उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणाऱ्या चार्ल्स डार्विनने सांगितले लग्नाचे 'हे' फायदे-तोटे; लग्न करण्याच्या निर्णयावर असा पोहचला डार्विन

एम्मा आणि चार्ल्स डार्विन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एम्मा (1808–1896) आणि चार्ल्स डार्विन (1809–1882) यांचं लग्न 43 वर्ष टिकलं आणि त्यांना 10 मुलं झाली.

'महान आणि यशस्वी पुरुषांच्या मागे एक स्त्री असते,' हे वाक्य आपण नेहमी ऐकत आलो आहोत.

पण त्या स्त्रीचं आयुष्य कसं असतं? तिच्या इच्छा, तिचं दुःख, तिचं कर्तृत्व यांचं काय? चार्ल्स डार्विनपासून ते लिओ टॉलस्टॉय आणि व्लादिमीर नाबोकोव्हपर्यंत अनेक जगप्रसिद्ध पुरुषांच्या आयुष्यात त्यांच्या पत्नींची भूमिका फक्त 'जोडीदारा'ची नव्हती, तर त्यांच्या यशामागची मुख्य ताकद होती.

पण या स्त्रियांनी काय गमावलं? काय सहन केलं? आणि त्यांची गोष्ट आपण का विसरतो? हा खरा प्रश्न आहे.

लग्न करावं की न करावं, या प्रश्नात अडकलेल्या चार्ल्स डार्विनची कहाणी वेगळीच आहे. सुरूवातीला नकार पण नंतर त्याचे विचार बदलले आणि त्याने विवाह करण्याचा निर्णय घेतला.

चार्ल्स डार्विननं नैसर्गिक निवडीबाबतच्या (सिलेक्शन नॅचरल) कल्पना 1838 मध्ये मांडायला सुरुवात केली होती.

जगप्रदक्षिणेच्या काळात त्यानं एचएमएस बीगल या वैज्ञानिक संशोधनासाठी असलेल्या जहाजावरून दक्षिण अमेरिका भागात केलेल्या निरीक्षणांच्या आधारे हे विचार विकसित केले.

त्याच काळात, डार्विन लंडनच्या भूगर्भशास्त्रीय संस्थेचा (जियोलॉजिकल सोसायटी) सचिव झाला. त्याच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी होती. या काळात त्यानं अनेक महत्त्वाचे अभ्यास सादर केले आणि इतर संशोधनातही प्रगती केली.

या सर्व गडबडीच्या काळात, त्याच वर्षी डार्विनच्या मनात एक अत्यंत वैयक्तिक प्रश्न घोळत होता.

आयुष्यभरासाठी जोडीदार(सोबती) असणं किती फायद्याचं ठरेल? लग्न केल्यानं आपल्या आयुष्यावर आणि कामावर काय परिणाम होऊ शकतो? असे प्रश्न डार्विनच्या मनात येत होते.

एप्रिल महिन्यात त्यानं पेन्सिलनं काही नोंदी केल्या, ज्यामध्ये एकटं राहण्याचे फायदे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या मर्यादांचा उल्लेख केला होता.

जुलै महिन्यात त्यानं पुन्हा या विषयाकडे लक्ष दिलं, पण यावेळी जसं 19व्या शतकातील एका अत्यंत शिस्तबद्ध वैज्ञानिक मेंदूकडून अपेक्षित होतं, अगदी तसंच अधिक शिस्तबद्ध आणि नियोजित पद्धतीनं काम केलं.

तेव्हा 29 वर्षांच्या या निसर्ग अभ्यासकानं (नॅचरलिस्ट) ही महत्त्वाची गोष्ट ठरवण्यासाठी दोन याद्या केल्या, एक लग्नाचे फायदे सांगणारी आणि दुसरी तोटे दाखवणारी.

डार्विनच्या यादीनुसार लग्नाचे फायदे आणि तोटे

'लग्न करणं' या शीर्षकाखाली डार्विननं खालील फायदे लिहून ठेवले:

  • मुलं होतील (देवाची इच्छा असेल तर)
  • एक कायमची सोबती (आणि वृद्धापकाळातील मैत्रीण) जी तुमच्यात रस घेईल.
  • कोणीतरी प्रेम करण्यासाठी असेल.
  • हक्काचं घर आणि घराची काळजी घेणारं कोणीतरी असेल.
  • काव्य, शास्त्र, विनोदासाठी एक कायमचा जोडीदार

आणि लगेचच त्यांनी विचार केला की, "या सगळ्या गोष्टी आरोग्यासाठी चांगल्या आहेत, पण यामुळे वेळ किती वाया जाईल?"

