You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मानसिक आरोग्यासाठी तरुण मदत का घेत नाहीत? 'व्यक्त' न होता पुरुष 'सहन' का करतात?
- Author, सेलिन गिरिट
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
संशोधनातून दिसून आलं आहे की किशोरवयीन मुलं आणि तरुण पुरुषांच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
मात्र ते यासाठी अनेकदा मार्गदर्शन किंवा मदत घेत नाहीत. समाजाद्वारे होणारी हेटाळणी, पुरुषत्वाबद्दलच्या कल्पना आणि तरुणांसाठी अनुकूल असणाऱ्या मदत करणाऱ्या व्यवस्थेचा अभाव ही त्यामागची कारणं आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये, तरुणांमधील मानसिक आरोग्याच्या समस्यांबाबत जगात जागरुकता निर्माण झाली आहे. त्यातही किशोरवयीन मुलं आणि तरुण पुरुष यांना ती अधिक भेडसावते आहे.
अनेक दशकांच्या संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की मानसिक आरोग्याच्या बाबतीत महिलांच्या तुलनेत पुरुष कमी प्रमाणात मदत किंवा मार्गदर्शन घेतात. 2023 मध्ये अमेरिकेत झालेल्या एका अभ्यासात आढळलं आहे, पुरुष 40 टक्के कमी प्रमाणात मदत घेतात किंवा मागतात.
किशोरवयीन मुलं आणि तरुण कशाप्रकारे किंवा कधी मदत, मार्गदर्शन मागतात, याबद्दल आपल्याला अजूनही फारसं माहित नाही.
"ही चिंताजनक बाब आहे. कारण किशोरवयीन मुलं आणि तरुणांमध्ये आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे. मात्र मानसिक आरोग्याच्या सेवांची मदत घेण्याचं प्रमाण कमी आहे," असं युरोपियन चाइल्ड अँड ॲडोलसेंट सायकॅट्री जर्नलच्या 2024 च्या एका पुनरावलोकनात म्हटलं आहे.
या विसंगतीमागचं कारण काय आहे - आणि शाळा, पालक आणि धोरणं ठरवणारे यासंदर्भात मदत करण्यासाठी काय करू शकतात?
व्यक्त न करता सहन करणं
जागतिक पातळीवर, 10 ते 19 वर्षे वयोगटातील सातपैकी एक किशोरवयीन मुलाला मानसिक समस्या किंवा विकार असतो, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) गेल्या वर्षीच्या संशोधनात आढळलं आहे.
या संशोधनात आढळलं की नैराश्य, तणाव आणि वर्तणुकीशी संबंधित समस्या या सर्वात सामान्य किंवा सर्वाधिक आढळणाऱ्या समस्या आहेत. 15 ते 29 वर्षे वयोगटातील मुलं आणि तरुणांमध्ये आत्महत्या हे मृत्यूंचं तिसरं प्रमुख कारण आहे.
'द लँन्सेट सायकॅट्री कमिशन'नुसार, सर्व प्रकारच्या मानसिक समस्या किंवा आजारांमध्ये 75 टक्क्यांपर्यंतच्या समस्या वयाच्या 25 व्या वर्षाच्या आधी सुरू होतात. वयाच्या 15 व्या वर्षीच त्यांना मानसिक आरोग्याच्या समस्यांची लक्षणं जाणवायला सुरुवात होते.
तरुण शारीरिकदृष्ट्या पूर्वीपेक्षा अधिक निरोगी असले तरी, ते मानसिक आरोग्याच्या समस्यांना तोंड देत आहेत. या समस्या असणाऱ्या तरुणांची संख्या वाढते आहे. त्यामुळे तरुणांच्या मानसिक आरोग्याच्या संदर्भात हा 'धोकादायक टप्पा' बनला आहे.
मानसिक आरोग्याच्या समस्या इतक्या प्रमाणात असल्यावर किशोरवयीन मुलं आणि तरुणांना त्यासाठीचं मार्गदर्शन किंवा मदतीची आवश्यकता आहे. मात्र तसं असून देखील, अनेक मुलं आणि तरुण मानसिक आरोग्याशी संबंधित उपलब्ध सेवांचा वापर करत नाहीत.
"गेल्या 15 ते 20 वर्षांमध्ये, मुलं आणि मुली दोघांच्याही बाबतीत मानसिक आरोग्याच्या समस्या असलेल्यांच्या संख्येत चिंताजनक वाढ झाली आहे. मात्र या समस्यांच्या बाबतीत मदत किंवा मार्गदर्शन घेण्याचं प्रमाण तरुण पुरुषांमध्ये खूपच कमी आहे," असं प्राध्यापक पॅट्रिक मॅकगरी म्हणतात.
