अ‍ॅपल आयफोन-16 सीरिज लाँच, जाणून घ्या नवीन फीचर्स आणि किंमत

आयफोन-16 लाँच

फोटो स्रोत, Apple Newsroom

फोटो कॅप्शन, आयफोन-16 लाँच

अ‍ॅपलने नुकतीच आयफोन-16 सीरिज लाँच केली आहे. या फोनची वैशिष्ट्ये काय आहेत, फोनच्या कोणत्या व्हेरियन्टची किती किंमत आहे हे आपण या बातमीतून जाणून घेऊ.

9 सप्टेंबर रोजी अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियास्थित अ‍ॅपल पार्कमध्ये कंपनीच्या वार्षिक इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं होतं.

यावर्षीच्या इव्हेंटला ‘इट्स ग्लोटाइम’ हे नाव देण्यात आलं. या इव्टेंटनंतर अ‍ॅपलने त्यांचे नवीन डिव्हाइसेस लाँच केले.

यामध्ये अ‍ॅपल वॉच सीरिज-10, एअरपॉड्स-4, अ‍ॅपल वॉच अल्ट्रा-2, एअरपॉड्स मॅक्सच्या लाँचनंतर आयफोन-16 सीरिजही लाँच करण्यात आली.

आयफोन-16 मध्ये नवीन काय

अ‍ॅपल इंटेलिजन्स

अ‍ॅपलच्या या इव्हेंटमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर भर देण्यात आला. आयफोनची ही नवीन सीरिज कंपनीच्या स्वतःच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह येत आहे.

अ‍ॅपल कंपनीचे मुख्य कार्यकारी टीम कुक या इव्हेंटमध्ये बोलताना म्हणाले, “आम्ही अ‍ॅपल इंटेलिजन्स आणि त्याच्या सर्वोत्तम क्षमतेसह नव्या रूपात आयफोन सादर करत आहोत.”

टीम पुढे म्हणाले, “जूनमध्ये आम्ही अ‍ॅपल इंटेलिजन्स लाँच केलं होतं. हे नवीन स्मार्ट आणि पर्सनल इंटेलिजंस सिस्टीम अतिशय आधुनिक आणि वेगळं आहे.”

कंपनीचं म्हणणं आहे की, नवीन एआय सपोर्टमुळे टेक्स्ट, फोटो आणि व्हिडीओमध्ये उत्तम सपोर्ट मिळेल. याशिवाय उत्पादकताही वाढेल. तसेच, सीरी (Siri) पूर्वीपेक्षा अधिक प्रभावी सिद्ध होईल.

मात्र, ॲपल इंटेलिजन्स फीचर काही महिन्यांनंतरच उपलब्ध होणार आहे. तत्पूर्वी काही देशांमध्ये यांची बीटा आवृत्ती लाँच केली जाईल.

आयफोन-16 लाँच

फोटो स्रोत, Getty Images

कॅमेरा कंट्रोल - या नव्या फोनमध्ये कॅमरा अ‍ॅक्शन कंट्रोलसाठी साइड पॅनलमध्ये एक बटन देण्यात आलं आहे. याचा उपयोग कॅमेऱ्याद्वारो फोटो, व्हिडिओ काढण्यासाठी, झूम, एक्सपोजर, डेप्थ, फिल्ड कंट्रोलसारख्या सेटिंग्समध्ये करता येईल. यामुळे आयफोनने व्हिडिओ किंवा फोटो क्लिक करणं आणखी सोपं होईल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

अ‍ॅक्शन बटन - या सीरिजमध्ये अ‍ॅक्शन बटनदेखील देण्यात आलं आहे. या बटनद्वारे एकावेळेस विविध सहजपणे स्विच करू शकतील.

उदाहरणार्थ फ्लॅशलाइट, कॅमेरा किंवा त्याचा वापर करून कंट्रोल उघडू शकतात. रिंग किंवा सायलेंट मोड स्विच करता येईल. याशिवाय विविध नवीन पर्यायही उपलब्ध होणार आहेत.

