फ्रीज, टीव्ही, लॅपटॉप, मोबाईलसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठीच्या विम्याबद्दल जाणून घ्या

इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, पद्मा मीनाक्षी
    • Role, बीबीसी

विमा हा आर्थिक नियोजनाचा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. मात्र, विम्याचेही अनेक प्रकार असतात.

आजकालच्या जीवनशैलीमध्ये घरामध्ये अनेक प्रकारच्या महागड्या वस्तू असतात. अशावेळी आयुर्विमा आणि आरोग्य विम्याबरोबरच या वस्तूंसाठी देखील विमा घेणं महत्त्वाचं ठरतं.

यासाठी कोणता विमा घ्यायचा, त्याचे फायदे काय आणि त्यासंदर्भातील महत्त्वाचे तांत्रिक मुद्दे कोणते याबद्दल सविस्तर माहिती देणारा हा लेख.

सध्याच्या काळात फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, मोबाईल फोन यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा उपकरणं जवळपास प्रत्येक घरात असतात. आपण हजारो रुपये मोजून फ्रीज विकत घेतो. महागडा आधुनिक एलईडी टीव्हीदेखील विकत घेतो.

या वस्तू विकत घेताना आपण सहजपणे चार पैसे जास्तीचे खर्च करतो. मात्र, या वस्तूंसाठी विमा घेणं मात्र टाळलं जातं. एकतर विमा घेतलाच जात नाही किंवा विमा घेण्यापूर्वी खूप विचार केला जातो.

उगाच का विम्याचा हफ्ता का भरायचा, ही भावना यामागे असते; तर अनेकदा असा काही विमादेखील असतो याचीच माहिती नसते.

त्यातच या वस्तूंवर अनेकदा वॉरंटी देखील मिळते, साहजिकच विम्याकडे दुर्लक्ष होतं.

मध्यमवर्गीय लोक साधारणपणे दोन प्रकारे वस्तू विकत घेतात. पहिला पर्याय म्हणजे दर महिन्याच्या खर्चातून अतिरिक्त बचत करून, त्या शिलकी रकमेतून वस्तू विकत घेतली जाते. दुसरा मार्ग म्हणजे अर्थात ईएमआयद्वारे वस्तू विकत घ्यायची.

मात्र, वस्तू विकत घेताना त्यावर विमा घेण्याचा विचार मात्र सहसा आपल्या नियोजनातच नसतो. विम्याच्या हफ्त्याला सहसा अतिरिक्त आणि विनाकारण स्वरुपाचा खर्च मानलं जातं.

इलेक्ट्रॉनिक गॅझेट इन्श्युरन्स

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मागील काही आठवड्यात महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणासह देशाच्या विविध भागाला पुराचा प्रचंड फटका बसला. यात अनेकांचे संसार रस्त्यावर आले. यातील काहीजणांनी तर त्यांच्या घरातील सर्व काही गमावलं. फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन सर्वकाही पुराच्या पाण्यात बुडालं किंवा वाहून गेलं.

यासारख्या आणि इतर वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक संकटांना तोंड देण्याची वेळ कधीही आणि कोणावरही येऊ शकते. अशा कठीण प्रसंगी सर्व काही गमावल्यामुळे आयुष्य नव्यानंच सुरू करण्याची वेळ येते. मात्र ती काही सोपी गोष्ट नसते. या सर्व वस्तू पुन्हा विकत घेण्यासाठी पैसा कुठून येणार? अशावेळी इलेक्ट्रॉनिक गॅझेट इन्श्युरन्स (electronic gadget insurance) म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठीचा विमा अतिशय महत्त्वाचा ठरतो.

जरी या विम्याच्या माध्यमातून त्या वस्तूच्या पूर्ण किंमतीएवढी रक्कम मिळत नसली तरीदेखील एका विशिष्ट रकमेचं विमा संरक्षण नक्कीच मिळतं. अडचणीच्या प्रसंगी ही रक्कम अत्यंत मोलाची ठरते.

