छातीत वेदना नसली तरीही हृदयविकाराचा धोका? महिलांसाठी महत्त्वाची माहिती

'कठीण कठीण किती पुरुष हृदय बाई...' पुरुषाच्या स्वभावावर महिला असं बोट ठेवत असल्या तरी महिलांमधला हृदयविकाराची लक्षणं ओळखणं, त्यांचं अचूक निदान करणं, त्यानुसार उपचार ठरवणं हे पुरुष रुग्णांपेक्षा फारच वेगळं आणि तितकंच कौशल्याचं काम आहे.

महिलांमध्ये थकवा, मळमळ वाटणं पासून अपचनापर्यंत अनेक लक्षणं हृदयविकाराशी जोडलेली असू शकतात. हाच फरक समजून घेऊया.

हृदयविकाराचा झटका (Heart attack) आला की छातीत तीव्र वेदना, घाम, आणि अचानक बेशुद्ध होणे...आपल्याला बहुतेक वेळा हेच चित्र डोळ्यासमोर येतं. पण हे चित्र बहुतेक पुरुषांमध्ये दिसतं. महिलांमध्ये हृदयविकाराची लक्षणं वेगळी असू शकतात...कधी पोटात दुखणं, थकवा, चक्कर येणे, किंवा फक्त अस्वस्थ वाटणं. ही लक्षणं इतकी सूक्ष्म असतात की अनेकदा दुर्लक्षित होतात.

त्यामुळे महिलांना वेळेवर उपचार मिळत नाहीत आणि धोका वाढतो. पुरुष आणि महिलांमध्ये हृदयविकाराची लक्षणं का वेगळी असतात? आणि ही माहिती का महत्त्वाची आहे? याचा शोध घेणं आजच्या काळात अत्यंत गरजेचं आहे.

महिलांमध्ये हृदयविकाराची लक्षणं इतकी वेगळी आणि सूक्ष्म असतात की ती अनेकदा सामान्य थकवा, अपचन किंवा तणाव समजून दुर्लक्षित केली जातात. त्यामुळे वेळेवर निदान होत नाही आणि धोका वाढतो.

दुसरीकडे, पुरुषांमध्ये लक्षणं अधिक स्पष्ट असतात जसं की छातीत तीव्र वेदना, घाम, श्वास घेण्यास त्रास अशी लगेच लक्षात येणारी असतात.

ही लक्षणांची तफावत केवळ शरीरशास्त्राशी संबंधित नाही, तर आरोग्य व्यवस्थेतील जागरूकतेशीही जोडलेली आहे.

यामुळे महिलांना वेळेवर उपचार मिळण्याची शक्यता कमी होते, आणि त्यामुळे मृत्यूदरही अधिक असू शकतो. यासाठीच आम्ही काही प्रश्न डॉक्टरांना विचारले. या तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेली उत्तर आपल्यासाठी येथे देत आहोत.

1. पुरुष आणि स्त्रिया यांच्यामध्ये हृदयविकाराची वेगवेगळी लक्षणं दिसतात का?

हा प्रश्न आम्ही मुंबईमधल्या जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या कन्सल्टंट कार्डिओलॉजी डॉ. वैभव धेडिया यांना विचारला.

डॉ. धेडिया म्हणाले, "पुरुषांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमुख दिसणारं लक्षण म्हणजे छातीत तीव्र वेदना सुरू होणं आणि ते डाव्या हातापर्यंत जाणं. हे पुरुषांमध्ये अतिशय सामान्यपणे दिसणारं लक्षण आहे. महिलांमध्ये मात्र हार्ट अटॅकची लक्षण वेगळी आणि काहीशी सौम्य वाटणारी असतात. त्यात थकवा, श्वास अपुरा पडणं, अपचन होणं, चक्कर येणं, मळमळ अशा लक्षणांपासून जबडा दुखणे, मान आणि पाठीचा वरचा भाग दुखणे असे त्रास दिसतात. त्यामुळे महिलांमध्ये हृदयविकाराचं निदान करणं अवघड होतं."

डॉ. धेडिया सांगतात, "महिलामध्ये हृदयविकाराचा धक्का येण्याआधी तीव्र थकवा किंवा फ्लूसारखी लक्षणं अनेक दिवस किंवा आठवडे दिसू शकतात, त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. हे सगळं मेनोपॉझ, चिंता, किंवा पोटाच्या आजारांमुळे असेल असं रुग्णांना किंवा त्यांच्या घरातल्या लोकांना वाटत असतं. पण निदान करण्यास जितका उशीर होईल तितकी जोखीम वाढत जाते."