"अरे देवा, आयुष्यभर एका मधमाशीसारखं जगणं, सतत काम, काम, आणि शेवटी काहीच नाही. ही कल्पनाच असह्य आहे," असं त्यांनी लिहिलं. "नाही, मी असं करणार नाही," असं त्यांनी लग्नाबाबत लिहून ठेवलं.

मग त्यांनी दोन शक्यतांची मनातल्या मनात तुलना केली: "कल्पना करा – एकटं, सगळा वेळ लंडनमधल्या अस्वच्छ घरात घालवणं.

"आणि दुसरीकडे एक प्रेमळ, दयाळू पत्नी सोफ्यावर बसली आहे. जवळ मस्त अशी उबदार शेकोटी, पुस्तकं आणि कदाचित संगीतही..."

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एम्मानं घरातील सर्व कामं आणि सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळल्या, जेणेकरून डार्विनला शांतपणे आपल्या कामावर लक्ष केंद्रित करता येईल. याशिवाय तिने त्याच्यासाठी काही कागदपत्रांचं भाषांतरही केलं.

डार्विनच्या मते तोट्यांची यादी अशी होतीः

मग डार्विन 'लग्न करू नये' या यादीकडे वळला आणि पुन्हा एकदा त्यांनं आपले विचार मांडले:

  • पाहिजे तिथे जाण्याची पूर्ण मोकळीक
  • लोकांमध्ये मिसळायचं की नाही, हे स्वतः ठरवण्याचं स्वातंत्र्य
  • क्लबमध्ये बुद्धिमान पुरुषांशी संभाषण करण्याची संधी
  • नातेवाईकांना भेट द्यावी लागणार नाही आणि प्रत्येक छोट्या गोष्टीला मान वाकवावी लागणार नाही.
  • मुलांवरील खर्च आणि चिंता टाळता येतील (कदाचित भांडणंही)
  • लग्न केल्या वेळेचा अपव्यय होईल
  • रात्री वाचन करता येणार नाही
  • जाड होणं आणि आळशी होणं
  • चिंता आणि जबाबदारी
  • पुस्तकांसाठी आणि इतर गोष्टींसाठी कमी पैसे
  • जर मुलं जास्त झाली, तर घर चालवण्यासाठी जबरदस्तीने खूप काम करावं लागेल (आणि खूप जास्त काम केल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो)
  • कदाचित माझ्या पत्नीला लंडन आवडणार नाही, त्यामुळे एखादी शिक्षा मिळाल्यासारखं घराबाहेर राहावं लागेल आणि आळशी, निष्क्रिय मूर्खासारखं आयुष्य जगावं लागेल

जरी तोट्यांची यादी मोठी असली तरी त्याला फायदे अधिक महत्त्वाचे वाटले असावेत, कारण शेवटी डार्विननं असा निष्कर्ष काढला:

'लग्न करा – हे सिद्ध झालं!' (Q.E.D म्हणजे Quod erat demonstrandum हे लॅटिनमधील एक वाक्य आहे. ज्याचा अर्थ होतो, 'जसं दाखवायचं होतं, तसं सिद्ध झालं').

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डाउन हाऊसच्या बागेत चार्ल्स डार्विन, जिथे तो बराचसा वेळ फिरत आणि विचार करण्यात घालवत असे.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

निर्णयापर्यंत पोहोचल्यानंतरही डार्विन या विषयावर स्वतःला प्रश्न विचारतच राहिला.

"लग्न करणं आवश्यक आहे हे सिद्ध झालं आहे, तर मग केव्हा करावं? लगेच की नंतर?"

त्याला सल्ला देण्यात आला होता की, लग्न लवकर करावं, कारण तरुण वयात 'स्वभाव अधिक लवचिक असतो, भावना तीव्र असतात आणि जर लवकर लग्न केलं नाही, तर खूप साऱ्या आनंदाला मुकावं लागतं.'

पण ही कल्पनाच त्याला घाबरवून टाकणारी होती.