आयफोन-16 लाँच

फोटो स्रोत, Getty Images

A18 चिप - अ‍ॅपल इंटेलिजन्ससाठी खासकरून या नवीन सीरीजमध्ये A-18 चिपचा वापर करण्यात आला आहे. ही मागील आयफोन सीरिजच्या दोन जनरेशनच्या पुढची चीप आहे. आयफोन 15 मध्ये A-16 बायोनिक चीप वापरण्यात आली होती.

यामुळे पॉवर एफिशियन्सीसह बॅटरीचे आयुष्य देखील वाढेल, असं कंपनीचं म्हणणं आहे.

कॅमेरा - आयफोन-16 मध्ये 48-मेगापिक्सल ड्युअल कॅमेरा प्रणाली देण्यात आली आहे. तसेच टेलिफोटो लेन्समध्ये 2x झूम करण्याची क्षमता आहे. तर आयफोन-16 प्रो मध्ये 5x झूमची क्षमता देण्यात आली आहे.

बॅटरी - आयफोन-16 मध्ये 27 तासांची व्हिडिओ प्लेबॅक क्षमता तर आयफोन-16 प्रोमध्ये 33 तासांपर्यंतची व्हिडिओ प्लेबॅक क्षमता असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

कलर, डिस्प्ले आणि कॅपेसिटी

आयफोन-16 आणि आयफोन-16 प्लस सफेद, काळा, गुलाबी, टील आणि अल्ट्रिरीन अशा पांच रंगात उपलब्ध आहे. तर, आयफोन-16 प्रो आणि प्रो मॅक्स हा ब्लॅक टायटेनियम, व्हाइट टायटेनियम, नॅच्युरल टायटेनियम, डेझर्ट टायटेनियम या चार रंगात उपलब्ध आहे.

याच्या डिस्प्लेबाबत बोलायचं झाल्यास, आयफोन-16 चा आकार 6.1 इंच, आयफोन-16 प्लस 6.7 इंच तर आयफोन-16 प्रो चा आकार 6.3 इंच आणि आयफोन-16 प्रो मॅक्सचा आकार 6.9 इंच आहे.

क्षमतेच्या बाबतीत आयफोन-16, आयफोन-16 प्लसचे तीन प्रकार असून यात 128GB, 256GB आणि 512GB क्षमता उपलब्ध आहे.

तर आयफोन-16 प्रोसाठी 128GB, 256GB, 512GB आणि 1TB असे चार प्रकार उपलब्ध आहेत. आयफोन-16 प्रो मॅक्स 256GB, 512GB आणि 1TB अशा तीन प्रकारांत उपबल्ध आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

किंमत आणि उपलब्धता

आयफोनचे हे सर्व मॉडेल 13 सप्टेंबरपासून भारतात प्री-ऑर्डर केले जाऊ शकतात आणि 20 सप्टेंबरपासून देशात उपलब्ध होतील. आता याची किंमत जाणून घेऊया.

आयफोन-16 ची किंमत 79,900 रुपये तर आयफोन-16 प्लसची किंमत 89,900 रुपये आहे.

तसेच, आयफोन-16 प्रो’ची किंमत 1,19,900 रुपये असून आयफोन-16 प्रो मॅक्सची किंमत 1,44,900 रुपये इतकी आहे.

आयफोनव्यतिरिक्त कोणते नवीन डिव्हाइस लाँच करण्यात आले

आयफोन 16 सीरिजव्यतिरिक्त अ‍ॅपल वॉच सिरीज 10 देखील लॉन्च करण्यात आली आहे. इतर कोणत्याही ऍपल वॉचच्या तुलनेत ही अधिक पातळ आणि पूर्वीपेक्षा अधिक प्रभावी असल्याचं, कंपनीचं म्हणणं आहे.

याचा उपयोग विशेषतः आउटडोर अ‍ॅक्टिव्हिटी आणि हेल्थ मॉनिटरिंगसाठी देखील केला जातो. भारतात ही 20 सप्टेंबरपासून उपलब्ध होईल आणि त्याची किंमत 46900 रुपये इतकी आहे.

कंपनीने अ‍ॅपल वॉच अल्ट्रा-2 देखील लाँच केलं असून तेदेखील भारतात 20 सप्टेंबरपासून उपलब्ध होईल.

याशिवाय अ‍ॅपलने एअरपॉड्स-4 आणि एअरपॉड्स मॅक्स-2 देखील लॉन्च केले आहेत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.