हाच प्रश्न आम्ही डॉ. ब्रजेश कुंवर यांना विचारला. डॉ. ब्रजेश नवी मुंबईतल्या अपोलो हॉस्पिटल्स येथे सिनियर कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी म्हणून कार्यरत आहेत.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "छातीमध्ये तीव्र वेदना सुरू होऊन डाव्या हातापर्यंत त्या जाणवणं हे पुरुषांमधलं अतिशय सामान्य लक्षण असलं तरीही महिलांमध्ये छातीत वेदना होणं हे लक्षण आढळतंच असं नाही. छातीत वेदना जाणवल्या नाहीत असं महिला सांगतात तेव्हा त्यांच्या इतर मळमळ, सतत थकवा जाणवणं, पोट बिघडणं, दीर्घकाळ थकवा असणं, जलद श्वास घ्यावा लागणं तसेच जबडा, मान, पाठीतल्या वेदना याची माहिती घ्यावी लागते.

ते म्हणाले एका AHA अभ्यासानुसार साधारणपणे 43 टक्के महिलांना हृदयविकाराच्या झटक्यावेळेस छातीत वेदना जाणवल्या नव्हत्या.

ते सांगतात, "पॅथोफिजिऑलॉजिकल दृष्टिकोनातून, पुरुष आणि महिलांमध्ये प्लाक्सच्या जैविक रचनेत आणि कोरोनरी शारीरिक प्रक्रियेत असलेल्या लिंगभेदामुळे काही गोष्टी स्पष्ट होतात.

"पुरुषांमध्ये बहुधा एकाच ठिकाणी अडथळा निर्माण करणाऱ्या कोरोनरी रक्तवाहिन्यांमध्ये गाठी (plaques) आढळतात, तर महिलांमध्ये सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे कार्य बिघडणे, प्लाक्स झिजणे (erosion), तरुण महिलांमध्ये अचानक कोरोनरी रक्तवाहिनी फाटणे (spontaneous coronary artery dissection), किंवा MINOCA (म्हणजेच अडथळा नसलेल्या कोरोनरी रक्तवाहिन्यांमुळे होणारा हृदयविकाराचा झटका) यासारख्या स्थिती अधिक सामान्य असतात.

या गोष्टींमुळे महिलांमध्ये लक्षणे अधिक विखुरलेली किंवा सूक्ष्म स्वरूपाची असू शकतात.

"हे भेद ओळखणे महत्त्वाचे आहे कारण महिलांमध्ये लक्षणे 'अपारंपरिक' स्वरूपाची असतात, त्यामुळे निदान उशिरा होते, उपचारात विलंब होतो आणि प्रारंभिक टप्प्यातील परिणाम अधिक गंभीर ठरू शकतात," असं ब्रजेश कुंवर म्हणाले.

2. महिलांमधील हृदयविकाराचं निदान चुकणं किंवा त्याकडे दुर्लक्ष होण्याचं प्रमाण जास्त आहे का?

महिला आणि पुरुषांमध्ये वेगवेगळी लक्षणं दिसत असल्यामुळे महिलांच्या हृदयविकाराचं निदान फार उशीरा होतं हे आतापर्यंत समजलं असेल.

पण ते किती गंभीर ठरू शकतं हे समजण्यासाठी आम्ही महिलांकडे होणाऱ्या दुर्लक्षाबाबत डॉक्टरांना प्रश्न विचारला.

डॉ. कुंवर यांनी ही चूक का होऊ शकते याची काही कारणं दिली, त्यावरुन परिस्थितीचा अंदाज येईल.

जैविक फरक-

स्त्रियांमध्ये हृदयविकाराचे लक्षणं वेगळी असू शकतात — जसे मायक्रोव्हॅस्क्युलर आजार, प्लाक इरोशन किंवा MINOCA (हृदयविकाराचा झटका पण अडथळा नसलेली कोरोनरी धमनी). या प्रकारांमध्ये ECG किंवा रक्तातील बायोमार्करमध्ये सूक्ष्म बदल होतात, जे सहज लक्षात येत नाहीत.