त्याला वाटत होतं की, लग्न केल्यावर सतत अडचणी आणि खर्च वाढतील, उगाचच लोकांत मिसळावं लागेल आणि रोजचा वेळही वाया जाईल.

आणि आपण केवळ वेळच नाही, तर संधी देखील वाया घालवत आहोत, असं त्याला वाटत होतं.

"मी कधी फ्रेंच शिकू शकणार नाही, युरोप पाहता येणार नाही, अमेरिकेला जाता येणार नाही, बलूनमध्ये उडता येणार नाही, एकट्यानं वेल्सला फिरायला जाता येणार नाही, अगदी गरीब गुलामासारखं जीवन होईल," असं त्यानं लिहिलं.

जणू तो आपला निर्णय बदलणार होता, पण अचानक त्याचा सूर बदलला.

"हिम्मत ठेव. एकटं-एकाकी आयुष्य जगून काही उपयोग नाही, म्हातारपणी सून्न वाटेल, मित्र नसतील, थंडी असेल आणि जवळ मुलंसुद्धा नसतील."

आणि तो पुढे म्हणाला: "काळजी करू नकोस, नशिबावर विश्वास ठेव. खूप गुलामसुद्धा आनंदी असतात."

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, खूप हुशार लोकांसाठी जोडीदार असणं ही एक अमूल्य गोष्ट होती.

11 नोव्हेंबर रोजी त्यानं आपल्या डायरीत लिहिलं, 'सगळ्यात खास दिवस!' ते आनंद साजरा करत होते, कारण त्याची नातलग एम्मा वेजवूड हिने त्याच्या लग्नाच्या प्रस्तावाला होकार दिला होता. एम्माचा 'हो' आनंदाचा क्षण होता, पण त्यासाठी तो फारसा धक्कादायक नव्हता.

डार्विन आणि वेजवूड कुटुंबांमध्ये अनेक पिढ्यांपासून लग्नसंबंध होते. एम्मा ही चार्ल्ससाठी अगदी योग्य निवड होती, आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही मान्य होतं की, हेच परिपूर्ण जोडीदार ठरतील.

पण तरीही चार्ल्सचा लग्नासाठीचा प्रस्ताव एम्मासाठी आश्चर्यचकित करणारा होता. कारण तिला माहीत होतं की, चार्ल्स तिच्यावर प्रेम करतो, पण तिला वाटायचं की तो तिला फक्त एक चुलत बहीण म्हणूनच पाहतो.

पण जर एम्मानंही असा विचार केला असता आणि तिनेही चार्ल्सप्रमाणे लग्न करण्याच्या फायद्या-तोट्यांची स्वतःची यादी तयार केली असती, तर ती यादी डार्विनपेक्षा खूप वेगळी असती, असं बीबीसी रेडिओ 4 वरील ग्रेट वाइव्ह्ज या मालिकेत हेलेन लुईस यांनी सांगितलं.

जर एम्मा अविवाहित राहिली असती, तर तिला डार्विनशी लग्नानंतर जो काही आराम किंवा स्वातंत्र्य मिळालं ते मिळालं नसतं.

ना बलूनमधून उडणे, ना एकटीनं वेल्सला फिरायला जाणं, या सगळ्यांना तिला मुकावे लागले असते.

त्या काळात जर एखाद्या महिलेचे लग्न नसेल झाले तर ते अतिशय कठीण मानले जायचे. समाजात मान कमी मिळायचा.

त्या काळातील परिस्थिती पाहता, एका महान पुरुषाची पत्नी होणं ही एक शहाणपणाची निवड होती.

43 वर्षांचं वैवाहिक आयुष्य आणि 10 मुलं

सहा महिन्यांनंतर एम्मा आणि चार्ल्स डार्विनचं लग्न झालं.

लग्नानंतर त्यांच्यात आणखी चांगलं नातं निर्माण झालं, त्यांना दहा मुलं झाली, त्यांचं कुटुंब प्रेमळ होतं. दोघांचा संसार अगदी डार्विनचा 1882 मध्ये मृत्यू होईपर्यंत सुरळीत चालला.

या 43 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात एम्मानं केवळ आपल्या पतीच्या लेखनाचीच नव्हे तर त्याच्या संपादनाचीही जबाबदारी घेतली. तिने आपल्या भाषा कौशल्याचा वापर करून वैज्ञानिक घडामोडींचं भाषांतरही केले आणि पतीला इतर भाषेतील माहितीही दिली.

