विंटर ब्लूज नेमके काय आहे? त्याचा सामना कसा करायला हवा? वाचा

कल्पना करा की तुम्ही अशा ठिकाणी असाल ज्याठिकाणी तापमान शून्य अंशाच्याही खाली असेल, अनेक महिने सकाळ होणार नाही आणि प्रकाशाचा किरणही तुम्हाला अनेक महिने पाहायला मिळणार नाही.

भारतात राहून असा विचारही थरकाप उडवणारा ठरतो. पण स्वीडनमधील एबिस्को हे लहानसं गाव काहीसं असंच आहे. उत्तर स्वीडनमध्ये वसलेलं हे गाव आर्क्टिक सर्कलपासून जवळपास दोनशे किलोमीटर उत्तरेला आहे.

इथं लोक तापमान शून्य अंशाच्या खाली गेल्यानंरतही दीर्घकाळ अंधारात राहतात. अनेक महिने याठिकाणी सूर्य उगवत नाही. एबिस्कोमध्ये हिवाळा सर्वाधिक काळ असतो.

इथं ऑक्टोबर महिन्यापासून सूर्यदर्शन बंद होतं. नंतर पुढं चार महिने इथं तशीच परिस्थिती असते. नंतर पुन्हा फेब्रुवारी महिन्यात सूर्य पुन्हा दिसतो.

इथं राहणाऱ्या लोकांच्या जीवनावर याचा खूप परिणाम होतो. त्यांचा मूड आणि उत्साह किंवा एनर्जी लेव्हरवरही याचा परिणाम होतो. लोकांना घराबाहेर पडण्याची इच्छा नसते.

सूर्यप्रकाश दिसला नाही तर शरिरात काय होते?

बीबीसी रीलशी बोलताना याचं कारण सांगताना स्टॉकहोम युनिव्हर्सिटीतील स्लीप रिसर्चर अर्नो लॉडेन म्हणाले की, मनुष्य हा एक डायूरनल प्राणी आहे.

सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास दिवसा अधिक सक्रिय राहण्यासाठी आणि रात्रीच्या वेळी झोपण्यात ते मदत करतं.

ते म्हणाले, "आपल्या शरिराचं एक घड्याळ (बॉडी क्लॉक) असतं. आपल्या शरिराला बाह्य जगाच्या प्रकाशानुसार अॅडजस्ट होण्यासाठी रोज काही ठरावीक प्रकाशाची आवश्यकता असते."

मेलोटोनिन एक प्रकारचं हार्मोन आहे. त्याला अंधाराचं हार्मोन म्हटलं जातं. या हार्मोनमुळं आपल्याला झोप येते. झोपेची जाणीव होऊ लागते, सूर्याचा प्रकाश आपल्या मेंदूला मेलाटोनिनचं उत्पादन थांबवण्याचा संदेश देतो.

संशोधक अर्नो लॉडेन म्हणतात की, मेलोटोनिन सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास अॅक्टिव्ह होतं. तर मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास झोपलेलं असताना उच्चांकी पातळीवर असतं. सकाळ होताच सूर्याच्या प्रकाशानं या हार्मोनची निर्मिती थांबते आणि झोप पूर्ण होते."

सूर्याचा प्रकाश न मिळाल्यास आपल्या शरिराचं अंतर्गत बॉडी क्लॉकही बिघडतं आणि बाह्य जगाशी आपला ताळमेळ बिघडतो.

सूर्यप्रकाश आणि नैराश्य

'द लायटिंग रिसर्च सेंटर' च्या मारियाना फिग्युरो म्हणाल्या की, अनेक लोक हिवाळ्यात मोठ्या रात्री आणि लहान दिवस याच्याशी जुळवून घेण्यात अपयशी ठरतात.

याचं कारण सांगताना त्या म्हणाल्या की, याबाबत अनेक सिद्धांत मांडले जातात. त्यापैकी एक म्हणजे, दिवसाच्या वेळी आपल्या शरिराला पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश मिळत नाही.

त्यामुळं अनेक लोक नैराश्याचे शिकार ठरतात. काही लोकांना कार्बोहायड्रेटची अधिक इच्छा निर्माण होते आणि त्यामुळं त्यांचं वजन वाढतं. मारियाना यांच्या मते, याला सिझनल इफेक्टिव्ह डिसऑर्डर किंवा विंटर ब्लूज म्हटलं जातं.

सूर्याचा प्रकाश अत्यंत महत्त्वाचा असतो असं दिल्लीतील मॅक्स सुपर स्पेशालिटीमध्ये मेंटल हेल्थ विभागाचे संचालक डॉ.समीर मल्होत्रा म्हणाले.

बीबीसी हिंदीसाठी फातिमा फरहीन यांच्याशी बोलताना डॉ.मल्होत्रा म्हणाले की, "आपल्या मेंदूच्या आत एक असा भाग आहे ज्याला हायपोथॅलेमस म्हणतात. हे आपल्या शरिराच्या आतील एक घड्याळ आहे. ते बाहेरच्या काळाबरोबर आपल्या शरिराचं संतुलन करत असते.