ते मानसोपचारतज्ज्ञ आहेत आणि ऑरिजेन- ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर युथ मेंटल हेल्थचे कार्यकारी संचालक आहेत.
मानसिक आरोग्याच्या समस्यांबाबत मार्गदर्शन किंवा मदत न घेतल्यामुळे तरुण जेव्हा संकटात सापडतात तेव्हाच यासाठी मदत घेतात.
भावनिकदृष्ट्या कणखर असणं आणि स्वावलंबी असणं या मुद्द्यांबातच्या सामाजिक धारणांमुळे मुलं अनेकदा मानसिक आरोग्याच्या समस्यांबाबत मदत घेण्यास परावृत्त होतात किंवा टाळतात, असं तज्ज्ञांनी बीबीसीला सांगितलं.
त्यांनी पुढे सांगितलं की अभ्यासामधून असं सातत्यानं दिसून आलं आहे की नाजूकपणा असणं किंवा एखाद्या गोष्टीचा त्रास होणं, हे कमकुवतपणाचं लक्षण आहे, असं मुलांनी आत्मसात केलेलं असतं.
साहजिक मानसिक आरोग्याची समस्या म्हणजे कमकुवत असणं असा अर्थ लावला जातो.
डॉ. जॉन ऑग्रोडनिकझुक, कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठात मानसोपचाराचे प्राध्यापक आहेत. तसंच हेड्सअपगाइजचे संचालक आहेत.
ही पुरुषांसाठीची मानसिक आरोग्य सेवा पुरवणारी संस्था आहे.
डॉ. जॉन सांगतात की अजूनही अनेक मुलं मानसिक आरोग्याच्या समस्यांसाठी मदत घेण्याचा संबंध अपयशाशी लावतात.
डॉ. जॉन म्हणतात, "जर आपण पुरुषत्वाच्या कल्पनांबद्दल बोललो, तर पुरुषांनी काय करावं आणि काय करू नये, यासाठीचे अनेक अलिखित नियम किंवा धारणा आहेत. पुरुषांनी फारसं भावनिक नसणं, मजबूत असणं, नियंत्रणात राहणं, कोणताही कमकुवतपणा किंवा नाजूकपणा न दाखवणं, स्वत:हून गोष्टी समजून घेणं हे ते मुद्दे आहेत."
"तुम्ही पाहू शकता की यापैकी बऱ्याच गोष्टी तुमच्या भावविश्वाशी संबंध निर्माण करण्यात आणि आवश्यकता असल्यास मदत मागण्यात अडथळ्याच्या ठरतात."
डॉ. ऑग्रोडनिकझुक नमूद करतात की जर स्वर, भाषा आणि दृष्टीकोनातून पुरुषांसाठी संधी निर्माण केली, तर याबाबतचा त्यांचा सहभाग वाढतो.
अनौपचारिक दृष्टीकोन
अलीकडच्या संशोधनात, सामाजिक धारणा किंवा अपेक्षा आणि कमकुवतपणा दाखवण्यासंदर्भातील लांछन याव्यतिरिक्त इतर अनेक मुद्दे ज्यांचा मानसिक आरोग्याबाबत मदत घेण्याबाबत मुलांच्या दृष्टीकोनावर कसा परिणाम होतो, लक्षात घेण्यात आले आहेत.
अनेक मुलांना त्यांची लक्षणं लक्षात येत नाहीत किंवा या समस्यांसाठी मदत कशी घ्यायची ते त्यांना माहीत नसतं. अनेकदा त्यांना औपचारिक क्लिनिकल सेटिंग म्हणजे औपचारिक मार्गदर्शन सोयीचं वाटत नाही.
मुलं आणि तरुण अनेकदा अनौपचारिक मदत घेणं पसंत करतात. उदाहरणार्थ, मित्रांबरोबरची किंवा अनामिक व्यक्तीबरोबरची संभाषणं, ऑनलाइन मदत आणि पुरुषांना सोयीचे वाटतील असे संदेश यांचा त्यांच्यावर अधिक प्रभाव पडतो. कारण या पद्धती ताकद किंवा भक्कमपणा, जबाबदारी आणि कृती जोडलेल्या असतात.