इतकंच नाही, तर चार्ल्सची प्रकृती खूपच नाजूक होती आणि त्याच्या मुलांना वारंवार आनुवंशिक आणि संसर्गजन्य आजार होत असत.

या सगळ्या मानसिक त्रासामुळे तो कोसळू नये, म्हणून एम्मानं त्याला नेहमी खंबीरपणे साथ दिली.

चार्ल्स डार्विन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एम्मानं डार्विनचं सगळं काम शक्य होईल, असं वातावरण तयार केलं.

एम्मानं डार्विनचं सगळं काम शक्य होईल, असं वातावरण तयार केलं. तिने इतक्या गोष्टी सांभाळल्या की, तिची सोबत असणं किती उपयोगाचं होतं, याची यादी खूप मोठी झाली असती.

म्हणूनच डार्विनचं रोजचं आयुष्य अगदी सुरळीत सुरू होतं, असं त्याच्या एका मुलानं सांगितलं.

"सकाळी 7 वाजता ते एकट्यानं नाश्ता करत असत, 7:45 पासून दुपारी 12 वाजेपर्यंत काम करत असत, आणि मग बागेत थोडं चालून आल्यावर कुटुंबासोबत जेवण करत असत."

दिवसभराचं वैचारिक काम झाल्यावर तो एम्माला एखादी कादंबरी किंवा दुसरं काही वाचन करून दाखवायला सांगत असत. मग ते थोडा फेरफटका मारत असत, काही छोटे कामं करत असत.

सायंकाळी 6 ते 7:30 दरम्यान एम्मा त्याला पुन्हा काहीतरी वाचून दाखवत असत, त्यानंतर ते जेवण करत.

त्याला हवं असलेलं सगळं त्याच्या मनाप्रमाणे मिळत असे.

खऱ्या प्रेमकथेसारखं एक सुंदर नातं

अशा जोडीदारामुळं डार्विन घरच्या रोजच्या कामांमध्ये अडकून पडले नव्हते, त्यामुळे ते शांतपणे आपलं काम करू शकले. पूर्ण लक्ष देऊन आपलं काम सुरू ठेवण्याचं स्वातंत्र्य त्याला मिळालं.

आणि 19व्या शतकात आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला लेखक, शास्त्रज्ञ आणि कलाकारांना जसं शांत आणि योग्य वातावरण विचारांच्या कामासाठी मिळालं, तसं फार थोड्या लोकांना मिळालं होतं.

त्यांना कुठलाही अडथळा न येता काम करता येत होतं. मध्येच फक्त कॉफी किंवा चहा येत असे, किंवा जादूसारखं जेवण तयार होऊन समोर ठेवलेलं असे.

एक पत्नी खूप काही करू शकते आणि हे विशेषतः वेरा नाबोकोव्हाच्या बाबतीत खरं ठरलं.

लेखक व्लादिमीर नाबोकोव्ह जेव्हा व्याख्यान देत असत, तेव्हा त्याची पत्नी वेरा स्टेजच्या बाजूला बसून असायची, फक्त त्याला मानसिक आधार देण्यासाठी.

वेरा ही त्यांची एजंट, अनुवादक, टायपिस्ट, कागदपत्रं सांभाळणारी, कपड्यांची देखरेख करणारी, आर्थिक व्यवहार पाहणारी, गाडी चालवणारी आणि त्याच्या सगळ्या कादंबऱ्यांची पहिली वाचकही होती.

जेव्हा व्लादिमीर नाबोकोव्ह वर्गात उपस्थित राहू शकत नसत, तेव्हा वेरा त्याच्या जागी विद्यापीठात शिकवायला सुद्धा जात.

हे सगळं करत असतानाच वेरा त्या काळातल्या एका पत्नीकडून अपेक्षित असलेली कामंही करत होती. स्वयंपाक, मुलांची देखरेख, कपडे धुणं आणि घरकाम. तरीही ती स्वतःला 'वाईट गृहिणी' मानायची.