व्हाईट माऊंट फिनसर्व्हचे एम. व्ही. व्ही. एन पत्रूडू यांनी बीबीसी न्यूजला इलेक्ट्रॉनिक गॅजेट इन्श्युरन्स म्हणजे काय? या विम्याचा क्लेम किंवा दावा कसा करतात? आणि तो कसा फायदेशीर असतो? याबाबत विस्तारानं सांगितलं.

इलेक्ट्रॉनिक गॅजेट इन्श्युरन्स म्हणजे काय?

इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर अनेकदा वॉरंटी दिली जाते. मात्र, जेव्हा इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील वॉरंटी उपयोगी ठरत नाही तेव्हा इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील विमा म्हणजे इलेक्ट्रॉनिक गॅजेट इन्श्युरन्स (electronic gadget insurance) उपयुक्त ठरतो.

उदाहरणार्थ, समजा तुमचा मोबाईल फोन जर चोरीला गेला किंवा चुकून,अपघातानं पाण्यात पडला. तर अशावेळी तिथे या वस्तूंवरील वॉरंटी लागू होणार नाही.

मात्र, चोरी, तोडफोड, अपघात किंवा नैसर्गिक संकटाच्या वेळेस इलेक्ट्रॉनिक गॅजेट इन्श्युरन्स फायद्याचा ठरतो.

हा विमा असल्यास अशा प्रसंगांमध्ये तुम्ही त्या वस्तूच्या किंमतीच्या आधारावर विम्याच्या रकमेसाठी दावा करू शकता.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

कोणत्या वस्तूंवर हा विमा मिळतो?

मोबाईल फोन, लॅपटॉप, टॅबलेट, आयपॅड्स, रेडिओ, टीव्ही, कॅमेरा, ड्रोन, गेमिंग कन्सोल यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा उपकरणांवर इलेक्ट्रॉनिक गॅजेट इन्श्युरन्स मिळतो.

वॉशिंग मशीन आणि फ्रीजवर देखील हे विमा संरक्षण मिळतं. अगदी तुमच्या ब्रँडेड स्मार्ट वॉचसाठी देखील हा विमा घेता येतो.

या प्रकारचा विमा कधी घ्यावा?

महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू विकत घेताना हा विमा घेतला पाहिजे. त्या वस्तूच्या किंमतींवर विम्याचा हफ्ता ठरतो किंवा वस्तूंच्या किंमतीच्या प्रमाणात विम्याच्या हफ्त्याची रक्कम असते.

तुम्ही वस्तू विकत घेताना विमा घ्यायचा राहिला असेल तर काही दिवस वस्तू वापरल्यानंतर देखील त्यावर विमा संरक्षण घेता येतं. फक्त वस्तू वापरल्यामुळे तिच्या किंमतीचे अवमूल्यन किंवा घट होते. म्हणजे मूळ किंमतीपेक्षा काही रक्कम कमी करून त्या आधारावर विमा दिला जातो.

पत्रूडू सांगतात की वेगवेगळ्या वस्तूंवर स्वतंत्र विमा घेण्याऐवजी घरातील सर्व मौल्यवान किंवा महागड्या वस्तूंवर एकच विमा घेणं श्रेयस्कर ठरतं.

इलेक्ट्रॉनिक गॅझेट इन्श्युरन्स

फोटो स्रोत, Getty Images

मात्र, फक्त लॅपटॉप, मोबाईल फोनसारख्या महागड्या वस्तूंवरच हा विमा घेता येतो का, असं विचारलं असता ते म्हणाले की इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर देखील विमा घेतो; फक्त ती वस्तू ब्रँडेड असली पाहिजे. जेणेकरून त्या वस्तूच्या गुणवत्तेची खात्री असते.

अनेकदा लॅपटॉप, मोबाईल फोन, टीव्ही यांसारख्या वस्तू स्थानिक बाजारात तयार केलेल्या असतात. बऱ्याचवेळा अशा वस्तूंचं बिल मिळत नाही आणि गुणवत्तेची देखील खात्री नसते. त्यामुळे त्यावर विमा घेता येत नाही.

