You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शाळेतल्या नाटकात बुरखा घातलेल्या मुली दाखवल्यानं वाद का झाला?
गुजरातच्या भावनगर शहरातून व्हायरल झालेल्या एका व्हीडिओवरून एका नव्या वादाला सुरुवात झालीय. 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं एका शाळेत सुरू असलेल्या कार्यक्रमाचा हा व्हीडिओ आहे. त्यात एका नाटकात बुरखा घातलेल्या काही मुली दहशतवादी आहेत, असं दाखवण्यात आलं आहे.
नाटकात काळ्या रंगाचा बुरखा घालून काही मुली खेळण्यातल्या बंदूकीनं इतर मुलींवर गोळ्या झाडतायत, असं व्हायरल झालेल्या व्हीडिओत दिसतंय. शिवाय, स्वातंत्र्य दिवसासंबंधी गाणीही मागे सुरू आहेत.
या व्हीडिओत काही महिन्यांपूर्वी जम्मू-काश्मीरला झालेल्या पहलगाम हल्ल्याचाही उल्लेख करण्यात आलाय.
बीबीसी गुजरातीसोबत काम करणारे पत्रकार अल्पेश डाभी सांगतात की, या व्हीडिओनं नव्या वादाला सुरुवात झालीय.
मुस्लीम समुदायातील काही नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
वादामागचं नेमकं कारण काय?
भावनगर शहरात कुंभारवाडा भागातल्या एका शाळेत 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस साजरा केला गेला. त्यात एका नाटकात काही विद्यार्थीनींनी बुरखा घालून एखाद्या दहशतवाद्यासारखं पांढऱ्या आणि भगव्या ओढण्या घेतलेल्या मुलींवर हल्ला करताना दाखवलं गेलं.
कार्यक्रमाचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर मुस्लिम समुदायातील लोकांनी या नाटकावर आक्षेप घेतले. अनेकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात तक्रारही केली.
मुस्लीम समुदायातील नेते जहूर भाई जेजा माध्यमांशी बोलताना म्हणाले, "कुंभारवाड्यात महानगरपालिकेची एक शाळा आहे. त्यात एक नाटक सादर केलं गेलं. त्यात पर्यटक आणि लष्कराची पात्र होती. पण सोबतच मुलींकडून बुरखा घालून दहशतवाद्यांसारखं काम करून घेतलं. हा मुस्लिमांचं दहशतवादी म्हणून चित्रण करण्याचा प्रयत्न आहे."
जहूर भाई जेजा पुढे सांगत होते की, या शाळेचं नावही एपीजे अब्दुल कलाम प्राथमिक शाळा नंबर 50/ 51 असं आहे. अशी दृश्य दाखवण्यामागे त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना जबाबदार धरलं आहे.
"निष्पाप मुलांना असं काही करायला लावून त्यांनी देशात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. बुरख्याचा वापर करून मुस्लिमांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. आम्ही त्याचा निषेध करतो," असं जेजा म्हणाले.
या शिक्षकांचं ताबडतोब निलंबन करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुख्याध्यापकांनी काय सांगितलं?
व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कुमार दवे यांनी माफी मागितली.
माध्यमांशी बोलताना दवे म्हणाले, "आमची मुलींची शाळा आहे. दरवर्षी आम्ही राष्ट्रीय सण साजरा करतो. यावर्षी ऑपरेशन सिंदूर नावाचंं नाटक सादर केलं गेलं. मुलींच्या वेशभुषेबाबत काही चूक झाली असेल आणि त्यावर एखाद्या समुदायाचे आक्षेप असतील तर मी त्यासाठी माफी मागतो."
"मुलांना आणि प्रेक्षकांना ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल सांगणं हाच आमचा उद्देश होता. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता," असंही मुख्याध्यापक दवे म्हणाले.
सरकारी अधिकाऱ्यांनी काय सांगितलं?
भावनगर प्राथमिक शिक्षण समितीचे शिक्षण अधिकारी मुंजाल बडमिया यांनी बीबीसी गुजरातीचे सहयोगी अल्पेश डाभी यांच्याशी चर्चा केली.
ते म्हणाले, "शहरातल्या प्राथमिक शिक्षण समितीच्या शाळांमध्ये 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस साजरा केला. त्यात मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. यावर्षी त्यासाठी 'ऑपरेशन सिंदूर' असा विषय घेतला होता. मुलींनी पहलगाममध्ये झालेल्या घटनेचं नाटकीय रुपांतरण केलं होतं. त्यात त्यांनी बुरख्याचा वापर केला. यासंबंधी मुस्लिम समुदायाकडून काही तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत."
या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचंही बडमिया पुढे म्हणाले, "शाळेने हे मुद्दाम केलं का याची चौकशी सुरू आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांना नोटिसही पाठवण्यात आली आहे. त्यांच्याकडून स्पष्टीकरणाची मागणी केली आहे. चौकशीत कुणी दोषी आढळलं तर त्यावर कारवाई केली जाईल."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)