वैद्यकीय गृहीतके-

वर्षानुवर्षे "सामान्य" लक्षणं पुरुषांवर आधारित शिकवल्यामुळे डॉक्टरांच्या मनात एक पूर्वग्रह तयार झाला आहे, त्यामुळे स्त्रियांच्या तक्रारींना हृदयविकाराशी संबंधित मानण्याची शक्यता कमी असते.

निदान करणाऱ्या साधनांची मर्यादा-

स्त्रियांचे ECG अनेकदा अस्पष्ट असेतो आणि ट्रोपोनिन नावाच्या रक्त तपासणीत वापरले जाणारे सामान्य निकष पुरुषांवर आधारित असल्यामुळे स्त्रियांमध्ये होणारी सूक्ष्म वाढ लक्षात येत नाही.

संरचनात्मक अडचणी-

स्त्रियांना अँजिओग्राफीसाठी कमी प्रमाणात पाठवले जाते, उपचार मार्गदर्शक तत्वांचा वापर कमी होतो आणि रुग्णालयात त्यांच्यावर कमी आक्रमक उपचार केले जातात.

आरोग्य व्यवस्थेतील सामाजिक अडथळे-

स्त्रिया अनेकदा घरातील जबाबदाऱ्या सांभाळत असल्यामुळे उपचार घेण्यास उशीर करतात. आर्थिक अडचणीही त्यांना वेळेवर उपचार घेण्यापासून रोखतात.

3. मेनोपॉज किंवा गरोदरपण अशा काळातील हार्मोन बदल महिलांच्या हृदयाच्या आरोग्यावर किती परिणाम करतात?

हार्मोन्स आपल्या शरीरात अतिशय महत्त्वाच्या भूमिका पार पाडत असतात. त्यांच्या वाढीमुळे, घटण्यामुळे शरीरातील अनेक क्रिया पार पडतात किंवा त्यावर परिणाम होत असतो.

त्याचा हृदयविकाराशी कसा संबंध येतो हे विचारल्यावर डॉ. वैभव धेडिया म्हणाले, "महिलांमध्ये इस्ट्रोजेन हे हार्मोन हृदयविकाराची शक्यता कमी करण्यास आधारासारखं काम करतं. त्यामुळे मेनोपॉजपूर्व काळात हृदयविकाराचा धोका कमी संभवतो. मात्र मेनोपॉजनंतर मात्र हे कवच नाहीसं होतं. धोका वेगानं वाढतो. गरोदरपणात होणाऱ्या काही स्थिती, उदाहर्णार्थ की प्री-एक्लॅम्पसिया, गर्भकालीन मधुमेह आणि उच्च रक्तदाब, या पुढच्या काळात हृदयविकाराचा धोका वाढवू शकतात. म्हणजेच, अशा स्थिती हृदयविकाराच्या सुरुवातीच्या इशाऱ्यांपैकी एक असू शकतात."

याबाबत डॉ. ब्रजेश कुंवर सांगतात, "हॉर्मोनल बदल आयुष्यभर हृदयविकाराच्या धोक्यावर मोठा परिणाम करतात. गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या स्थिती, जसं की प्री-एक्लॅम्पसिया, गर्भकालीन मधुमेह आणि उच्च रक्तदाब या नंतर हृदयविकाराचा धोका वाढवतात. संशोधनातून दिसतं की प्री-एक्लॅम्पसिया झालेल्या महिलांना आयुष्यात इस्केमिक हार्ट डिसीज, स्ट्रोक आणि हार्ट फेल्युअरचा धोका दुप्पट किंवा त्याहून अधिक असतो. त्यामुळे गर्भधारणा ही एक नैसर्गिक 'स्ट्रेस टेस्टच' आहे, जी रक्तवाहिन्यांची संवेदनशीलता उघड करते."

ते पुढं सांगतात, "मेनोपॉजमुळे शरीरातील नैसर्गिक इस्ट्रोजेन कमी होतं, ज्याचा परिणाम कोलेस्ट्रॉल, रक्तवाहिन्यांच्या कार्यक्षमतेवर आणि रक्ताभिसरणावर होतो. लवकर मेनोपॉज झाल्यास हृदयविकाराचा धोका अधिक असतो.

