पाकिस्ताननं अण्वस्त्रांचा साठा कुठे लपवलाय? अमेरिकन रिपोर्टमुळे माहिती उघड

अण्वस्त्र

फोटो स्रोत, Getty Images

पाकिस्तानकडे सध्या एकूण 170 अण्वस्त्रं (वॉरहेड) असून, ती विशेष लष्करी तळांवर ठेवण्यात आल्याची माहिती अमेरिकेच्या सर्वोच्च अणु शास्त्रज्ञांनी दिलीय.

पाकिस्तान याच वेगानं अण्वस्त्रांचा साठा वाढवत राहिल्यास 2025 पर्यंत त्यांच्याकडील अण्वस्त्रांची संख्या 200 पर्यंत पोहोचू शकते.

अण्वस्त्र वाहून नेणारी कमी आणि लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रं देशाच्या कोणत्या भागात ठेवण्यात आली आहेत, याची माहिती 11 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘बुलेटिन ऑफ द अॅटॉमिक साइंटिस्ट्स’मध्ये देण्यात आलीय.

अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेली क्षेपणास्त्रं आणि त्यांचं मोबाईल लाँचर्स इस्लामाबादच्या पश्चिमेकडील काला चिट्टा दाहर पर्वतरांगात असलेल्या नॅशनल डिफेन्स कॉम्प्लेक्समध्ये विकसित केलं जात आहेत.

उपग्रह छायाचित्र दर्शवितं की या कॉम्प्लेक्सचे दोन भाग आहेत. पश्चिम भागात क्षेपणास्त्रं आणि रॉकेट इंजिनं विकसित, उत्पादित आणि चाचणी केली जातात.

फतेह जंगच्या ईशान्येकडील भागात असताना, रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रान्सपोर्टर इरेक्टर लाँचर्सचे (टीईएल) पुरावे सापडले आहेत.

जून 2023 च्या फोटोमध्ये नस्र, शाहीन-1ए बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि बाबर क्रूझ क्षेपणास्त्रासाठी बनवलेल्या ट्रान्सपोर्टर इरेक्टर लाँचर्सची चेसिज देखील इथं आहे.

बॅलिस्टिक क्षेपणास्त्र

अहवालानुसार, पाकिस्तानकडे सध्या कार्यक्षम सहा अण्वस्त्र बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहेत, ज्यांचा त्वरित वापर केला जाऊ शकतो.

यामध्ये कमी पल्ल्याच्या अब्दाली (हत्फ-२), गझनवी (हत्फ-3), शाहीन-आय/ए (हत्फ-4) आणि नस्र (हत्फ-9) आणि मध्यम श्रेणीतील घौरी (हत्फ-5) आणि शाहीन-2 ( हत्फ-6) यांचा समावेश आहे.

बाबर मिसाईल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बाबर मिसाईल

आणखी दोन अण्वस्त्र सक्षम बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केल्या जात आहेत. यात मध्यम पल्ल्याच्या शाहीन-3 आणि MIRVED अबाबिल यांचा समावेश आहे.

अब्दाली, घौरी, शाहीन-2 आणि अबाबील वगळता सर्व आण्विक सक्षम क्षेपणास्त्रं 2021 च्या पाकिस्तान डे परेडमध्ये प्रदर्शित करण्यात आली आहेत.

2022 च्या पाकिस्तान डे परेडमध्ये नस्र, घौरी, शाहीन-1A सोबत बाबर-1A आणि राड-2 प्रदर्शित करण्यात आलं.

गेल्या दोन दशकांत, रस्ते मार्गानं घेऊन जाता येतील, अशा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसाठी प्रक्षेपकांच्या संदर्भात खूप विकास आणि विस्तार झाला आहे.

आण्विक क्षेपणास्त्रं कुठे ठेवण्यात आली आहेत?

बुलेटिन ऑफ द अॅटोमिक सायंटिस्टच्या अहवालात असंही म्हटलं आहे की, संपूर्ण पाकिस्तानमध्ये क्षेपणास्त्रांचा साठा 8-9 ठिकाणी तयार करण्यात आला आहे, ज्यात भारतीय सीमेलगतच्या भागात कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रं (बाबर, गझनवी, शाहीन-1, नस्र) 4-5 ठिकाणी ठेवण्यात आली आहेत.

अण्वस्त्रांसाठीची स्पर्धा

फोटो स्रोत, AFP

देशाच्या अंतर्गत भागात तीन ते चार लष्करी तळ आहेत, जिथे मध्यम श्रेणीची क्षेपणास्त्रं (शाहीन-2 आणि घौरी) ठेवण्यात आली आहेत.

अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्रांसाठी पाकिस्तानकडे किती तळ आहेत, हे निश्चितपणे सांगता येणार नाही, असं या अहवालात लिहिलं आहे. पण व्यावसायिक उपग्रहांच्या छायाचित्रावरून दिसून येतं की, पाकिस्तानकडे अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेले किमान पाच क्षेपणास्त्र तळ आहेत.

मात्र, 2016 पासून त्यांच्या संख्येत फारसा बदल झालेला नाही, असं अहवालात म्हटलं आहे.

