मुंबईच्या चाळीत 7 महिलांनी सुरू केलेला उद्योग, आता 1600 कोटींची उलाढाल, वाचा 'लिज्जत'ची यशोगाथा

    • Author, देविना गुप्ता
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
    • Reporting from, दिल्ली

पिढ्यानपिढ्या महिला स्वयंपाकघर, मुलं आणि घरातील इतर कामाचा भार वाहत आहेत. कुटुंबासाठी आयुष्यभर इतकं सर्व करूनदेखील त्या आर्थिक स्वातंत्र्यापासून दूर राहतात. कारण त्यांच्या या कष्टाचं, योगदानाचं मोल जवळपास लक्षातच घेतलं जात नाही.

अशावेळी काही महिलांनी एकत्र येऊन स्वयंपाकाच्या कौशल्यालाच आपलं बलस्थान बनवत एका सहकारी उद्योगाची स्थापना केली आणि पुढील काही दशकांमध्ये हजारो महिलांचं आयुष्य बदलून टाकलं. महिलांना आर्थिक स्वातंत्र्य आणि सन्मान मिळवून देणाऱ्या 'श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड'ची ही प्रेरणादायी यशोगाथा.

डिसेंबरमधील एक कडाक्याची थंडी असलेली सकाळ. दिल्लीतील एका गजबजलेल्या भागातील तीन मजली इमारत. रंगीबेरंगी साड्या, उबदार शाली आणि लोकरी टोप्या घातलेल्या महिलांचा एक गट जमला आहे.

त्या इमारतीमध्ये भारतातील सर्वात जुन्या सामाजिक उपक्रमांपैकी एक उपक्रम चालवला जातो. त्या उपक्रमाची किंवा व्यावसायिक युनिटची मालकी महिलांकडे आहे आणि तो चालवतात सुद्धा महिलाच.

हा एक सहकारी तत्वावर चालणारा उपक्रम आहे. त्याचं नाव "श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड". अर्थातच हे नाव आज भारतात घराघरात पोहोचलेलं आहे, सर्वांनाच त्याची माहिती असते.

एरव्ही 'लिज्जत पापड'चा आस्वाद अनेकांनी अनेकदा घेतलेला असतो. मात्र, याची सुरुवात कशी झाली आणि या पापडानं हजारो महिलांचं आयुष्य कसं बदललं, याबद्दल मात्र फारसं माहित नसतं.

1959 मध्ये मुंबईत (तेव्हाचं बॉम्बे) सात गृहिणींनी या उपक्रमाची सुरुवात केली होती.

त्यांनी भारतीय जेवणाचा मुख्य भाग असलेले लज्जतदार, चविष्ठ, कुरकुरीत पापड बनवत या उद्योगाची सुरुवात केली होती.

मुंबईत मुख्यालय असलेल्या या सहकारी व्यवसायाचा गेल्या 65 वर्षात देशभरात विस्तार झाला असून 45,000 हून अधिक महिला त्याच्या सदस्य आहेत.

आज श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापडची वार्षिक उलाढाल तब्बल 16 अब्ज रुपयांवर (18.6 कोटी डॉलर ; 15 कोटी पौंड) पोहोचली आहे. फक्त भारतातच नव्हे तर युके आणि अमेरिकसह जगातील अनेक देशांमध्ये त्यांच्या उत्पादनांची निर्यात होते.

70 वर्षांच्या लक्ष्मी यांचं जीवन कसं बदललं?

लिज्जतसाठी काम करणाऱ्या बहुतांश महिला घरूनच काम करतात. या सहकारी उद्योगातील महिला डिटर्जंट, मसाले आणि चपातीसह विविध उत्पादनं तयार करतात. मात्र त्यांचं सर्वात लोकप्रिय म्हणजे अर्थातच लिज्जत पापड हा ब्रॅंड.

