सैंधव मिठाचा हृदय आणि मेंदूवर काय परिणाम होतो?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, आनंद मणि त्रिपाठी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
सैंधव मीठ एक नैसर्गिक खनिज आहे. समुद्री मिठाप्रमाणे ते समुद्रातून नाही, तर खडकांमधून, डोंगरांमधून (खनिजांच्या खाणीतून) काढलं जातं.
या मिठाचा वापर भारतात विशेषकरून उपवासात केला जातो. कारण या मिठाला 'शुद्ध' मानलं जातं.
सैंधव मिठाचा रंग पांढरा, फिकट गुलाबी किंवा निळादेखील असू शकतो.
या मिठात सोडियम क्लोराईडव्यतिरिक्त कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियमसारखी खनिजंदेखील असतात.
हे मीठ हिमालयात (भारत, नेपाळ, पाकिस्तान) सापडतं. त्यामुळेच त्याला अनेकदा 'हिमालयन पिंक सॉल्ट'देखील म्हटलं जातं.
भारतात उत्तराखंड, हिमाचल प्रदेश यांच्याबरोबरच राजस्थानातही सैंधव मिठाच्या खाणी आहेत.
'फूड अँड वाइन' या अमेरिकेतील मासिकानुसार पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील खेवडा सॉल्ट माइन ही सैंधव मिठाचा मोठा स्त्रोत आहे.
सोडियमचं प्रमाण कमी असणारं सैंधव मीठ
बाजारात सैंधव मिठाची विक्री पिंक सॉल्ट, हिमालयन सॉल्ट, लाईट सॉल्ट किंवा लो सोडियम सॉल्ट या नावानं होते.
ज्या लोकांना जास्त मीठ खाण्याची सवय असते, अशांसाठी हे मीठ फायदेशीर मानलं जातं.
हिमालयातून येणाऱ्या या मिठामध्ये तुलनात्मकरित्या सोडियमचं प्रमाण कमी असतं. तसंच मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखी खनिजं अधिक असतात.
डॉ. अनु अग्रवाल एम्समधील माजी आहारतज्ज्ञ आहेत आणि वन डायट टूडेच्या संस्थापक आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. अग्रवाल म्हणतात, "मर्यादित सैंधव मीठ मर्यादित प्रमाणात वापरल्यास आरोग्यासाठी चांगलं असू शकतं. यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखी आवश्यक खनिजं असतात. ती पचनात मदत करतात. तसंच हायड्रेशन वाढवतात आणि इलेक्ट्रोलाईट्सचं प्रमाण संतुलित करण्यास उपयुक्त ठरू शकतात."
तज्ज्ञांच्या मते मीठाबद्दलची एक साधी बाब म्हणजे, याचा संतुलित वापर करणंच योग्य असतं. चांगल्या आरोग्यासाठी लोणचं, पापड, मुरब्बा यासारख्या प्रिझर्व्ह्ड गोष्टी टाळल्या पाहिजेत. तसंच टेबल सॉल्टचा वापर कधीही करू नये म्हणजे अन्नात वरून मीठ घेऊ नये.
डॉ. अदिती शर्मा, वरिष्ठ सल्लागार आहार तज्ज्ञ आणि एसएपी डाएट क्लिनिकच्या संस्थापक आहेत.
डॉ. शर्मा म्हणतात, "ज्याप्रकारे आपण कपडे बदलून वापरतो आणि जेवणात बदल करत असतो. त्याचप्रकारे मीठदेखील बदललं पाहिजे. सोडियमचं प्रमाण कमी असल्याच्या नावानं बेछूटपणे सैंधव मीठाचा वापर करणं आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतं."
सैंधव मिठाचा शरीरावर काय परिणाम होतो?
सोडियम हा कोणत्याही मिठातील सर्वात महत्त्वाचा घटक असतो. ते आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतं.
शरीरात पाण्याचं योग्य प्रमाण राखण्यापासून ते ऑक्सिजन आणि इतर पोषक घटक शरीराच्या सर्व अवयवांपर्यंत पोहोचवण्यात सोडियम उपयुक्त असतं.
सोडियममुळे आपल्या नसांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण होतो. मात्र मीठ कमी प्रमाणात किंवा मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो.

याबाबत डॉ. अनु अग्रवाल म्हणतात की, संतुलन खूप महत्त्वाचं असतं. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यामुळे शरीराच्या अनेक अवयवांना अपाय होऊ शकतो.
त्या म्हणतात, "सैंधव मिठात आयोडिन अजिबात नसतं. हीच या मिठातील सर्वात मोठी उणीव आहे. आयोडिनच्या कमतरतेमुळे गलगंड होऊ शकतो."
"त्याशिवाय उच्च रक्तदाब, वॉटर रिटेंशन आणि थायरॉईडसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचा चयापचयावर देखील परिणाम होतो," असंही त्या नमूद करतात.