PCOS, अंडाशयाची कार्यक्षमता लवकर कमी होणे आणि काही हार्मोनल उपचार यामुळे शरीरातील चयापचय बिघडतं (इन्सुलिनचा प्रतिकार, कोलेस्ट्रॉल वाढ) आणि दीर्घकालीन हृदयविकाराचा धोका वाढतो. म्हणूनच, स्त्रियांच्या गर्भधारणा आणि हार्मोनल इतिहासाची सविस्तर माहिती घेणं अत्यावश्यक आहे, कारण यावरून त्यांच्या आयुष्यभराच्या हृदयविकाराच्या धोक्याचं मूल्यांकन करता येतं आणि वेळेपूर्वी प्रतिबंधात्मक उपाय करता येतात."

4. ECG किंवा स्ट्रेस टेस्टसारखी पारंपरिक तपासण्या पुरुष आणि स्त्रियांसाठी तितक्याच प्रभावी असतात का?

याला उत्तर देताना डॉ. वैभव धेडिया सांगतात, "या तपासण्या नेहमीच प्रभावी असतात असं नाही. उदाहरणार्थ, स्त्रियांमध्ये मोठ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येण्याऐवजी सूक्ष्म रक्तवाहिन्यांतील आजार किंवा प्लाक इरोजन जास्त दिसून येतं, हे पारंपरिक अँजिओग्राफी किंवा स्ट्रेस टेस्टमध्ये स्पष्टपणे दिसत नाहीत. तसंच, ECG चाचणी स्त्रियांमध्ये इस्केमिया (रक्तपुरवठा कमी होणे) ओळखण्यात कमी संवेदनशील असते."

डॉ. ब्रजेशही असंच मत मांडतात.

ते म्हणाले, "हृदयविकाराच्या निदानासाठी वापरली जाणारी पारंपरिक साधनं स्त्री-पुरुषांमध्ये समान परिणामकारक नसतात." त्यासाठी ते या साधनांची मर्यादा काय आहे याबद्दल माहिती पुढीलप्रमाणे देतात.

ECG (विश्रांती स्थितीत): स्त्रियांमध्ये इस्केमिया (रक्तपुरवठा कमी होणे) ओळखण्यात कमी संवेदनशील, विशेषतः सूक्ष्म रक्तवाहिन्यांतील किंवा सौम्य इस्केमियामध्ये.

स्ट्रेस टेस्ट: स्त्रियांमध्ये याची विशिष्टता कमी असते यात ECG आधीच असामान्य असू शकतो आणि व्यायाम क्षमतेतही फरक असतो.

इमेजिंग स्ट्रेस टेस्ट (जसे की स्ट्रेस-इको, न्यूक्लियर परफ्युजन, CMR): यामुळे अचूकता वाढते, पण उपलब्धता सर्वत्र समान नसते.

बायोमार्कर्स (उदा. हाय-सेंसिटिव्ह ट्रोपोनिन): आरोग्यदायी स्त्रियांमध्ये याचे बेसलाइन स्तर कमी असतात. एकसारखा cutoff वापरल्यास स्त्रियांमधील सूक्ष्म पण महत्त्वाचे बदल लक्षात येत नाहीत.

डॉक्टर ब्रजेश सांगतात, "थोडक्यात सांगायचं तर या चाचण्या उपयुक्त आहेत, पण डॉक्टरांनी लिंगानुसार निकष वापरून त्याचे विश्लेषण करणे गरजेचे आहे. चाचण्या 'नॉर्मल' आल्या तरी संशय असल्यास पुढील इमेजिंग (उदा. कोरोनरी CT अँजिओग्राफी, स्ट्रेस CMR) किंवा सूक्ष्म रक्तवाहिन्यांची तपासणी करावी."

5. हृदयविकार हा 'पुरुषांचा आजार' आहे या पूर्वग्रहाचा स्त्रियांवरील निदान आणि उपचारावर काय परिणाम होतो?

स्त्रिया स्वतःच लक्षणं दुर्लक्षित करतात, जसं अपचन किंवा तणाव समजून उपचार घेण्यास उशीर करतात, असं डॉ. ब्रजेश कुंवर सांगतात. ते म्हणतात, "डॉक्टरही स्त्रियांच्या लक्षणांकडे कमी संशयाने पाहतात, त्यामुळे तातडीच्या तपासण्या कमी होतात, अँजिओग्राफीसाठी कमी रेफरल दिलं जातं आणि योग्य उपचार कमी दिले जातात."

