ड्रोनद्वारे फवारणीतून सुप्रियाने स्वतःसाठी केला निर्माण रोजगार, एका दिवसाचे मिळतात इतके रुपये

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

“ड्रोन उडवला तेव्हापासून असं वाटायला लागलं की, स्वत:चं फ्लाय करायला लागलेय म्हणून.”

सुप्रिया नवले अहमदनगर जिल्ह्यातल्या मालदाड गावात राहतात. सध्या त्या ड्रोन पायलट म्हणून काम करत आहेत. बीएस्सी अॅग्रीपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पुण्यात ड्रोन तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण घेतलं.

नोव्हेंबर महिन्यात प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुप्रिया यांना फेब्रुवारीमध्ये एका कंपनीकडून ड्रोन देण्यात आलं. त्यासोबत एक इलेक्ट्रिक व्हेईकल, जनरेटर, बॅटरी या वस्तू देण्यात आल्या.

सुप्रिया यांच्याकडील ड्रोन पिकांवर कीटनाशक, बुरशीनाशक आणि खतांच्या फवारणीसाठी वापरलं जातं.

सुप्रिया यांच्याकडे शेतकरी ड्रोनद्वारे फवारणीसाठी विचारणा येतात. त्यानंतर मग ड्रोन, बॅटरीज आणि जनरेटर हे साहित्य त्या इलेक्ट्रिक व्हेईकलमध्ये ठेवतात आणि शेतकऱ्याच्या शेताकडे निघतात.

सुप्रिया सांगतात, "शेतकऱ्याच्या शेतावर गेले तर पहिल्यांदा मी माझे इन्स्ट्रूमेंट सेट-अप करते. त्यानंतर शेतकऱ्याचं फिल्ड चेक करून तिथं काही अडथळा (Obstacle) आहे का, बांधावर किंवा साईडला काही आहे का, ते सगळं पाहते. ते मला आरसीमध्ये (Remote control) दिसतं असतं.”

“मग मी फवारणी ज्या क्षेत्रावर करायची आहे, ते क्षेत्र बघून मॅपिंग करुन घेते. कॉर्नर पॉईंट सिलेक्ट करते. मधे स्पेसिंग, डिस्टन्स, अल्टिट्यूड मेटेंन करुन घेते आणि मग ऑटो मोडमध्ये 7 मिनिटात 1 एकर क्षेत्रावर फवारणी पूर्ण होते.”

ड्रोनद्वारे कीटनाशकांची किंवा खतांची फवारणी, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी सध्या तरी कुतूहलाचा विषय आहे. ज्यावेळेस सुप्रिया एका शेतात फवारणी करण्यासाठी ड्रोन घेऊन आल्या, त्यावेळेस आजूबाजूचे शेतकरी एकत्र जमल्याचं दिसून आलं.

या शेतकऱ्यांना हे ड्रोन तंत्रज्ञान नेमकं कसं काम करतं, हे जाणून घ्यायचं कुतूहल होतं.

'पहिले बॅटरी पंपानं 2 तास जायचे'

शेतकरी भीमराज नवले पहिल्यांदाच त्यांच्या डांगर पिकावर ड्रोनद्वारे फवारणी करत होते. ड्रोनद्वारे केलेली फवारणी त्यांना आश्वासक वाटतेय.

भीमराव सांगतात, “पहिले बॅटरी पंपानं फवारणी देत होतो. एक पंप मारायला साधारण 10 ते 15 मिनिटे लागायचे. 10 पंप मारायला साधारण 2 तास जायचे. आता 10 मिनिटामध्ये एक एकर क्षेत्रावर फवारणी होऊन जाते.

"पावसाचं वातावरण असलं तरी 10 मिनिटात पूर्ण फवारा होऊन जातो आणि आपलं औषध पण सेव्ह होतं आणि मॅनपॉवरचा इश्यू याच्यातून सॉल्व्ह होतो.”

