'पती तुझा घात करणार आहे' म्हणत महिलेला पहाटे फोन, पुढे काय घडलं? मुंबईतल्या 'या' अघोरी प्रकारानं खळबळ

    • Author, अल्पेश करकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

(यातील काही मजकूर तुम्हाला विचलित करू शकतो)

"माझ्या अडीच वर्षाच्या मुलाला भूत लागलं सांगून चटके दिले आणि मलाही त्रास दिला," मुंबईत महाराष्ट्र नरबळी अघोरी प्रथा कायद्याअंतर्गत घडलेल्या गुन्ह्यातील पीडित गार्गी कदम यांच्या या वेदना आहेत. त्यांनी दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी अशी मागणी केली आहे.

अंधश्रद्धेची प्रकरणं प्रामुख्यानं ग्रामीण भागात घडतात, असा अनेकांचा समज चुकीचा ठरवणारी ही घटना. मुंबईसारख्या आधुनिक शहरातही अंधश्रद्धेतून असे भयानक प्रकार घडतात, घडू शकतात, हे या प्रकरणातून दिसून येतं.

मुंबईत भांडुपमध्ये भूतबाधा झाल्याचा दावा करत एका दाम्पत्याने मोलकरणीच्या अडीच वर्षांच्या चिमुकल्याला चटके देत, वेताच्या काठीने बेदम मारहाण करण्याचा अघोरी प्रकार केला.

याप्रकरणी भांडुप पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

नक्की प्रकरण काय आहे?

मुंबईतील भांडुप लोकमान्य नगर परिसरातील ही घटना आहे. 32 वर्षांच्या गार्गी कदम या अडीच वर्षाचा मुलगा आणि पती यांच्यासोबत राहतात.

त्यांच्या 42 वर्षीय पतीला अर्धांगवायू झाल्याने संपूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी गार्गी कदम यांच्यावर आली. गार्गी कदम या एके ठिकाणी मोलकरीण म्हणून काम करत होत्या. त्यादरम्यान, त्यांचा संपर्क वैभव कोकरे (35) यांच्याशी आला.

वैभव कोकरे यांनी गार्गी कदम यांना अधिक उत्पन्नाचं आमिष दाखवलं. त्यानुसार गार्गी कदम या कोकरे यांच्या घरी जेवण, साफसफाई इत्यादी घरगुती कामांसाठी जाऊ लागल्या. कोकरे यांची पाणी वितरण करणारी कंपनी असल्याने 5 मे 2025 पासून त्या तिथेही काम करण्यासाठी जाऊ लागल्या.

घरी मुलाला सांभाळण्यासाठी कुणी नसल्यामुळे, त्या मुलालादेखील सोबत घेऊन कोकरे यांच्याकडे कामावर जात असत. दरम्यान, एके दिवशी वैभव कोकरे यांनी गार्गी कदम यांना त्यांची पत्नी हर्षदा गुरव यांच्याशी ओळख करून दिली. पुढे गार्गी आणि हर्षदा यांच्यात चांगली ओळख निर्माण झाली.

मात्र, एके दिवशी वैभव कोकरे यांच्या घरी गार्गी कदम काम करत असताना कोकरे अंगात आल्यासारखं वागू लागले आणि गार्गी कदम यांच्याशी बोलू लागल्या.

त्यावेळी वैभव कोकरे यांनी, "तू पतीसोबत राहू नकोस? तू स्वतःचं अस्तित्व निर्माण कर. तू मुलाला वडिलांचे नाव न देता तुझे नाव दे. मी तुझ्या पतीवर माझ्या संस्थेमार्फत उपचार करेन," असं म्हटलं.

त्यांच्या या म्हणण्यावर, गार्गी यांचा विश्वास बसला आणि त्या कोकरे दाम्पत्यानं सांगितल्याप्रमाणे गोष्टी करू लागल्या.

गार्गी या वैभव कोकरे यांच्या घरातील कामे करत असताना मुलालादेखील सोबत न्यायच्या. त्या दरम्यान मुलगा जोरात रडणं, हट्ट करणं अशा गोष्टी करायचा. हे पाहून एके दिवशी कोकरे दाम्पत्यानं 'मुलाला भूतबाधा झाली आहे, त्याच्यात दोष आहे,' असं सांगितलं.