डॉ. ब्रजेश कुंवर यांच्यामते "समाजातील हा पूर्वग्रह संशोधन आणि जनजागृती मोहिमांवर परिणाम करतो, त्यामुळे पुरुषांवरच अधिक लक्ष केंद्रित केलं जातं. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे निदानात उशीर होतो आणि उपचारही तितक्याच उशीरा होतात. याचा काही स्त्रियांवर अधिक गंभीर परिणाम होतो."

म्हणूनच या समस्या बदलण्यासाठी पुढील गोष्टी करणं गरजेचं आहे.

  • लोकशिक्षण- हृदयविकार हे स्त्रियांचा प्रमुख मृत्यू कारण आहे हे स्पष्ट सांगणं.
  • डॉक्टरांसाठी प्रशिक्षण - स्त्री-विशिष्ट लक्षणं आणि निकष समजून घेणं.
  • स्त्री-केंद्रित जनजागृती मोहिमा- स्त्रियांच्या गरजा लक्षात घेऊन जागृती मोहिमा तयार कराव्यात.

6. स्त्रियांना हृदयविकाराच्या उपचारांमध्ये समतोल आणि योग्य सेवा मिळावी यासाठी धोरण किंवा आरोग्य व्यवस्थेच्या पातळीवर कोणते बदल आवश्यक आहेत?

हा प्रश्न डॉ. वैभव धेडिया यांना विचारल्यावर त्यांनी काही उपाय सुचवले. ते सांगतात,

  • क्लिनिकल ट्रायल्समध्ये स्त्रियांचा सक्तीने समावेश करणे.
  • लिंगानुसार वेगवेगळ्या उपचार मार्गदर्शक तत्त्वांची निर्मिती.
  • डॉक्टर आणि आरोग्यसेवकांसाठी स्त्री-विशिष्ट प्रशिक्षण.
  • स्त्रियांच्या हृदयविकार संशोधनासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करणे.
  • इलेक्ट्रॉनिक आरोग्य नोंदींमध्ये गर्भधारणा आणि मेनोपॉजचा विचार हृदयविकाराच्या जोखमीच्या मूल्यांकनात समाविष्ट करणे.

7. स्त्रियांच्या मानसिक आरोग्य आणि भावनिक तणावाचा हृदयविकाराच्या धोक्याशी काय संबंध आहे? हा मुद्दा उपचारांमध्ये किती लक्षात घेतला जातो?

मानसिक आरोग्य आणि भावनिक तणावाचा स्त्रियांच्या हृदयविकाराच्या धोक्याशी स्पष्ट संबंध आहे, असं डॉ. ब्रजेश कुंवर सांगतात.

ते सांगतात, " डिप्रेशन, चिंता, जबाबदाऱ्यांचा ताण आणि आर्थिक अडचणी यांचा हृदयाच्या आरोग्यावर मोजता येण्याजोगा परिणाम होतो आणि हे स्त्रियांमध्ये अधिक तीव्र असू शकते. संशोधनातून दिसतं की डिप्रेशन आणि दीर्घकालीन तणाव यामुळे कोरोनरी आजार वाढतो आणि हृदयविकारानंतरचा परिणामही अधिक गंभीर असतो. स्त्रियांमध्ये डिप्रेशन आणि तणावाचे प्रमाण जास्त असते, त्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. तणावामुळे काही विशिष्ट आजार होऊ शकतात, उदाहरणार्थ टाकोत्सुबो कार्डिओमायोपॅथी (तणावामुळे होणारा हृदयविकार) हे स्त्रियांमध्ये अधिक दिसून येते. तणावामुळे सूक्ष्म रक्तवाहिन्यांमध्ये बिघाड होण्याची शक्यता वाढते."

ते म्हणतात, "मन आणि हृदय यांचा परस्पर संबंध लक्षात घेता, मानसिक आरोग्य तपासणीही आवश्यक आहे. यामुळे लक्षणं वेळेवर समजतात, उपचारांमध्ये सातत्य राहतं आणि परिणाम चांगले होतात. तसंच मानसिक आरोग्य लक्षात घेणं हे प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक दोन्ही दृष्टिकोनातून फायदेशीर ठरू शकतं."

जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात, उपचारात, औषधांमध्ये बदल करायचा असेल तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांची आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे. आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)