गोवा : नाईटक्लबला भीषण आग, मृतांचा आकडा 25 वर, कर्मचाऱ्यांसह पर्यटकांचाही समावेश

गोवा आग

फोटो स्रोत, Screengrab/UGC

गोव्यातील एका नाईटक्लबमध्ये शनिवार-रविवारच्या मध्यरात्री लागलेल्या आगीमध्ये मृतांचा आकडा 25 वर पोहोचला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सकाळी सव्वानऊच्या सुमारास केलेल्या एका एक्स पोस्टमध्ये 25 जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे.

त्यापूर्वी पहाटे घटनास्थळी भेटीनंतर सावंत यांनीच 23 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं. त्यात नंतर वाढ झाली.

सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याचा पोलिसांना संशय आहे.

मृतांपैकी बहुतेक जण या क्लबचेच कर्मचारी असल्याचं मानलं जात आहे.

नॉर्थ गोव्यातील अर्पोरा भागात असलेल्या क्लबमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये काही पर्यटकांचाही समावेश आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, मृतांपैकी बहुतेक जण नाईट क्लबमधील स्वयंपाकघरात काम करणारे कर्मचारीच होते.

यामध्ये तीन महिलांचाही समावेश आहे.

पंतप्रधान मोदींकडून या घटनेवर दु:ख व्यक्त करण्यात आलं असून मदतीचीही घोषणा करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

या घटनेतील प्रत्यक्षदर्शी सुरक्षा रक्षक संजय कुमार गुप्ता म्हणतात की, "ही घटना रात्री 11 ते 12 च्या दरम्यान घडली. अचानक आग लागली... मी गेटवर होतो... एक डीजे, डान्सर इथे येणार होता आणि तिथे खूप गर्दी होणार होती..."

'एएनआय' या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची चौकशी सुरू केली आहे. सध्या जखमींना आणि पीडितांच्या कुटुंबियांना वैद्यकीय मदत आणि आधार देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, रविवारी अर्पोरा येथील एका रेस्टॉरंट-कम-क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत अनेकांचा मृत्यू झाला आहे.

गोवा आग

फोटो स्रोत, ANI

मध्यरात्रीच्या सुमारास या आगीची माहिती मिळाली आणि आपत्कालीन पथकं घटनास्थळी तातडीनं दाखल झाली.

या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, तर अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रात्रभर काम केलं.

आगीच्या कारणाचा सखोल तपास अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे.

जखमींना वैद्यकीय मदत आणि मृतांच्या कुटुंबियांना मदत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे, अशी माहिती एएनआयनं दिली आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, गोव्यातील सर्वात लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांपैकी एक असलेल्या बागा येथील 'बर्च बाय रोमियो लेन' नावाच्या क्लबमध्ये ही आग लागली.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत काय म्हणाले?

मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी भेटीनंतर पहाटे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर लिहिलंय की, "आज गोव्यासाठी खूप दुःखद दिवस आहे. अर्पोरा येथे लागलेल्या एका मोठ्या आगीच्या घटनेत 23 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे."

नंतर सकाळी सव्वानऊच्या सुमारास त्यांनी आणखी एक पोस्ट करत मृतांचा आकडा 25 असल्याचं सांगितलं.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत

त्यांनी सांगितलं की, या घडीला मी सर्व पीडित कुटुंबांना श्रद्धांजली अर्पण करतो.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, "मी घटनास्थळी गेलो आणि अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीतून आगीचं खरं कारण कळेल."

"जो कोणी जबाबदार आढळेल त्याच्यावर कायद्यानुसार शक्य तितकी कठोर कारवाई केली जाईल. कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही."

पुढे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आणखी एक ट्विट करत म्हटलंय की, "अर्पोरा येथील दुःखद आगीच्या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्याशी संवाद साधला आणि मी त्यांना सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली आहे. या कठीण काळात गोवा सरकार पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करत आहे."

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे.

'एक्स'वर त्यांनी म्हटलंय की, "गोव्यातील अर्पोरा येथील आगीची दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत जी यांच्याशी परिस्थितीबद्दल बोललो आहे. राज्य सरकार बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहे."

गोवा दुर्घटना

फोटो स्रोत, X/PMO

पंतप्रधान कार्यालयाकडून या घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्या तसेच जखमींना मदतीची घोषणा करण्यात आली आहे. पीएमओने ट्विट करत म्हटलंय की, "गोव्यातील अर्पोरा येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येकाच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये देण्यात येतील."

या दुर्घटनेवर राष्ट्रपतींनीही शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "नॉर्थ गोवामध्ये झालेल्या आगीच्या दुर्घटनेमुळे जीवितहानी झाली आहे. शोकाकुल कुटुंबांना माझ्या मनःपूर्वक संवेदना. या कठीण काळात त्यांना शक्ती मिळो. जखमी लवकर बरे व्हावेत, यासाठी मी प्रार्थना करते."

पोलिसांनी काय सांगितलं?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दरम्यान, गोव्याचे डीजीपी आलोक कुमार यांनी सांगितलं की, मध्यरात्रीनंतर पोलिसांना अलर्ट मिळाला.

ते म्हणाले की, "अर्पोरा येथील एका रेस्टॉरंट-कम-क्लबमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. रात्री 12 वाजून चार मिनिटांनी, पोलीस नियंत्रण कक्षाला आगीची माहिती मिळाली आणि पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी तातडीनं दाखल झाल्या."

"आग प्रामुख्यानं तळमजल्यावरील स्वयंपाकघराच्या परिसरात केंद्रित होती. बहुतेक मृतदेह स्वयंपाकघराभोवती आढळले होते. यावरून असं दिसून येतं की यातील मृत व्यक्ती क्लबमध्ये काम करत होत्या."

पुढे ते म्हणाले की, "आग आता नियंत्रणात आली आहे आणि सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पोलिसांकडून या घटनेमागचं कारण तपासलं जाईल आणि जे निष्कर्ष निघतील त्यावरून आम्ही कारवाई करू..."

या घटनेनंतर भाजप आमदार मायकल लोबो यांनी गोव्यातील सर्व क्लबचे सुरक्षा ऑडिट करण्याची मागणी केली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, "गोव्यातील इतर सर्व क्लबचं सुरक्षा ऑडिट करणं आवश्यक आहे. आणि हे खूप महत्वाचं आहे.

पर्यटक नेहमीच गोव्याला एक अतिशय सुरक्षित ठिकाण मानतात, परंतु आगीची घटना खूपच त्रासदायक आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत.

पर्यटक आणि या आस्थापनांमधील कामगारांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. बहुतेक लोक तळघराकडे धावत असताना गुदमरल्यामुळे मरण पावलेले आहेत."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.