त्यावर गार्गी कदम यांनी 'यावर काय करायचं?' अशी विचारणा केली. त्यावेळी त्या दोघांनी यावर आपण लवकरच उपाय करू, असं सांगितलं.

'तुझ्यावर नक्की काहीतरी प्रसंग येणार'

22 जून 2025 रोजी पहाटे सव्वातीन वाजता गार्गी आपल्या घरी झोपेत असताना वैभव कोकरे यांचा फोन आला.

"तुझा पती तुझा घात करणार आहे. मुलाला घेऊन तू माझ्याकडे त्वरित ये," असं त्यांनी म्हटलं. मात्र, गार्गी यांनी ते ऐकलं नाही. पुन्हा काही वेळात कोकरे यांची पत्नी हर्षदा गुरव यांचा रडत रडत गार्गी यांना फोन आला.

"वैभव काहीतरी सांगतोय म्हणजे तुझ्यावर नक्की काहीतरी प्रसंग येणार आहे," असं त्या म्हणाल्या.

हे ऐकून हर्षदा यांच्या बोलण्यावर गार्गी यांचा विश्वास बसला आणि त्या कोकरे यांच्या घरी जाण्यासाठी निघाल्या.

गार्गी या मुलाला पहाटे साडेतीन वाजता घरातून घेऊन जात असताना त्यांच्या पतीने त्यांना अडवलं आणि शिवीगाळ केली.

या वादादरम्यान जवळच राहणाऱ्या दोन्ही नणंदादेखील त्यांना थांबवण्यासाठी आल्या. परंतु, गार्गी यांनी कोणाचं काहीच ऐकलं नाही आणि त्या थेट कोकरे यांच्याकडे मुलासह गेल्या.

सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान कोकरे यांनी मुलाच्या अंगातील कथित भूत उतरवण्यासाठी गळ्यातलं मंगळसूत्र देवाजवळ ठेवावं लागेल, असं गार्गी कदम यांना सांगितलं.

त्यानुसार, गार्गी कदम यांनी 13 ग्रॅम सोन्याचं मंगळसूत्र देवाजवळ ठेवलं. दुसऱ्या दिवशी गार्गी यांनी या मंगळसूत्राबद्दल विचारणा केली असता कोकरे यांनी ते गहाण ठेवल्याचं सांगितलं.

23 जून 2025 रोजी गार्गी यांनी कोकरे आणि गुरव यांना मला माझ्या पतीच्या घरी जायचं आहे, असं सांगितलं. मात्र, दोघांनीही गार्गी यांना अडवलं आणि मोबाईल काढून घेतला. तसेच, दोघांनी पतीविरोधात तक्रार देण्यासाठी सांगितलं.

गार्गी यांनी यासंदर्भात विरोध केल्यावर कोकरे यांनी त्यांना मारहाण केली. त्या रात्री मुलगा हा जास्त रडू लागला. त्यामुळे त्याच्यावर उपचार करावे लागतील, असं गार्गी कदम यांनी त्या दोघांना सांगितलं.

मुलावर अघोरी उपाय, महिलेला मारहाण

त्यानुसार 24 जून 2025 रोजी सकाळी 10 वाजता वैभव कोकरे आणि हर्षदा गुरव यांनी लहान मुलाला घट्ट पकडून धरले.

"वाईट शक्ती तुझ्या मुलाला खेचत आहेत," असं सांगत हर्षदा गुरव मुलाला पायात घट्ट पकडून त्याचे केस खेचू लागली आणि तोंडावर काडेपेटीची काडी पेटवून चटके देऊ लागली.

मुलाला जोरजोरात ओरडत "तू वैभवच्या मागे का लागला आहेस? सोडून का जात नाही," असं म्हणू लागली. दुसरीकडे, वैभव कोकरे हा मुलाला एका लाकडी काठीने आणि झाडूने मारत होता. गार्गी या दोघांच्या आहारी गेल्यामुळे त्यांनी यादरम्यान काहीच केलं नाही.

रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान गार्गी या दोघांची नजर चुकवून जखमा दाखवण्यासाठी खालीच असलेल्या डॉक्टरकडे गेल्या. त्यानंतर गार्गी यांनी त्यांच्या भावाला कॉल केला आणि सर्व हकीकत सांगितली.

