You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'जुळे असणं आमची चूक आहे का?' गेली 8 वर्षे आधार कार्डसाठी सांगलीच्या जुळ्या भावांची फरपट
- Author, सरफराज सनदी
- Role, बीबीसी मराठीसाठी
आधार कार्ड अपडेट होत नसल्याने सांगलीच्या जुळ्या भावांना शिक्षण घेणं कठीण झालंय, तर आता नोकरी मिळण्यातही अडचणी येत आहेत.
गेली आठ वर्षं तेच नाही तर त्यांचे आई-वडीलही आधार कार्ड मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये आपल्या चप्पल झिजवत आहेत.
सांगली जिल्ह्यातील वाळवा इथे राहणारे निलेश आणि योगेश घळगे या दोघांचं वय 18 वर्षं पूर्ण आहे. दोघांच्या वयात पाच मिनिटांचं अंतर.
“जुळे नसतो तर बरं झालं असतं,” असं ते हतबल होऊन सांगत आहेत. निलेश ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षात शिकतोय तर योगेशचं बारावीनंतर आयटीआयचं शिक्षण सुरू आहे.
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) नावनोंदणी आणि प्रमाणीकरण करुन भारतीय नागरिकाला 12 अंकी आधार कार्ड देते.
निलेश आणि योगेशचं वयाच्या सहाव्या वर्षी आधार कार्ड काढलं गेलं.
निलेश सांगतो, “नंतर शाळेत पाचवीत असताना अपडेट करतेवेळी त्यात अडचणी यायला सुरूवात झाली. सगळी प्रक्रिया पूर्ण केली, कागदपत्रं दिली, अर्ज केला पण तेव्हा रिजेक्ट झाला. तेव्हापासून आम्ही शेकडो वेळा अर्ज केले आहेत.”
आधार कार्डसाठी नोंदणी करताना वा अपडेट करताना व्यक्तीच्या नाव, पत्ता, लिंग, जन्म तारीख, मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी ही डेमोग्राफिक माहिती तसंच तीन प्रकारची बायोमेट्रीक माहिती गरजेची असते.
चेहऱ्याचा फोटो, हाताच्या बोटांचे ठसे आणि आयरिस म्हणजेच डोळ्यांची बुबुळं हे आधार केंद्रात नोंदवून घेतलं जातं.
‘देवाने गळ्यात सोनंच घातलं’
योगेश आणि निलेशची नोंदणी न होण्याचं कारण त्यांच्या हाताचे ठसे आणि डोळ्यांमध्ये साम्य असल्याच्या बातम्या काही वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या.
पण हेच कारण आहे का, किंवा नेमकी काय अडचण आहे, हे सरकारी कार्यालयातून सांगण्यात आलेलं नाही, असं जुळ्या मुलांचे वडील तानाजी घळगे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
त्यांनी सरकारच्या सुचनेनुसार जवळच्या केंद्रात तक्रारी नोंदवल्याचंही सांगितलं.
“जेव्हा या दोघांचा जन्म झाला तेव्हा देवाने माझ्या गळ्यात सोनंच घातलं असं मला वाटलं. देवाला हात जोडले होते आणि म्हटलं होतं- माझ्या गरीबाच्या घरात दोन मुलं जन्माला आली. मला खूप आनंद झाला. तेव्हा स्वप्न होतं या दोघांना पोलीसमध्ये भरती करायचं.” पण प्रत्यक्षात त्यांना निराशेचा सामना करावा लागला.
तानाजी आणि त्यांच्या पत्नी सविता दोघंही द्राक्षांच्या बागेत मोलमजुरीला जातात. पण अडलेल्या आधार कार्डमुळे कित्येकदा त्यांची मजुरी चुकल्याचं तानाजी सांगतात.
मुलांच्या शिक्षणावरच परिणाम झालेला नाही तर त्यांचं मानसिक खच्चीकरण झाल्याचं सविता सांगत होत्या. “कित्येकवेळा आम्ही जेवलो सुद्धा नाही. पोरं रडू लागली की आम्हालाही रडू यायचं. शाळा, कॉलेजमध्ये कसंबसं चालून गेलं. पण आमची मुलं अस्तित्वात आहेत की नाहीत, असा प्रश्न एखाद्याला पडतोय.”
हातातली नोकरी गेली
कॉलेज प्रवेश, शिष्यवृत्ती, आरक्षण, सरकारी योजना, य इतकंच काय नोकरी मिळवण्यातही अडचणी येतात, असं ते सांगतात. आधार कार्ड नसेल तर शिष्यवृत्ती आणि सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही.
योगेश सांगतो की, याच कारणामुळे मला स्कॉलरशिप फॉर्म भरता आला नाही. आयटीआय कॉलेजमध्ये मला पूर्ण फी भरावी लागली.
पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मोबाईल सिम कार्ड आणि बँकेत अकाऊंट उघडायलाही त्यांना अडचणी येतायत.
निलेशला 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर नोकरीची संधी चालून आली, पण 15 हजार रुपये पगाराची नोकरी हुकल्याचं तो सांगतो.
“कोल्हापूरहून नोकरीसाठी कॉल आला, तर त्यांनी कार्ड मागितलं. तेव्हा साहेब म्हणाले, बारावी झाल्याचं सांगतोस तर मग लहान मुलाचं आधार का पाठवलंस? हे तर अलिकडचं उदाहरण. पण आम्हाला गुणवत्ता असूनही अनेकदा हाकलण्यात आलंय.”
भरती नाही तर सराव कशाला?
निलेश आणि योगेशला पोलीस किंवा सैन्य दलात भरती व्हायचंय, त्यासाठी ते सराव देखील करायचे. आता त्यांनी निराशेतून सराव देखील थांबवलाय.
“आम्ही चौघेजण जेव्हा कधी एकत्र भेटतो तेव्हा वेगळा विषयच काढत नाही. कधी यायची आधार कार्ड, कधी व्हायचं काम हाच सारखा विषय. मुलं म्हणतात, व्यायाम तरी का करायचा, कार्ड तरी आहे का? भरतीचा फॉर्म भरुन घेत नाहीत तर तू कशाला आम्हाला सराव करायला सांगते आहेस? म्हणून मी व्यायामच बंद केलाय असं म्हणाले,” असं सविता रडवेल्या आवाजात सांगत होत्या.
वाळव्याच्या आधार केंद्रावर बायोमेट्रिक नोंदणीत अडचण येत होती म्हणूनच त्यांना मुंबईच्या कफ परेड येथील प्रादेशिक आधार नोंदणी कार्यालयात पाठवण्यात आल्याचं वाळवा ग्रामपंचायत आधार केंद्राचे संचालकांनी आम्हाला सांगितलं.
तिथेही तोडगा निघाला नाही, निराशा घेऊन घळगे कुटुंबाला गावी परतावं लागलं.
वाळवा आधार नोंदणी केंद्राचे संचालक महादेव देसाई सांगतात, “बायोमेट्रिक मिसमॅच झालं असेल म्हणून आम्ही UIDAIच्या 1947 या टोल फ्री नंबरवर तक्रार केली. मी स्वतः खूप प्रयत्न केले आहेत. पण नेमकी समस्या काय आहे हे कळत नाही. एक अशीही शक्यता आहे की, पूर्वी निलेशचे ठसे योगेशच्या नावावर, आणि योगेशचे निलेशला गेलेले असू शकतात. पण नेमकं काय ते माझ्या पातळीवर कळणार नाही. मी तक्रार नोंदवली आहे. UIDAI हेल्प डेस्कला कळवलं आहे. मुंबईला जाऊनही त्यांचा प्रश्न सुटला नाही.”
डोळ्यांचे रेटिना वेगळे
बायोमेट्रीकच्या नोंदीमध्ये दोघांचे डोळे ही तांत्रिक अडचण आहे का याविषयी बीबीसी मराठीने जाणून घेतलं.
दोन्ही जुळ्या भावांच्या डोळ्यांमध्ये काही साम्य आहे का हे समजून घेण्यासाठी डॉ. दिलीप पटवर्धन या सांगलीच्या निष्णात नेत्रतज्ञांशी संपर्क केला. त्यांच्या मते दोघांचेही डोळे वेगवेगळे आहेत.
“मोनोझायगॉट ट्वीन्समध्ये साम्य असतं. अंगठ्याचे ठसे सारखे असू शकतात. पण डोळ्याच्या बाबतीत तसं नसतं. डोळ्याचा रेटिना म्हणजेच पडदा पाहिल्यावर लक्षात येतं की तिथल्या ब्लड व्हेसल्सचं ब्रॅचिंग जेनेटिकली जुळत नाहीत. या दोन्ही मुलांच्या डोळ्यातील रेटिना आणि फंडसचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने फोटो काढल्यावर ते वेगळे असल्याचं दिसतंय. बायोमेट्रिकच्या सॉफ्टवेअरमध्ये याचा समावेश केला तर जुळ्या भावांना आधार कार्ड मिळायला काही अडचण नाही.”
आधारसाठीच्या बायोमेट्रिक नोंदणीतली तांत्रिक कमतरता कधी दूर होईल याची प्रतिक्षा या कुटुंबाला आहे. या परिस्थितीला जबाबदार कोण असा प्रश्न ते पोटतिडकीने विचारतायत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.