त्याचबरोबर काहीवेळा या वस्तू सेंकडहँड स्वरुपात विकत घेतल्या जातात. या वस्तूंचं देखील बिल किंवा इनव्हॉईस मिळत नाही. अशा परिस्थितीत त्यावर विमा मिळत नाही.

हा विमा कुठे मिळतो?

ज्या प्रकारे आपण आरोग्यविमा, आयुर्विमा विकत घेतो, त्याचप्रकारे इलेक्ट्रॉनिक गॅजेट इन्श्युरन्सदेखील घेता येतो. विविध विमा कंपन्या, एजन्सी आणि सरकारी विमा कंपन्या ज्यांची नोंदणी इन्श्युरन्स रेग्युलेटरी ऑथोरिटीकडे करण्यात आली आहे, त्यांच्याकडून ही विमा पॉलिसी विकत घेता येते.

सध्या बाजारातील सर्व आघाडीच्या किंवा मान्यताप्राप्त विमा कंपन्या याप्रकारच्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट इन्श्युरन्स पॉलिसीची विक्री करत आहेत. ग्राहक त्यांच्या आवश्यकतेनुसार विमा पॉलिसी विकत घेऊ शकतात.

यासाठी घरातील विमा घेण्यायोग्य अशा सर्व वस्तूंची एक यादी तयार केली पाहिजे. या यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या वस्तू नामांकित किंवा मान्यताप्राप्त कंपनीच्या असल्या पाहिजेत. जेणेकरून त्यांच्या गुणवत्तेची हमी असते.

शिवाय, ज्या वस्तूंवर विमा घ्यायचा आहे; त्या वस्तूंचं बिल असणं बंधनकारक आहे.

त्याचबरोबर ज्या कंपन्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री करतात अशा कंपन्यांबरोबर काही विमा कंपन्यांचा करार झालेला असतो. त्यामुळे या कंपन्या वस्तू विकत घेत असतानाच ग्राहकांना विमा सेवा देखील पुरवतात. म्हणजे वस्तूची खरेदी करतानाच विमा पॉलिसी देखील विकत घेता येते.

इलेक्ट्रॉनिक गॅझेट इन्श्युरन्स

फोटो स्रोत, Getty Images

विम्यासाठी किती हफ्ता भरावा लागतो?

विम्याच्या हफ्त्याची रक्कम ज्या वस्तूसाठी विमा घ्यायचा त्या वस्तूच्या किंमतीवर अवलंबून असते.

जर ती वस्तू काही दिवस वापरली गेली असेल आणि अजूनही उत्तमरित्या कार्यरत असेल तर त्यावर विमा घेता येतो. मात्र त्या वस्तूच्या मूळ किंमतीत अवमूल्यन किंवा घट होते. म्हणजेच त्या वस्तूची किंमत त्या प्रमाणात कमी करून त्या आधारावर विम्याची रक्कम निश्चित होते.

या विम्याच्या अनेक प्रकारच्या पॉलिसी देखील उपलब्ध आहेत. ज्या प्रकारची विमा पॉलिसी घेतली असेल त्यानुसार क्लेम किंवा दावा करता येतो.

यात बेसिक प्लॅन देखील असतो. या बेसिक प्लॅनमध्ये वस्तूच्या पूर्ण किंमतीचा विमा मिळण्याचा पर्याय नसतो.

इलेक्ट्रॉनिक गॅझेट इन्श्युरन्स

फोटो स्रोत, Getty Images

पत्रूडू सांगतात की विमा पॉलिसी घेताना त्यातील सर्व बारकावे, अटी व नियम लक्षात घेतले पाहिजेत आणि त्यानंतरच विमा पॉलिसी विकत घेतली पाहिजे.

अनेकदा एखाद्या वस्तूसाठी विमा पॉलिसी घेतली जाते. मात्र त्यातील बारकावे, अटी लक्षात न घेतल्यामुळे वस्तू हरवल्यावर, विम्याची रक्कम क्लेम केल्यानंतर विमा कंपनी तो स्वीकारत नाही आणि ग्राहकाला धक्का बसतो.

