पावभाजीमुळं असा फसला डाव, दोन कोटींच्या दरोड्याचं गूढ उलगडण्यात पोलिसांना आलं यश

    • Author, इम्रान कुरेशी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

फारुख अहमद मलिक हा सोन्याचा व्यापार करायचा. त्याच्यावर 40 लाख रुपयांचं कर्ज होतं, ते त्याला फेडायचं होतं.

त्यासाठी त्यानं एक योजना आखली आणि ती पूर्णत्वासही नेली.

पण एका पावभाजीनं त्याचा हा दरोड्याचा डाव उघड केला.

पोलिसांनी दिलेला माहितीनुसार, हे कर्ज फेडण्यासाठी त्यानं दुसऱ्या एका सोन्याच्या व्यापाऱ्याला लुटण्याची योजना आखली होती.

त्यानं एक टोळी तयार केली होती, त्यातील साथीदार कर्नाटकातील कलबुर्गी शहरात मुथुल्ला मलिकच्या दागिन्यांच्या दुकानात दरोडा टाकण्यासाठी तयार झाले.

दरोडा कसा टाकला?

या टोळीत एकूण पाच जण होते. ही घटना घडण्यापूर्वी त्यांनी आपसांत चर्चा केली आणि स्वतःची ओळख लपवण्यासाठी चौघांनी आपले चेहरे पूर्णपणे झाकून घेतले आणि ते दुकानात घुसले.

त्यांनी मुथुल्ला मलिक यांना घाबरवण्यासाठी पिस्तुलासारख्या दिसणाऱ्या लायटरचा वापर केला.

त्यांनी त्याचे हात आणि पाय दोरीनं बांधले, दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले आणि सुमारे 2 कोटी 15 लाख रुपयांचं सोनं आणि दागिने ते घेऊन गेले.

मुथुल्ला मलिक यांनी पोलीस तक्रारीत सांगितलं की, 11 जुलै रोजी दुपारी 12.15 वाजता चार जण त्यांच्या दुकानात घुसले आणि त्यापैकी एकानं त्यांच्या डोक्यावर बंदूक रोखली, दुसऱ्यानं त्यांच्या मानेवर चाकूनं ठेवून त्यांना धमकावलं आणि तिसऱ्यानं सीसीटीव्हीच्या तारा कापून टाकल्या.

त्यांनी मुथुल्ला मलिक यांच्याकडे लॉकरच्या चाव्या मागितल्या. नंतर त्यांचे हात-पाय बांधले, त्यांच्या तोंडात कापड कोंबलं आणि तोंडावर टेप चिटकवला.

तक्रारीच्या आधारे, कलबुर्गी पोलिसांनी चोरांचा शोध घेण्यासाठी पाच पथकं तयार केली.

तपासादरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्यांना दुकानात फक्त चार लोक घुसल्याचं आढळलं, परंतु सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुकानाबाहेर पाच लोक दिसत होते.

या पाचव्या व्यक्तीचा मोबाईल नंबर सापडत नव्हता. तर चार जणांनी त्यांचे मोबाईल फेकून दिले होते.

पोलिसांना सुगावा कसा लागला?

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं तेव्हा त्यातील एक व्यक्ती पावभाजीच्या दुकानात उभा असल्याचं दिसून आलं. तिथून त्याचा नंबर सापडला.

हा पाचवा व्यक्ती संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला सोनार होता.

दुकानात घुसलेल्या चौघांच्या मोबाईल नंबरची पोलिसांनी चौकशी सुरू केली.

चौकशीत असं आढळून आलं की, अयोध्या प्रसाद चौहान हा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे पण तो मुंबईत फूटपाथवर कपडे विकतो.

सुहेल मोबाईल चोरीसारख्या छोट्या गुन्ह्यांमध्ये सहभागी होता आणि तो मुंबईचा आहे. फारुख मलिक मूळचा पश्चिम बंगालचा आहे, पण तो कलबुर्गीमध्ये व्यवसाय करातो. अरबाज आणि साजिद हे स्थानिक रहिवासी आहेत.

चौकशीदरम्यान असं आढळून आलं की, फारुख मलिक दागिन्यांच्या दुकानात शिरला नव्हता. दरोड्याच्या वेळी तिथून पळून गेलेला तो पाचवा व्यक्ती होता. परंतु टोळीतील इतर सदस्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यानंच पोलिसांना महत्त्वाचे संकेत दिले.

कलबुर्गीचे पोलीस आयुक्त डॉ. एस. शरणप्पा यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं की, "घटनेच्या वेळी फारूक मलिक यांनी वेगळा मोबाईल फोन वापरला होता. पण पावभाजीचे पैसे देताना त्यांनी वेगळा नंबर वापरला होता. हा आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा संकेत ठरला."

ते म्हणाले, "आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, हा गुन्हा चार जणांनी केला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार जण दुकानात प्रवेश करताना आणि बाहेर पडताना दिसत होते. आम्हाला आढळून आलं की, पाचवा व्यक्ती दागिन्यांच्या दुकानात शिरला नव्हता आणि तो फारुख मलिक होता."

चोरीला गेलेल्यापेक्षा जास्त सोने सापडले

पोलिसांनी संपूर्ण 2.8 किलो सोनं आणि इतर दागिने जप्त केले. पण यानंतर मुथुल्ला मलिकची एक वेगळीच कहाणी समोर आली.

त्यानं पोलिसांकडे तक्रार केली होती की, फक्त 850 ग्रॅम सोनं चोरीला गेलं आहे. पण जेव्हा पोलिसांनी त्याचं खातं तपासलं तेव्हा हे आकडे जुळत नव्हते.

त्यांच्या व्यवसायाच्या कागदपत्रांमध्ये त्यांनी दोन किलो सोन्याचा कोणताही हिशोब ठेवला नसल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणी वेगळा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांना असं आढळून आलं आहे की, या संपूर्ण टोळीचे संबंध आंतरराज्यीय स्तरावर पसरले आहेत आणि त्यांच्यावर 10 ते 15 दरोड्यासंदर्भातील घटनांच्या नोंदी आहेत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.