आणि अर्थातच, वेरा त्यांच्यासोबत फुलपाखरं शोधायला सहलींवर जात असे. ही फुलपाखरं व्लादिमीरला पाचव्या वर्षांपासूनच खूप आवडायचे. तो फुलपाखरांना गोळा करत असे, त्यांचं निरीक्षण करत असे आणि मनापासून त्यांचा अभ्यास करत असत.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, द अटलांटिक या वृत्तपत्रातील एका लेखात असं म्हटलं होतं की, सर्वात नशीबवान लेखक तोच होता, ज्यांचं लग्न एका 'वेरा'सारख्या बायकोशी झालं होतं, जिने त्याला दैनंदिन घरगुती कामांपासून मुक्त केलं होतं, जेणेकरून तो आपल्या लेखनावर लक्ष केंद्रित करू शकेल.

जेव्हा नाबोकोव्हने 'लोलिता' हे वादग्रस्त पुस्तक प्रकाशित केलं, ज्यात एका माणसाची 12 वर्षांच्या मुलीकडे आकर्षित होण्याची कथा होती. तेव्हा असं म्हणतात की वेराच्या पर्समध्ये एक पिस्तूल असायची, जेणेकरून जर कोणी तिच्या नवऱ्यावर हल्ला केला, तर ती त्याला थोपवू शकेल.

त्यांचं आयुष्य एका सुंदर प्रेमकथेसारखं होतं. ते 1932 साली बर्लिनमधल्या एका नृत्य कार्यक्रमात पुलावर भेटले होते. वेरानं ब्लॅक सॅटिन मास्क घातला होता आणि तिने व्लादिमीरला त्याच्याच काही कविता म्हणून दाखवल्या.

नंतर व्लादिमीरनं लिहिलं, "असं वाटतं जसं तिच्या मनात माझ्या प्रत्येक विचारासाठी आधीपासूनच एक जागा तयार होती."

वेराची बुद्धिमत्ता, तिचं स्वावलंबन, तिचा विनोदी स्वभाव आणि साहित्यावरील प्रेम यामुळे व्लादिमीर तिच्यावर खूप भारावून गेला होता. तिच्यासोबत काही तासच घालवल्यानंतर त्याने तिच्यासाठी आपली पहिली कविता लिहिली.

ते 52 वर्षे एकत्र होते, आणि या काळात वेराला काही अशी प्रेमपत्रं मिळालीत, ज्यांना इतिहासातल्या सर्वात सुंदर प्रेमपत्रांपैकी मानलं जातं. ही पत्रं 'कार्ट्स ए वेरा' (वेराला लिहिलेली पत्रं) या पुस्तकात संग्रहित केली आहेत.

"हो, मला तुझी गरज आहे, माझ्या परीकथेतील परीसारखी तू. कारण फक्त तुझ्याशीच मी ढगांच्या सावलीबद्दल, एखाद्या विचाराच्या गाण्याबद्दल बोलू शकतो आणि आज सकाळी जेव्हा मी बाहेर कामासाठी गेलो आणि एका मोठ्या सुर्यफुलाकडे पाहिलं, तेव्हा त्याने आपल्या प्रत्येक बीयासह मला हसून उत्तर दिलं," असं व्लादिमीरने आपल्या एका कवितेत लिहिलं आहे.

टॉलस्टॉय दाम्पत्यांचा कधीच न संपणारा वाद

पण सगळ्या महान व्यक्तींच्या बायका इतक्या नशीबवान नव्हत्या.

1889 साली रशियन लेखक लिओ टॉलस्टॉय यांनी 'क्रेउत्झर सोनाटा' नावाची कादंबरी प्रकाशित केली. ही कादंबरी त्यांनी मागील दहा वर्षांत तयार केलेल्या नैतिक विचारधारेचं एक जरा लपवलेलं, पण स्पष्ट माध्यम होतं.

तोपर्यंत टॉलस्टॉय यांनी ख्रिश्चन धर्माची स्वतःची एक वेगळी व्याख्या तयार केली होती, आपल्या राजघराण्याच्या पदाचा त्याग केला होता आणि आपल्या आधीच्या लिखाणावर टीकाही केली होती.

त्यांनी अ‍ॅना कॅरेनिनाला 'घृणास्पद' म्हटलं आणि त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांसारखे कपडे घालण्यास सुरूवात केली.