असं होऊ नये यासाठी विमा पॉलिसी विकत घेण्यापूर्वीच त्यातील विविध अटी आणि मुद्दे नीट समजून घ्यावेत.

विम्याची रक्कम क्लेम करण्यासाठीच्या अटी कोणत्या?

इलेक्ट्रॉनिक गॅजेट इन्श्युरन्स या नावाप्रमाणेच हा विमा इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी असतो. घराला किंवा इमारतीला आग लागणे, पूरस्थिती, भूकंप, दरड कोसळणं, शॉर्ट सर्किट होणं, दंगली आणि तोडफोड होणं इत्यादी नैसर्गिक बाबींमुळे जर या वस्तूंचं नुकसान झालं तर त्या स्थितीत विम्याच्या रकमेवर क्लेम करता येतो.

पत्रूडू यासंदर्भात आणखी एक मुद्दा स्पष्ट करतात. तो म्हणजे वस्तूच्या अतिवापरामुळे किंवा वस्तू अपघातानं, चुकून पाण्यात पडल्यामुळे जर वस्तूचं नुकसान झालं तर अशा स्थितीत विम्याची रक्कम मिळण्याची शक्यता नसते.

जर तुम्ही एखाद्या इलेक्ट्रॉनिक वस्तूवर विमा पॉलिसी घेतली असेल तर ती वस्तू बेजबाबदारपणे हाताळणं योग्य नसतं, ही बाबदेखील ते लक्षात आणून देतात.

याशिवाय सर्वच विमा कंपन्यांच्या अटी सारख्या असतात असं नाही. अनेकदा त्यात फरक असतो. त्यामुळे विमा पॉलिसी विकत घेण्यापूर्वी सर्व अटी आणि नियम समजून घेतल्या पाहिजेत.

त्याचबरोबर ती विशिष्ट विमा पॉलिसी तुमच्या गरजेनुरुप आहे की नाही, याचीही खातरजमा केली पाहिजे.

इलेक्ट्रॉनिक गॅझेट इन्श्युरन्स

फोटो स्रोत, Getty Images

विम्याचा क्लेम कसा करावा?

ज्या वस्तूवर विमा घेतलेला आहे, ती वस्तू हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास 24 तासाच्या आत स्थानिक पोलिस स्टेशनवर एफआयआर नोंदवला पाहिजे. त्यानंतर संबंधित विमा कंपनीला ते तात्काळ कळवलं पाहिजे. विमा कंपनीला एफआयआरची एक प्रत देखील दिली पाहिजे.

जर विमा पॉलिसीत उल्लेख केलेल्या कारणांव्यतिरिक्त इतर कुठल्याही कारणामुळे वस्तू हरवली असेल तर त्या स्थितीत देखील तत्काळ विमा कंपनीला या गोष्टीची माहिती दिली पाहिजे.

त्यानंतर विमा कंपनीचा संबंधित अधिकारी यासंदर्भात माहिती घेईल, तपासणी करेल आणि त्यानंतर क्लेमसाठीची आवश्यक प्रक्रिया सुरू करेल.

क्लेम फॉर्मला त्या वस्तूचं बिल देखील जोडलं पाहिजे. याशिवाय विमा कंपनीनं मागितलेली इतर माहिती आणि आधार कार्ड सारखं ओळखपत्र इत्यादी गोष्टीसुद्धा विमा कंपनीला दिल्या पाहिजेत.

किती दिवसात क्लेमची प्रक्रिया पूर्ण होत विम्याची रक्कम मिळते?

जर ती वस्तू ती कायमची हरवली असेल तर त्या विमा रकमेतून घट कमी करून (वस्तूच्या वापरामुळे झालेले अवमूल्यन) उर्वरित पूर्ण रक्कम पॉलिसीधारकाला दिली जाते.

जर ती वस्तू दुरुस्त होण्यासारखी असेल तर त्या वस्तूच्या दुरुस्तीचा खर्च विमा कंपनीकडून दिला जातो.