त्यामुळे यासंदर्भात सेवा पुरवणाऱ्या संस्था पारंपरिक पद्धतीचे क्लिनिकल मॉडेल सोडून देत आहेत. उदाहरणार्थ, ऑस्ट्रेलियामध्ये, ऑरिजेन ही संस्था तरुणांना मानसिक आरोग्याच्या समस्यांबाबत मदत करते. या संस्थेनं तरुणांबरोबर अशा जागांची सह-रचना केली आहे. ज्या तरुणांना "सॉफ्ट एन्ट्री" देतात. म्हणजेच तिथे औपचारिक स्वरुपाची संभाषणं होऊ शकतात.
ऑरिगेनचे कार्यकारी संचालक पॅट्रिक मॅकगरी म्हणतात, "तरुण पुरुष पहिल्यांदाच संपर्क झाल्यानंतर कन्सल्टिंग रूममध्ये बसण्यास तितकेसे इच्छूक नसतील. त्यांना तिथे बसून मुलाखत देण्याची इच्छा नसेल."
"कदाचित त्यांना काहीतरी कृती करत असतानाचं अधिक सोयीचं, अनौपचारिक संभाषण हवं असेल. उदाहरणार्थ, पायी फिरायला जाताना किंवा टेबल टेनिस किंवा इतर एखादा खेळ खेळताना संभाषण करण्याची त्यांची इच्छा असते."
सोशल मीडिया: मित्र की शत्रू?
सोशल मीडिया ही एक दुधारी तलवार आहे. सोशल मीडियामुळे एकाकी असणारे किशोरवयीन मुलं जोडले जाऊ शकतात आणि त्यांना मौल्यवान माहिती मिळू शकते.
मात्र त्याचवेळी त्यांच्यापर्यंत हानिकारक कंटेन्ट पोहोचू शकतो. तसंच त्यांच्यापर्यंत पुरुषत्वाच्या नकारात्मक किंवा चुकीच्या कल्पना देखील पोहोचू शकतात.
"बहुतांश तरुण आता पुरुषांशी आणि पुरुषत्वाच्या प्रभावशाली कंटेन्टशी जोडले जात आहेत," असं डॉ. सिमॉन राईस म्हणतात. ते क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आहेत. तसंच मूव्हेम्बर इन्स्टिट्यूट ऑफ मेन्स हेल्थचे जागतिक संचालक आहेत.
मूव्हेम्बरच्या संशोधनातून दिसून आलं आहे की, पुरुषत्वाशी आणि महिला द्वेषाशी निगडीत कंटेन्टशी जोडलेल्या अनेक तरुणांमध्ये त्यांच्या समवयस्क तरुणांपेक्षा मानसिक आरोग्याच्या अधिक समस्या दिसून आल्या आहेत.
मात्र राईस या गोष्टीवर भर देतात की सर्वच कंटेन्ट नकारात्मक नसतो. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी सोशल मीडियादेखील एक उपयुक्त साधन ठरू शकतं.
"आम्हाला या गोष्टीची खातरजमा करायची आहे की समुदायांना एकत्र करण्यासाठी, शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयी चांगली माहिती पुरवण्यासाठी, तसंच सोशल मीडियामुळे होणाऱ्या हानीची शक्यता कमी करण्यासाठी सोशल मीडियाशी संबंधित सकारात्मक पैलूंचा वापर आपण करू शकतो."
ते म्हणतात की, सोशल मीडियाच्या अल्गोरिदमची काम करण्याची पद्धत हे एक गंभीर आव्हान आहे. कारण या अल्गोरिदमची रचना, जे कंटेन्ट अधिक व्हायरल होण्याची शक्यता असते, असंच कंटेन्ट शेअर करण्यासाठी करण्यात आलेली आहे. त्यामुळे सकारात्मक, आरोग्य-केंद्रीत कंटेन्टला अल्गोरिदममध्ये "अग्रक्रमाचं स्थान" मिळणं कठीण आहे.
प्राध्यापक मिना फझेल, ऑक्सफर्ड विद्यापीठात किशोरवयीन मानसोपचारशास्त्राच्या अध्यक्षा आहेत.
त्या या गोष्टीशी सहमत आहेत की सोशल मीडियाचा अल्गोरिदम कशाप्रकारे काम करतो, हे किशोरवयीन मुलांना आणि पालकांना शिकवणं खूप महत्त्वाचं आहे.
प्राध्यापक मिना फझेल यांनी एका लवकरच प्रकाशित होणाऱ्या संशोधनाकडे लक्ष वेधलं. या संशोधनात असं आढळलं आहे की गेल्या महिन्यात एक तृतियांश तरुणांनी सोशल मीडियावर स्वत:ला हानी पोहोचवणारं कंटेन्ट पाहिलं होतं.