"बाहेर जास्त अंधार झाला तर आपल्याला डोळ्याच्या माध्यमातून हवा तेवढा प्रकाश मिळत असतो. अशा परिस्थितीत जे लोक संवेदनशील असतात, त्यांच्या मूडमध्ये बदल होण्याची शक्यता असते. त्याला सिझनल इफेक्टिव्ह डिसऑर्डर नाव देण्यात आलं आहे."

दिल्लीतील ज्येष्ठ डॉक्टर शेख अब्दुल बशीर म्हणतात की, अशा प्रकारची जास्त प्रकरणं उत्तर युरोप आणि उत्तर अमेरिकेतच पाहायला मिळतात.

फातिमा फरहीन यांच्याशी बोलताना डॉ.बशीर म्हणाले की, "भारतात अशाप्रकारची स्थिती नसते. त्यामुळं याठिकाणी शक्यतो विंटर ब्लूजची प्रकरणं शक्यतो कधीही आढळत नाहीत. फक्त पावसाळ्याच्या काळात काही प्रकरणं पाहायला मिळतात."

त्यांच्या मते, सिझनल इफेक्टिव्ह डिसऑर्डरबद्दल बोलायचं झाल्यास, यातही सर्व नैराश्याची लक्षणं असतात.

याची मुख्य लक्षणं सांगताना डॉ.बशीर म्हणतात की, लोक उदास राहायला लागतात, त्यांचं कशातही मन लागत नाही. लोक जीवनात आनंदी राहायचं विसरतात, भूक कमी लागते, लोकांमध्ये सेक्सची इच्छा कमी होते.

आपल्याला सूर्याचा किती प्रकाश गरजेचा असतो?

आमच्या हे लक्षात आलं की, सूर्याचा प्रकाश न मिळाल्यानं आपल्या शरिरावर याचा वाईट परिणाम होतो. वैद्यकीय भाषेत त्याला विंटर ब्लूज म्हटलं जातं.

पण यामुळं असा प्रश्न निर्माण होतो की, विंटर ब्लूजपासून वाचण्यासाठी एका दिवसात आपल्याला नेमक्या किती प्रकाशाची गरज असते.

प्रोफेसर लॉडेन यांच्या मते, ही गरज प्रत्येकासाठी वेगवेगळी असते. पण साधारणपणे असं म्हटलं जातं की, आपल्या शरिराला रोज किमान 20 मिनिटं चांगला सूर्यप्रकाश मिळायला हवा. तोही सकाळच्या वेळी.

मरियाना म्हणाल्या की, आपण एक-दोन तासासाठी घराबाहेर निघायला हवं. ते शक्य नसेल तर घराच्या खिडकीजवळ बसायला हवं. तेही शक्य नसेल तर आपण घरात जिथं बसतो त्याच्या जवळपास असलेला टेबल लँप सुरू करून जास्तीत जास्त प्रकाशाचा वापर करायला हवा.

पण हे सर्व अशाठिकाणी शक्य आहे जिथं उन्ह असतं. जर तुम्ही जगाच्या अशा कोपऱ्यात असाल जिथं अनेक महिने सूर्यच उगवत नसेल तर अशा ठिकाणी काय करायला हवं?

या प्रश्नावर डॉ. बशीर म्हणाले की, एक सोपा मार्ग हा आहे की, तुम्ही हवामान बदलण्याची वाट पाहावी. पण काही देशांमध्ये तर सहा-सहा महिने सूर्यप्रकाशच दिसत नाही.

डॉ.बशीर यांच्या मते, शक्य तेवढा व्यायाम करायला हवा. चांगला संतुलित आहार आणि चांगली झोप घ्यायला हवी. त्याशिवाय ते ध्यानधारणा करण्याचाही सल्ला देतात. साधारणपणे हिवाळ्यात लोक फार कमी पाणी पितात. पण लोकांनी हिवाळ्यातही भरपूर पाणी प्यायला हवं, असंही ते सांगतात.

ते म्हणतात की, याचा सामना करणाऱ्या लोकांनी छंदासाठी वेळ द्यायला हवा. तसंच मित्रांबरोबर जास्त वेळ घालवायला हवा.

स्कॅनडिनेवियन देशांमध्ये लोकांनी यावर एक उपाय शोधलाय. तिथं लोकांना लाइट थेरपी दिली जाते. घराच्या आतच आर्टिफिशियल सन रूम (Sun Room) तयार केली जाते. त्यामुळं लोकांना विंटर ब्लूजचा सामना करण्यासाठी मदत मिळते. पण आतापर्यंत आर्टिफिशियल लाइट थेरपी किती प्रभावी आहे, हे समजू शकेल असा काहीही वैज्ञानिक आधार समोर आलेला नाही.

कदाचित त्यामुळंच फेब्रुवारीमध्ये जेव्हा पुन्हा सूर्य उगवतो तेव्हा स्वीडनच्या एबिस्को गावात लोक डोंगरांवर जाऊन प्रकाशाचं स्वागत करत त्याचा उत्सव साजरा करतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)