काही पिकं जसं की ऊस, मका या पिकांची उंची जास्त असते. पिकं कमरेच्या वरती गेल्यावर त्यावर फवारणी करता येत नाही. याशिवाय साप, बिबट्या अशा प्राण्यांचाही धोका असतो. अशा स्थितीत ड्रोननं फवारणी करण्याचा पर्याय शेतकऱ्यांकडे असू शकतो.

पण ग्रामीण भागात ड्रोन वापरासमोर काही आव्हानंही आहेत.

डॉ. अविनाश काकडे हे ड्रोन तंत्रज्ञानाचे अभ्यासक असून कृषी महाविद्यालय सोनई येथे सहायक प्राध्यापक आहेत. ड्रोन वापरताना त्याचा पायलट प्रशिक्षित असला पाहिजे, असं ते सांगतात.

बीबीसी मराठीशी बोलताना डॉ. अविनाश काकडे म्हणाले, “ड्रोननं पिकांवर फवारणी करायची म्हणजे सर्वप्रथम बॅटरी उपलब्ध पाहिजे. कारण चार्जिंग नसेल तर आपण ड्रोननं फवारणी करण्याचं काम पूर्णत्वास नेऊ शकत नाही. हे झालं पहिलं चॅलेंज.

“दुसरं, रिमोट एरियात फवारणी असेल तर तिथं त्याला जीपीएस सिग्नल मिळालं तरच तो ड्रोन स्टार्ट होऊ शकतो. हे दुसरं महत्त्वाचं चॅलेंज आहे. आणि तिसरं म्हणजे, ड्रोन ज्या ठिकाणी न्यायचा आहे, तिथपर्यंत जाण्यासाठीचा रस्ताही उपलब्ध असला पाहिजे.”

ड्रोन सुरू करण्यासाठी जीपीएस महत्त्वाचं असतं. ज्या ठिकाणी रिमोट एरिया असेल, तिथं DGCA या पोर्टलशी कनेक्ट झाल्यानंतरच ड्रोन सुरू होतो.

ड्रोन फवारणीतून रोजगार

ड्रोन म्हणजे मानविरहित चालणारं यंत्र. ड्रोनमध्ये नेव्हिगेशन सिस्टीम, जीपीएस, वेगवेगळे सेन्सर्स, कॅमेरे यांचा समावेश असतो. ड्रोनचे त्याच्या वजनानुसार वेगवेगळे प्रकार पडतात.

ड्रोनची किंमत साधारणपणे 6 लाखांपासून ते 15 लाखांपर्यंत असते. शेतीकामासाठी वापरले जाणारे ड्रोन साधारणपणे 3 मीटर उंचीपर्यंत वरती घेता येतात आणि त्याची रेंज 2 ते 4 किलोमीटरपर्यंत असते.

शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर ड्रोन उपलब्ध करुन दिल्यामुळे सुप्रिया यांना एकप्रकारचा रोजगार मिळाला आहे.

सुप्रिया सांगतात, “एक एकर क्षेत्र फवारणीसाठी मी 300 रुपये घेते. अजून तरी माझ्यासाठी सगळ्या गोष्टी नवीनच आहे. एक-दीड महिनाच झालाय. तरी दिवसाला 4 ते 5 हजार रुपये घरात घेऊन येते.”

ड्रोनसारख्या तंत्रज्ञानातून पिकांवर येणाऱ्या रोगाची सुरुवातीची लक्षणं ओळखून त्यावर वेळीच उपाय करता येईल. याद्वारे औषधाची बचत होऊन कमी मनुष्यबळात, कमी वेळेत शेतीची कामं करता येईल आणि परिणामी पिकांची उत्पादकता वाढण्यास मदत होईल, असं म्हटलं जात आहे.

असं असलं तरी ड्रोनच्या वापराला अजून तरी सार्वत्रिक स्वरूप आलेलं नाहीये.