You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हेल्मेटमुळे केस गळतात का? हेल्मेटखाली साचलेल्या घामामुळे कोंडा होतो का?
दुचाकी चालवताना हेल्मेट घालणं हे कायद्याने बंधनकारक आहे आणि ते जीव वाचवण्यास मदत करतं यात शंका नाही. पण गेल्या काही वर्षांत एक प्रश्न अनेकांच्या मनात घर करून बसला आहे : हेल्मेटमुळे केस गळतात का?
जर दुचाकीवरून प्रवास करत असाल, तर हेल्मेट घालणं अपरिहार्य असतं, मग अशावेळी अनेकजण केस गळतीच्या तक्रारी करताना हेल्मेटला दोष देतात. काहींना वाटतं की घट्ट हेल्मेटमुळे टाळूवर दाब येतो, घाम साचतो, आणि त्यामुळे केस कमजोर होतात. तर काहींना वाटतं की हेल्मेटमधील धूळ, घाण किंवा बुरशीजन्य घटक केसांच्या मुळांवर परिणाम करतात.
या सगळ्या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे? केस गळतीमागे फक्त हेल्मेट जबाबदार आहे का, की यामागे आणखी काही वैद्यकीय किंवा जीवनशैलीशी संबंधित कारणं आहेत?
याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न करू कारण हेल्मेट घालणं टाळणं हा उपाय नाही पण केस गळती टाळणं नक्कीच शक्य आहे.
आता हेल्मेटबद्दल मुख्य प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे केस गळतील का? पण हेल्मेटमुळे केस गळतात या विधानाला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. पण काहीवेळेस हेल्मेटमुळे डोक्यावर घर्षण होतं, तिथं घाम साचू शकतो. यामुळे केसांची मुळं कमकुवत होतात. त्यामुळे टाळू किंवा केसाजवळच्या कातडीवर परिणाम होतो.
हेल्मेट आतून अस्वच्छ असेल, ते फारच घट्ट असेल आणि त्यात आतून बुरशीवगैरे आली असेल तर केसांवर परिणाम होतो. पण हेल्मेट हे काही केसगळतीचे स्वतंत्र असे कारण नाही. नियमित केस स्वच्छ करणं, हेल्मेटचा आतला भाग स्वच्छ ठेवला तर केसांवर परिणाम होणार नाही.
केसगळती ही संप्रेरकांतील बदल (हार्मोनल चेंजेस), जनुकीय (जेनेटिक्स) तसेच अंतर्गत आरोग्य कारणामुळे होत असते. त्यामुळे ही कारणं नसलेल्या लोकांना हेल्मेटमुळे केसांची कायमची गळती झाली असे ठोस पुरावे अद्याप दिसलेले नाहीत.
तरुण वयात केस गळणं हे काही आता दुर्मिळ नाही. दरवर्षी याची संख्या वाढतच असल्याचं दिसतं. अयोग्य आहार, ताणतणाव, संप्रेरकांतील बदल, जनुकीय कारणं यांचा केसगळतीत मोठा वाटा असतो. प्रदूषण आणि केसांची अयोग्यप्रकारे निगा राखणं यामुळे हा त्रास वाढतो. त्यामुळे केसगळती होतीय याचं लवकर निदान होणं आणि चांगली आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणं याला फार महत्त्व आहे.
मुंबईतील जसलोक हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटर येथे डर्मेटोलॉजी अँड ट्रायकोलॉजी विभागात कन्सल्टंट म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. मैथिली कामत यांनी याबद्दल अधिक माहिती दिली.
त्या म्हणाल्या, "केसगळतीसाठी हार्मोनल फॅक्टर्स म्हणजे संप्रेरकातील बदल महत्त्वाचे कारण आहे. महिलांमध्ये थायरॉईड, पीसीओडी अशी कारणं केसगळतीसाठी कारण ठरू शकतात. तर पुरुषांमध्ये जनुकीय कारणं जास्त प्रभावशाली ठरतात. तसेच आजारपण, व्हिटॅमिन्सची कमतरता, लोहाची कमतरता, धूम्रपानाची सवय यामुळे केसगळतीला वेग येऊ शकतो."
