्याचे एकापेक्षा जास्त गर्भपात झाले असले तरी त्यांनी वैद्यकीय मदत घ्यावी.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)