"लिज्जत आमच्यासाठी एक मंदिर आहे. त्यामुळे आम्हाला पैसे कमावता येतात आणि आमच्या कुटुंबाचा आर्थिक भार उचलता येतो," असं 70 वर्षांच्या लक्ष्मी म्हणतात. त्या लिज्जत च्या दिल्लीतील केंद्राचं व्यवस्थापन पाहतात.

लक्ष्मी फक्त त्यांचं पहिलं नावच वापरतात. चार दशकांपूर्वी त्यांच्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर त्या या गृह उद्योगाशी जोडल्या गेल्या. पतीच्या निधनामुळे त्यांना काम करण्याशिवाय पर्याय नव्हता.

"मी माझं शिक्षण पूर्ण केलं नव्हतं आणि पुढे काय करायचं हे मला माहित नव्हतं. त्यावेळेस माझ्या शेजारच्यांनी मला लिज्जतबद्दल सांगितलं," त्या म्हणतात.

महिला गृह उद्योगाशी जोडून घेण्याच्या निर्णयामुळे आयुष्य बदलल्याचं लक्ष्मी सांगतात. आज 150 महिला काम करत असलेल्या लिज्जतच्या या केंद्राचं व्यवस्थापन लक्ष्मी सांभाळतात.

लक्ष्मी यांच्यासारख्या महिलांसाठी या सहकारी उपक्रमामुळे किंवा उद्योगामुळे चांगलं उत्पन्न कमावण्याचं साधन उपलब्ध होतं. त्यामुळे घर सांभाळत त्यांना कामदेखील करता येतं.

दररोज सकाळी, केंद्रातील महिला सदस्य लिज्जतनंच उपलब्ध करून दिलेल्या बसनं जवळच्या लिज्जत केंद्रावर जातात. तिथे त्या डाळ आणि मसाले एकत्र करून तयार करून ठेवलेलं त्यांच्या वाट्याचं पीठ घेतात. त्यानंतर या महिला पापड करण्यासाठी ते पीठ घरी घेऊन जातात.

"मी हे पीठ घरी घेऊन जायचे. त्यानंतर मी माझं घरातलं काम उरकायचे. माझ्या मुलांना जेवणखाण करायचे. ते आटोपलं की मग दुपारून मी पोळपाट लाटणं घेऊन बसायचे आणि पापड लाटायचे," असं लक्ष्मी म्हणाल्या.

सुरुवातीला एक किलो वाळलेले पापड लाटायला चार ते पाच तास लागायचे. मात्र, आता सराव झाल्यामुळे फक्त अर्ध्या तासातच तेवढं काम उरकतं, असं त्या सांगतात.

अर्थात, लक्ष्मी हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. लिज्जत पापडमुळे हजारो महिलांचं आयुष्य बदललं आहे.

श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापडचं, मुंबईतील मुख्यालय पापडासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे डाळी, मसाले आणि तेल या गोष्टी घाऊक स्वरुपात विकत घेतं. मग त्याचं पीठ तयार करतात आणि ते देशभरातील लिज्जतच्या केंद्रांमध्ये पाठवतात.

महिला घरी पापड लाटतात, ते वाळवतात. मग महिला ते पापड लिज्जतच्या केंद्रांमध्ये पॅकेजिंगसाठी पोहोचवतात. त्यानंतर लिज्जतच्या वितरण नेटवर्कद्वारे हा माल किरकोळ दुकानांपर्यत पोहोचतो.

लिज्जतची स्थापना झाल्यापासून या सहकारी उद्योगानं फार मोठा पल्ला गाठला आहे.

लिज्जत पापडची स्थापना, त्यावेळची परिस्थिती आणि वाटचाल

श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापडची स्थापना किंवा सुरुवात झाली तो काळ आणि त्यावेळची परिस्थिती देखील महत्त्वाची होती.

1950 च्या दशकात भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. देशाच्या पुनर्उभारणीवर सर्व लक्ष केंद्रित होतं.