मात्र प्राध्यापक फझेल पुढे म्हणतात की फक्त सोशल मीडियालाच दोष देता येणार नाही. समाजातील व्यापक स्वरुपाचे बदल देखील लक्षात घेतले पाहिजेत.
"कुटुंब आणि समुदायाची रचना खूप वेगानं आणि मोठ्या प्रमाणात बदलत आहेत. अशा परिस्थितीत सोशल मीडिया संभाव्यपणे अनेक तरुणांसाठी मदतीची भूमिका बजावू शकतो," असं त्या म्हणतात.
एकाकीपणाचा मुद्दा
मुलांना भेडसावत असलेल्या सर्वात व्यापक आणि अनेकदा दुर्लक्ष करण्यात येत असलेल्या मुद्द्यांपैकी एक म्हणजे त्यांचा एकाकीपणा.
मे महिन्यात प्रकाशित झालेल्या, गॅलप सर्वेक्षणानुसार, 15 ते 34 वर्षे वयोगटातील 25 टक्के अमेरिकन पुरुषांनी सांगितलं की, त्यांना आदल्या दिवशी मोठ्या प्रमाणात एकाकीपणा किंवा एकटेपणा जाणवला होता.
याबाबतीत अमेरिकेची राष्ट्रीय सरासरी 18 टक्के आहे आणि एकूण तरुणींसाठी देखील ती 18 टक्के आहे. या दोन्हीपेक्षा अमेरिकन पुरुषांना एकाकीपणा जाणवण्याचं प्रमाण अधिक आहे.
डॉ. ऑग्रोडनिकझुक म्हणतात की हेड्सअपगाईजमधील त्यांची आकडेवारी दाखवते की एकाकीपणा आणि कोणतंही उद्दिष्टं नसणं, या दोन कारणांमुळे तरुणांमध्ये सर्वाधिक ताणतणाव निर्माण होतो.
जिथे मुलं मैत्री करू शकतील आणि मोकळेपणानं बोलू शकतील, अशा सुरक्षित जागा पुरवण्याची गरज तज्ज्ञांनी अधोरेखित केली आहे. हे फक्त ठरवण्यात आलेल्या थेरेपीच्या सत्रांसाठीच नसावं तर दैनंदिन संभाषणांसाठीदेखील असावं.
याचा अर्थ मार्गदर्शन करणारे कार्यक्रम, मदत करणारे समवयस्क गट किंवा वर्गांमध्ये आपण मानसिक आरोग्याबद्दल कसं बोलतो याचा पुनर्विचार करणं, या गोष्टी असू शकतात.
शाळांची भूमिका
प्राध्यापक मिना फझेल म्हणतात, "किशोरवयीन मुलं जेव्हा मानसिक आरोग्याच्या समस्यांबाबत मदत किंवा मार्गदर्शन घेतात, तेव्हा त्यांना सहसा त्याचा उपयोग होतो हा एक सकारात्मक ट्रेंड आहे."
"ती मदत किंवा मार्गदर्शन कुठे दिली गेली आहे, हे प्रत्यक्षात महत्त्वाचं नसतं. ती मदत शाळेत केली जाऊ शकते, सामाजिक सेवांमध्ये असू शकते किंवा समुदायात असू शकते."
मुलांच्या आरोग्यामध्ये शाळेतील संस्कृतीची, वातावरणाची भूमिका असल्याचे पुरावे वाढत आहेत. मुलांवर शैक्षणिक दबाव असतो.
विशेषकरून जिथे मुलं मुलींपेक्षा मागे पडत आहेत, तिथे हा दबाव असतो. या दबावामुळे मुलांमध्ये चिंता, निराशा वाढू शकते. त्यांचा शिक्षणातील रस कमी होऊ शकतो.
प्राध्यापक फझेल यांना वाटतं की मुलांच्या बाबतीत योग्य वातावरण निर्माण करण्यासाठी शाळांची पुनर्रचना करणं आवश्यक आहे.
त्या पुढे म्हणतात, "जगातील बहुतांश मुलांना शाळा उपलब्ध आहेत."
"त्यामुळे शाळा या अशी जागा आहे, ज्याबद्दल आपण फक्त मुलांच्या शिक्षणाबद्दलच नाहीत तर ते किशोरावस्थेत मुलं विकसित होण्याची व्यवस्था म्हणून त्याचा व्यापक विचार करण्याची आवश्यकता आहे. विशेषकरून मुलांच्या बाबतीत ते आवश्यक आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)