क्रेउत्झर सोनाटा या कादंबरीत निवेदक व्यक्ती रेल्वेच्या प्रवासात एका अशा माणसाला भेटतो जो प्रेमासाठी लग्न करायची कल्पना उडवून लावतो आणि म्हणतो की, त्याला आपल्या सगळ्या प्रेमसंबंधांचा पश्चात्ताप आहे.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, टॉलस्टॉयचे अनुयायी सोफियाचं चित्रण फारशी बुद्धिमान नसलेली आणि फक्त भौतिक गोष्टींमध्येच रस असलेली स्त्री म्हणून करत.

तो माणूस म्हणतो, महिलांची समस्या अशी आहे की त्या आपल्या कपड्यांनी आणि शरीरानं पुरुषांवर भुरळ पाडतात.

"स्त्रिया, राणीसारख्या, माणसांच्या नऊ-दशांश लोकसंख्येला एखाद्या युद्धकैद्यासारखं किंवा जबरदस्तीनं काम करणाऱ्या कैद्यांसारखं ठेवतात. आणि हे सगळं फक्त यासाठी की त्यांना पूर्वी अपमानित केलं गेलं, त्यांना पुरुषांसारखे हक्क दिले गेले नाहीत. आता त्या आपला सूड घेत आहेत, आपल्या वासनेचा फायदा घेतात, आणि आपल्याला त्यांच्या जाळ्यात अडकवतात."

टॉलस्टॉयच्या कथेतील मुख्य पात्र हे जबरदस्त मत्सरानं पछाडलेलं असतं, कारण त्याला संशय आहे की, त्याची पत्नी एका देखण्या व्हायोलिन वादकाच्या प्रेमात आहे.

ही कादंबरी टॉलस्टॉयच्या पत्नी सोफिया यांच्यावर केलेली एक सूचक आणि टोमणेबाज टीका म्हणूनही वाचता येते, कारण तिचं कुटुंबातील संगीत शिक्षकासोबतचं नातं घनिष्ठ होतं.

टॉलस्टॉयला खात्री होती की, सोफियाला हा संदेश नक्कीच समजेल, कारण त्यांच्या हस्तलिखितांची नक्कल करणारी तीच होती.

टॉलस्टॉय दाम्पत्याचं नातं खूप गुंतागुंतीचं होतं

सोफियाचं आयुष्य तिच्या पतीची कारकीर्द, घरकामाच्या जबाबदाऱ्या आणि टॉलस्टॉयला मिळालेल्या मालमत्तेची आणि व्यवहारांची जबाबदारी यामध्ये पूर्णपणे अडकलेलं होतं.

आणि तिने नेहमीच आपल्या पतीच्या साहित्यिक महत्त्वकांक्षांना साथ दिली.

तो तिच्याकडून तिचं मत विचारत असे आणि लिहिताना अनेक तपशीलांवर तिचा सल्ला घेत असत.

इतकंच नाही, तर त्याच्या संपूर्ण साहित्यसंग्रहाच्या प्रकाशनाच्या मोठ्या कामाची जबाबदारीही सोफियानेच उचलली होती. त्यातले कायदेशीर आणि प्रशासकीय सगळे मुद्दे तिनेच हाताळले.

तिने त्याच्या एका हस्तलिखिताची सात वेळा स्वतःच्या हाताने नक्कल केली होती.

आणि जेव्हा ती 13 बाळंतपणांनंतर बिछान्यावर अडकून पडली, तेव्हाही काम चालू ठेवता यावं, म्हणून तिने खास एक टेबल तयार करून घेतलं होतं.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सोफियाचं आयुष्य तिच्या पतीची कारकीर्द, घरकामाच्या जबाबदाऱ्या आणि टॉलस्टॉयला मिळालेल्या मालमत्तेची आणि व्यवहारांची जबाबदारी यामध्ये पूर्णपणे अडकलेलं होतं.

ही अशी पुस्तकं होती ज्यात 'वॉर अँड पीस'सारख्या कादंबऱ्यांचा समावेश होत्या. या कादंबरीत सुमारे 60 हजार शब्द आहेत.

खरं तर, टॉलस्टॉयने चार मोठ्या कादंबऱ्या, सुमारे एक डझन लघुकादंबऱ्या आणि किमान 26 लघुकथा, याशिवाय बऱ्याच इतर लेखनप्रकारांमध्येही लिखाण केलं होतं.