एकीकडे छोट्या स्वरूपातील किंवा लघु उद्योगांना तसंच ग्रामीण भागातील उद्योगांना चालना देणं आणि दुसऱ्या बाजूला शहरातील मोठ्या कारखान्यांना पुढे नेणं अशा दोन्ही प्रकारे विकासाचं संतुलन साधण्याचा देशाचा प्रयत्न होता.

त्यावेळेस देशातील बहुतांश कारखान्यांची मालकी सरकारकडेच होती. महिलांसाठी तो काळ अतिशय आव्हानात्मक होता.

कारण अतिशय पुराणमतवादी आणि पितृसत्ताक किंवा पुरुषप्रधान समाजात शिक्षण घेण्यासाठी आणि काम मिळवण्यासाठी किंवा स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी महिलांना मोठा संघर्ष करावा लागत होता.

जसवंतीबेन जमनादास पोपट, पार्वतीबेन रामदास थोडानी, उजमबेन नारनदास कुंडालिया, बानूबेन एन तन्ना, लागूबेन अमृतलाल गोकानी, जयाबेन व्ही विठलानी आणि दिवालीबेन लुक्का या महिलांच्या गटानं लिज्जतची स्थापन केली होती.

या महिला त्यावेळेस त्यांच्या वयाच्या विशीत आणि तिशीत होत्या. त्या मुंबईतील गर्दीच्या, दाटीवाटीच्या चाळींसारख्या इमारतींमध्ये राहत होत्या. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्या मार्ग शोधत होत्या.

त्यांच्या डोक्यातील विचार स्पष्ट होता. घरूनच काम करायचं. पिढ्यानपिढ्यानं त्यांच्याकडे आलेलं स्वयंपाकाचं कौशल्य वापरून पैसे कमवायचा त्यांचा प्रयत्न होता.

मात्र, एखादं काम किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे मग त्यांनी छगनलाल करमशी पारेख या सामाजिक कार्यकर्त्याकडे आर्थिक मदत मागितली.

छगनलाल पारेख यांनी त्यांना 80 रुपयांचं (0.93 डॉलर; 0.75 पौंड आजच्या चलनदरानुसार) कर्ज देऊ केलं. हा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा काळ होता. तेव्हा या रकमेचंही मोल मोठं होतं. साहजिकच या महिलांच्या गटाला उद्योग सुरू करण्यासाठी ही रक्कम पुरेशी होती.

मात्र, या महिलांना लवकरच याची जाणीव झाली की त्यांनी तयार केलेले पापड विकत घ्यायला कोणीही तयार नाही.

स्वाती पराडकर या सध्या 'श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड'च्या अध्यक्षा आहेत. त्यांनी सांगितलं की त्यामुळे या महिलांना पुन्हा एकदा मदतीसाठी पारेख यांच्याकडे जावं लागलं.

पारेख यांनी या महिलांना पुन्हा 80 रुपये कर्जाऊ दिले. मात्र या खेपेस त्यांनी अट घातली. ती म्हणजे या महिलांना पारेख यांना 200 रुपये परत करावे लागणार होते.

पारेख यांना या महिला बाप्पा (म्हणजे वडील) म्हणायच्या. पारेख आणि इतर सामाजिक कार्यकर्ते या महिलांनी तयार केलेले पापड स्थानिक दुकानदारांकडे घेऊन गेले.

स्थानिक दुकानदार देखील, हे पापड विकले गेल्यावरच त्या पापडांचे पैसे देतील या अटीवर हे पापड घेण्यास तयार झाले.

फक्त एकच दुकानदार महिलांना या पापडाचे पैसे लगेच देण्यास तयार झाला.

"त्या दुकानदारानं दररोज चार ते सहा पॅकेट विकत घेण्यास सुरुवात केली आणि हळूहळू ते पापड लोकप्रिय झाले," असं पराडकर म्हणतात.