या पाच क्षेपणास्त्र तळांची यादी खालीलप्रमाणे :

1) आक्रो मिलिटरी बेस

हे सिंध प्रांतातील हैदराबादच्या उत्तरेस 18 किलोमीटर आणि भारतीय सीमेपासून 145 किलोमीटर अंतरावर आहे.

इथं सहा क्षेपणास्त्र गॅरेज आहेत, जे 12 प्रक्षेपकांसाठी तयार केले आहेत.

मिसाईल

फोटो स्रोत, Getty Images

या लष्करी तळाचा विस्तार 2004 पासून सुरू आहे. उपग्रह छायाचित्रांमध्ये दिसलेल्या वाहनांच्या विश्लेषणावरून असं दिसून येते की पाच-अॅक्सल वाले ट्रान्सपोर्टर हे इरेक्टर लाँचर बाबर क्रूझ क्षेपणास्त्र शस्त्र प्रणालीसाठी आहेत.

बाबरची फायर रेंज 450 ते 700 किलोमीटर आहे. ते समुद्राखालून प्रक्षेपित करण्यासाठी पाकिस्तानही लाँचर बनवत आहे.

2) गुजरांवाला लष्करी तळ

गुजरांवाला मिलिट्री बेस हे पाकिस्तानचे सर्वात मोठे लष्करी संकुल आहे. हे पंजाब प्रांताच्या ईशान्य भागात 30 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेलं आहे.

भारतीय सीमेपासून त्याचं अंतर 60 किलोमीटर आहे.

क्षेपणास्त्र

फोटो स्रोत, Getty Images

उपग्रह प्रतिमांमध्ये दिसणारं क्षेपणास्त्र प्रक्षेपक दर्शवतात की, ते कमी पल्ल्याच्या नस्र क्षेपणास्त्रांसाठी आहेत.

नस्र क्षेपणास्त्राची पल्ला 60 किलोमीटर आहे.

3) खुझदार

बलुचिस्तान प्रांतातील सक्करपासून पश्चिमेला सुमारे 220 किलोमीटर अंतरावर हा क्षेपणास्त्र तळ आहे. भारतीय सीमेपासून सर्वात दूर असलेल्या क्षेपणास्त्र तळांपैकी हा एक आहे.

आक्रो प्रमाणेच इथं अण्वस्त्र साठवण्यासाठी भूमिगत गोदामं बांधण्यात आली आहेत.

उपग्रह छायाचित्रांमध्ये दिसणारे प्रक्षेपक असं सूचित करतात की हे अण्वस्त्र सक्षम घौरी किंवा शाहीन-2 क्षेपणास्त्रासाठी आहेत.

4) पानो अकिल

सिंध प्रांतातील भारतीय सीमेपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या या लष्करी तळावर लाँचर्सचे गॅरेज आणि टीइएल (transporter erector launcher ) दिसतात.

ही बाबर आणि शाहीन-१ क्षेपणास्त्रे असल्याचे या चित्रांवरून दिसून येते.

5) सरगोधा

1983 ते 1990 दरम्यान, पाकिस्तानने किराणा हिल्समध्ये असलेल्या या विशाल कॉम्प्लेक्सचा न्यूक्लियर प्रोग्रामसाठी वापर केला.

10 टीइएल गॅरेज आणि इतर दोन गॅरेज आहेत जी देखभालीसाठी वापरली जात आहेत.

जमीन आणि समुद्रातून लाँच केली जाणारी क्षेपणास्त्रं

बाबर (हत्फ-7) हे अमेरिकेच्या टॉमहॉक क्षेपणास्त्रासारखं आहे ज्याचा वेग आवाजापेक्षा कमी आहे. हे समुद्रातून मारा करणारं क्रूझ क्षेपणास्त्र आहे.

बाबर-1 क्षेपणास्त्राची रेंज जमिनीवरून 600 ते 700 किलोमीटर इतकी आहे. पण, अमेरिकन गुप्तचर संस्थांनी त्याची रेंज 350 किलोमीटर असल्याचा अंदाज व्यक्त केला होता.

बाबर-2 ची रेंज 700 किलोमीटर असल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. बाबर-3 चीही हीच श्रेणी आहे परंतु ते समुद्रातून लाँच करण्यासाठी विकसित करण्यात आलं आहे.

बाबर-३ हे पाकिस्तानच्या खान, पांडा आणि नारंग या तीन पाणबुड्यांमध्ये तैनात असेल. नवीन पाणबुड्या तैनात करण्यास विलंब होत असला तरी त्यामध्ये अण्वस्त्रधारी बाबर-3 क्षेपणास्त्र तैनात करणं शक्य आहे.

यासोबतच पाकिस्तान बाबर क्रूझ क्षेपणास्त्रांचं प्रतिरूप ‘हरबा’ हे विकसित करत आहे. हे 2022 मध्ये लढाऊ जहाजांमध्येही तैनात करण्यात आलं आहे.

पाकिस्तानच्या प्रवक्त्यानं ‘हरबा’चं वर्णन सर्व हवामानात सक्षम सबसॉनिक क्षेपणास्त्र म्हणून केलं होतं. त्याची रेंज 290 किलोमीटर आहे.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)