क्रेउत्झर सोनाटा प्रकाशित झाल्यावर टॉलस्टॉय आणि सोफिया यांचं नातं पूर्वीसारखं राहिलं नव्हतं. ते तणावपूर्ण झालं होतं.

त्यामागचं एक कारण म्हणजे, टॉलस्टॉयचा अधिकाधिक वेळ एक तरुण व्लादिमीर चेर्तकोव्हसोबत व्यथित व्हायचा.

त्याने टॉलस्टॉयच्या मनात पत्नीविरोधी विचार भरवले आणि त्याचं अराजकतावादाकडे स्वारस्य वाढवलं.

'महान माणसाची सेवा करणं हे एक मोठं दुर्दैव'

जेव्हा टॉलस्टॉयने आपल्या सर्व मालमत्तेला भ्रष्ट मानून त्याग केला, तेव्हा आपल्या मुलांना उपाशी राहू न देण्याची जबाबदारी सोफियावर आली.

तिने आपल्या नवऱ्याच्या कादंबऱ्यांचं प्रकाशन स्वतःच्या हातात घेतलं. इतकंच नाही तर झार (रशियाचा सम्राट) आणि ऑर्थोडॉक्स चर्चला तिने टॉलस्टॉयच्या पुस्तकांवर बंदी घालू नये, म्हणून विनवण्या केल्या.

चेर्तकोव्हने टॉलस्टॉयला सांगितलं की, सोफिया ज्या प्रकारे पैशाच्या आणि व्यवसायाच्या गोष्टींची काळजी घेत होती, त्यावरून ती एक कपटी आणि स्वतःचा फायदाच पाहणारी श्रीमंत वर्गातील स्त्री आहे.

28 ऑक्टोबर 1910 रोजी टॉलस्टॉय घर सोडून निघून गेले. त्यांनी एक चिठ्ठी ठेवली होती, ज्यात लिहिलं होतं की, ते आता शेवटी आपल्या तत्त्वज्ञानावर चालायला सुरुवात करत आहेत.

"मी तेच करत आहे, जे माझ्या वयाचे वृद्ध लोक करत असतात. हे माझं जीवन सोडून देतोय, जेणेकरून उरलेले दिवस एकट्याने आणि शांततेत घालवता येतील."

तेव्हापर्यंत त्यांच्या लग्नाला 48 वर्षं झालेली होती.

सोफियाला आपल्या पतीचा ठावठिकाणा शोधायला आठवडाभरापेक्षा जास्त वेळ लागला. शेवटी तिने त्यांना एका रेल्वे स्टेशनवर शोधून काढलं, जिथे 82 वर्षांचे टॉलस्टॉय आजारी पडून मृत्यूच्या जवळ होते.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पण शेवटच्या क्षणी सोफियाला टॉलस्टॉयपासून दूर ठेवण्यात आलं.

आजूबाजूला चाहत्यांनी आणि अनुयायांनी गर्दी केली होती. त्यांचा मृत्यू हा एक मोठा सार्वजनिक आणि प्रसारमाध्यमांचा चर्चेचा विषय बनला होता.

पण शेवटच्या क्षणी सोफियाला टॉलस्टॉयपासून दूर ठेवण्यात आलं.

काही वर्षांपूर्वी सोफियाने लिहिलं होतं, "मी जवळपास 40 वर्षं एका महान माणसाची सेवा केली. कित्येक वेळा माझ्या आतल्या विचारशक्तीने धडपड केली, वेगवेगळ्या इच्छा जाग्या झाल्या, पण मी त्या सगळ्या इच्छांना दाबलं आणि गप्प बसवलं," असं तिने स्पष्टपणे सांगितलं.

"सगळेजण विचारतात, 'तुझ्यासारख्या निरुपयोगी स्त्रीला बौद्धिक किंवा कलात्मक आयुष्याची काय गरज?' याला मी फक्त इतकंच उत्तर देऊ शकते, 'माहीत नाही, पण अशा गोष्टी कायमच दाबून ठेवून एका महान माणसाची सेवा करत राहणं, हे खूप मोठं दुर्दैव आहे.'"

(या लेखाचा बराचसा भाग 'बीबीसी'च्या 'हेलन लुईसः ग्रेट वाइव्हज' या मालिकेतील 'थँक्स फॉर टायपिंग' या भागातून घेतला आहे. हा भाग इंग्रजीत ऐकायचा असेल, तर येथे क्लिक करा.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.