घट्ट हेल्मेट जास्तकाळ वापरल्यास चाई पडू शकते असं मुंबईतल्या डर्मटॉलॉजिस्ट डॉ. शरिफा चौसे यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, "अतिघट्ट हेल्मेट वापरल्यामुळे केसांची मुळं कमकुवत होऊ शकतात. डोक्यावर योग्यप्रकारे न बसणारं हेल्मेट वापरल्यास टाळूवर खाज सुटते, घाम येतो, बुरशीची लागण होते. जर हेल्मेट योग्य आकाराचं नसेल आणि त्याचा आतला भाग नीट स्वच्छ नसेल तर याचा त्रास वाढू शकतो."
डॉ. मैथिली कामत सांगतात, "जर पोनीटेलसारख्या किंवा ज्यात केसांची मुळं घट्ट खेचलेली असतील अशा केशरचनेवर हेल्मेट वापरल्यास चाईसारखे त्रास होऊ शकतात. सतत केस ओढले गेल्यामुळे त्यावर हेल्मेट घातल्यामुळे हे होऊ शकते. तसेच हेल्मेटच्या कडा जिथं घासल्या जातात तिथं केस तुटू शकतात."
हेल्मेट वापरणाऱ्यांमध्ये अनेकदा कोंड्याची तक्रार असते. त्यामुळेही हेल्मेट वापरायला नको असं कारण पुढं केलं जातं.
डॉ. शरीफा चौसे सांगतात, हेल्मेटमुळे टाळूवर थोडं उष्ण आणि दमट आवरण तयार होतं. तेथे घाम येतो आणि त्यामुळे बुरशी किंवा जीवाणूंची वाढ होते. त्याचा टाळूला संसर्ग होतो मग खाज येते आणि कोंडा वाढतो. त्यामुळे केस नेहमी नीट स्वच्छ ठेवणं तसेच योग्य हवेशीर हेल्मेट वापरणं आवश्यक आहे.
हेल्मेटची स्वच्छता अत्यंत गरजेची आहे. घाम, धूळ आणि सुक्ष्मजीवांमुळे केसांखालच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं. तसेच हेल्मेट नियमितपणे स्वच्छ केल्यामुळे कोंडा, संसर्ग किंवा केसांच्या इतर तक्रारी होत नाहीत.
- योग्य फिटिंगचं हेल्मेट वापरावं
- हेल्मेट आतून स्वच्छ ठेवावं.
- दररोज शांपूनं केस धुवावेत
- हेल्मेटखाली एक रुमाल किंवा स्कार्फ बांधावा. हे कापड दररोज धुवून वाळवलेलं असावं.
डॉ. शरिफा चौसे सांगतात, "हेल्मेट या एकमेव कारणाने केस गळत नाहीत तर चुकीचं हेल्मेट वापरल्यामुळे केस गळू शकतात. घर्षणामुळे, दाब पडल्यामुळे तसेच घामामुळे केसांची गळती होते. अशावेळेस तिथल्या त्वचेची योग्य काळजी घेतली आणि तिथल्या ग्रंथीची हानी झाली नसेल तर केस परत येतात. जर दीर्घकाळ केस गळत असतील तर यामागे कोणते दुसरे कारण आहे का याचं निदान डॉक्टरकडून करुन घ्यावं."
हेल्मेट घालणं टाळणं हा उपाय नाही, पण केस गळती टाळणं नक्कीच शक्य आहे. हेल्मेटमुळे केस गळतात का, हा प्रश्न जितका सामान्य आहे तितकाच गैरसमजांनी भरलेला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता, हेल्मेट हे केसगळतीचं थेट कारण नाही. मात्र, अस्वच्छता, घाम, बुरशी आणि घर्षण यामुळे केसांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उपाय हे हेल्मेट न वापरण्यात नाही, तर ते योग्य प्रकारे वापरण्यात आहे. स्वच्छता राखणं, योग्य फिटिंग असलेलं हेल्मेट वापरणं आणि केसांची निगा राखणं हे उपाय केस गळती टाळण्यासाठी उपयुक्त ठरतात. केसगळती ही अनेक घटकांमुळे होते, जसंकी हार्मोन्स, जेनेटिक्स, पोषण, तणाव. पण हेल्मेट त्याला एकमेव कारण नक्कीच नाही. म्हणूनच, सुरक्षित प्रवासासाठी हेल्मेट वापरणं सुरू ठेवा, पण केसांचं आरोग्यही जपायला विसरू नका.
जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात, उपचारात, औषधांमध्ये बदल करायचा असेल तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांची आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे. आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)