त्यानंतर त्यांचा भाऊ तिथे पोहोचला आणि त्याने गार्गी व लहान मुलाची सुटका केली. तसेच त्यांना घेऊन भांडुप पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी मुलाला जवळच असलेल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आणि गार्गी यांची तक्रार घेतली. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघड झालं. हा सगळा घटनाक्रम पीडित गार्गी कदम यांनी दिलेल्या तक्रारीत आहे.

'आमच्या कुटुंबाला याचा फार त्रास झाला'

या संदर्भात पीडित गार्गी कदम बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या, "आमच्या कुटुंबाला याचा फार त्रास झाला. उदरनिर्वाहासाठी आणि मुलाच्या दृष्टीने मी त्यांनी बिंबवलेल्या परिस्थितीत अडकले. त्यांनी अघोरी कृत्य करून मला व माझ्या मुलाला त्रास दिला."

"माझ्या कुटुंबानं संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोकरे आणि गुरव हे माझा फोन बंद करायचे. मात्र, संधी मिळताच मी घरी संपर्क केला आणि मदत मागितली. दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी," असंही त्या म्हणाल्या.

पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली.

याप्रकरणी भांडुप पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी अघोरी प्रथा कायद्याअंतर्गत कलम 3(2), भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 126 (2), 115 (2), 118 (2), 316 (2), अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा कलम 75 अन्वये गुन्हा नोंदवला.

वैभव कोकरे (35) आणि त्याची पत्नी हर्षदा गुरव (32) या दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. त्यांना कोर्टाने 30 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपी कोकरे दाम्पत्य भांडुप जंगल मंगल रोड परिसरात राहतात. या दाम्पत्याचे महिनाभरापूर्वीच लग्न झाल्याचे समजते. त्यांची बाटली बंद पाणी वितरणाची एजन्सी असून 37 वर्षीय तक्रारदार गार्गी कदम या त्यांच्या घरी व दुकानात कामाला होत्या. कोकरे व गुरव मूळचे देवगडचे असल्याची माहिती आहे.

कोर्टात लवकरच यासंदर्भात दोषारोप दाखल केलं जाणार आहे.

भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "पीडित मुलाला वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आई आणि मुलगा यांची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी आम्ही अधिक तपास करत आहोत."

सहाय्यक पोलीस आयुक्त जितेंद्र आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, महेश महाजन, एसीपी जितेंद्र आगरकर, महिला उपनिरीक्षक केतकी जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश नडवीणकरी यांच्या सहकार्याने सर्व पुरावे प्राप्त केले आहेत. कोर्टात लवकरच यासंदर्भात दोषारोप दाखल केले जातील.

आरोपींची कसून चौकशी करावी

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारणी सदस्य मिलिंद देशमुख बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा होऊन जवळपास 13 वर्षे झाली आहेत. अजून देखील मुंबईसारख्या शहरात अशा प्रकारे हे जादूटोणाविरोधी कृती होत आहे."

"आम्ही मेळघाटामध्ये दौरा केला. तिथे आजारी मुलांना अशाप्रकारे चटके दिल्याचं समोर आलं. त्यानंतर आम्ही तिथे मोहीम राबवली होती. मात्र, मुंबईसारख्या शहरात भूत उतरवण्याच्या बहाण्याने अशाप्रकारे मुलांना चटके दिले जातात हे भयंकर आहे."

पुढे देशमुख म्हणाले, "जादूटोणा विरोधी कायद्याच्या पहिल्या कलमात एखाद्याला मारहाण करणं याबद्दल स्पष्ट उल्लेख आहेत. आमची मागणी आहे की, या आरोपींचा हा पहिलाच गुन्हा आहे की, यापूर्वी देखील त्यांनी असं काही केलं आहे, हे तपासायला हवं."

"बऱ्याचदा तक्रार द्यायला लोक पुढे येत नाहीत. हे कृत्य करणारे आरोपी हे लोकांना घाबरवतात किंवा बिंबवतात की हा भुताटकीचा प्रकार आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी," अशी मागणी देशमुख यांनी केली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)