फोटो स्रोत, Getty Images
हृदय: पांढऱ्या मिठाच्या तुलनेत सैंधव मिठात सोडियम कमी प्रमाणात असतं, मात्र ते मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे या मिठाचं जास्त सेवन केल्यामुळे रक्तदाब वाढतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्यापासून ते हृदयाच्या इतर समस्या किंवा आजार होण्याची शक्यता वाढते.
मूत्रपिंड: सैंधव मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे मूत्रपिंडावरील ताण वाढतो. शरीरातील हे अतिरिक्त पाणी उत्सर्जित करण्यासाठी मूत्रपिंडाला अधिक श्रम करावे लागतात. त्यामुळे शरीरात सूज येणं किंवा एडिमाची समस्या निर्माण होऊ शकते.
मेंदू: आयोडिनच्या कमतरतेमुळे मज्जातंतूंच्या संदेशांचे योग्य प्रकारे वहन होत नाही. त्यामुळे स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता कमी होते.
हार्मोन: प्रदीर्घ काळ सैंधव मिठाचं सेवन केल्यामुळे टी 3 आणि टी 4 हार्मोनची कमतरता निर्माण होऊ शकते.
सैंधव मीठ किती आणि कसं खावं?
जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ), निरोगी लोकांना दररोज 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ खाण्याचा सल्ला देते. 5 ग्रॅम म्हणजे जवळपास एक चमचाभर मीठ.
ऑस्ट्रेलियातील जॉर्ज इन्स्टिट्यूट ऑफ ग्लोबल हेल्थनुसार, भारतीय लोक दररोज 11 ग्रॅम मीठ खातात. म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनं सूचवलेल्या प्रमाणापेक्षा दुप्पट प्रमाणात मीठ खातात.
आयसीएमआरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजीच्या वैज्ञानिकांच्या मते, भारतात जास्त प्रमाणात मीठ खाण्यात येत असल्यामुळे त्यातून एक 'छुप्या महामारी'ला चालना मिळते आहे.
अभ्यासातून असं आढळून आलं आहे की, शहरी भागातील भारतीय लोक दररोज सरासरी 9.2 ग्रॅम मीठ खातात, तर ग्रामीण भागात दररोज सरासरी 5.6 ग्रॅम मिठाचं सेवन केलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
आहारतज्ज्ञ डॉ. अनु अग्रवाल म्हणतात, "शरीरात कोणत्याही गोष्टीचं प्रमाण जास्त किंवा कमी होणं अपायकारक असतं. मीठ देखील त्यापैकी एक गोष्ट असते."
"अलीकडच्या काळात पॅकेज्ड फूड खाण्याचं प्रमाण वाढलं आहे. तसंच पदार्थ जास्त चविष्ट असावा या इच्छेमुळे खाद्यपदार्थांमधील मिठाचा वापर वाढला आहे. अशावेळी आहारात आयोडिन योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी घरातील जेवणात सामान्य प्रमाणात मिठाचा वापर करावा."
"पापड, लोणचं, चटणी किंवा दही यामध्ये आपण जे अधिकचं मीठ टाकतो, त्यात सैंधव मिठाचा वापर करावा. त्यामुळे संतुलन साधलं जातं."
"सैंधव मीठ सातत्यानं खाता कामा नये. त्याचा वापर डॉक्टरच्या सल्ल्यानंच केला पाहिजे. तुम्हाला जर काही विशिष्ट आजार असले, तेव्हाच हे मीठ खायला हवं. कारण हे मीठ खाल्ल्यामुळे तुमच्या आहारातील पोटॅशियमचं प्रमाण वाढू शकतं," असंही डॉ. अग्रवाल नमूद करतात.
सैंधव मीठ असतं डिटॉक्सिफाय
सैंधव मिठाला हॅलाइटदेखील म्हणतात. कारण त्याचा वापर फक्त स्वयंपाकघरापुरताच मर्यादित नाही. त्याचा वापर डिटॉक्सिफायरच्या रुपातदेखील केला जातो.
पचन सुधारण्यापासून आणि घशातील खवखव कमी होण्यापासून ते त्वचेचं आरोग्य सुधारण्यापर्यंत आणि स्नायूंमधील वेदना कमी होण्यापर्यंत, सैंधव मीठ हा अनेक गोष्टींमध्ये उपयुक्त ठरणारा नैसर्गिक उपाय आहे.
मलेशियातील आहार तज्ज्ञ सोंग यिन वा म्हणतात, "सैंधव मीठ डिटॉक्सिफायरचं कामदेखील करतं. सैंधव मीठ गरम पाण्यात मर्यादित प्रमाणात घेतल्यास त्यामुळे पचनक्रिया सुधारून आतड्यांमधील विषारी घटक बाहेर टाकले जातात."
"जर हे मीठ पाण्यात टाकून त्या पाण्यानं आंघोळ केली तर ते त्वचेतील छिंद्र मोकळी करून त्यातून विषारी घटक बाहेर टाकतं. तसंच रक्ताभिसरणदेखील सुधारतं."

फोटो स्रोत, Getty Images
सोंग यिन वा पुढे म्हणतात की, सैंधव मिठात असलेल्या मॅग्नेशियम आणि सल्फरसारखी सूक्ष्म खनिजं नैसर्गिक डिटॉक्स प्रक्रियांमध्ये उपयुक्त असतात. ते पीएचचं प्रमाण संतुलित करण्यास मदत करतात. सेवन करून किंवा बाह्य रुपानं वापरून सैंधव मीठ डिटॉक्सिफिकेशन अधिक चांगल्या प्रकारे करू शकतं.
सैंधव मीठ मध, नारळ पाणी किंवा दह्यामध्ये टाकून नैसर्गिक फेस किंवा बॉडी स्क्रब म्हणून देखील वापरलं जातं. ते त्वचेवरील मृतपेशी हटवून त्वचेचं आरोग्य सुधारतं.
सैंधव मिठाची वाफ ॲलर्जी, सर्दी किंवा श्वसनाच्या जुन्या समस्यांमध्ये फायदेशीर ठरू शकतं. यामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