महिला सह-मालक आहेत, कर्मचारी नाही!

जसजसा हा पापडांचा व्यवसाय वाढत गेला, तसतशा आणखी महिला या सहकारी उद्योगात सहभागी झाल्या, त्याच्याशी जोडल्या गेल्या.

विशेष म्हणजे, या महिला तिथे कर्मचारी नव्हत्या, तर त्या तिथे सह-मालक होत्या. तिथे घेतल्या जाणाऱ्या निर्णयाबाबत मत मांडण्याचा, निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याचा त्यांना अधिकार होता.

या महिला एकमेकांना बेन म्हणतात. गुजराती भाषेत बहिणीला बेन म्हणतात.

"आम्ही एखाद्या सहकारी संस्थेप्रमाणे आहोत. ही काही कंपनी नाही. मी जरी लिज्जतची अध्यक्षा असले तरी मी काही त्याची मालकीण नाही. आम्ही सर्व सह-मालक आहोत आणि आम्हाला समान अधिकार आहेत. या व्यवसायातून मिळणारा नफा आम्ही सर्व सदस्यांमध्ये वाटतो आणि तोटादेखील. मला वाटतं आमच्या यशाचं तेच गुपित आहे," असं लिज्जतच्या एकूणच स्वरुपाबद्दल पराडकर म्हणतात.

अनेक दशकं या सहकारी व्यवसायानं लिज्जत या त्यांच्या प्रसिद्ध ब्रॅंडशिवायच पापडचं उत्पादन केलं.

ब्रँड लिज्जत

1966 मध्ये खादी विकास आणि ग्रामोद्योग आयोगानं (Khadi Development And Village Industries Commission)त्यांना सुचवलं की त्यांनी त्यांच्या या उत्पादनाला एक ब्रॅंडचं नाव द्यावं. हा आयोग म्हणजे छोट्या स्वरुपातील ग्रामीण उद्योगांना चालना देणारी सरकारी संस्था आहे.

"मग या सहकारी उपक्रमानं वृत्तपत्रांमध्ये एक जाहिरात दिली आणि लोकांना यासाठी नाव सुचवण्यास सांगितलं. आम्हाला असंख्य सूचना आल्या. मात्र आमच्या उद्योगातीलच एका बहिणीनं आम्हाला लज्जत हे नाव सुचवलं. मग आम्ही त्यात थोडा बदल केला आणि ते नाव लिज्जत असं केलं. कारण गुजरातीमध्ये लिज्जतचा अर्थ चव होतो," असं पराडकर म्हणाल्या.

इतक्या दशकांमध्ये या सहकारी उद्योगानं महिलांच्या आयुष्याचा कायापालट करताना अनेक पिढ्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे.

"हे काम करत मी माझ्या मुलांना शाळेत घातलं, घर बांधलं आणि त्यांची लग्नंसुद्धा केली," असं लक्ष्मी अभिमानानं सांगतात.

त्या पुढे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात. त्या म्हणाल्या, "इथे काम करून मला फक्त उत्पन्न किंवा पैसेच मिळाले नाहीत, तर मला सन्मानदेखील मिळाला."

लिज्जतच्या या सहकारी उपक्रमाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्यं म्हणजे स्वयंपाकघरातील काम किंवा स्वयंपाक कौशल्य या महिलांच्या पिढ्यानपिढ्या चाकोरीतील मार्गातूनच महिलांना एक चाकोरीबाहेरचं आयुष्य, यश मिळालं आहे.

एरव्ही आर्थिक स्वावलंबन आणि सन्मान या दोन्ही गोष्टींसाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या महिलांना लिज्जतनं काय दिलं आहे, याचं मोल त्यांच्याशिवाय कोणाला कळू शकणार.

लिज्जतनं एकाचवेळी पापड खाणाऱ्या आणि त्या बनवणाऱ्या अशा दोघांचंही आयुष्यं खरोखरंच बहारदार केलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)