विम्याबद्दल जागरुकता आवश्यक

तेलंगणातील पूरग्रस्त भागात पुनर्वसन प्रकल्प राबवणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापकानं बीबीसीला सांगितलं की, या पुरामध्ये शेकडो लोकांनी त्यांची घरं गमावली. फ्रीज, वॉशिंग मशीन आणि टीव्हीसारख्या महागड्या वस्तू गमावल्या. दुर्दैवाची बाब म्हणजे यातील कोणीही त्या वस्तूंसाठी विमा संरक्षण घेतलेलं नव्हतं.

मॉर्डर इंटेलिजन्सनं या विविध विषयांचा अभ्यास करणाऱ्या रिसर्च फर्मनं, 'इंडिया इलेक्ट्रॉनिक गॅझेट इन्श्युरन्स मार्केट साईज अँड शेअर अ‍ॅनालिसिस - ग्रोथ ट्रेंड्स अँड फोरकास्ट हा अहवाल प्रकाशित केला आहे.

या अहवालानुसार भारतातील मोबाईल वापरणाऱ्या 16 टक्के लोकांनी विमा घेतला आहे आणि फक्त 7 टक्के उपकरणांवर विमा संरक्षण घेण्यात आलेलं आहे.

2025 भारतातील गॅजेट इन्श्युरन्सची बाजारपेठ 50 कोटी डॉलर्सवर (जवळपास 4,194 कोटी रुपये) पोहोचणार असल्याचा अंदाज मॉर्डर इंटेलिजन्सच्या अहवालात वर्तविण्यात आला आहे.

अनिता मल्ला एडेलवाईस कंपनीत सीनियर डेव्हलपमेंट मॅनेजर आहेत. त्या म्हणतात, अर्थात अजूनही भारतात इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा उपकरणांसाठीच्या विम्याबद्दल फारशी जागरुकता किंवा माहिती नाही.

इलेक्ट्रॉनिक गॅझेट इन्श्युरन्स

फोटो स्रोत, Getty Images

कोरोनाच्या संकटानंतर आयुर्विमा आणि आरोग्यविमा पॉलिसीचं महत्त्व वाढलं. मात्र, गॅजेट इन्श्युरन्सबद्दल अजून एक टक्का लोकांमध्येही जागरुकता नाही.

"विकसित देशांमध्ये आयुर्विम्यापासून ते घरातील छोट्यात छोट्या वस्तूपर्यंत सर्व गोष्टीवर, उपकरणांवर विमा घेतलेला असतो," असं अनिता म्हणाल्या.

"विमा एजंट त्यांना आग्रह केल्याशिवाय उपकरणं किंवा वस्तूंसाठीच्या विविध विमा पॉलिसीचे फायदे सांगत नाहीत. परिणामी अनेकजण याप्रकारची विमा पॉलिसी घेत नाहीत," असं मत त्या मांडतात.

विमा संरक्षणासंदर्भात सर्वसामान्यांनी अधिक सजग व्हायला हवं, असं अनिता यांना वाटतं.

यासंदर्भात त्या म्हणतात, "ज्याप्रमाणे प्राप्तिकर किंवा इतर कर न भरल्यास त्याचे काय परिणाम होतात याबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये जागरुकता आहे त्याचप्रमाणे विमा पॉलिसी नसल्यास काय होतं याबद्दल देखील सरकारनं लोकांमध्ये जागरुकता निर्माण करायला हवी."

विमा पॉलिसीची आवश्यकता आणि महत्त्व तेव्हाच लक्षात येतं जेव्हा एखादं नैसर्गिक संकट किंवा आपत्ती येते. एरवी आपल्या घरातील वस्तूंना काहीच होणार नाही अशी लोकांना खात्री असते.

अनिता म्हणाल्या की नैसर्गिक आपत्ती किंवा संकटाच्या वेळेस विमा पॉलिसीशी संबंधित सर्व कागदपत्रे हरवली किंवा गहाळ झाली तरी फोन नंबरचा वापर करून विम्याची रक्कम क्लेम करता येते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)