You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जळगावात मॉब लिंचिंग, मुलीसोबत कॅफेत गेलेल्या तरुणाचा मारहाणीत मृत्यू; नेमकं काय घडलं?
जळगावच्या जामनेरमध्ये सुलेमान पठाण नावाच्या 21 वर्षीय तरुणाचा मॉब लिंचिंगमध्ये मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे.
पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. आरोपींवर मॉब लिंचिंग आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सुलेमान पठाण हा तरुण जामनेरमधील कॅफेमध्ये एका मुलीबरोबर बसलेला होता, तेव्हा काही जण तिथं आले आणि सुलेमानला तिथून घेऊन गेले. त्यानंतर सुलेमानला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला.
सुलेमानच्या नातेवाईकांनी सुरुवातीला रुग्णालयातून मृतदेह घेऊन जाण्यास नकार दिला. त्यासाठी जामनेर शहरात दीड तास 'रास्ता रोको' करण्यात आला.
आरोपींना अटक केल्यानंतर परिसरातील वातावरण काहीसं शांत झालं. शवविच्छेदनानंतर सुलेमानच्या मृतदेहावर त्याच्या मूळ गावी म्हणजेच बेटावदमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
कुटुंबीयांनाही केली मारहाण
या प्रकरणानंतर सुलेमानच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. सुलेमानचे मामा साबीर खान यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना माहिती दिली.
"सुलेमान पोलीस भरतीच्या ऑनलाईन फॉर्मची माहिती घेण्यासाठी जामनेरला आला होता. त्यानंतर पोलीस स्टेशनच्या बाजूनं त्याचं अपहरण केलं गेलं.
'जामनेरपासून 15 किलोमीटरवर बेटावद नावाचं गाव आहे, तिथला सुलेमान रहिवासी आहे. कॅफेच्या आत त्याचे शाळा-कॉलेजचे त्याचे मित्र होते, तिथं तो बसला होता. पोलीस स्टेशनच्या बाजूला कॅफे आहे, तिथून नेऊन जंगलात नेऊन त्याला सहा ते सात तास अमानुषपणे मारहाण केली."
"मारहाणीनंतर गावात नेऊन सुलेमानच्या घरासमोर त्याचं शरीर फेकलं. त्यानंतर त्याची आई आणि बहीण घराबाहेर आल्या, तर त्यांच्यासमोरही त्याला मारहाण केली. तसंच, त्याची आई, बहीण आणि वडिलांनाही मारहाण केली गेली," असाही आरोप साबीर खान यांनी केला आहे.
तर सुलेमानचे आजोबा माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "माझ्या नातवाला बेदम मारहाण करण्यात आली. तो पोलीस भरतीची तयारी करत होता घराचा कर्ता मुलगा होता आणि आरोपींना मकोका लावावा, त्याला न्याय द्यावा."
एसआयटीबाबत विचार करणार - पोलीस
जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना माहिती दिली.
महेश्वर रेड्डी यांनी सांगितलं की, "जामनेरमध्ये 11 तारखेला एका कॅफेत एक 17 वर्षांची मुलगी आणि मुलगा बसलेले होते. त्याठिकाणी त्या शहरातले इतर काही मुलं आले आणि त्यांना तिथून घेऊन गेले.
"त्यांना मुला-मुलीचं जे गाव आहे, तिथं नेत मुलाला मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर काही वेळानं मुलाची स्थिती गंभीर झाल्यानं, त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. तेव्हा उपचारादरम्यान त्याला मृत घोषित करण्यात आलं."
याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात कलम 103 (1) आणि 103 (2) म्हणजे मॉब लिंचिंग आणि हत्येच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक रेड्डी पुढे म्हणाले की, "या प्रकरणी चार आरोपींना त्याचदिवशी अटक केली, तर आणखी तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तसंच, एकाला जळगावमधून ताब्यात घेतलं आहे. अशा एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
"काही जणांनी विशेष तपास पथकाची (SIT) मागणी केली आहे. त्याचा विचार करून एक दोन दिवसांत विचार करून एसआयटी स्थापन करून सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल."
शवविच्छेदन अहवाल अद्याप हाती आलेला नाही, पण प्रथमदर्शनी डोक्याला मार लागल्यानं मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे, असंही पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी सांगितलं.
शववाहिनीला पोलिस बंदोबस्तात काढले
मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींना तत्काळ अटक करून मकोका लावावा, या मागणीसाठी नगरपालिका चौकात आणि नंतर पाचोरा रोडवरील रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर जमावाकडून रास्ता रोको करण्यात आला.
यावेळी पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांच्यासह अधिकाऱ्यांनी नातेवाइकांची समजूत काढली. त्यानंतर बंदोबस्तात शववाहिका शहराबाहेर काढण्यात आली.
जामनेरातून दीड तास उशिराने मृतदेह बेटावदला पोहोचला.
सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आणि माजी खासदार इम्तियाज जलील दफनविधीला येणार असल्याचा निरोप काही समाजातील नेत्यांनी नातेवाइकांना दिला; परंतु यासंदर्भात प्रशासन किंवा पोलिसांना कोणताही अधिकृत निरोप नव्हता.
शेवटी तासाभराच्या प्रतीक्षेनंतर दफनविधी उरकण्यात आला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)